Click "Follow" Button below To Follow this Blog

२३/१२/२०२०

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 3

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-3

जुने स्टँड   

"....काही वर्षांपूर्वी कुणाला दवाखाना, कुणाला शिक्षण, कुणाला रोजगारासाठी घेऊन जाण्यास सोयीस्कर असणारे हे शहरातील ज्या राज्य परिवहन मंडळाचे “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असे ब्रीद आहे त्या एस. टी. बस स्थानकाचे हे मध्यवर्ती ठिकाणआज उपेक्षित आहे. कधीकाळी हमरस्त्याहून दिसणा-या जुन्या बस स्थानकाच्या या जागेला आज मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही...."

संग्रहीत चित्र 

 
जुन्या काळातील एस टी बसेस 

    खामगांव शहराचा विस्तार तेंव्हा वाढलेला नव्हता. प्रवास करायचा असेल तर सुरुवातीला फक्त रेल्वेच उपलब्ध होती.त्यानंतर खाजगी मोटार गाड्या असत.या खाजगी बसेस म्हणे अग्रसेन चौकात उभ्या राहत. त्या दृष्टीने हे खामगांवचे पहिलेच बस स्थानक असावे, परंतू ते खाजगी बसेसचे होते. याच ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून खामगांवकरांची क्षुधा शांती करणा-या आनंद भुवन या उपहार गृहात नाश्ता झाल्यावर मग बस निघत असे असे सांगितले जाते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजे एस.टी.ची स्थापना झाल्यावर महाराष्ट्रात एस.टी च्या बसेस कडेवर एक पोरग , एकाचे बोट धरलेले अशा लेकुरवाळ्या स्त्रीप्रमाणे प्रवाशांना घेऊन धाऊ लागल्या. उन्हाळा , पावसाळा , हिवाळा कोणत्याही वातावरणात प्रवाशांना सुखाने घेऊन जाण्यासाठी चालक , वाहक आपल्या परीने प्रयत्न करू लागले. विदर्भाच्या प्रखर उन्हाळ्यात एस.टी. बस चालवणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. प्रवाशांकरीता राज्यशासनाने माफक दरात कलेली ही सुविधा लवकरच लोकप्रिय झाली. खामगांव शहरात सुद्धा एक बस स्थानक सुरु झाले. त्याच स्थानकाच्या म्हणजेच आताच्या जुन्या स्टँडच्या अवस्थेबाबत आजचा हा लेख.  

राज्यात सर्वत्र या गाड्यांच्या स्थानकांसाठी जागा निवडण्यात आल्या. खामगांव शहरात सुद्धा एका जागेची निवड करण्यात आली. हे ठिकाण प्रधान डाक घराच्या अगदी समोर आहे. अगदी नेमके हे ठिकाण कुठे आहे हे सांगायचे तर आजच्या हॉटेल, बार संस्कृतीच्या काळातील लोकांना विशाल हॉटेल व बारच्या समोर असे सांगितले की त्यांना जुन्या बस स्थानकाचा पत्ता लक्षात येण्यास काहीच वेळ लागणार नाही. खामगांव प्रधान डाक घराच्या समोर रेल्वे लाईनला लगत अशी चंद्राच्या कोरी प्रमाणे आकार असलेली ही जागा खामगांव शहराचे बस स्थानक झाले. या चंद्रकोरीच्या एका कोप-यात, प्रवेश करतांना उजव्या बाजूला एक छोटीसी जागा म्हणजे कंट्रोल रूम व प्रवासी निवारा व स्थानकाच्या तत्सम उपयोगा करीता होती असे सांगितले जाते.ती इमारत आजही आहे. ही जागा आता इतर उपयोगासाठी वापरली जाते. ही जागा कुणाच्या मालकीची आहे कुणास ठाऊक परंतू आज मोटार दुरुस्तीच्या अनेक छोट्या मोठ्या दुकानांनी त्या जागेला जणू लपवून टाकले आहे. मी या ठिकाणाहून कधी बसने प्रवासास गेल्याचे माझ्या काही स्मरणात नाही. आता तर एक पिढी अशी आहे की जीला हे जुने स्टँड माहीत सुद्धा नसेल. याच स्थानकाच्या अंतर्गत भागात पुर्वी एक दुध डेअरी सुद्धा होती. ती जागा सुद्धा आज भकास उभी आहे. आज कधी या ठिकाणी गेलो तर या जागेत बस स्टँड कसे काय असेल असा सहज प्रश्न निर्माण होईल इतकी ही जागा अडचणीची झाली आहे. अर्थात त्याकाळात बसेस सुद्धा कमी होत्या व लोकसंख्या सुद्धा कमी त्यामुळे तेंव्हा ती जागा पुरेसी होत असेल. आज खामगांव शहराचे बस स्थानक चांगले ऐसपैस आहे, प्रवासी निवारा इत्यादी सुविधा सुद्धा चांगल्या आहेत. परंतू हे जुने बस स्थानक मात्र दुर्लक्षित , उपेक्षित असे आहे. या जागेकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानकाच्या आत प्रवेश करतांनाच पुर्वी एक हॉटेल होते व त्यानंतर बापट यांचे सायकलचे दुकान होते हे अनेकांना आठवत असेल.

गतकाळात प्रवासी , जुन्या बसस्थानकाची सुटसुटीत , मोकळी जागा , रेल्वे रूळ व बस स्थानक यांच्या मध्ये वडांची झाडे असे चित्रातल्या एखाद्या स्थानकाप्रमाणे हे स्थानक दिसत असेल. आज कळकटलेले , भंगार , तेलकट कापडाचे तुकडे, गुटख्यांच्या रिकाम्या पुड्या अशी अस्वच्छता येथे दिसते. नाही म्हणायला काही कार्यालये व प्रतिष्ठाने येथे उभी आहेत. सायंकाळी हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला न वाचलेले परंतू ती न वाचता तसे अनुसरण करणा-यांचा सुद्धा येथे राबता सुरु होतो. 

काही वर्षांपूर्वी कुणाला दवाखाना, कुणाला शिक्षण, कुणाला रोजगारासाठी घेऊन जाण्यास सोयीस्कर असणारे हे शहरातील  ज्या  राज्य परिवहन मंडळाचे “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असे ब्रीद आहे त्या एस. टी. बस स्थानकाचे हे मध्यवर्ती ठिकाण आज उपेक्षित आहे. कधीकाळी हमरस्त्याहून दिसणा-या जुन्या बस स्थानकाच्या या जागेला आज मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही. मी सकाळच्या वेळी येथून फिरायला गेलो असता मला जुन्या स्टँडची ही अवस्था दिसली. इतक्यात मागून एक एस. टी.बस येऊन तिथे थांबली. विचारांच्या तंद्रीत असल्याने मला क्षणभर वाटले अरे ! असे कसे काय झाले बस कशी थांबली ? पण मी भानावर येण्यास वेळ लागला नाही , इथे पूर्वी असलेल्या व आताच्या जुन्या स्टँडमुळे एक थांबा दिला आहे त्यामुळे ती बस थांबली होती. खामगांवातील हा बस थांबा त्या जुन्या स्टँडमुळे मिळाला आहे हे सुद्धा आता कुणाला ठाऊक नसेल.

२ टिप्पण्या: