Click "Follow" Button below To Follow this Blog

२१/०१/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 7

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग- 7

रेडिओ श्रवण केंद्र

"...कुणी असेही म्हणेल की , जे ठिकाण आता अस्तित्वातच नाही व भविष्यात कधी सुरूही होऊ शकणार नाही अशा कायम बंद झालेल्या तसेच अस्तित्वाची एकही खुण शिल्लक नसलेल्या स्थानाची कथा सांगण्याचे काय प्रयोजन ? परंतू आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचा इतिहास , तेथील ठिकाणे हे आपल्याला ठाऊक असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्याच शहराबद्दलची आत्मीयता वृद्धिंगत होऊ लागते...."

      आजचे हे ठिकाण अस्तित्वातच नाही त्यामुळे भकास असण्याचा प्रश्नच नाही. केवळ खामगांवात असे ठिकाण होते हे ज्यांना ज्ञात नाही त्यांना ज्ञात व्हावे म्हणून आजचा लेखमालिकेत या ठिकाणचा समावेश करावासा वाटला.

“इयं आकाशवाणी संप्रती वार्ता: श्रुयंताम” काही वर्षांपुर्वी या ओळी ऐकून अनके कुटुंबाच्या दिवसाची सुरुवात  होत असे. मार्कोनीने रेडिओचा शोध लावला. भारतात रेडिओला येण्यास खुप काळ लागला. पोर्टेबल टीव्हीच्या किंवा त्याहुनही मोठ्या आकाराचे रेडिओ अनेकांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवीत असत. एक वैभवाचीच निशाणी होती ती. रेडिओ भारतात आल्यावरही जुनी हिंदी चित्रपट गीते ही “सिलोन” अर्थात श्रीलंकेतून प्रसारित होत असत. ती भारतातून प्रसारित होण्यास सुद्धा बरेच कष्ट करावे लागले होते. तो तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. भारतातून पुढे बातम्या , विविध विषयांची माहिती , श्रवणीय गाणी इत्यादी अनेक कार्यक्रम प्रसारित होणे सुरु झाले. “बिनाका गीतमाला” मुळे अमीन सयानी हे नांव सर्वांना परिचित झाले. “सैनिकोके लिये जयमाला” हा कार्यक्रम सुद्धा लोकप्रिय होता. मुंबई केंद्र , जळगांव केंद्र , पुणे केंद्र , इंदोर केंद्र अशी अनेक केंद्रे आजच्या भाषेत चॅनल हे रेडिओचे गोलाकार बटन फिरवले की लागत असत. रेडिओ पुराण तसे खुप मोठे आहे. रेडिओ हे त्याकाळातील महागडी अशी गोष्ट होती. ती सर्वांना "परवडेबल" अशी नव्हती. म्हणून त्याकाळात अनेक शहरात सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्र असायचे. एका ठिकाणी सरकारी रेडिओ लावला जायचा व एक कर्मचारी ठराविक वेळी तो लावायचा. मग रेडिओ प्रसारण , बातम्या आदी ऐकण्यासाठी गावातील माणसे त्या ठिकाणी जमा होत असत. वेळ संपली किंवा प्रसारण बंद झाले की घरी रवाना. हो प्रसारण बंद होत असे. दुरदर्शन वरील प्रसारण सुद्धा बंद होत असे. आजसारखे 24*7 असा काही प्रकार नव्हता.

असेच एक सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्र आपल्या खामगांवात सुद्धा होते. खामगांव शहरात हे केंद्र फरशी भागातील हनुमान मंदिरासमोर व अग्रवाल यांच्या घरासमोर रस्त्याच्या मध्ये जी मोकळी जागा आहे त्या जागेत होते. अशा स्मृती शहरातील अनेक वृद्ध नागरिक सांगतात. या भागात सध्या एक पाणपोयी व सार्वजनिक गणेश उत्सवात जय संतोषी माँ गणेश मंडळाचा गणपती बसतो. या पाणपोयीच्याच ठिकाणी एक खोली होती. या खोलीत एक रेडिओ लावलेला होता. ठराविक वेळी प्रशासनातील नियुक्त व्यक्ती येऊन तो रेडिओ लावत असे व प्रक्षेपण संपल्यावर बंद करीत असे. ही गोष्ट 1950-60 च्या दशकातील किंवा त्या अलीकडील-पलीकडील असेल. त्यामुळे हे केंद्र प्रत्यक्षात पाहिलेले लोक अगदीच कमी असतील.

कुणी असेही म्हणेल की , जे ठिकाण आता अस्तित्वातच नाही व भविष्यात कधी सुरूही होऊ शकणार नाही अशा भकास काय तर कायम बंद झालेल्या तसेच अस्तित्वाची एकही खुण शिल्लक नसलेल्या  सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्राची कथा सांगण्याचे काय प्रयोजन ? परंतू आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचा इतिहास , तेथील ठिकाणे हे आपल्याला ठाऊक असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्याच शहराबद्दलची आत्मीयता वृद्धिंगत होऊ लागते. शहर अधिक सुंदर व्हावे , शहरातील अशा उपरोक्त व या लेखमालिकेत समाविष्ट केलेल्या स्थांनांसारख्या ठिकाणी स्वच्छता असावी , सौंदर्यीकरण असावे असे वाटते, शिवाय नवीन पिढीला सुद्धा शहराचा इतिहास कळू शकतो व या संबंधित लोकांना इथे पुन्हा काही चांगले करावे असे वाटण्याची शक्यता आहे म्हणून हा उहापोह. पुढे सिनेमाचे प्रस्थ वाढले गावोगावी सिनेमागृह झाले व रेडिओची पिछेहाट होऊ लागली , टीव्ही आल्यावर तर अनेकांचे रेडिओ अडगळीत पडले. तसेच खामगांवातील हे सार्वजनिक रेडिओ केंद्र सुद्धा बंद पडले. 

आज अनेक “दर्दी” लोकांकडे रेडिओ आहे. मोबाईलमध्ये सुद्धा रेडिओ आहे, एफ.एम.वाहिन्या व ऑनलाईन रेडिओ ऐकल्या जात आहे. नवीन कार्यक्रम प्रसारित करून जुनी रेडिओ  केंद्रे सुद्धा कार्यान्वित आहेत. मा. पंतप्रधानांचा जनसामान्यांना उद्बोधन करण्यासाठी म्हणून असलेला “मन की बात” हा कार्यक्रम सुद्धा अनेक लोक रेडिओवर ऐकतात. ज्या सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती देश साजरा करणार आहे त्या नेताजींनी सुद्धा जर्मनीमध्ये  आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन केले होते व त्या काळात या माध्यमाचा वापर भारतीयांना उद्बोधित करण्यासाठी मोठ्या खुबीने केला होता. असा हा रेडिओ आजही अस्तित्व टिकवून असला तरी सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्रे मात्र काळाच्या ओघात व वाढत्या तांत्रिक प्रगतीमुळे लुप्त झाली. कधीकाळी अशी केंद्रे सुद्धा होती यावर आता कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. इति वार्ता: !

                                           क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा