Click "Follow" Button below To Follow this Blog

२९/०७/२०२१

PART - 5 MAD, Suma

 वेडयांच्या विश्वात - भाग 5  

सुमा

सुमा ज्या भागात फिरत असे त्या भागाचे स्वरूप आता पालटले आहे. परंतू त्या भागातून गेलो की कधी-कधी मला खाऊ द्या हो मला खाऊ द्या हो ” या आर्त स्वरातील ओळी कानात घुमतात व डोळ्यासमोर गरीब सुमाचे ते करुण डोळे येतात.

👉मागील भागापासून पुढे..

मागील भागात पाहिलेल्या बावरी पेक्षा या लेखातील वेडी स्त्री खुप निराळी होती.  आजच्या भागातील स्त्री अतिशय दीन अशी, कुणालाही जिच्याकडे पाहून दया येईल अशी स्त्री होती. गावाच्या मध्य भागातून वाहणा-या नाल्यावरील पुलावरून जात असतांना “ मला खाऊ द्या हो मला खाऊ द्या हो “ असे गाणे म्हणत फिरणारी मोठा फ्रॉक घातलेली, एक वेणी घट्ट बांधलेली, रिबीन लावलेली ठेंगणी मुलगी अनेकांना दिसत असे. वयाने मोठी वाटत असून तिला एक झगा घालून दिलेला असे. झगा म्हणजे फ्रॉक हे इथे इंग्रजाळलेल्या व ग्रामीण भागातून शहरात/ विदेशात गेलेल्यांच्या पिढीसाठी नमूद करावे लागेल. अर्थात ते मराठी वाचन करीत असतील की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्या मुलीच्या गाण्याच्या त्या ओळी कित्येकदा ऐकू आल्या कारण ती खुप वेळा दिसायची त्यामुळेच त्या ओळी लक्षात राहिल्या. ती याच ओळी पुन्हा पुन्हा म्हणत राही. हे गाणे पुर्ण होते का हे कधी कळले नाही. कदाचित ते अंगाई गीत असावे, तिची आजी किंवा आई तिला निजवतांना ते म्हणत असेल व तेच त्या मुलीच्या लक्षात राहिले असेल. या ओळी म्हणत जाता जाता जरी नात्याने नसेल पण कुणी तरी दयाळू काका, मामा तिला खाऊसाठी पैसे देत असावा. त्याच नाल्याच्या काठावर पानठेला असलेला एक कनवाळू माणूस या मुलीला नेहमी खाऊ पिऊ घालत असे. खुप वर्षांपूर्वी याच भागातून जात असतांना ती मुलगी दिसली होती. तिला प्रथमच पाहत असतांना माझ्या पावलांची गती कमी झाली “अरे चल लवकर, सुमा आहे ती” आई म्हणाली. मग सुमा कित्येकवेळा दिसायची. काळानुसार प्रौढत्वाच्या खुणा तिच्या चेह-यावर दिसायला लागल्या होत्या परंतू खाऊसाठीची याचना मात्र सुरूच असायची. नंतर सुमा कधीच दिसली नाही. कुणाच्या तरी संसारवेलीवर फुललेले हे सुमा नावाचे पुष्प होते. पण हे पुष्प पुर्ण विकसित झाले नव्हते.  पुर्ण बौद्धिक विकास न झालेली ही मुलगी आहे हे त्या सुमाच्या परिवाराच्या लक्षात आल्यावर त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नसेल. कित्येकदा अशी परिस्थिती येते की मानवाच्या हाती काहीच उपाय नसतो. कधी परिस्थिती बरोबर नसते तर कधी परिस्थिती चांगली असूनही दैव साथ देत नाही. प्रारब्ध सोबत घेऊन आलेला जीव त्यानुसार जगतो , आयुष्याची वाटचाल करतो. कधी कधी कुणी त्याच्या मदतीला येते , तर कधी केलेली मदत सुद्धा त्याच्या कामी येत नाही, कधी कुणाला त्याच्याशी काहीही सोयरसुतक नसते. अशा लोकांशी तसेच रस्त्याने येणा-या-जाणा-यांशी , गर्दीशी कुणाला काय घेण-देण असते ? त्यातही मानसिक अवस्था चांगली नसलेले सुमासारखे लोक कुणाच्या खिजगणतीत असणार ? आजकाल मात्र अनेक स्वयंसेवी संस्था , लोक अशा लोकांसाठी झोकून देऊन कार्य करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेक मनोरुग्णांची मानसिक स्थिती सुधारत सुद्धा आहे ही निश्चितच एक दिलासा देणारी बाब आहे. सुमा ज्या भागात फिरत असे त्या भागाचे स्वरूप आता पालटले आहे. परंतू त्या भागातून गेलो की कधी-कधी मला खाऊ द्या हो मला खाऊ द्या हो ” या आर्त स्वरातील ओळी कानात घुमतात व डोळ्यासमोर गरीब सुमाचे ते करुण डोळे येतात.

                               क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 
 


An old article written in 2015 , on the occasion of Babasaaheb Purandare birthday

 जाणता माणूस

बाबासाहेब अभ्यासासाठी इंग्लंड मध्ये असतांना त्यांना तेंव्हा इंग्लंडला दुस-या

 महायुद्धात अग्रेसर ठेवणा-या विस्टन चर्चिल यांचा पुतळा कुठेही आढळून आला नाही. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी चर्चिलचा पुतळा कुठेही नाही ?” असे त्यांच्या तेथील मित्र जोसेफ यांस विचारणा केली तेंव्हा जोसेफ याने मोठे मार्मिक उत्तर दिले. जोसेफ म्हणाला, “Whats the necessity ? Churchill is in our blood.” चर्चिल आमच्या रक्तात आहे. शिवाजी महाराजांचे केवळ पुतळेच असू नये तर शिवाजी महाराज आपल्या  नसानसांत असावे असा संदेश त्यांनी यातून दिला.

म्हणतात ना आरंभ चांगला तर अंत पण चांगला होतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली की सर्व म्हणतात , “चला सुरुवात छान झाली” . खामगांवकरांची सुद्धा 2015 या वर्षाची सुरुवात छानच झाली. ही छान सुरुवात करून देण्यास निमित्त ठरले ते म्हणजे मा. भाऊसाहेब फुंडकर व सागरभाऊ फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच स्थापन झालेले “व्हिजन फाउंडेशन”. डॉ.श्री विशाल घुले यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेने “जाणता राजा” या आशिया खंडातील सर्वात मोठ्या व पहिल्या महानाट्याचा प्रयोग खामगांवात आयोजित केला. या महानाट्याच्या अनुषंगाने 12 जानेवारी रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात शिवचरित्र अभ्यासक शिवशाहीर आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सुद्धा व्हिजन फाउंडेशन ने केले होते. खामगांवकरांसाठी हे व्याख्यान एक पर्वणीच ठरले. वर्षाच्या आरंभी “जाणता राजा” आणि मा. बाबासाहेबांचे व्याख्यान म्हणजे २०१५ ची सुरुवात चांगलीच झाली ना ! दि. 12 जानेवारी 2015 हा दिवस सर्वच श्रोत्यांना चिरकाल स्मरणीय असा ठरला कारण स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजामाता यांची जयंती व त्याच दिवशी श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान. कार्यक्रमाला बरोबर सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात झाली कारण बाबासाहेब हे वेळेला फार महत्व देतात. बाबासाहेब म्हणतात की, “ मी जी वेळ सांगितली आणि जर का त्यावेळेस आलो नाही तर समजा नक्कीच काही अपघात झाला” इतके ते वक्तशीर आहे. व्याख्यानात त्यांनी त्यांच्या समवेत त्यांचे मानसपुत्र श्री गणेश धालपे यांना सुद्धा सहभागी केले होते व या दोघांतील संवादातून श्रोत्यांसमोर शिवरायांच्या चरित्राचे नानाविध पैलू त्यांनी प्रकट केले. आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने बाबासाहेबांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. सभागृहात नीरव शांतता होती. सर्व श्रोते अगदी कानांत प्राण आणून बाबासाहेबांचा शब्द न शब्द श्रवण करीत होते. सभागृह भारावल्यागत झाले होते. बाबासाहेबांनी अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केले की मी तुम्हाला कोणतीही दंतकथा सांगणार नसून सगळी वस्तुस्थिती व खरा इतिहास सांगणार आहे. दोन किल्यांतील अंतर , शाहिस्तेखानाच्या फौजेची संख्या , त्यातील घोडदळाची संख्या , बहादूरखानाची हंबीरराव मोहिते यांनी केलेली फजिती, बहिर्जी नाईक हा कसा निष्णात हेर होता , महाराज सर्वांना कसे मान देत हे त्यांनी सोनोपंत डबीर या त्यांच्या सेवकाची महाराजांनी महाबळेश्वर येथे केलेली सुवर्णतुला व दानधर्म या कार्यक्रमाचे उदाहरण देऊन कथन केले. 

सोनोपंत डबीर हे वाशिमचे होते अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्याविषयी विशेष आपुलकी बाबासाहेबांनी असल्याचे सांगितले तसेच शिवरायांच्या एक पत्नी अंबिकाबाई या बुलडाणा जिल्ह्यातील करवंडच्या इंगळे कुटुंबियातील असल्याचे त्यांनी कथन केले. आजही करवंड गावात तत्कालीन इतिहासाची साक्ष देणा-या गढ्या पहावयास मिळतात. बाबासाहेब जेंव्हा या सर्व गोष्टी सांगत होते तेंव्हा आपल्याच घरातील आपले आजोबा जुन्या गोष्टी सांगत आहे असे श्रोत्यांना वाटत होते. त्यांच्या बोलण्यातून , त्यांच्या नजरेतून श्रोत्यांविषयी प्रेम, आपुलकी जाणवत होती. निव्वळ चरितार्थासाठी किंवा व्यावसायिक कार्यक्रम करणा-यांचे जसे व्याख्यान असते तसे हे व्याख्यान नक्कीच नव्हते. वयाच्या 93 व्या वर्षी तारखा , महाराजांची पत्रे , सैन्याची संख्या , किल्यांमधील अंतर व इतर अनेक बाबींचे स्मरण असणे हे ध्यास , अभ्यास , चिकाटी , प्रयत्नांची पराकाष्ठा यांशिवाय साध्य होत नाही. महाराज सिद्धी जौहरच्या वेढ्यातून भर पावसात निसटले म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा त्याच वाटेने पावसातच जाऊन पाहिले आहे. आपल्या व्याख्यानात त्यांनी एक संस्मरणीय अशी घटना सांगितली.

बाबासाहेब अभ्यासासाठी इंग्लंड मध्ये असतांना त्यांना तेंव्हा इंग्लंडला दुस-या महायुद्धात अग्रेसर ठेवणा-या विस्टन चर्चिल यांचा पुतळा कुठेही आढळून आला नाही. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी , चर्चिलचा पुतळा कुठेही नाही ?” असे त्यांच्या तेथील मित्र जोसेफ यांस विचारणा केली तेंव्हा जोसेफ याने मोठे मार्मिक उत्तर दिले. जोसेफ म्हणाला, “Whats the necessity ? Churchill is in our blood.” चर्चिल आमच्या रक्तात आहे. शिवाजी महाराजांचे केवळ पुतळेच असू नये तर शिवाजी महाराज आपल्या  नसानसांत असावे असा संदेश त्यांनी यातून दिला. आपल्या आयुष्याचे व आजही “फिट” असल्याचे रहस्य हे वक्तशीरपणा , शिस्त , सतत कार्यमग्नता आणि कोणतेही व्यसन नसणे यामध्ये आहे हे  सांगून शेवटी बाबासाहेबांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच शिवाजी राजांबद्दल सर्वच “जाणत” असलेले “जाणता माणूस” मा. बाबासाहेब पुरंदरे याना याची देही याची डोळा पाहण्याची , त्यांची वाणी ऐकण्याची अनुभूती त्यांच्या खामगांवात येण्याने मिळाली व 2015 वर्षाचा चांगला आरंभ झाला हे मोठे भाग्यच म्हणावे लागेल.

२२/०७/२०२१

PART - 4 MAD, Bawari , a mad woman

वेडयांच्या विश्वात - भाग 4

बावरी

आपल्या 7 अर्भकांना मारल्यावरही भगवंताच्या मातेने, देवकीने ते अपार दु:ख पचवले, मनाचा समतोल ढळू दिला नव्हता. या बावरीला मात्र असे काय झाले होते की तिचा मानसिक तोल  ढासळला होता. बावरीच्या अशा दशेला कुणी कारणीभुत असेल का ? असल्यास तो कसा असेल , त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले असेल की नाही ? दूर का असेना परंतू त्या महाभारतातील देवकीला तिच्या श्यामचा आधार वाटत होता. या बावरीचा कुणी श्याम होता की नव्हता हे मात्र कधी कळले नाही.

👉मागील भागापासून पुढे...

परवा संध्याकाळी नांवात श्याम हे कृष्णाचे नाव असलेल्या एका रस्त्याने जात होतो. या रस्त्याने आता जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती झाल्या आहेत काही होत आहेत. घरी परततांना जुन्या इमारती आठवल्या व त्याच अनुषंगाने बावरी पण आठवली. महादू हा वेडा इसम होता त्याच काळात बावरी ही पागल स्त्री सुद्धा याच भागात फिरत असे. या बावरीला पाहिल्यावर मात्र मला वाटायचे की ही बावरी अशी का ? लुगडे नेसलेली बावरी गावात फिरत असे. महादू कुणाशी बोलत नसे पण बावरी मात्र लोकांशी बोलत असे. बालपणी मी एकदा माझ्या मित्राच्या दुकानात गेलो होतो, कित्येकदा मी तिथे जात असे. याच दुकानासमोर बावरी मला सर्वप्रथम दिसल्याचे स्मरते. बावरी कुणाला तरी चहा मागत होती. चहाला पैसे दिले किंवा नाही दिले तरी बावरी त्यावर काही प्रतिक्रिया देत नसे. फक्त हसून निघून जात असे. गावातील  मध्यवस्तीत बावरी फिरायची. बावरी वरून लोक एकमेकांची थट्टा मस्करी सुद्धा करीत असत. पण ते बावरीला काय ठाऊक. बावरी आपल्याच धुन मध्ये आपल्या लुगड्याच्या पदराशी चाळा करीत निघून जात असे. आमच्या एका मित्राचा जेष्ठ बंधू ढेकर देतांना “ए बावरी” असा आवाज काढत असे व त्याचे ते ढेकरातून बावरी अशा केलेल्या उच्चारणामुळे एकच हशा पिकत असे. हा गमतीचा भाग झाला. पण बावरी कुठून आली होती , कोण होती , ती वेडी का झाली याबाबत कुणाला काही ठाऊक नव्हते ,

मै वैसी नही जैसी बतायी गयी हूं |

मै बावरी नही , बावरी बनायी गयी हूं| 

या उपरोक्त पंक्तींप्रमाणे तिच्या वेडेपणास कुणी कारणीभूत असेल का ? पण या सर्व बाबींचा  कुणी कशाला विचार करेल. कोणी काही खायला प्यायला दिलेल्या अन्नावर बावरीची गुजराण होत असे. बावरी कधी चिडलेली, कुणाच्या अंगावर धाऊन गेलेली दिसली नाही. ज्या गांवात बावरी राहायची ते गांव पुर्वी खुप लहान होते त्यामुळे बावरीला सर्वच ओळखत. बावरीला मात्र सर्व लोक सारखेच वाटत असावेत. बावरी कधी काळाच्या पडद्याआड गेली कुणाला कळले सुद्धा नाही. तिच्या असण्या- नसण्याने कुणाला काय फरक पडणार होता ? या लेखमालिकेच्या निमित्ताने मला या वेड्या लोकांचे स्मरण होत आहे नाहीतर मी पण त्यांना विसरलोच होतो. धकाधकीच्या जीवनात मनुष्य काय काय म्हणून लक्षात ठेवेल ? पण तरीही वेळप्रसंगी त्याला अनेक गोष्टींची आठवण होतच असते. म्हणूनच त्या दिवशी लॉकडाऊन मध्ये शाळेजवळ पाहिलेल्या त्या वेड्या तरुणामुळे मला हे इतर वेडे एकापाठोपाठ एक असे आठवत आहेत. मी त्यांच्या आठवणी झर-झर टाईप करत काही वेड्यांना जसे बंधनात टाकतात तसे मी या वेड्या व्यक्तींच्या आठवणींना शब्द बंधनात अडकवू लागलो. ही वेडया लोकांविषयीची मालिका वाचकांना कितपत रुचेल असाही विचार आला खरा. पण तरीही याच विषयावर लिहिण्याची अंत:प्रेरणा मात्र मला झाली म्हणून मी लिहिता झालो. आपण वेड्यांसाठी काही करू शकत नाही निदान काही लेखन तरी करू जेणे करून त्यांच्याप्रतीची जाणीव, संवेदना, भावना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण यांबाबत काही प्रमाणात जागृती होईल अशी आशा कुठेतरी वाटली. 

 बावरी जन्मत: बावरी होती की नंतर झाली होती कोण जाणे ? भगवंताच्या भावंडाना जन्म झाल्याबरोबर कंसाने ठार मारले होते. आपल्या 7 अर्भकांना मारल्यावरही  भगवंतमाता देवकीने ते दु:ख पचवले, मनाचा समतोल ढळू दिला नव्हता , अपार दु:ख पचवले होते. या बावरीला मात्र असे काय झाले होते की तिचा मानसिक तोल  ढासळला होता. बावरीच्या अशा दशेला कुणी कारणीभुत असेल का ? असल्यास तो कसा असेल , त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले असेल की नाही ? दूर का असेना परंतू त्या महाभारतातील देवकीला तिच्या श्यामचा आधार वाटत होता. या बावरीचा कुणी श्याम होता की नव्हता हे मात्र कधीच कळले नाही पण योगायोगाने नांवात श्याम हे नांव असलेला मार्ग मात्र तिला राहण्यासाठी म्हणून होता व अनेक लोकांच्या रूपातून श्यामच खाऊ-पिऊ घालत होता.

                                           क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

१५/०७/२०२१

PART - 3 MAD , Mahadu

वेडयांच्या विश्वात - भाग 3

महादू

सर्वात पहिल्यांदा तो दिसला. मोठे केस , दाढी वाढलेली, शर्टाच्या गुंड्या उघड्या एका हाताने आपली पँट सावरत एका हाताने दगड , वस्तू जमा करीत होता. मी त्याच्याकडे कित्येकदा निरखून पहायचो. तो खुप हुशार असल्याचे , त्याला गणितात गती असल्याचे व अति अभ्यासाने तो पागल झाला असल्याचे कुणीतरी सांगितले होते. ते खरे की खोटे काही माहित नाही. त्याला पाहतांना मात्र मला त्याच्या नजरेत खुप करूण भाव दिसत असत.

 👉मागील भागापासून पुढे....

मी पाहिलेले हे वेडे हिंसक नव्हते, बालपणापासून त्यांना पाहिले असल्याने त्यांच्या दशेची जाणीव होती. त्यांच्याप्रती सहानुभूती होती असे म्हणता येणार नाही कारण सहानुभूती म्हणजे सह+अनुभूती असे होय. “मला अमूक एकाप्रती सहानुभूती आहे” असे सहज म्हटल्या जाते परंतू प्रत्यक्षात तशी अनुभूती घेणे हे खूप कठीण आहे.

80 चे दशक होते, प्राथमिक शाळेत मला दाखल केले. शाळा घरापासून हाकेच्या अंतरावर. शाळेत जाऊ लागलो. तिसरी चौथीत असतांना सर्वात पहिल्यांदा तो दिसला. मोठे केस , दाढी वाढलेली, शर्टाच्या गुंड्या उघड्या एका हाताने आपली पँट सावरत एका हाताने दगड , वस्तू जमा करीत होता. माझ्या छोट्या पाऊलांनी भर-भर घर गाठले. मला भेदरलेला पाहून “काय झाले रे , घाबरला का ?” आई म्हणाली. मी त्या वेडयाबद्दल सांगितले “मी नाही जाणार शाळेत” मी. “अरे तो महादू आहे” तो कुणाला काही करत नाही , बोलत पण नाही , दगड जमा करतो पण कुणाला कधी मारत नाही, गरीब आहे तो" आईने समजावले. तरी दुस-या दिवशी भीत-भीतच शाळेत गेलो. येतांना एका मित्रासोबत येत होतो तो पुन्हा दिसला. आज मात्र माझी भीती थोडी कमी झाली होती. मग तो रोजच दिसे. कुणी त्याला भाकरी, भाजी देत असे. ती तो गुमान खायचा आणि पुन्हा त्याच दगड, काड्या काटक्या जमा करण्याच्या त्याच्या नादात लागून जायचा. हायस्कूलला गेल्यावर मी त्याच्याकडे कित्येकदा निरखून पहायचो. तो पुर्वी खुप हुशार असल्याचे , त्याला गणितात खुप गती असल्याचे व अति अभ्यासाने तो पागल झाला असल्याचे कुणीतरी सांगितले होते. ते खरे की खोटे काही माहित नाही. त्याला पाहतांना मला त्याच्या नजरेत खुप करूण भाव दिसत असे. काय असेल त्याचे पुर्ण नांव ? महादू वरुन त्याचे नांव महादेवच असावे. महादेव किती छान नांव  ? सर्वांपासून दूर राहणारा , जटा वाढलेला , अंगावर पुरेसे कपडे नसलेला अशा देवाचे देव महादेव यांचे नांव. महादू तर वेडा होता पण राहण्याच्या बाबतीत तो त्या कैलासाचा पती असलेल्या ख-या महादेवाप्रमाणेच होता. मग या महादू वर अशी परिस्थिती का आली असेल ? आजही त्याचा चेहरा , त्याच्या चेह-यावरील करुण भाव माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे येत आहेत. महादू माझा कोणी नव्हता पण तो रोज दिसायचा आमच्या शेजारच्या घरासमोर ओटा होता तिथे तो बसायचा. ऊन, वारा, पाऊस महादू नेहमी रस्त्यावरच असे. मी त्याला ना कधी काही खायला दिले ना कधी त्याच्याशी बोललो पण कोण जाणे का महादू लक्षात राहिला. कदाचित मी सर्वात प्रथम पाहिलेला असा तो वेडा मनुष्य होता. पुढे मी शिक्षणात गर्क झालो, नवीन भागात रहायला गेलो. जुन्या घरी गेल्यावर क्वचित महादू दिसत असे. आता काहीसा थकलेला , केस पांढरे झालेला. एक दिवस जुन्या घरी गेलो तर महादू ज्या गोदामाच्या दरवाजातील कोप-यात बसत असे तिथे त्याचे तेच साहित्य दगड, काटक्या जमा केलेले दिसले, महादू मात्र नव्हता. गेला असेल इकडे-तकडे म्हणून मी दुर्लक्ष केले. पण नंतर त्याचे निधन झाल्याचे कळले. कुणी , कसे केले असतील त्याचे अंत्यसंस्कार ? असा प्रश्न मला पडला होता. कुणी म्हणे मुन्सिपाल्टीच्या माणसांनी त्याला उचलून नेले. मला वाईट वाटले. मानवी मनंच असे असते की गल्लीतील मुक्या जनावरांचा सुद्धा त्याला लळा लागतो मग पागल का असे ना महादू तर मनुष्य होता. आपल्या संत मंडळींचे सुद्धा मनुष्य व प्राणी यांच्याप्रतीच्या करुणा, दया, प्रेम , आपुलकी यांबाबतचे कित्येक दाखले आहेत. 

पुर्वी वेड्या लोकांना वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमाने सरकारच आधार होते परंतु पुर्ण क्षमता झाली की इतर वेड्यांना मात्र रस्त्यांचाच आधार होता. आज मात्र अनेक खाजगी मनोविकार तज्ञ आहेत काही सेवाभावी डॉक्टर्स मानसिक रोग्यांना सेवा देत आहेत त्यामुळे मात्र बराच बदल होत आहे.

मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. मनुष्याची अशी स्थिती का होत असावी ? अति अभ्यासाने खरेच महादूच्या डोक्यावर परिणाम झाला असावा का ? त्याचे मन स्वास्थ्य का बिघडले असावे ? कुण्या एखाद्या घटनेने त्याच्यावर परिणाम झाला असावा ?

उन्मादो मातृदोषेण पितृदोषेण  मूर्खता ||
अर्थ -  जर माता किंवा पिता यांच्यात काही  वंशानुगत  अथवा  अन्य दोष असतील तर  मातृदोषामुळे संतती 
पागल  तर पितृदोषामुळे  संतती मूर्ख  होते.

असे उपरोक्त संस्कृत सुभाषितात म्हटले असले तरी ते सांप्रत काळात कुणाला पटेल असे वाटत नाही.  

 कदाचित महादू आता कुणाला आठवत सुद्धा नसेल. शेवटी पागलच तो. तो का कुणाच्या लक्षात राहील ? पण विसरण्याची शक्ती जरी मानवाला दिली असली तरी काही गोष्टी मानव आजन्म विसरत नाही. म्हणूनच आज इतकी वर्षे झाली,कितीतरी घडामोडी जीवनात घडल्या पण महादू व त्याचा तो करुण चेहरा कुणास ठाऊक का पण स्मरणात राहिला.

क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

११/०७/२०२१

Article about renowned actor Yusuf Khan Alias Dilipkumar and his contribution to film industry and Nation.

 युसुफ खान उर्फ दिलीपकुमार




दिलीपकुमारच नव्हे तर इतरही अनेक कलाकारांना इथे मान्यता दिली गेली. पाकिस्तान कडून त्याच्या भूमीतून आतंकवादाच्या आडून किती हल्ले केले , बळी घेतले तरीही येथील कलाप्रेमी , भोळ्या हिंदू जनतेने पाकिस्तानी कलाकारांना सुद्धा इथे डोक्यावर घेतले. तसेच युसुफ खान उर्फ दिलीपकुमारलाही घेतले होते. पण दिलीपकुमार मात्र मनाने युसुफ खानच राहिला असावा का ? असा प्रश्न आवर्जून पडतो.

परवा 7 जुलै रोजी मुळ युसुफ खान असलेल्या परंतू सिनेसृष्टीत नट म्हणून दाखल होण्यासाठी दिलीपकुमार हे नांव धारण केलेल्या अभिनय सम्राटाचे निधन झाले. त्वरीत त्यावर “ट्रॅजेडी किंगचा अंत” म्हणून लेख लिहिला. परंतू तद्नंतर दिलीपकुमार यांच्यावर हा दूसरा लेख सुद्दा लिहावासा वाटला. 1970 च्या आसपास दिलिपकुमारचा गोपी चित्रपट झळकला होता. गोपीतील रफीच्या आवाजात “सुखके सब साथी दुख मे ना कोई” हे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे भजन म्हणणारा भोळा भाबडा दिलीप , त्यापूर्वी नया दौर मधला “मॅन व्हर्सेस मशीन” कथेच्या अनुषंगाने मानवाचा टांग्याचा रोजगार हिरावला जाऊ नये म्हणून लढा देणारा नायक. याप्रकारचे अत्यंत अभ्यासपुर्वक असे  चित्रपट तो करायचा. त्याने बहुतांश वेळा ग्रामीण भागातील भोळ्या नायकाच्या  भूमिका साकारल्या. त्याच्या या अशा साध्या, भाबड्या तरुणाच्या भूमिकांमुळे त्याची भोळी अशी प्रतिमा भोळ्या मनाच्या भारतीय जनमानसात निर्माण झाली. 

      भारतीय मन हे सिनेसृष्टी , संगीत , गीते , नाटक , नाट्यसंगीत , शास्त्रीय संगीत, नृत्ये आदींची आवड असलेले रसिक मन आहे. हिंदू धर्मात अनादी अनंत काळापासून , वेदांमधून आलेले शास्त्रीय संगीत तसेच कला यांना मोठे स्थान आहे. या स्थानामुळे हिंदू जनता कलाकारांचा जात , धर्म यांचा मुलाहिजा न बाळगता सदैव सन्मान करीत आली आहे. या मुळेच युसुफ खान उर्फ दिलीपकुमारला भारतीय जनतेने डोक्यावर घेतले त्याला ट्रॅजेडी किंगचा खिताब देऊन अभिनयाचा अनभिषक्त सम्राट म्हणून घोषित केले, माध्यमांनी त्यांच्यावर नेहमीच स्तुती सुमने उधळली. केवळ दिलीपकुमारच नव्हे तर इतरही अनेक कलाकारांना इथे मान्यता दिली गेली. पाकिस्तान कडून त्याच्या भूमीतून आतंकवादाच्या आडून किती हल्ले केले , बळी घेतले तरीही येथील कलाप्रेमी , भोळ्या हिंदू जनतेने पाकिस्तानी कलाकारांना सुद्धा इथे डोक्यावर घेतले. सलमा आगा, झेबा बख्तियार, नुसरत फतेह अली खान, अदनान सामी, गुलाम अली असे कितीतरी कलाकार सांगता येतील. 

हिंदूच्या घरातील मंगल प्रसंगी आजही बिस्मिल्ला खान यांनी वाजवलेल्या सनईचे मधूर स्वर वाजत असतात. सोनू निगमच्या घरात रफी साहेबांचा मोठा फोटो आहे. रफी साब मेरे वालीद जैसे है असे तो अभिमानाने सांगतो. तसेच दिलीपकुमारचे झाले. त्याला पण इथे किती मान मरातब मिळाला. धर्मेंद्र ने त्याला आपला जेष्ठ भाऊ मानले.अनेक नटांनी त्याला आपला आदर्श मानले. पण दिलीपकुमार मात्र मनाने युसुफ खानच राहिला असावा का ? असा प्रश्न आवर्जून पडतो. त्याची काही कारणे आहेत.

      आपल्या उर्दू भाषेवरील प्रभूत्वाचा त्याला अहंकार होता म्हणूनच अगदी सुरूवातीला            लता मंगेशकर यांना “मराठी लोगोके गाने मे दाल चावल की बू आती है |” म्हणून त्याने हिणवले होते. (लता दीदी मात्र काही मौलवींकडे जाऊन उर्दू शिकत होत्याच पुढे त्यांनी उर्दू शब्दोच्चारणावर प्रभुत्व मिळवले व नंतर मग दिलीकुमार यांनी त्यांचा गौरव केला होता. ) 

    पाकीस्तानातील कर्करोग इस्पितळास त्याने  दहा लाखाची मदत केली होती व त्यामुळे त्याला पाकीस्तान सरकार कडून पुरस्कार प्राप्त झाला होता. इतरही काही ऐकीव व वाचनात आलेली कारणे आहेत परंतू त्याचा ऊहापोह इथे करावासा वाटत नाही. 

  त्याला पाकीस्तान कडून पुरस्कार प्राप्त झाल्यावर त्याच्यावर मोठी टीका झाली. त्याने मग अटलजींना पुरस्कार परत करू का असे विचारले होते. परंतू यापेक्षा फाळणीपासून जो पाकीस्तान भारताशी कुरापती काढत आला आहे , ज्या  देशामुळे आपले कित्येक जवान हुतात्मा झाले आहेत त्याच पाकीस्तानातील इस्पितळास मदत करतांना मात्र त्याला काहीच गैर वाटले नाही. त्यावेळी “अशी मदत करू का ?” असा त्याने कुणाचा सल्लाही घेतला नाही. शिवाय भारतावरील संकटाच्या काळात अमिताभ बच्चन , नाना पाटेकर  अक्षय कुमार , अजय देवगण , विक्रम गोखले यांचे वडील चंद्र्कांत गोखले व इतर अनेक सिनेकलाकारांनी मदतीचा हात पुढे केला तसा दिलीपकुमार ने दिलेला कधी दिसला नाही. तसे कधी काही ऐकण्यात, वाचनात आले नाही. परंतू तरीही दिलीपकुमारला जनतेने इथे प्रेमच दिले, सन्मान दिला , सरकार कडून पद्म पुरस्कार मिळाला , दादासाहेब फाळके सन्मान मिळाला परंतू ज्या हिंदुस्थानने त्याला भरभरून सन्मान , प्रेम दिले त्या हिंदुस्तानला मात्र हा युसुफ खान उर्फ दिलीपकुमार कधी मदतीचा हात देण्यास पुढे आलेला दिसला नाही. 

०७/०७/२०२१

Tribute to Dilipkumar

 ट्रॅजेडी किंगचा अंत

आज आपण पाहतो दोन-दोन घटस्फोट देणारे अभिनेते याच चित्रपटसृष्टीत आहे. त्या घटस्फोटाचे ते समर्थन पण मोठ्या खुबीने करतात. चित्रपटातील हे अभिनेते, छोट्या छोट्या मुद्द्यां वरून वेगळे होणारे समाजातील कित्येक नवविवाहीत यांनी दिलीपकुमार-सायरा यांच्या प्रेमाचा, इतकी वर्षे प्रेमाने एकत्र राहण्याचा , संसार करण्याचा आदर्श जरूर घ्यावा.

त्याचे कृष्ण धवल चित्रपट पाहणारे अनेक लोक सुद्धा आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. परंतू 1980- 90 च्या दशकात आलेल्या त्याच्या शक्ती, कर्मा, मशाल , विधाता , इज्जतदार, कानून अपना अपना अशा चित्रपटांमुळे आता चाळीसी-पन्नाशीत असणा-यांना मात्र तो नक्कीच आठवतो. नवीन पिढीला मात्र कदाचित तो तितकासा माहित नसावा. त्याच्या प्रकृती बाबतच्या वृत्तांमुळे एक जुना अभिनेता एवढीच काय ती नवीन पिढीशी त्याची ओळख असू शकते. आजच्या चाळीसी-पन्नाशीतील अनेकांनी त्याचे जुने चित्रपट सुद्धा पाहिलेच असतील कारण या लोकांनी केवळ एकच वाहिनी असलेला दूरदर्शनचा जमाना तसेच टॉकीजमध्ये जुने चित्रपट पुनर्प्रदर्शित होण्याचा जमाना पाहिला आहे. बालपणी मी एके वर्षी 15 ऑगष्ट ला दूरदर्शनवर “ ये देश है वीर जवानो का” ही गाणे जेंव्हा पाहिले तेंव्हा दिलीपकुमार हे नांव माहित झाले. पुढे त्याचे काही चित्रपट सुद्धा पाहिले. “अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नही” , “साथी हाथ बढाना , एक अकेला थक जायेगा” अशी रफीच्या आवाजातील त्याची देशभक्तीपर गीते ऐकल्यावर , पुढे शोलेतील ठाकूर प्रमाणे दुर्जनांचा नाश करण्यासाठी तरुणांना हाताशी घेऊन लढा पुकारणारा कर्मा तील त्याचा ठाकूर विश्वप्रतापसिंग , मशाल मधील अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा पत्रकार, आपल्या गुन्हेगार मुलाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नशील असा शक्ती मध्ये अमिताभच्या पित्याची भूमिका करणारा पोलीस अधिकारी अशा नानाविध भूमिका साकारणारा दिलीपकुमार त्याचा अभिनय पाहिल्यावर आवडू लागला होता. सुरुवातीला  हॉटेलच्या व्यवसायात वडीलांना मदत करणा-या मो. युसुफ खान यांस बॉम्बे टॉकीजच्या देविकाराणी या जुन्या अभिनेत्रीने अभिनेता बनण्यास प्रेरणा दिली व दिलीपकुमार हे नांव दिले. कृष्ण धवल जमान्यात त्याने अनेक हिट चित्रपट दिले. सतत दु:खी भूमिका साकारल्यामुळे तो काही काळ नैराश्याने ग्रासला होता. म्हणून पुढे त्याने मानसिक  रोग तज्ञांंच्या सल्ल्यानुसार कोहिनूर, राम और श्याम सारख्या काही चित्रपटात विनोदी भूमिका केल्या. 

    90 च्या दशकात त्याला पाकीस्तानने “निशान- ए – इम्तीयाज” हा पुरस्कार दिल्यावर व त्याने पाकीस्तानातील इस्पितळास मदत केल्याची चर्चा यांमुळे त्याला बरीच टीका सहन करावी लागली होती. त्याने पुरस्कार परत करण्याचे सुद्धा ठरवले होते. परंतू भारत-पाक संबंधासाठी त्याला काही राजकीय मंडळीनी तसे करण्यापासून रोखले होते. मुंबई मधील बांद्रा येथील अनेक सुधारणा या दिलीपकुमारच्या पाठपुराव्यामुळे झाल्या आहेत. दिलीपकुमारमुळे धर्मेंद्र , मनोजकुमार सारख्या अभिनेत्यांना चित्रपटात येण्याची प्रेरणा मिळाली होती. अभिनयाचा बादशहा असलेल्या दिलीपकुमारची सरळ-सरळ नक्कल करून आज अनेक नट किंग, बादशहा अशी बिरुदावली मिरवतात. 

दिलीपकुमारचे चित्रपट , त्याचा अभिनय , दादासाहेब फाळके पुरस्कार , त्याचा सुरुवातीच्या काळातील संघर्ष या सर्व बाबी व त्याची चर्चा तर होईलच परंतू नवीन पिढीने दिलीपकुमार व सायराबानू या दाम्पत्यामध्ये असलेल्या प्रेमाचा आदर्श मात्र घेणे रास्त होईल. दिलीपकुमार व त्याची काळजी घेणारी त्याची पत्नी ही दृश्ये सर्वानी पाहिली आहेत. सायराबानूच्या सेवेमुळे दिलीपकुमारने नव्वदी पार केली होती. आज आपण पाहतो दोन-दोन घटस्फोट देणारे अभिनेते याच चित्रपटसृष्टीत आहे. त्या घटस्फोटाचे ते समर्थन पण मोठ्या खुबीने करतात. चित्रपटातील हे अभिनेते, छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून वेगळे होणारे समाजातील कित्येक नवविवाहीत यांनी दिलीपकुमार-सायरा यांच्या प्रेमाचा, इतकी वर्षे प्रेमाने एकत्र राहण्याचा , संसार करण्याचा आदर्श जरूर घ्यावा. 

     आज या ट्रॅजेडी किंगचा अंत झाला, त्याला सुपूर्द ए खाक केले जाईल. "राजा हो या रंक सभी का अंत एकसा होयी" (👈 click to listen song) ही त्याच्याच गाण्यातील ओळ अंताचे भान ठेवून जीवन व्यतीत करायला हवे असे सांगून जाते.

#ट्रॅजेडी_किंगचा_अंत


०१/०७/२०२१

Part - 2 MAD, Some Memories , Article series about mad persons and madness.

वेडयांच्या विश्वात - भाग 2

काही आठवणी

कुणीतरी कॅसेट बदलवली रफीच्या आवाजातील मधुर गीते वाजू लागली. टेपरेकॉर्डरवरून रफीच्या आर्त , करुण आवाजातील “खि लौsss नाsss जानकर तुम तो" या ओळी ऐकू आल्या. खिलौना चित्रपटात वेडया माणसाची भूमिका वठवणारा हरहुन्नरी अभिनेता संजीवकुमार खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून गीत गात असलेले दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले. नुकतेच त्या वेडयांच्या इस्पितळात पाहिलेले अनेक वेडे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले.

मागील भागापासून पुढे

ठाण्याच्या वेडयांच्या इस्पितळातील कर्मचारी निवास्थानात केलेला मुक्काम , मुंबई  दर्शन , जीवाची मुंबई करून आम्ही गच्छंतीस निघालो. प्रवासात मुंबईच्या आठवणी , गप्पा सुरु होत्या. तेंव्हा चार चाकी गाडयांत ऑडीओ कॅसेट प्ले होणारा कार टेप असे त्यात रेडिओ नव्हता व एफ एम बँड सुरु झाले नव्हते. कुणीतरी कॅसेट बदलवली रफीच्या आवाजातील मधुर गीते वाजू लागली. गाडीने वेग पकडला होता. सर्व पेंगू लागले होते. मला प्रवासात क्वचितच झोप लागते त्यामुळे मी बाहेरील दृश्ये न्याहाळत होतो. खिडकीचा प्रश्नच नव्हता, कमांडर जिपला दरवाजे नसत पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मेनकापडाचे गुंडाळून ठेवता येतील असे दरवाजे असत त्यामुळे हवेशीर वाटत असे. आता तसे दरवाजे अ‍ॅटोरिक्षाला असतात. टेपरेकॉर्डरवरून रफीच्या आर्त , करुण आवाजातील “खि लौsss नाsss जानकर तुम तो" या ओळी ऐकू आल्या. खिलौना चित्रपटात वेडया माणसाची भूमिका वठवणारा हरहुन्नरी अभिनेता संजीवकुमार खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून गीत गात असलेले दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले. नुकतेच त्या वेडयांच्या इस्पितळात पाहिलेले अनेक वेडे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. आम्ही मुक्काम केलेले निवासस्थान व आत्याचे निवासस्थान यात 100-200 पावलांचे अंतर होते व या रस्त्याने जातांना अनेक वेडे दिसत होते. कुणाची भेदक नजर, कुणी शुन्यात नजर लावून बसलेले, कुणी स्वत:शीच बडबडत असलेले, कुणी मोठ्याने ओरडणारे राठ मोकळे केस सोडलेली मांडीवरील गाठोड्याला बाळाप्रमाणे थोपटणारी , त्याच्याकडे पाहून हसणारी वेडी स्त्री , कुणी येणा-या-जाणा-यांकडे पाहून हसत होते व निरर्थक बडबडत होते. मध्येच एक जण येऊन आम्हाला नमस्कार करून गेला. आम्हाला आश्चर्य वाटले "तो पण वेडा आहे , पण हिंसक नाही. म्हणून आम्ही त्याला मोकळेच ठेवले आहे" आत्या म्हणाली. प्रथम दर्शनी त्याला कुणीही पाहिले तर कुणालाही तो वेडा न वाटावा असाच दिसत होता.

ही सर्व दृश्ये त्या परतीच्या प्रवासात माझ्या डोळ्यासमोर आली होती. कुणी वेडे का होत असावे ? मेंदूवर असा काय बरे परीणाम होत असावा की एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती पार कोलमडून जावी. असे नाना प्रश्न त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाले होते. परंतू या प्रश्नांची उत्तरे मात्र माझ्याकडे नव्हती व नंतर ती शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पुढे जीवनाच्या रहाटगाडग्यात त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा विसर पडून गेला. तो मुंबई प्रवास , ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात एक रात्र केलेला मुक्काम या गोष्टी इतक्या वर्षानंतर परत स्मरण होण्यास शाळेजवळ दोन महिन्यांपुर्वी दिसलेला तो वेडा तरुण कारणीभूत होता. त्या दिवशी दिसलेला तो तरुण व त्यामुळे आठवलेला खुप वर्षांपूर्वी ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात एक दिवस केलेला मुक्काम या दोन घटनांनामुळे मला वेडे , वेड्यांचे इस्पितळ , त्यांची हालत, रस्त्यावर फिरणारे वेडे व त्यांना आणखी वेडे करणारे काही शहाणे लोक व मुले , वेड्यांसाठी कार्य करणा-या काही संस्था , वेड्यांसाठी सेवाभावाने कार्य करणारे डॉक्टर्स हे सर्व आठवले. शाळे समोरून तो तरुण गेल्यावर मी या काही आठवणींच्या जाळ्यातून बाहेर आलो, शाळेतून घरी परत येतांना मला माझ्या जीवनात मी पाहिलेली जी मनोरुग्ण, वेडी माणसे होती त्यांचे एकापाठोपाठ एक असे स्मरण होत होते. आगामी काहीं लेखात मी तसेच अनेकांनी पाहिलेल्या या व्यक्तींबाबत येईलच.

क्रमश:

👉या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन.