...शुभारंभ आपण करावा
"कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई कर्नाटकला जोडावे अशी मागणी केली उद्या आपलाच कुणी वॉशिंग्टनची सुद्धा मागणी करायला व त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी करायाला मागे पुढे पाहणार नाही. बेळगांव प्रश्नी मा. मुख्यमंत्र्यानी सुद्धा मराठी माणसातील दुहीबाबत भाष्य केले ती दुही मिटवण्याचा शुभारंभ त्यांनीच करावा याबाबतचा लेख"
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प”या शासकीय पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन झाले. मा. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद , बेळगांवला उपराजधानी बनवणे, नामांतर करणे , भाषावार प्रांतरचना मराठी एकीकरण समितीमध्ये फुट पडणे आदी बाबींवर भाष्य केले. बेळगांव प्रश्न फार जुना आहे आणि राज्या-राज्यातील सीमावादाचे प्रश्न हे नेहरूंच्या भाषावार प्रांतरचनेमुळे निर्माण झाले. हे प्रश्न खरेतर फार पुर्वीच निकालात निघणे आवश्यक होते. परंतू प्रश्न लवकर मार्गी न लावणे हा जणू आपल्या देशातील राजकारणाचा एक शिरस्ताच बनला आहे. प्रश्न कायम ठेवायचे आणि आपला राजकीय स्वार्थ साधत राहायचा. असेच मराठी बहुल बेळगांव प्रश्नाचे आहे. उद्धव ठाकरे यांनी बेळगांव प्रश्न निकाली लागेपावेतो हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी या प्रकाशन सोहळ्यात केली याच मुद्द्यावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई कर्नाटकला जोडावी व जोपर्यंत हे होत नाही तो पर्यंत मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करावा अशी केंद्र सरकारला विनंती केली. याला आता काय म्हणावे ? बेळगांव हे सीमेवर आहे आणि तेथे मराठी भाषिक लोक मोठ्याप्रमाणात आहे त्यांची सुद्धा महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे. परंतू मुंबईला कसे कर्नाटकशी जोडणार ? कर्नाटक आणि मुंबई यांचा भूगोल , भाषा , इतिहास या अनुषंगाने काहीच संबंध नाही. उद्या आपलाच कुणी वॉशिंग्टनची सुद्धा मागणी करायला व त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी करायाला मागे पुढे पाहणार नाही. काहीही वक्तव्ये करायची त्याला तोंडात येईल तसे प्रत्युत्तर द्यायचे हे असे सांप्रत कालीन राजकारणी आहेत. सावदी यांचे मुंबईला कर्नाटकशी जोडण्याचे व केंद्रशासित म्हणून घोषित करण्याचे हे विधान हास्यास्पद आहे. मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती महाराष्ट्राचाच भाग राहील हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. केंद्र सरकारने कर्नाटक व महाराष्ट्र दोन मुख्यमंत्री ,जनप्रतिनिधी यांना सर्वांना बोलावून बेळगांव प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. यासाठी तेथील मराठी भाषिकांचे मत सुद्धा ध्यान्यात घेतले पाहिजे. असे कित्येक वर्षांपासूनचे चिघळत असलेले प्रश्न भारताच्या सार्वभौमतेसाठी, एकात्मतेसाठी त्वरीत मार्गी लावणे गरजेचे आहे.
वरील पुस्तक प्रकाशन
सोहळ्यात मा. उद्धव ठाकरे जे बोलले तेसुद्धा विचार करण्यास भाग पाडणारे आहे. मराठीला
दुहीचा शाप आहे, भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी माणसे आपल्यापासून दुर गेली असे मा.
मुख्यमंत्री म्हणाले. मराठी अस्मिता , मराठी माणूस या विषयावर शिवसेना लढली ,
सत्तेत आली. मराठीला दुहीचा शाप आहे हे मुख्यमंत्री म्हणतात परंतू या शापातून
मुक्त व्हायचे असले तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:पासूनच सुरुवात करायला नको का? राज
ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच शिवसेनेतून बाहेर पडले. पुढे
बाळासाहेबांच्या निधनानंतर राज यांचे व्यतिरिक्त इतर भावंडांत निर्माण झालेली दुही सुद्धा जनतेला समजलेली आहे. हे
सर्वानी पाहिले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता त्यावरचे
आपले तत्कालीन उत्तर सुद्धा जनतेने ऐकले आहे. एका मराठी भाषिक राज्यातील मराठी मुद्दा
व इतर अनेक समान मुद्दे असलेले मराठी पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रातील मराठी
भाषिक जनतेसाठी ते आनंददायीच ठरू शकेल. पण तशी चिन्हे दुर-दुर पर्यंत दिसत नाहीत. मराठी
माणसातील दुही मिटवायची असले तर त्याचा शुभारंभ आपण पुढाकार घेऊन करून दाखवू
शकतात. जनतेला दुही मिटवण्याचा सल्ला देण्याआधी आपणच तशी कृती केली तर आपले राजकीय मोठेपण व परीक्वता जनतेला दिसेल व आपला सल्ला मानण्यास ते अधिक प्रवृत्त होतील व मराठी माणसांना तसेच बेळगांवातील मराठी एकीकरण समितीला
सुद्धा दुही मिटवण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. तेंव्हा मराठी माणसातील दुही मिटवण्याचा शुभारंभ हा आपणापासूनच व्हावा असे तमाम मराठी भाषिक जनतेला सुद्धा अपेक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा