खामगांवची खाद्य संस्कृती भाग-7
सुरेश कुल्फी
कुल्फीवाल्याच्या भूमिकेतील चॉकलेट हिरो देव आनंदचे संग्रहित चित्र |
मागील भागापासून पुढे...
जिलेबी फापडा या लेखा संदर्भात खिलोशिया यांच्याशी थंड पदार्थांविषयी सुद्धा चर्चा झाली होती. तसे आता थंडीचे दिवस पण तरीही थंड पदार्थांविषयीची ही चर्चा आजच्या कुल्फी बाबतच्या या भागाचे कारण ठरली.
1980 च्या दशकातील उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही बालाजी प्लॉट मधील आमच्या घराच्या आंगणात रात्री बाहेर झोपत असू. जमिनीवरच गादया टाकल्या जात असत. साप, विंचू याची भीती कधी मोठ्यांनी आम्हाला दाखवली नाही. त्यामुळे आमच्या मनात सुद्धा ते भय उत्पन्न झाले नाही. त्या काळात खामगांवात मोजक्याच घरी टीव्ही आले होते. आमच्याकडे मात्र नव्हता. त्यामुळे दिवेलागणी नंतर लवकरच शांतता होत असे. टीव्हीच आलेला नसल्याने मालिकांचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे महिला मंडळी गप्पा मारायच्या. जेवण झाले की अंगणात अंथरूण पसरायची. झोपेपावेतो अंथरुणे थंड पडायची. आमच्या समोरच्या घरात एक भला मोठा पिंपळ वृक्ष होता. अजूनही तो डौलात उभा आहे. मी तिकडे गेलो की त्या महाकाय अश्वत्थ वृक्षाकडे बरेचदा पाहत राहतो. मला नेहमी त्याचे वय किती असेल ? मी त्याला लहानपणापासून ओळखतो तसा तो पण मला ओळखत असेल का? असे प्रश्न पडतात. या पिंपळाच्या पानाची सळसळ ऐकू यायची. तेंव्हा ध्वनी प्रदूषण पण किती कमी होते. वाहने कमी असल्याने विनाकारण पँ पॅं , पी पी , पों पों असे हॉर्नचे आवाज व्हायचे नाही. वाजलाच तर लुना किंवा स्कुटरचा बारीक ट्रीक ट्रीक असा हॉर्न वाजे. "पिपल झुमे मोरे आंगना थंडी थंडी छांव रे" या एका गीतातील ओळी प्रमाणेच उन्हाळ्यात त्या पिंपळ वृक्षाचा मोठा आधार वाटायचा. आम्ही गादीवर पडल्या पडल्या तारे न्याहाळत असू. आजोबांनी अनेक ता-यांची ओळख करून दिली होती. "ते बघा ते सात तारे ते सप्तर्षी आहेत बर, तो ध्रुव, तो शुक्रतारा.” मग धृव बाळाची गोष्ट अशी ते माहिती ते देत. त्यांचा ग्रह, तारे पंचांग यांचा चांगला अभ्यास होता, आमच्या जन्मपत्रिका त्यांनीच बनवल्या होत्या.
थोड्यावेळाने आम्ही ज्याची वाट पाहात असू तो मंजूळ असा “टिंग टिंग” आवाज यायचा. हा घंटीचा आवाज असायचा एका कुल्फीवाल्याच्या गाडीचा. “सुरेश कुल्फी” असे त्या गाडीवर लिहिलेले असे. वडील मग ही कुल्फी आम्हाला घेऊन द्यायचे. मोठ्या आकाराची ती कुल्फी खाल्ली की एक शीत लहर शरीरात प्रवाहित होत असे. त्याकाळात ही कुल्फी खामगांवात फार प्रसिद्ध होती. रात्री घरपोच विकल्या जाणारी ती कदाचित एकमेव अशी कुल्फी होती. सुरेश कुल्फीवाला मला आजही आठवतो. काळा-सावळा ,कुरळे केस, पँट-शर्ट आणि चेह-यावर हास्य, बोलण्यात मृदूता.
"जिंदगी है क्या सून मेरी जान, प्यार भरा दिल मिठी जुबान"
या पंक्तींप्रमाणे त्याच्या जिभेवर सुद्धा साखर असे. ही कुल्फी तेंव्हा 1/2 रुपयात मिळायची तरीही ती तेंव्हाची महागडी कुल्फी होती. कुल्फी खाता-खाता खुप गप्पा होत असत. तदनंतर झोप लागून जायची. आज काल बाहेर झोपणे, गच्चीवर झोपणे फार कमी झाले आहे. सर्वांकडे कुलर, एसी आले आहेत. परंतू उन्हाळ्यातील रात्री येणा-या नैसर्गिक थंड हवेची सर त्या कुलर, एसीच्या हवेला नाही. बालपणी अनेकदा खाल्लेल्या त्या सुरेश कुल्फीवाल्याच्या कुल्फीची चव स्मरणात राहिली. आजच्या डालडा असलेल्या आईस्क्रीमपेक्षा ती चव नक्कीच सरस होती. आजही कुल्फी हा शब्द ऐकला, वाचला की सुरेश हे नांव सुद्धा आठवतेच. कदाचित त्या कुल्फीवाल्याच्या प्रामाणिकपणाच्या व्यवसायामुळे त्याचे नांव आजही आठवत असावे. दोन चार वर्षानंतर सुरेश कुल्फीवाला येणे बंद झाले होते. त्याचे येणे का बंद झाले हे काही कळले नाही.
लोकांची आवड आता झपाट्याने बदलत आहे. जाहिराती, ब्रँड यांना लोक भुलत आहेत. जे साधे आहे, चांगले आहे, ज्याची जाहिरात नाही त्याला आता खराब समजले जात आहे. आईसकांडीत पूर्वी अळ्या आहे अशी अफवा अधून-मधून पसरत असे व त्या कारणास्तव प्रसंगी ती नाकारली सुद्धा जात असे. आज आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या अनेक आईस्क्रीमवर ”यात वनस्पती तेलाचा वापर केला आहे” अशी स्पष्ट सूचना दिली असते. अनेक ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने जास्त प्रमाणात “डालडा” असलेल्या आईस्क्रीम केंद्रांवर धाडी टाकल्या आहेत. आकर्षक वेस्टनाला ग्राहक भुलतो. आज जनतेजवळ पैसा चांगला खुळखुळतो आहे. क्रयशक्ती वाढली आहे. परंतू आपण काय खातो याकडे बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. पूर्वी 10,20,50 पैस्यांची आईस कांडी घेणारे आज बक्कळ कमावत आहेत परंतू आज दिसायला जरी चांगले असले, महागडे असल्रे तरी आजच्या अन्नात, खाद्य पदार्थात भेसळ मात्र जास्त आहे. आईस्क्रीम म्हणून चक्क डालडा पोटात जातो आहे. साधा बर्फ व रंग यांचा वापर करून बनवलेली ती आईस्कांडी आजच्या भेसळयुक्त, डालडायुक्त आईस्क्रीम पेक्षा निश्चितच कितीतरी पटीने सरस होती. एके दिवशी महागडा चोकोबार घेतांना सहज आईस्कांडी, आईssssस्कांडी वाला, त्याची गाडी हे सर्व चित्र डोळ्यासमोर तरळले. आज सुरेश कुल्फीवाला कुठे असेल कुणास ठाऊक ? लोक तर त्याला विसरले सुद्धा असतील, पण तो जिथे कुठे असेल तिथे प्रामाणिकपणा व सचोटी, हसतमुखाने, गोड बोलून केलेल्या व्यवसायामुळे क्षेम , कुशल असेल असे निश्चित वाटते. मी चाखत तर तो ब्रँडेड चोकोबार होतो परंतू आठवण होत होती त्याच सुरेश कुल्फीवाल्याची व तोंडात चव घोळत होती त्याच्या कुल्फीची.
( 2019 मध्ये लिहिलेल्या "आईस्कांडी" या लेखातील काही भाग वरील लेखात घेण्यात आला आहे. )
"आईस्कांडी" या पुर्वी लिहिलेल्या लेखाची लिंक ⇩
http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/05/article-in-memory-of-ice-candy-its.html
For Old Bollywood Song Lovers
https://www.youtube.com/watch?v=YvK4JVLWCWk
क्रमश:
👌👌
उत्तर द्याहटवाये कुल्फी ले लो , हा आवाज ऐकू येत नाही
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवा