Click "Follow" Button below To Follow this Blog

२३/०९/२०२१

PART - 7, MAD, Hakka-Bakka

 वेडयांच्या विश्वात - भाग 7 

हक्का-बक्का

कुत्र्यांच्या मधोमध हक्क-बक्का बसलेला होता थैलीतून भाकरीचा एक-एक तुकडा काढून कुत्र्यांना भरवत होता. तुकडा काढणे व कुत्र्याला देणे यात तो मश्गुल होता. बालवयातील मला त्याची ही कृती खुप भावली होती. नाथ महाराजांनी गाढवाला गंगेचे पाणी पाजले होते, गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच्छ भोजन करू दिले होते. या गोष्टी मी आजी कडून ऐकल्या होत्या त्यामुळे मला हक्का-बक्काचे ते मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे भावले होते

 👉 वेड्यांच्या विश्वात लेखमालिकेतील हा 7 वा लेख तसा तयार होता पण इतर काही न सोडता येतील असे विषय मध्ये आल्याने त्यावर लिहिले. आज हा 7 वा भाग प्रकाशित करीत आहे. पुर्वीचे 6 भाग ज्यांनी वाचले आहेत त्यांचा मालिकेत खंड पडल्याने भ्रमनिराश झाला असल्यास दिलगिर आहे.

मागील भागापासून पुढे... 

कुणी चिडवल्यावर अर्वाच्य भाषा बोलणा-या स्त्रीबाबत मागच्या म्हणजे या मालिकेच्या 6 व्या भागात सांगितले पण आजचा हा मनुष्य वेगळाच होता. एक दिवस घराच्या मागच्या बाजूस सकाळीच काही विचित्र आवाज ऐकू आला. आमच्या परसाच्या कुंपणाची भिंत चांगली उंच होती पण त्या भिंतीवरून पलीकडे डोकाऊन पाहण्यासाठी काही ठिकाणी जागा होती. मी भिंती वरून डोकाऊन पाहू लागलो. एक फक्त चड्डी घातलेला व्यक्ती काहीबाही निरर्थक बरळत होता त्याच्या बोलण्यातील काही शब्द कळत होते परंतू ते शब्द सुद्धा निरर्थक होते. लहान बाळ जसे काही शब्द उच्चारते तसे. त्याच्या बोलण्यातले दोनच शब्द स्पष्ट समजत होते ते म्हणजे “हक्का बक्का” मी त्याला पाहत होतो. आमच्या घराच्या मागे सुद्धा 3-4 कुटुंब राहत ते सुद्धा त्याच्याकडे पाहत होते. तो कोलांट्या उड्या मारत होता, काहीतरी कसरती करून दाखवत होता. कुणीतरी त्याला खायला दिले ते खाल्यावर त्याने पुन्हा “हक्का बक्का” म्हटले व निघून गेला. बाराही महिने त्याच्या अंगात फक्त चड्डीच असे. तो अगदीच वेडा मात्र नसावा. त्याच्या चेह-यावर हास्य असे. त्याच्या अशा निरथर्क बडबडीतून सुध्दा लोक मनोरंजन करून घेत असत . “ए हक्का-बक्का म्हण रे तुला भाकर देईल “ तो मग “हक्का बक्का” अथवा असे त्याचे काही ठराविक शब्द उच्चारत असे व लोक हसत व त्याच्या त्या वेडगळ कृतीतूनही शहाणे लोक स्वत:चा आनंद प्राप्तीचा स्वार्थ साधत असत. पण हक्का-बक्काला यातले काय कळणार ? तो त्याच्या जवळील थैलीत भाकर टाकून त्याच्याच विचारात मग्न होऊन पुढे जात असे. पुढच्या गल्लीत पुन्हा तेच. हक्का-बक्का वेडा होता, की त्याची वाचा चांगली नव्हती कधी काही कळले नाही कारण हक्का-बक्का सारख्या लोकांची चौकशी करण्यास कुणाला फुरसत असणार. हक्का-बक्का हेच शब्द तो वारंवार का उच्चारत असावा ? आश्चर्यचकित होणे यास हिंदीत "हक्का-बक्का होना" असे म्हणतात. हा वेडसर हक्का-बक्का हिंदी भाषिक तर नसावा ? कुणी तरी त्याची फसवणूक केल्यामुळे त्याला मोठे आश्चर्य होऊन तर तो हक्का-बक्का झाला असावा काय ? त्यामुळे तो आजीवन केवळ हक्का-बक्का हेच शब्द उच्चारत  होता काय असे प्रश्न मला पुढे कधीतरी पडले होते. पण हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले.     

    हक्का-बक्का ची कायम राहील अशी एक आठवण मला आहे. एक दिवस मी शाळेतून घरी येत होतो एका झाडाखाली खुप कुत्रे गोलाकार जमलेले दिसले काय झाले म्हणून वेग वाढवला व त्या दिशेने गेलो तर कुत्र्यांच्या मधोमध हक्का-बक्का बसलेला होता थैलीतून भाकरीचा एक-एक तुकडा काढून कुत्र्यांना भरवत होता. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते तुकडा काढणे व कुत्र्याला देणे यात तो मश्गुल होता. बालवयातील मला त्याची ही कृती खुप भावली होती. बालवयातही काही गोष्टींची समज ही निसर्गत:च येत असते. नाथ महाराजांनी गाढवाला गंगेचे पाणी पाजले होते, गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच्छ भोजन करू दिले होते. या गोष्टी मी आजी कडून ऐकल्या होत्या त्यामुळे मला हक्का-बक्काचे ते मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे भावले होते. मी मोठ्याने हक्का-बक्का म्हटले त्याने हळूच मान वर करून माझ्याकडे पाहिले व स्मितहास्य केले. हक्का-बक्काची भीती वाटत असलेल्या मला यावेळी मात्र त्याचे भय वाटले नव्हते मी पण त्याच्याकडे पाहून हसलो व पुढे चालू लागलो. त्या दिवशी नंतर हक्का-बक्का परत कधीच दिसला नाही.                                                 क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

1 टिप्पणी: