Click "Follow" Button below To Follow this Blog

०९/१२/२०२०

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 1

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने, भाग-1  

मुन्सिपल शाळा

बदलत्या काळात मुन्सिपल शाळा काही बदलली नाही. हळू-हळू विद्यार्थी संख्या घटत जाऊन ती बंद पडली. परवा या शाळेच्या मैदानात सायंकाळी फिरायला गेलो असता खिन्न झालो. मला खिन्नता का वाटावी ? मी तर या शाळेत शिकलो सुद्धा नव्हतो. हो आम्ही दररोज सकाळ-संध्याकाळी येथे हँडबॉल खेळायला मात्र जात असू. येथील बोरसल्ले सर या क्रिडाप्रेमी शिक्षकांनी आम्हाला तेंव्हा चांगले सहकार्य केले होते. माझे मोठे काका येथे काही काळ शिक्षक होते आणि माझे वडील या शाळेचे विद्यार्थी होते कदाचित या आठवणींमुळे आज ती बंद पडलेली शाळा पाहून मला खिन्नता आली असावी. 

    
    खामगांव शहर, बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर. एकेकाळची कापसाची मोठी बाजारपेठ. यामुळेच या शहरात त्याकाळात अनेक शैक्षणिक केंद्रे , सरकारी कार्यालये सुरु झाली. टुमदार शहर असलेल्या खामगांवाची या कार्यालयांच्या व सरकारी शैक्षणिक केंद्रांच्या जुन्या पद्धतीच्या इमारतींनी शान वाढवली होती. काळाच्या ओघात येथील 100 हून अधिक असलेल्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी या कापुस एकाधिकार योजनेमुळे नामशेष झाल्या काही जिनिंग आजही आपल्या अस्तित्वाच्या खुणा कशाबशा दाखवीत आहेत. 1990 च्या दशकानंतर खामगांव शहर कात टाकू लागले , आधुनिकतेकडे वाटचाल करू लागले परंतू ही वाटचाल करतांना येथील पुर्वीच्या , इंग्रजकालीन इमारती दुर्लक्षित होऊ लागल्या , भकास होऊ लागल्या.

आजपासून आगामी 10 लेखात आपल्या लाडक्या खामगांव शहरातील 10 भकास होत चाललेल्या स्थळांची माहिती करून घेऊ या. आपले गतवैभवाचा आठवणीत असलेली, आता मोडकळीस आलेली ही स्थळे आपण आता नामशेष होऊ की आपल्याला नुतनीकरण करून पुनश्च गतवैभव बहाल करून दिले जाईल का अशी प्रतीक्षा करीत असतील. आजच्या पहिल्या भागात मुन्सिपल शाळा.  

इंग्रजकालीन खामगांव कसे दिसत असेल याची आता कुणाला कल्पना करता येणार नाही. परंतू कल्पना करा एक रेल्वे स्टेशन. तिथून कापसाच्या गठाणी घेऊन जाणा-या मालगाड्या, वाफेचे इंजिन. स्टेशन वरून स्पष्ट दिसत असेल एक शाळा व शाळेच्या पटांगणावर बागडणारी मुले, शाळा व स्टेशन यांमध्ये तेंव्हा एकही अतिक्रमण नसेल. शाळेच्या मागे टेकड्या शाळेकडे जातांना डाव्या बाजूच्या छोट्या टेकडीवर डाक बंगला (सर्किट हाऊस ) व जयपूर लांडे कडे जाणारा जुना रस्ता. पावसाळ्यात किती सुंदर दृश्य दिसत असेल. रेल्वेने काही मुले जलंब या गावातून सुद्धा येत असतील. ही शाळा म्हणजे तत्कालीन मुन्सिपल हायस्कूल अर्थात नगर परीषदेची शाळा. आम्ही शालेय जीवनात असतांना या शाळेचे नांव इंदिरा गांधी मुन्सिपल हायस्कूल असे बदलण्यात आले होते. खामगांव नगर परीषदेची स्थापना ही 1869 या वर्षातील म्हणजेच काही वर्षानंतर या शाळेची स्थापना झाली असेल. आता एक-दोन वर्षापुर्वी पर्यंत ही शाळा सुरु होती. आता ती पटसंख्ये अभावी बंद पडली. शाळा , शाळेचे स्वरूप , शिक्षण यात बदल करायचा असतो नांव बदलून काय होणार ? परंतू ज्यात बदल करायचा ते सोडून आपल्या देशात भलतेच बदल केले जातात. बदलत्या काळात मुन्सिपल शाळा काही बदलली नाही. हळू-हळू विद्यार्थी संख्या घटत जाऊन ती बंद पडली. परवा या शाळेच्या मैदानात सायंकाळी फिरायला गेलो असता खिन्न झालो. मला खिन्नता का वाटावी ? मी तर या शाळेत शिकलो सुद्धा नव्हतो. हो आम्ही दररोज सकाळ-संध्याकाळी येथे हँडबॉल खेळायला मात्र जात असू. येथील बोरसल्ले सर या क्रिडाप्रेमी शिक्षकांनी आम्हाला तेंव्हा चांगले सहकार्य केले होते. माझे मोठे काका येथे काही काळ शिक्षक होते आणि माझे वडील या शाळेचे विद्यार्थी होते कदाचित या आठवणींमुळे आज ती बंद पडलेली शाळा पाहून मला खिन्नता आली असावी. इंग्रजकालीन ती कौलारू इमारत सुद्धा खिन्न उभी असल्यासारखी वाटत होती. मोडलेले दरवाजे,खिडक्या असलेले वर्ग ब-याच दिवसांपासून विद्यार्थ्यांचा कोलाहल न ऐकल्याने आपल्या भकास स्वरूपाने त्रस्त भासत होते. सर्वत्र धुळ, पक्षांची विष्ठा व पिसे, असे घाणीचे साम्राज्य असलेल्या ज्या वर्ग खोल्यात येथील विद्यार्थी कधी-काळी नमस्कार करून प्रवेश करीत असतील त्या विद्येच्या मंदिराचे हे असे स्वरूप मी पाहत होतो.

एकेकाळच्या खामगांव शहरातील या दिमाखदार ईमारतीची आज ही अशी अवस्था झालेली आहे. प्रशासनाने येथे सेमी इंग्रजी शाळा का काढू नये ? येथे इस्पीतळ किंवा सरकारी रुग्णालयाचा एखादा विभाग सुद्धा बनवता येईल, सरकारी रुग्णालय येथून जवळच आहे. सरकारी मालमत्ता या सुरक्षित का राखल्या जात नाही ? प्रशासनाच्या असे काही विचाराधीन आहे की नाही ? कदाचित असेलही , नसल्यास कुणीतरी चांगला अधिकारी असा विचार करेल का? त्याला राजकारणी साथ देतील का ? की पुर्वाश्रमीची ग्रामीण भागातील , आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना समावून घेणारी व त्या विद्यार्थ्यांना घडवणारी ही मुन्सिपल हायस्कूल आता अशीच राहील का ? ती अजून खचत जाऊन केवळ भग्नावशेष शिल्लक राहतील का , स्टेडीयम स्वरूपासारखी बनवलेली भिंत तर आताच खचली आहे. मैदानातून बाहेर पडलो तेंव्हा अंधार पडू लागला मागे वळून पुन्हा शाळेकडे पाहिले तर त्या अंधारात ती मला अधिकच भकास दिसू लागली आणि विचारांच्या वेगासह माझ्या पावलांचा वेगही वाढला.

क्रमश:

३ टिप्पण्या:

  1. प्रशांत महानकर१०/१२/२०, ८:५६ PM

    खूप सुरेख वर्णन केले आहे विनय, खास करून इंग्रज कालीन शाळा, डाक बंगला, टेकळ्या वगैरे अगदी भीतकाळात घेऊन जाते, मूळचा खामगावकर असल्यामुळे शहराशी भावनिक नाळ आहे, शहरातून वावरताना बऱ्याच जुन्या इमारती भग्न झाल्या सारख्या वाटतात. तुझं लेखन खूप आवडला, पुढच्या अंकाची वाट पाहतो

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद भाऊ
    पुढील लेख पुढच्या गुरुवारी

    उत्तर द्याहटवा