Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/१२/२०२०

Artricle about demolition of our old house

 भिषक अंतर्गृहे – नस्ति

  
 

"...फ्लॅशबॅक पाहता-पाहता अंगणातील एका खुंटी कडे लक्ष गेले. या खुंटीवर“भिषक अंतर्गृहे”(Doctor Inside) खाली “अस्ति (In) नस्ति (Out) असे पांढ-या पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात लिहिलेली पाटी होती...."      

1975 मध्ये माझा जन्म झाला. बाल्यावस्थेपासून ते वर्ग 8 वी पर्यंत आर्य समाज मंदिरा जवळ , बालाजी प्लॉट ,खामगांव असा पत्ता असलेल्या घरात राहत होतो. ते घर आजपासून(29/12/2020) पाडायला सुरुवात झाली. वडीलोपार्जित हे घर पाडून येथे नवीन वास्तू निर्मिती करणार हे तसे माहित झालेच होते. तसे पाहिले तर मी त्या घरात 13 वर्षे राहिलो होतो. माझ्या वडीलांना त्यांच्या पिढीतील लोक सखा म्हणतात. या नावाप्रमाणे ते खरोखर सर्वांचे सखा आहे. बालाजी प्लॉट मधील जुने घर म्हणजे शेजारच्या गौतम आजींचा रिकामा प्लॉट होता. सखा राहायला येणार म्हणून त्यांनी तो आजोबांना विकला होता अशी आठवण ते नेहमी सांगतात. एकत्र कुटुंबात भावंडासह बाल्यावस्थेतील काळ येथे व्यतीत झाल्यामुळे या जागेशी नाळ जुळलेली आहे. आज जेंव्हा जेष्ठ भावंड सिद्धेश्वर व गणेश यांनी घर पाडण्याचे कार्य सुरु केले म्हणून ते पाहण्यास गेलो आणि गतकाळ डोळ्यासमोर चित्रपटाच्या फ्लॅशबॅकप्रमाणे तरळू लागला.

      जेंव्हापासून कळायला लागले तेंव्हापासूनचे कित्येक गोड-कटू प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागले. यातील गोड तेवढे लक्षात ठेवले तर जीवन चांगले व्यतीत होण्यास सहाय्य होते. चंदेरी रंगाचे फाटक , अंगणात फ्लोरिंग म्हणून विटा लावलेल्या. पाहुण्यांना बसण्यासाठी एक लाकडी बाक होता , तो आजही आहे परंतू त्याचे स्थान दुसरीकडे आहे. आमच्या सायकली याच अंगणात असत , गाय बांधण्यासाठी जागा आणि हो खामगांवातील लोकांचे आकर्षण असलेली आणखी एक गोष्ट ती म्हणजे फाटकातून अंगणात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला असलेला मोराचा पिंजरा. आजोबा शिकारी असल्याने वडील, दोन्ही काका यांना पशुपक्षांचे आकर्षण होते. त्यामुळे आमच्या अंगणात एका मोठ्या पिंज-यात मोर लांडोर होते. काही दिवस एक हरीण सुद्धा होते.

