आपकी
दुवासे सब ठीक-ठाक है |
गुलजार यांचे राजकारण्यांना इ उद्देशून एक जुने गीत आहे. पदवीधारकांना नोक-या नाही , चोरी ,भ्रष्टाचार यावर गुजराण होते आहे, बाजारभाव वाढलेले आहे , म्हातारी झालेली भूक अजून मरत नाही , जुन्या समस्यारूपी जेष्ठांशी कसे लढावे ? , नेत्यांची रोज नवी भाषणे असतात या भाषणांवर
मात्र काही रेशन नाही, तरी आमची म्हणजे जनतेची परिस्थिती मात्र ठीक-ठाक आहे.बी. ए. , एम.ए. केले तरी काम नाही त्यामुळे हे सर्व शिक्षण उगाचच केले असे बेरोजगार तरुणांना वाटत असते अशा आशयाचे हे गीत कालातीत आहे. 70 च्या दशकातील या गीतातील समस्यांव्यतीरिक्त इतरही अनेक नवीन समस्या आता निर्माण
झाल्या आहेत. देश पातळीवरील समस्या तूर्तास बाजूला ठेवू या. देशातील प्रत्येक खेड्यात, शहरात कितीतरी समस्या आहेत
की ज्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही लक्ष नसते. यातील सर्वात मोठी अबालवृद्धांना, गृहिणींना भेडसावणारी समस्या म्हणजे पाण्याची समस्या. आपले
खामगांव शहर सुद्धा याला अपवाद नाही , धरणात पाणी असो किंवा नसो शहरात अनेक भागांत पाण्याची समस्या कायम असतेच. कधी पंपात बिघाड, कधी पाईपलाईन फुटलेली , कधी टाक्या सफाईचे काम , तर कधी रस्ता दुरुस्तीचे काम. संबंधीताना काही विचारणा केली तर अजब उत्तरे मिळतात त्याबाबत यापूर्वी सुद्धा लिहिलेले
आहे. परंतू कितीही लिहा , शाई खर्च करा उपयोग शून्य होतो अशी प्रचिती अनेकांना आलेली
आहे. समस्येबाबत कुणी चौकशी , आपली व्यथा मांडण्यास गेले असता त्यांना एवढा मोठा अडचणींचा पाढा वाचून दाखवला जातो की त्यांची
पाण्याची अडचण जणू स्थानिक संस्थांच्या नाना
अडचणींपुढे अगदीच क्षुल्लक वाटावी. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसल्याचे स्पष्ट
जाणवते. कर्मचारी लोकप्रतींनिधींकडे तर लोकप्रतिनिधी कर्मचा-यांकडे बोट दाखवत असतात. पावसाळा सुरू झाल्यावरही काही भागांत अनेक नागरीकांना कित्येक वेळा टँकर घ्यावे लागले
आहे. रस्ता दुरूस्ती कामावेळी कंत्राटदार नगर परीषदेला सूचना देऊन पाणी पुरवठा कर्मचा-यांना कळवतो की नाही ? की थेट जेसीबीने खोदकाम सुरू
करतो ? मग पाईपलाईन फुटते. रस्ता दुरूस्ती कामामुळे पाईपलाईन फुटते तर संबंधीत कंत्राटदाराकडून दंड वसूल केला जातो की नाही देव जाणे,गेल्या कित्येक दिवसांपासून प्रामाणिक करदात्यांच्या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठयाच्या अनेक अडचणी आहेत
परंतू कुणीही त्याची दखल घेत नाही. व्यथा मांडल्यावर तर अनेकांना क्षोभ सुद्धा येतो.
काय म्हणावे याला ? नागरीक
कर भरतात त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काच्या सुविधा का देऊ शकत नाही ? ऐन सणासुदीच्या दिवसात नळ येत नाही. सध्या गणपती, महालक्ष्मी सण आहे , आणि नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. याचा सुद्धा विचार होतो की नाही गणपतीलाच ठाऊक ! पाणी पुरवठा खंडीत झाल्यावर अनेक दिवसांनी
जेंव्हा नळ सोडतात तेंव्हा सुद्धा अत्यल्प पाणी पुरवठा केला जातो व “सोडले न नळ !”
असे उपकार केल्यासारखे बोलणे सुद्धा नागरीकांना ऐकावे लागते. अनेक प्रयत्न करूनही समस्या
सुटत नाही म्हणूनच मायबाप स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना उद्देशून गीतकार, कवी गुलजार आम्हाला
अनेक समस्या आहे परंतू तरीही “आपकी दुवासे सब ठीक-ठाक है“ असे म्हणतात व 70 च्या दशकाप्रमाणे आजही हीच परिस्थिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा