Click "Follow" Button below To Follow this Blog

१६/१२/२०२०

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 2

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-2 

भारतरत्न राजीव गांधी उद्यान

"...आम्हा लहान मुलांना आकर्षित करीत असे ते या बगीच्याचे प्रवेशव्दार. लाटांच्या आकाराचे छत आणि प्रवेशव्दाराच्या बाजूला असलेली वॉचमनसाठीची सिमेंटच्या बांधकामाची छोटीसी गोलाकार खोली. ही खोली फिरती आहे का ? हा प्रश्न पडायचा कारण तीचे बांधकामच तसे केले आहे ?आता या बगिच्याला दोन बाजूंनी सिद्धी जौहरचा जसा पन्हाळगडाला पक्का वेढा पडला होता त्याचप्रमाणे अतिक्रमणाचा पक्का वेढा पडला आहे...."।

 


 

     मुन्सिपल हायस्कूल मधून त्या दिवशी संध्याकाळी परत आलो. रस्त्यातच आहे एक उद्यान ज्यात आता नागरिकांची वर्दळ अत्यल्प आहे. पुर्वी या उद्यानात अनेक पालक आपल्या पाल्यांना घेऊन येत. एखाद दोन लग्न प्रसंग सुद्धा झाल्याचे मला स्मरते. अतिक्रमणामुळे दिसत नसलेले आकर्षक प्रवेशव्दार असलेले हे उद्यान म्हणजे भारतरत्न राजीव गांधी उद्यान.

आहे का स्मरणात ? हो तेच स्थान ज्याला खामगांवकर “टॉवर गार्डन” म्हणून ओळखतात. या बगीच्याकडे पाहीले की मला आवर्जून आठवतात ते बालपणीचे दिवस. सुप्रसिद्ध गायक किशोरकुमारचे “पिछली याद भुला दो , गुजरे बिते अफसानोका हर एक नक्श मिटा दो” या गीताप्रमाणे भूतकाळातील स्मृतींचे नामोनिशान पुसून टाकले पाहिजे. हे जरी खरे असले तर लगेच गतकाळातील आठवणी संपता संपत नाही हे सांगणारे “याद न जाये बिते दिनोंकी” हे रफीचे गीत आठवते आणि अनेक जुन्या आठवणी मनांत फरशी या भागातील गर्दीपेक्षाही जास्त गर्दी करू लागतात. हा बगीचा माझ्या घरालगतच असल्याने रोजच दृष्टीस पडतो. तसा तो सर्व जनता , अधिकारी , कर्मचारी , नेते यांच्या सुद्धा दृष्टीस पडतोच कारण या बागीच्याच जवळपास शहरातील अनेक कचे-या आहेत.याच्या मागील बाजूने तारेच्या कुंपणाला लागून बोगनवेलीं व गुलमोहरांची फुले वाटसरुंचे लक्ष वेधून घेत असत. आम्हा लहान मुलांना आकर्षित करीत असे ते या बगीच्याचे प्रवेशव्दार. लाटांच्या आकाराचे छत आणि प्रवेशव्दाराच्या बाजूला असलेली वॉचमनसाठीची सिमेंटच्या बांधकामाची छोटीसी गोलाकार खोली. ही खोली फिरती आहे का ? हा प्रश्न पडायचा कारण तीचे बांधकामच तसे केले आहे ? या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने मोठी मोठी अशोकाची झाडे होती त्याखाली दाट सावली असे. आजही तिथे काही झाडे उभी आहेत. त्याच बाजूने आणखी 10-12 पावलांवर एक नागमोडी आकाराचा भला मोठा हौद होता व त्यात कमलपुष्पे फुललेली राहत त्याच्या बाजूला चांदणीच्या झाडांची अनेक झाडे फुलांनी लदबदलेली असत. ती तोडण्यास मनाई नव्हती इतकी ती झाडे होती. कुणी यांना स्वस्तिकची फुले सुद्धा म्हणतात. हा बगीचा टेकडीवर तयार केला असल्याने थोडे वर चढावे लागते वर हिरवळ, कमानी, वेली बहरलेल्या असत. येथे खुप मोठ्या प्रमाणात हरळी असायची त्यातून आम्ही दैनंदिन पुजेसाठी दुर्वा निवडून आणत असू. चप्पल काढून, बरोबर तीन टोके असलेल्या दुर्वा निवडायच्या, आधी हरळीला नमन करून दुर्वा निवडण्याची परवानगी मागायची मग त्या तोडायच्या असे आजोबा सांगत. हरळीची परवानगी कशी मागायची याचे कोडे आम्हाला पडत असे. याच बगीच्यात सिमेंटने बांधकाम केलेली एक घसरगुंडी आहे अजूनही ब-यापैकी शाबूत आहे. अनेक लहान मुलांची गर्दी येथे असे. नंतर येथे हिंदुसुर्य महाराणाप्रताप यांचा पुतळा उभारल्या गेला व दर्शनीय भागच तेवढा सुशोभित केल्या गेला. या बगीचालगत पंचायत समिती आहे व त्यात एक टॉवर आहे. या टॉवरवर पुर्वी घडयाळ होते नंतर ते बंद पडले व आता तर घड्याळच नाही. या टॉवरमुळेच या बगीच्याला “टॉवर गार्डन” म्हणू लागले. इथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ जयस्तंभ सुद्धा आहे तो आता विविध संघटना, प्रतिष्ठाने यांच्या फ्लेक्स बॅनर नी कुणाला दिसत सुद्धा नाही. 

असा हा बगीचा तेंव्हा विविध वेली, फुले , कमळे झाडांवर निवास करणारे अनेक पक्षी यांनी समृद्ध होता , शहराची शान होता. या बगीच्याला लागणा-या पाण्यासाठी गावातील नटराज गार्डन या विहिरीवरून खास पाईपलाईन टाकली होती. आज रुंद झालेल्या हमरस्त्याने गेले तर या बगीच्याचे प्रवेशव्दार सुद्धा दिसत नाही. पुर्वी खामगांवात दुस-या गावाहून एस टी बसने शहरात येणा-या नागरीकांचे लक्ष हा बगीचा आपल्या निसर्ग समृद्धतेने वेधून घेत असे. या बगीच्याच्या दु:खाला वाचा फुटावी असे वाटू लागले म्हणून मी या बगीच्यात दाखल झालो तर पुढील दृश्य दिसले.

आता या बगिच्याला दोन बाजूंनी सिद्धी जौहरच्या पन्हाळगडाला दिलेल्या पक्क्या वेढ्याप्रमाणे अतिक्रमणाचा पक्का वेढा पडला आहे. पुर्वीचे जे मुख्य प्रवेशव्दार होते ते बंदच असते. अतिक्रमणाममुळे नागरिकांना आत जाण्यास त्रास होतो व त्यामुळे येथे कुणी जात नाही , कमळांचा हौद कोरडा ठन्न आहे. स्वस्तिकची झाडे नाहीत, लहानपणीच्या दुर्वा निवडण्याच्या ठिकाणी हरळी लुप्त झाली असून माती , दगडे दिसतात. एखाद दोन ठिकाणी कुंपणाच्या भिंतीवर लोखंडी जाळ्या लावलेल्याच नाहीत, तर काही ठिकाणी त्या तोडलेल्या आहेत, कुंपणाला लागून असलेली बोगनवेल, गुलमोहर ही झाडे नष्ट झाली आहेत, नाही म्हणायला ज्या झाडांवर पक्षीही बसत नाही, घरटे बांधत नाही अशी सप्तपर्णी झाडे मात्र लावली आहेत परंतू हिरवळ मात्र काहीच नाही, पूर्वी जागोजागी लावलेल्या वेलींच्या कमानी मोडल्या आहेत. रखवालदाराची राहण्याची खोली मोडलेली आहे. शहराच्या या फुफ्फुसाची ही अशी अवस्था आता झाली आहे.

शहरात आज सावरकर उद्यानासारखी खुपच चांगली नवीन उद्याने झाली आहेत. काही प्रस्तावित सुद्धा आहेत हे निश्चितच स्तुत्य आहे तरीही जुने असलेले “टॉवर गार्डन” म्हणजेच भारतरत्न राजीव गांधी उद्यान आपल्या जुन्या वैभवाच्या स्मरणात भकास पडले आहे. बगीच्याची दशा पाहत असतांना अंधार पडू लागला. उद्यानात विद्युत दिवे सुद्धा कमी आहेत. मी आता परतण्याच्या तयारीत होतो. कुठून तरी घुबडाचा आवाज कानी आला. बाहेर पडतांना मला बहादूरशहा जफर या भारताच्या अखेरच्या शहेनशहाच्या अंतिम दिवसांवर आधारीत एका जुन्या मालिकेच्या

ना किसी की आंखका नुर हुं , ना किसीके दिल का करार हुं

जो किसीके काम ना आ सके मै वो मुश्तेगुबार हुं

या ओळी कानांत घुमू लागल्या. या बगीच्याची दशा सुद्धा आता खराबच आहे, पूर्वी नागरिकांची रेलचेल, हिरवळ , पक्षांचा किलबिलाट अशी रौनक असलेला हा बगीचा आता पुन्हा “किसी की आंख का नुर” वा कुण्या निराशेने ग्रस्त  व्यक्तीच्या “दिला ला करार” देणारा बनेल का? तसे त्याला बनवले जाईल का ?      उपरोक्त ओळीच माझ्या स्मरणात का याव्या ? बहादुरशहा जफरप्रमाणे आपल्या परिस्थितीचे वर्णन हा बगीचा तर करत नसेल ? या विचारांच्या चक्रात अतिक्रमणाच्या बाजूने मी चालू लागलो.

क्रमश:

४ टिप्पण्या:

  1. तुम्हाला सौंदर्याचं पडल आहे इथं लोकांना उपाशी मारण्याची वेळ आली आहे
    अतिक्रमण काढण्याची गोष्ट करता आधी तिथल्या लोकांचा विचार करा की ते काय करतील
    आणि त्यांचे कुटुंब कसे चालेल...

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ या देशात कुणीच
    उपाशी न राहोत. बगीचाची अवस्था खराब वाटली म्हणून लिहिले. कुणाला दुखवण्याचा हेतू नाही 🙏

    उत्तर द्याहटवा