अंगणातून बैठकीत प्रवेश करण्यास दोन उंच दरवाजे , बैठकीत वैद्य असलेल्या माझे आजोबा वैद्य डी. आर. वरणगांवकर उपाख्य नानासाहेब यांचा दवाखाना , आजोबांची विशिष्ट खुर्ची औषधांचे कपाट व त्यामागे देवघर. माझे आजोबा मला का कोण जाणे “गोडबोले” म्हणत. ते सकाळ संध्याकाळ संध्या करीत. गणपतीचे निस्सीम भक्त होते. बैठकीतच एका बाजूला माझी अंध आजी माई माळ जपत बसत असे. ती आम्हाला कितीतरी अनोख्या गोष्टी सांगत असे. या बैठकीच्या मागे एक खोली आमची व एक काकांची म्हणजे बी एच के सर्व एकच. मागच्या अंगणात उंच बांधलेले शौचालय, विहीर व विहिरीला लागून बाथरूम. ही विहीर माझे वडील, काका व त्यांचे एक दोन मित्र यांनी खणली होती. या बाथरूम समोर एक बोळ त्या बोळीत बाबा म्हणजे माझा सर्वात जेष्ठ बंधू (बुलडाणा येथे राहत असलेल्या माझ्या जेष्ठ काकांचा मुलगा) काही काळ वास्तव्यास होता. असे हे घर, वर टिनपत्रे , उन्हाळ्यात ते कमी तापावेत म्हणून पराट्या टाकत. तीन-तेरा हा शब्दप्रयोग तसा चांगल्या अर्थाने केल्या जात नाही पण तीन खोल्यांच्या या घरात आम्ही तेरा जण राहात होतो. सहा आम्ही, काकांकडचे पाच आणि आजी-आजोबा मिळून तेरा. सर्वात मोठे काका बुलडाणा येथे राहत. त्या काळात एवढ्या कमी संसाधनात तेरा लोक कसे राहत असतील हे आजच्या पिढीतील मध्यमवर्गीय मुलांना विश्वासार्ह वाटणार नाही. आज अशा घरात राहणारा एखादा विवाहानुरूप मुलगा असेल तर मुलगी नक्कीच त्याला नाकारेल अशी परिस्थिती आहे. सर्वांना कसे सर्व सेप्रेट पाहिजे असते, प्रायव्हसी पाहिजे असते. असो ! या आमच्या घरात वरचा पंखा एकाही खोलीत नव्हता. तेंव्हा सिलिंग फॅन शब्दच माहित नव्हता. खालचे पंखे म्हणजे टेबल फॅन मात्र होते. आमच्या व काकांच्या दोन्ही खोल्यात मोठी कपाटे ठेवून स्वयंपाक घर व बैठक असे पार्टीशन केले होते. सामान-सुमान ठेवण्यासाठी फळ्या होत्या. तीनच खोल्या असलेल्या या घरात अभ्यासासाठी जागा ती कुठे असणार ? मग बाजूच्या बोळ्या, समोरचे अंगण अशा जागा आम्ही निवडत असू. वर्गात मी नेहमी पहिल्या तीन मध्ये असे. वर्ग सातवीत मी सर्व तुकड्यातून प्रथम क्रमांक मिळवला होता , स्वातीताई तर बी.एससी.ला मेरीट होती, इतरही भावंड अभ्यासात चांगलेच होते.शिवाय वडील व काकांच्या प्रेरणेने आम्ही सर्व मुले एन.सी.सी.त होतो. बाबा, राजू हे दोघे अंडर ऑफिसर होते. आमचे हे घर पुर्वी मातीचे होते नंतर ते सिमेंटमध्ये बांधकाम केल्याचे सांगतात. माझ्या जेष्ठ भावंडाना या घराबाबत अजूनही खुप काही सांगता येईल.

आजोबा व नंतर आजी गेल्यावर 1988 च्या सुमारास एक दिवस अंगणात अचानक सुतारकाम सुरु झालेले दिसले. दरवाजे , खिडक्या बनत होत्या. त्या कशासाठी काही कळत नव्हते. परंतू एक दिवस आमचे कुटुंब नवीन घरात व काकांचे कुटुंब याच घरात असे ठरल्याचे जेष्ठांनी सांगितले. बालपण व्यतीत केलेले ते घर , कुणी रागावले , भांडणे झाली तर आजोबा-आजींच्या जवळ आम्ही जात असू. ते घर आम्ही सोडणार होतो. आम्ही भावंडे शोकाकुल झालो होतो. त्यामुळे आम्ही जरी नवीन घरात राहायला गेलो तरी बालाजी प्लॉट मधील घराशी संबध दृढ होते व पुढे सुद्धा राहतील. हिंदी चित्रपट गीतांचे चाहते असलेले माझे वडील “जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया” , “गम और खुशी मे फर्क न महसुस हो जंहा” अशा स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे सांगणा-या देव आनंदच्या  गीताप्रमाणेच जीवन जगत असल्याने जे मिळेल त्यात ते खुश राहिले. मला आठवते 12 फेब्रुवारी 1989 ला आम्ही कोर्टा जवळ राहायला आलो. दोन घरे झाली होती. परंतू वडील व काका भाऊ कमी व मित्र जास्त असल्यामुळे घरे जरी दुर झाली तरी मनाने जवळच राहिलो.

 असा फ्लॅशबॅक पाहता-पाहता अंगणातील एका खुंटी कडे लक्ष गेले. या खुंटीवर एक पाटी होती. “भिषक अंतर्गृहे”(Doctor Inside) खाली “अस्ति (In) नस्ति (Out) असे पांढ-या पार्श्वभूमीवर काळ्या अक्षरात लिहिलेली पाटी होती. भिषक म्हणजे माझे वैद्य आजोबा देहरुपातून गेल्यावर ती पाटी सुद्धा निघाली होती. आज भिषक पण नाही आणि त्यांची संस्कृत भाषेतील पाटी असलेले ते जुने घर सुद्धा नाही.बदल हा जगाचा नियमच आहे.

२ टिप्पण्या:

  1. विनू तू भूतकाळचे घर शद्बात उभे केले घर पाडले जाते आहे पुन्हा दिसणार नाही म्हणून जीव कासावीस होतो वाईट वाटते पण तेच घर पुन्हा नवीन स्वरूपात मिळेल असा विचार करतो
    घर असावे घरा सारखे
    नकोत नुसत्या भिंती
    शेवटी इतकेच म्हणेन हम साथ साथ है !

    उत्तर द्याहटवा