खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग- 8
पाण्याची टाकी
भकास स्थानाचे नांव आणि ते सुद्धा पाण्याची टाकी हे कसे काय ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. शिवाय हा सुद्धा लेखाचा विषय असू शकतो का ? असेही वाटले असेल. पण भकास झालेल्या खामगांव शहरातील स्थानांची माहितीची ही लेख मालिका असल्याने या पुर्वीच्या निसर्गरम्य व पालक पाल्यांचा राबता असलेल्या या ठिकाणाचा अंतर्भाव सुद्धा या लेखमालिकेत होणे गरजेचे वाटले.
रेल्वे गेट मधून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोरून समता कॉलनी कडे गेल्यावर पाण्याची टाकी व त्या टाकीच्या परिसरात छोटीसी बाग. खामगांवातील विविध ठिकाणांबाबत लेख लिहितांना मी नकळत गतकाळात चाललो जातो. वडीलांसह आम्ही भावंडे म्युन्सिपल हायस्कूलच्या मागच्या टेकडीवरून या पाण्याच्या टाकीवर गेलो होतो अशी दृश्ये मग डोळ्यासमोर तरळू लागतात. पाण्याच्या टाकीवर गेलो होतो म्हणजे प्रत्यक्ष टाकीवर चढलो असे नाही तर तेथील बगीच्यात गेलो होतो हे आता सांगण्याची तशी आवश्यकता नाही. या बाजूने पाण्याच्या टाकीच्या स्थानी गेले की एका कोप-यातून बगीच्यात जाता यायचे येथे ज्यातून पाणी अविरत वाहत असायचे असा नळ होता. अविरत वाहणा-या पाण्यामुळे खालील उतारावर पाणथळ जागा झाली होती. या जागेत पाणथळीच्या ठिकाणी उगवणा-या अनेक छोट्या वनस्पती उगवल्या होत्या. आत गेल्यावर चारीही बाजूंनी मेंदीच्या झाडांचे कुंपण , आता विविध झाडे , लहान मुलांना क्रिकेट खेळता येईल अशी छोटीसी खुली जागा. याच बाजूने म्हणजे दूरदर्शन केंद्रा समोरून गेल्यावर आता एक भव्य प्रवेशव्दार झाले आहे. या टाकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही टाकी खुप उंच अशा खांबांवर नव्हती कारण उंच टेकडीवर असल्याने तशी काही गरज नव्हती. छोट्या सिमेंटने बांधलेल्या अनेक ओट्यांवर ती होती. या टाकीखाली लहान मुलांना सहज जाता येईल अशी जागा होती.
30-35 वर्षांपूर्वी खामगांवातील महिलांना, पालकांना आपल्या मुलांना घेऊन जाता येईल असे पिकनिक स्पॉट नव्हते. दोन बगिचे , जनुना तलाव व पाण्याची टाकी. कित्येक वेटाळातील महीला एकत्र येऊन सोबत डबे घेऊन आपल्या मुलांना येथे घेऊन जात असत. तेंव्हा या भागात आजच्या इतकी वस्ती झाली नव्हती. येथून “बर्डस आय व्ह्यू“ प्रमाणे खामगांव शहराचे विहंगम दृश्य दिसत असे , आजही दिसते पण पुर्वीच्या आणि आताच्या दृश्यात मोठा फरक आहे.पुर्वी एक मजली घरे व खुप झाडे दिसत तर आता मोठ्या मोठ्या इमारती व मोबाईल टॉवर दिसतात झाडे आहेत पण पुर्वीच्या तुलनेत कमी. आता इथे मुलांना घेऊन जाऊन ते दृश्य दाखवण्याची कुणाकडे सवड नाही.
काही वर्षांपूर्वी या बगीच्याला भिंतीचे कुंपण करण्यात आले, शाहु महाराजांचे नांव येथील बगीचाला किंवा त्याच्या प्रवेशव्दाराला देण्यात आले होते का देण्याचे ठरले होते असे काहीसे स्मरते. पुर्वीप्रमाणे आता येथे पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा राबता नसतो, बागही आता पुर्वीसारखी नाही. कुंपणाची भिंत , प्रवेशव्दार हे मात्र चांगले आहे. संध्याकाळी पाण्याच्या टाकी शेजारील टेकडीवर काही लोक फिरायला मात्र येत असतात.
कित्येक खामगांवकरांची तहान भागवलेली जुनी टाकी आता नाही परंतू ती असल्याच्या तुरळक खुणा मात्र दिसतात. बाहेरील वळणाच्या रस्त्याने जातांना बगीच्याचा अंतर्गत भाग नीटसा दिसत नाही. भिंतीमुळे बाह्यस्वरूप चांगले दिसत असले तरी आतील स्वरूप मात्र विशेष असे नाही. पुनश्च या भागात करंज सारखी सदाहरित वृक्ष लागवड केली , फुलबाग , कारंजे केले तर खामगांवातील जनतेला हिल स्टेशनवर आल्यासारखे वाटेल. परंतू खंत ही आहे की आपल्या देशात जे आहे ते टिकवून ठेवले जात नाही व नवीन केलेल्या गोष्टी गुणवत्तापुर्ण नसल्याने टिकत नाही. त्याप्रमाणे पाण्याची टाकी व तेथील बाग हा पिकनिक स्पॉट काळाच्या ओघात खामगांवकरांच्या विस्मृतीत गेला.
Super written by you vinay sir
उत्तर द्याहटवासुंदर शब्दांकन विनय सर
उत्तर द्याहटवाDear , You are bringing back all the good memories of childhood. Keep it up.Also include Jannuna talav, Rashtiya shala ,wish to know their current status.
उत्तर द्याहटवापाण्याच्या टाकी बाबतच्या लेखास प्रतिक्रिया देणा-या सर्वांना धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा