"जी.एस." एक यादों की बारात
खरे तर यादों की बारात हे एका जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे शीर्षक, या लेखाला हे शीर्षक देतांना एखाद्या लग्नाच्या वरातीप्रमाणे आठवणींची प्रचंड गर्दी मनात झाली होती व म्हणून यादों की बारात चे स्मरण झाले व तेच शीर्षक या लेखाला द्यावेसे वाटले. ही आठवणींची गर्दी होण्याचे कारण म्हणजे त्या दिवशी व्हॉट्स अॅप वर आलेला कॉलेजने 75 वर्षे पुर्ण केल्याबद्दल आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचा एक संदेश. संदेशात जुन्या
विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते तसेच माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या आठवणींबाबत लेख आमंत्रित केले होते. हा संदेश मी वाचला आणि माझ्या काही मित्रांना पुढे
पाठवला. रात्री बिछान्यावर पडल्यावर मला त्या संदेशाची आठवण आली व टाईम मशीन
प्रमाणे मी गतकाळात जाऊ लागलो. जी. एस. मधील अनेक किस्से मला स्मरू लागले. मला आठवले मी एस.एस.सी उत्तीर्ण झालो आजच्या पिढीसारखा शैक्षणिक awareness त्यावेळी नव्हता. त्यामुळे मित्रांनी म्हटले ,”अरे आपण जी.एस मध्ये प्रवेश
घेऊ” मग काय “जिधर दोस्त उधर अपन”. या वयात दोस्ती म्हणजे सबकुछ असते. मग
काय घेतला प्रवेश जी.एस. अर्थात गोविंदराम सक्सेरीया कॉलेज या बुलढाणा जिल्ह्यातील
नावाजलेल्या महाविद्यालयात. गो.से. महाविद्यालय हे त्या काळापासून ते
आजतायागत विदर्भात प्रसिद्ध असलेले असे कॉलेज आहे. विद्यार्थी वर्ग मात्र कॉलेजच्या लघु नावाचाच अधिक वापर करतो ते म्हणजे जी. एस. तसे
तर माझे वडील , काका, जेष्ठ बंधू भगिनी यांच्याकडून मी लहानपणापासून जी.एस. बद्दल ऐकत आलो होतो. कारण
आमच्या घरची सर्व जेष्ठ मंडळी ही जी. एस. मध्येच शिकलेली. आई, काकू या मात्र अपवाद कारण
त्या त्यांच्या माहेरी शिकलेल्या. घरातील जेष्ठ मंडळी ही जी. एस चे विद्यार्थी
असल्याने 1960, 70,80 च्या दशकातील जी. एस. मध्ये घडलेल्या अनेक घटना , तेथील प्राध्यापक , वसतीगृह , बटालियन , एन.सी.सी. आदींबाबत मी बाल्यावस्थेपासूनच ऐकत आलो होतो. त्यामुळे जी. एस कॉलेज म्हणजे भव्य-दिव्य असे वाटत
असे, तसे ते
आहे सुद्धा. येथील प्राणीशास्त्र विभागाच्या त्या भल्या मोठ्या खिडक्या याची साक्ष देतात. त्यामुळे इथेच शिक्षण घ्यावे असे कुठेतरी मनात पक्के बसून गेले होते त्यामुळे
“जी एस मध्ये प्रवेश घेऊ” मित्राच्या तेंव्हाच्या त्या हाकेला त्वरीत होकार
भरला होता. जी. एस. बद्दलच्या आठवणी लिहू गेल्यास अनेक आठवणी होतील त्यामुळे हा
लेख प्रदीर्घ होण्याची शक्यता मला वाटत आहे. कारण यात आमच्या बॅचच्याही कितीतरी
वर्षे आधी इथेच शिकलेल्या माझ्या वडीलधारी
व जेष्ठ बंधू भगिनी या मंडळींकडून सांगितल्या गेलेल्या सर्वच नाही परंतू काही
आठवणींचा सुद्धा समावेश या लेखात केला आहे किंबहुना तो केल्यावाचून राहवले नाही.
|
Ex student and NCC Cadet of G. S. College |
1960 च्या दशकात आमचे तिर्थरूप जी.एस. चे विद्यार्थी होते. "एन. सी. सी. शिबीरादी असले की आम्ही खिशात पु-या घेऊन जात असू, त्या काळात आजच्यासारखे पॅकिंग
पदार्थ थोडी मिळत होते, मग परेड करता करता पु-या खात असू. एक मेजर माने म्हणून एन.सी.सी.
अधिकारी होते,
जितेंद्रचा फर्ज हा बॉण्डपट गाजला होता त्यातील "चाहे तू माने चाहे ना माने " हे गीत
सुद्धा गाजले होते, यातील माने हा हिंदीतील शब्द मराठी माने अडनावाशी साधर्म्य साधत असल्याने मेजर माने यांना "चाहे तू माने चाहे ना माने" या गाण्याच्या चालीत "कॅप्टन माने, मेजर माने" असे चिडवणे , इतिहासातील अनंगपाळाच्या हत्ती विषयी शिकल्यावर एकाजाडजूड सहपाठीस अनंगपाळाचा हत्ती असे चिडवणे", आमच्या स्नेहसंम्मेलनाच्या वेळेस पृथ्वीराज कपूर या अभिनेत्यास बोलावले होते.(आजच्या पिढिसाठी एक अनावश्यक परंतु द्यावासा वाटला असा Extra Shot पृथ्वीराज कपूर म्हणजे आताच्या रणवीर कपूर या नायकाचे पणजोबा)" अशा कितीतरी आठवणी त्यांच्या कडून ऐकल्या आहेत.
तद्नंतर 70, 80 च्या दशकातील जेष्ठ बंधू व भगिनी यांच्या सुद्धा अनेक आठवणी आहेत. त्यातली एक ठळक म्हणजे 80 च्या दशकाच्या अखेरीस स्नेहसंमेलनास मुकेश खन्ना (महाभारत मालिकेत भीष्माची व शक्तिमान मध्ये शीर्षक
भूमिका साकारणारा कलाकार) आला होता त्याच्या समोर कॉलेज मधील दोन गटात भांडणे झाली
होती त्यावर “तुमने तो मेरे सामने
महाभारत शुरू कर दी” असे उद्गार त्यांनी काढले
होते व भांडणे थांबली होती. पुर्वी सायकलने कॉलेजात येणारी मुले आता 80 च्या दशकात
वाहनांनी येण्यास सुरुवात झाली होती , यातील काही बहाद्दर
कॉलेजच्या व्हरांड्यातून स्कूटर चालवत असत. अशा कित्येक जुन्या आठवणी आहेत.
आम्ही 90 च्या दशकात इथे शिकलो या
दशकापर्यन्त खामगांवात मुले-मुली यांच्यात फार काही संभाषण किंवा मैत्री वगैरे
हा प्रकार नव्हता परंतू त्यातही एक वेगळा गोडवा होता. कॉलेजच्या मैदानात एन.सी.सी. परेड होत असे एरवी कशीही परेड करणारी मुले, मुली व्हरांड्यात बसलेल्या असल्या की एकदम तालेवार चालत. ऑफिसर, अंडर ऑफिसर यांना “पैर उठाके मारो , एडी पे चलो “ अशा ऑर्डर
देण्याचे काम पडत नसे. एन.सी.सी. च्या ड्रेसमध्ये कॉलेजात आले की आपली एक वेगळीच छाप पडते आहे असे या कॅडेटसला मनोमन वाटे. देसाई सर , सिंग सर यांच्या
तासिकेच्या वेळी पुर्ण वर्ग भरलेला असे. इंग्रजीवर प्रभुत्व असलेले देसाई सर इंग्रजीतील एखादा कठीण शब्द
सांगत व त्याचा अर्थ शोधून आणण्यास सांगत ते इंग्रजी अत्युत्कृष्ट शिकवत, त्यांना पाश्चात्य शैली आवडत
असे. सिंग सरांच्या तासिकेला तत्वज्ञानावर खूप छान चर्चा होत असे. "जिथे धूर आहे तिथे अग्नि आहे" असे सरांनी शिकवल्यावर मागे कुजबूज सुरू झाली , “काय आहे रे “ सर म्हणाले “सर मोटर सायकल मधून
धूर येतो पण आग तर नसते“ अशी कोटी एका मुलाने केली वर्गात हशा पिकला सरांनी त्यावर
मोटर सायकल मध्ये अग्नी कसा सुप्तरित्या दडलेला असतो हे सांगितले होते.
जी. एस. मधील आठवणींबाबत लिहू जाता लेखन मर्यादेचे
भान वेळोवेळी ठेवावे लागत आहे. इतक्या आठवणी
की जणू यादो की बारातच. त्यात आम्ही म्हणजे सर्वच ठिकाणी स्पोर्ट ,एन.सी.सी., युथ फेस्टिव्हल , स्नेह संमेलन सा-याच इंव्हेंट मध्ये जात असू. कनिष्ठ महाविद्यालयातील आमची हँडबॉलची चमू म्हणजे राज्यस्तरावर जाणारी आजतायागतची एकमेव
चमू , ध्यानचंदप्रमाणे
आम्ही सुद्धा विना बुटाने सराव करायचो साहित्याची उपलब्धता कमी व घरून सुद्धा पैसे
बेताचेच मिळत. पण कॉलेज झाल्यावर नोकरी चे दडपण येऊ लागल्यावर खेळही मागे पडला अन खेळात ध्यानचंदसारखे पुढे जाणेही. एन.सी.सी.च्या शिबीरात आमच्यापैकी काही मुले मांसाहारी होती ती मुले जाणून
किचनकडे स्वत:ची डयुटी लाऊन घेत कारण काय? तर रात्री तिथे खायला उरलेले मटन व रस्सा प्यायला मिळायचा. हे गुपित आम्हाला उशिरा कळले अर्थात आम्हाला त्याचा उपयोगही नव्हता म्हणा. आमचा एक मुस्लिम मित्र लालबुंद गोरापान होता. तो एन. सी. सी. ड्रेस मध्ये पक्का "विलायती बाबू" दिसत असे धनंजय टाले या मित्राने त्यास "ब्रिटिश सोल्जर" अशी उपाधी दिली होती. त्या काळात पिंपळगांव राजा येथील अनेक मुस्लिम मुले आमच्या सोबत जी. एस. मध्ये होती. त्यातील रहबर, अशफाक, शेख शब्बीर, सलीम बेग आदी मुस्लिम मुलांशी आमची चांगली मैत्री जडली होती. आजही क्वचित काही भेटतात. जी.एस. ला जिल्हाभरातून मुले शिकायला येतात त्यामुळे जळगांव जामोद, नांदुरा, शेगांव, वरवट बकाल व इतर काही गांवे येथील मुलांशी मैत्री झाली व ती आजही टिकून आहे. नवीन आलेल्या प्राध्यापकांच्या गमती, नकला, गाणी, अशी खूप धम्माल होत असे. प्राचार्य जावंधीया सरांचा खुप दरारा होता. कित्येक आठवणी आहेत. इथे काही जणांचे जुळले तर काही नेहमीसाठी दुरावले.
अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोमे मिले
जिस तरह सुखे हुये फूल किताबोमे मिले
याप्रमाणे अनेक जण आज दुरावले आहेत परंतू फेसबुक ,व्हॉट्स अॅप च्या कृपेने अनेक दोस्त पुन्हा भेटलेही आहेत त्यांची reunion सुद्धा होत आहे. विकासाभिमुख संस्था, कार्यकारिणी व प्राचार्य तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांमुळे आज आमचे जी. एस. कॉलेज खुप प्रगत झाले आहे त्याला NAAC चे चांगले मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे जीम , तरण तलाव आहे , अनेक कोर्सेस आहेत. इथून जे विद्यार्थी शिकून गेले त्यांच्या मनात मात्र येथील आठवणी सदैव तेवत राहतील , शैक्षणिक व महाविद्यालयीन जीवन हे सर्वांना प्रिय असते म्हणून जी. एस. त्यांच्या सदैव स्मरणात राहील. हे विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात नांव काढत असतील त्यांना नवीन मित्र सुद्धा मिळाले असतील पण
गुजरे हुये जमाने दुबारा नही आते,
आते है नये लोग पुराने नही आते |
अनेक माजी विद्यार्थी कॉलेजला 75 वर्ष होत आहेत म्हणून मेळाव्यास येतील. देश सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे हा एक योगायोग आहे या मेळाव्याच्या निमित्ताने माझ्यासह अनेक माजी विद्यार्थ्याना येथील अनेक आठवणी येत असतील एक यादो की बारातच जणू आज प्रत्येकाच्या हृदयाच्या व्दारात आली आहे व आजीवन हृदयात राहणार आहे.
स्वतंत्रता प्राप्तीच्या पुर्वीच्या लोकांना शिक्षणाप्रति तळमळ होती , शिक्षणाचा दर्जा चांगला होता, नितीमुल्यांना महत्व होते, लोक शाळा कॉलेजसाठी राजीखुषीने करोडोच्या जागा दान देत. त्याच पिढीतील लोकांनी स्थापन केलेल्या आमच्या जी.एस. कॉलेजची वाटचाल अशीच प्रगतीपथावर होत राहो, प्रगतीचे शिखर हे महाविद्यालय गाठो हीच सदिच्छा.
✍️विनय वि.वरणगांवकर ©