खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-6
माणसांचा दवाखाना
"आजच्या स्थानाला अंशत: भकास स्थान असे म्हणता येईल हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो कारण या स्थानाच्या काही भागात लायन्स क्लबच्या सहाय्याने सेवा कार्य सुरु आहे.
"...असे सांगितले जाते की टाटा उद्योगसमूहाने ही जागा दवाखान्याच्याच
उपयोगाकरिता म्हणून मागितली होती. असे झाले असते तर एक प्रसिद्ध सर्व सुविधांनी
युक्त व अल्प मोबदल्यात सेवा देणारे असे रुग्णालय मात्र खामगांवात नक्कीच उभे
राहीले असते.."
1980 च्या दशकात आम्ही बाल्यावस्थेत असतांना खामगांवात खाजगी रुग्णालये तशी फारच कमी होती. दवाखाना म्हटला की लेडीज हॉस्पिटल म्हणजे आताचे सरकारी रुग्णालय व नगर परिषद मेन्स हॉस्पिटल अर्थात माणसांचा दवाखाना. हो याच नावाने हा दवाखाना ओळखल्या जात असे. या दोनच रुग्णालयांची नांवे तेंव्हा जास्त ऐकिवात होती. अनेक नागरिक याच रुग्णालयात उपचारासाठी जात असत. त्यात कमीपणा वगैरे कुणी मानीत नसे. तेंव्हा इतर पर्याय सुद्धा कमी होते आणि आता लोक सरकारी रुग्णालयात का जात नाही हा एक मोठा विषय आहे. खामगांवचे हे माणसांचे रुग्णालय जी.एस.टी. कार्यालयाच्या अगदी समोर व एका बाजूने लोकमान्य टिळक शाळा क्रमांक 6 च्या समोर आहे. 6 नंबर शाळेच्या बाजूने कर्मचा-यांची निवासस्थाने व रुग्णालयात जाण्यास छोटासा रस्ता आहे. आज तो दुकानांच्या गर्दीत हरवला आहे. ही पुर्ण कौलारू व प्रशस्त इमारत खामगांव व परीसरातील रुग्णांचा आधार होती त्यामुळे त्यादृष्टीने ती सुद्धा खामगावचे एक वैभवच होती. समोरून जाण्या-या राष्ट्रीय महामार्गावरून ती दिसत असे. आता दुकानांच्या मागे लपली आहे. अद्यापही ही इमारत ब-यापैकी सुस्थितीत आहे. या रुग्णालयाच्या बाजूला उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान आहे. या बाजूने वैद्यकीय अधिका-याचे निवासस्थान व त्याच्या मागील बाजूचा कक्ष कुष्ठरोग्यांवर उपचारासाठी वापरला जात असे. आज या जागा खितपत पडल्या आहेत. वैद्यकीय अधिका-याचे निवासस्थान तर आता मुख्य रस्त्यावरून दिसत सुद्धा नाही. ही बाजू अत्यंत घाण झाली आहे, अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. उपविभागिय अधिका-याच्या अधिपत्याखाली उपविभाग म्हणजे दोन तालुके असतात त्या अधिका-याच्या बंगल्याच्याच बाजूने इतकी घाण व अतिक्रमणे असतील तर सामान्य नागरिकांची व त्यांच्या वस्त्यांची काय गत असेल. या रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी प्लॉट भागातील मुले उपविभागीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या मागे पुर्वी पतंग उडवीत असत. आता या मैदानात घाणीचे मोठे साम्राज्य आहे. या रुग्णालयात ब-यापैकी सुविधा तेंव्हा होत्या. माझ्या आजोबांना या दवाखान्यात भरती केले होते तेंव्हा या दवाखान्यात सर्वप्रथम गेलो होतो. एका कौलारू खोलीत आजोबांचा बेड होता. एक कुटुंब सहज राहू शकेल अशी दोन लहान-लहान खोल्यांची मिळून एक प्रशस्त, हवेशीर, मागे प्रसाधन गृह असलेला तो रुग्ण कक्ष होता. या दवाखान्यात डॉक्टरांसाठी सुद्धा एक निवासस्थान होते. पुढे हे रुग्णालय बंद झाले. का बंद झाले हे तेंव्हा लहानपणी काही कळले नव्हते. लहानपणी एकदा बहिणीच्या पायाला लागले असता ड्रेसिंग करायला तिथे गेल्याचे आठवते. घाटोळ काका म्हणून एक रुग्णसेवक तिथे होते. चांगले ड्रेसिंग करणारे म्हणून ते ओळखले जात. आनंद सिनेमातील ललिता पवार या मायाळू नर्ससारख्या वत्सलाबाई नावाच्या प्रेमळ व सुस्वभावी नर्स होत्या. त्यांचे आडनांव आता आठवत नाही. घाटोळ काका , वत्सलाबाई हे लोक आता हयात नाहीत. कुठे असतील त्यांचे कुटुंबीय कोण जाणे ? जुन्या काळातील डॉक्टर व नर्स यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या वागणुकीनेच अर्धे दुखणे पळून जात असे. मंत्र्यांच्या पी.ए. बाबत बोलतांना मागे एकदा नितीनजी गडकरी म्हणाले होते, "हे मंत्र्यांचे पी.ए. म्हणजे चहापेक्षा किटली गरम" असेच अनेक रुग्णालय व तेथील कर्मचा-यांबाबत आज म्हणता येईल.
ब-याच वर्षानी माझ्या मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी म्हणून या रुग्णालयात गेलो होतो. थोडा उशीर होता म्हणून सर्वदूर निरीक्षण केले तर आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला जिथे या दवाखान्यातील मुख्य डॉक्टर राहात असत ते निवासस्थान मोडकळीस आलेले आहे. मागील बाजूला असलेल्या रुग्ण कक्षात आता निवासस्थाने आहेत. काही ठिकाणी पडझड झालेली व भंगार सामान पडलेले दिसले. नाही म्हणायला लायन्स क्लब येथे नेत्र रोग्यांवर उपचाराचे चांगले कार्य करीत आहे. निदान या कार्यामुळे तरी हे रुग्णालय आपले जुने स्वरूप थोड्याप्रमाणात का होईना पण टिकवून आहे. या दवाखान्याच्या आजूबाजूने झालेल्या दुकानांच्या मागच्या बाजूस म्हणजे रुग्णालयाच्या आतील बाजूस अस्वच्छता आहे. गतवर्षी झालेल्या पावसाळ्यात थोडेफार वृक्षारोपण झाले आहे. पुर्वी येथे जनसामान्यांचा आरोग्यसेवेकरिता राबता असायाचा. कर्मचारी , डॉक्टरांची निवासस्थाने असल्याने या दवाखान्यात प्राण असल्याचे दिसायचे.
रुग्णांना बरे करणारा हा दवाखाना व येथील निवासस्थाने आज स्वत:वरच उपचार होण्याच्या प्रतीक्षेत आहे. असे सांगितले जाते की टाटा उद्योगसमूहाने दवाखान्याच्याच उपयोगासाठी ही जागा मागितली होती. यात कितपत तथ्य आहे हे ठाऊक नाही परंतू असे खरेच झाले असते तर एक प्रसिद्ध सर्व सुविधांनी युक्त व अल्प मोबदल्यात सेवा देणारे असे रुग्णालय मात्र खामगांवात नक्कीच उभे राहिले असते. आज पुर्वीच्या लेडीज हॉस्पिटल मध्ये म्हणजेच आताच्या सरकारी रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रग्गड उपचार शुल्क घेणारी खाजगी रुग्णालये आहेत परंतू नगर परिषदेचा हा माणसांचा दवाखाना मात्र खराब अवस्थेत , आजूबाजूला घाण , अस्वच्छता घेऊन आपल्या जुन्या, चांगल्या दिवसांच्या आठवणीत खितपत पडला आहे, समोर झालेल्या दुकानांच्या मागे दुर्लक्षित असा जीव मुठीत धरून उभा आहे.
क्रमश:
सुंदर विश्लेषण केले आहे, विनय लिहत रहा असेच 👍
उत्तर द्याहटवाIt was political decision taken by the then incharge.Lost good opportunity of having good hospital in our town
उत्तर द्याहटवाधन्यवाद रितेश भाऊ
उत्तर द्याहटवा@Subhash Bobdey Yes Kaka
उत्तर द्याहटवा