मुडदे उकरु नका , सत्य समोर आणा
(टीप – शीर्षकातील मुडदे उकरणे या शब्दावरून कुणी काही गैरसमज वगैरे कृपया करून घेऊन नये , जुने वाद
, जुन्या गोष्टी, विस्मरीत गोष्टींवर पुन्हा चर्चा करणे व नवीन वाद निर्माण करणे यासाठी हिंदी भाषेत गढे मुर्दे उखाडना असा वाक्प्रचार वापरला जातो )
सुशांत राजपूत या तरुण अभिनेत्याच्या
आकस्मिक निधनांनंतर देशभरात शोक निर्माण झाला.
या घटनेचे साद-पडसाद , हत्या की
आत्महत्या ? , बिहार पोलिस
अधिका-याचे महाराष्ट्र पोलिसांनी विलगीकरण करणे , नेत्यांचे एकमेकांवर आरोप
प्रत्यारोप करणे हे सर्व देशातील जनता पाहत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हिन्दी चित्रपटसृष्टीतील
गटबाजी सुद्धा दिसून आली. सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तपासाची चक्रे फिरू लागल्यानंतर तसेच एका पार्टीचा व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांची तीव्रता वाढली. जहाल पत्रकार , संपादकांनी आपली लेखणी जोरात चालवत कधी पोलिसांच्या तपासावर ताशेरे काय ओढले तर थोड्याच वेळात पोलिसांची पाठराखण सुद्धा केली. मयताच्या वडीलांबाबत विधान केल्यामुळे त्या विधानामुळे माफीची मागणी सुद्धा होत आहे. एका
पक्षाच्या नेत्यावर आरोप झाला तर त्या पक्षाच्या नेत्यांनी दुस-या पक्षाच्या नेत्याच्या अपघाताची चौकशी करा, एका दिवंगत
न्यायाधीशाच्या आकस्मिक निधनाची चौकशी करा असे सुतोवाच केले. आपल्यावर आरोप झाला की आपण जर
काहीही केलेले नसले तर निधड्या छातीने पुढे जावे. तसे न करता आपल्या देशातील नेते मंडळी दुस-याच्या
जुन्या चुका, पुर्वकृत्ये
यांचे दाखले देत बसतात. ठीक आहे त्यांनी तसा काही गुन्हा केला असेल , चूक केली असेल तर त्याची शिक्षा
व्हायलाच पाहिजे परंतू त्यांनी गुन्हे केले, गैरकृत्ये केली म्हणून मग
तुम्ही करणे किंवा करावे ही भूमिका मुळीच योग्य नाही आणि जर तसेच असेल तर याच
न्यायाने मग 90 च्या दशकात ठाण्यातील एक दिग्गज नेत्याच्या संशयास्पद मृत्यूची सुद्धा
चौकशी व्हावी. याच काळात पुण्याच्या एका सिनेमागृहात एक मृतदेह आढळला होता. तो मृत्यू कसा झाला याचे गूढ सुद्धा अद्याप कायमच आहे. या देशात कित्येक हत्या झाल्या आहेत की ज्यांचे मारेकरी कोण ? याचा तपास
आजतायागात लागलेला नाही. सुशांत राजपूत या अभिनेत्याची हत्या असो वा आत्महत्या
याची नि:पक्ष चौकशी , तपास व्हावा. तसे होईल की नाही कुणास ठाऊक ? परंतू पोलिसांनीच पोलिसांना पकडणे , वृत्तपत्रात लिहिणे एक व बोलणे दुसरे तद्नंतर त्यावर
सारवासारव करणे, एकमेकांवर
आरोप-प्रत्यारोप करणे, तरुण नेत्यानी सीबाआय चौकशीची मागणी केली असता त्यांच्या परिपक्वते बद्दल शंका व्यक्त करणे. या सगळ्यांमुळे देशातील जनतेच्या मनातील संशय अधिकच वाढतो आहे.
नेते-अभिनेते यांच्या घनिष्ट संबंधातून अनेकवेळा बरेच काही मोठे व अनपेक्षित असे घडलेले देशाने पाहिले आहे मग ते शस्त्रास्त्रे
बाळगणा-या अभिनेत्याच्या शिक्षेबाबत असो की , हेडली सोबत मित्रता ठेवणा-या
एका चित्रपटसृष्टीतील दिग्गजपुत्राचे प्रकरण असो किंवा मग अनेक प्रकरणात आरोपी असलेल्या, खटले चाललेल्या अभिनेत्याच्या चित्रपट प्रदर्शनाला मोकळी वाट करून देणे असो. राजकीय नेत्यांच्या
आश्रयामुळे अनेकवेळा अभिनेत्यांना पाठीशी घातल्या गेले आहे. नेते, अभिनेते यांच्या गुन्ह्यांची , प्रकरणांची चौकशी करतांना
देशातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणेची मात्र मोठी कसरत होत असेल, त्यांच्यावर मोठा दबाव व तणाव येत असेल. यातूनच अनेक अधिका-यांनी आत्महत्या
सुद्धा केल्याची उदाहरणे आहेत. उच्चभ्रू समाजात जेंव्हा अशा घटना घडतात तेंव्हा त्यावर
देशाचे लक्ष असते , जनतेला अशा घटनांची नि:पक्ष चौकशी झालेली तसेच गुन्हेगाराला
कडक शासन झालेले पाहायचे असते. परंतू राजकीय नेते , बडी मंडळी
मात्र अशा घटनांची चौकशी होत असतांना जुने वाद , जुनी प्रकरणे
अर्थात मुडदे उकरण्याचे काम करून जनतेला उल्लू बनवण्याचे कार्य तर करीत असतातच शिवाय तपासाची
चक्रे सुद्धा काही वेगळ्याच दिशेने फिरतील अशी वक्तव्ये करीत असतात. त्यांनी आप-आपली भूमिका
योग्य पद्धतीने पार पाडावी , जुने वाद, प्रकरणे यांचे
मुडदे उकरण्याऐवजी संयम बाळगणे, तपास योग्य दिशेने होऊ देणे, संभ्रम न वाढवणे, आपण राजकीय नेते आहोत "यथा राजा तथा प्रजा" या न्यायाने प्रजा आपले अनुसरण करीत असते त्यामुळे आपली वागणूक योग्य व आदर्श अशी ठेवणे हे जनतेला अपेक्षित असते. जुने मुडदे निव्वळ एकमेकांवर आरोपांसाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी उकरू नये तर त्यांच्या नि:पक्ष चौकशीसाठी पुढाकार घ्यावा व पूर्वी झालेल्या व आता होत असलेल्या सर्वच गुढ मृत्यूंचे सत्य जनतेसमोर आणावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा