एक स्वतंत्रता
दिवस असाही
आज आपल्या भारत भूमीचा स्वतंत्रता दिवस. 73
वर्षे लोटली स्वतंत्रता प्राप्ती होऊन. आजचा स्वातंत्र्य दिन मात्र लक्षात राहणारा
आहे. समजायला लागल्यापासून ते आजपावेतो कित्येक स्वतंत्रता दिवसांना उपस्थित
राहिलो आहे, राहत आहे. बालपणी आई-वडील तयारी करून द्यायचे , वडील कापसाच्या
बोळ्याने अत्तर लाऊन द्यायचे. मग आम्ही गणवेशात शाळेत हजर होत असू . 8 वीत गेल्यावर
राष्ट्रीय छात्रसेनेंत प्रवेश घेतला. एनसीसी चा तो गणवेश, 15 ऑगस्ट आले की 4-5 दिवस आधीपासून तयार करावा लागत असे , त्याला
स्टार्च करावे लागे , बेल्ट व बॅजला ब्रासो लाऊन घासून-घासून मी व माझी भावंडे ती चमकवत
असू, बुटाला चमकवत असू . माझे भाऊ सिनियर डिव्हिजनला तर मी ज्युनिअर डिव्हिजनला
होतो. माझ्या या आठवणीं प्रमाणेच इतर सर्व विद्यार्थ्यां मध्ये सुद्धा स्वतंत्रता दिनाचा उत्साह संचारलेला असतोच शिवाय नागरीक
सुद्धा आप-आपल्या परीने स्वतंत्रता दिन छोट्या-मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतातच.
अगदी गरीब , सामान्यातील सामान्य , झोपडपट्टीत राहणारी माणसे 15 ऑगस्टला चौका- चौकातून रांगोळ्या
काढतात , झेंडे लावत असतात. हे सर्व चित्र आज डोळ्यासमोर सतत तरळत आहे कारण 2019
मध्ये आलेल्या चीनी व्हायरस कोरोनाने सर्व जगाचेच अतोनात नुकसान केले , जनजीवन पार
पालटून टाकले , या कोरोना विषाणूमुळे यंदा स्वतंत्रता दिनी अनामिक अशी हूर-हूर
होती. विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही, फक्त स्टाफ तेवढा हजर, दरवर्षी शाळांत
किती उत्साह असतो , मुलांचा किलबिलाट , भारतमातेचा जयघोष दुमदुमत असतो, स्वतंत्रता
वेदीवर आपल्या प्राणांची आहुती देणा-या अनेक क्रांतिकारक , स्वतंत्रता सेनानी यांचा
जयघोष , त्यांचे स्मरण या निमित्ताने होत असते. यावर्षी मात्र काहीच धामधूम , लगबग
नाही. कित्येक फेरीवाले झेंडे, लहान मुलांच्या शर्टाला लावायचे बिल्ले यांची
विक्री करीत असतात त्यांना सुद्धा विक्री करता
आली नाही, त्यांचेही उत्पन्न बुडाले.
15
ऑगस्टला प्रथमच हे असे चित्र पाहून खंत होत होती. मानवाने तंत्रज्ञानात बेसुमार
प्रगती केली. परंतू त्या प्रगतीमुळे अशी अधोगती सुद्धा होते हे या चिन्यांच्या
कोरोना विषाणूमुळे दिसून आले. आयुष्याच्या 40 वर्षात हा असा स्वतंत्रता दिवस प्रथमच अनुभवत
होतो. हा असाही शांत , धामधूम नसलेला , बाल गोपालांची किलबिल नसलेला एक स्वतंत्रता दिवस येईल असे ध्यानी मनीही नव्हते.
चीनमध्ये तयार झालेल्या कोरोना
विषाणूच्या कहरामुळे यंदा १ मे रोजी महाराष्ट्र दिन तर साजराच झाला नाही तसेच 15 ऑगस्ट
उत्साहात साजरा करता आला नाही. विस्तारवादी देशांनी आत्मपरीक्षण करून , विज्ञान ,
तंत्रज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी करावा. कोरोनासारखे विषाणू निर्माण करण्यासाठी
नव्हे. भारताने जगाला शांतीचा , वसुधैव कुटुंबकम चा मंत्र दिला आहे. जगाने भारताच्या
अध्यात्माचा अभ्यास करून ,चिंतन करून या विश्वाला कसे वाचवता येईल , विश्वशांती कशी
प्रस्थापित होईल , आतंकवाद कसा नष्ट करता येईल याकडे प्राधान्यपूर्वक पाहिले पाहिजे.
या जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे , हा कोरोना सुद्धा जाईलच व पुनश्च सर्व पूर्वीप्रमाणे
नांदतील आणि स्वतंत्रता दिन तसेच इतर सर्व सण, समारंभ मानव उत्साहाने साजरे करतील ही
सदिच्छा. जय हिंद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा