Click "Follow" Button below To Follow this Blog

०८/०९/२०२२

Article on the incident of Industrialist Status Mestry car accident

 नजर हटी दुर्घटना घटी


सुसाट जाणा-या वाहनाचे स्पीडोमीटर नेत्यांनी सुद्धा जनतेला व्हिडिओद्वारे दाखवले आहे मग जनता सुद्धा त्यांचे अनुकरण करणार नाही का ?
परवा देशातील मोठे उदयोगपती , टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष तसेच शापूरजी पालोनजी या स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उद्योग क्षेत्रात व संपूर्ण देशात  हळहळ पसरली.  पंतप्रधान  तसेच  इतर लोकप्रतिनिधींनी  शोक संवेदना व्यक्त केल्या. या घटनेनंतर काल नितीन गडकरी यांनी चार चाकी वाहनाच्या मागील सीटवर बसणाऱ्या व्यक्तीस सुद्धा सिट बेल्ट बांधणे बंधनकारक केले. वाहनचालकास सिट बेल्ट बांधणे हे पूर्वीपासूनच बंधनकारक होते आता वाहन चालक व इतरांनी सिट बेल्ट बांधला नाही तर तो दंडास पात्र ठरेल. नितीन गडकरी यांचा हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. परंतु निष्काळजीपणा कसा आवरणार ? आणि वाहनाची वेग मर्यादा कशी आवरणार ? वेगाने वाहन चालवणाऱ्यास दंडाची काही तरतूद आहे की नाही याची कल्पना नाही परंतु सर्वच वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवण्याबद्दलची जागरूकता समाजात पसरवणे अत्यंत आवश्यक आहे.  आज देशात  जवळपास  सर्वच महामार्ग  अतिशय  सुंदर बांधकाम झालेले आहेत  व त्यामुळे वाहन चालकास  वेगात वाहन चालवण्याची उत्साह येतो. एवढेच काय तर काही मंत्री व लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांच्या या महामार्गांवरुन सुसाट जाणा-या वाहनाचे स्पीडोमीटर जनतेला व्हिडिओद्वारे दाखवले आहे मग जनता सुद्धा त्यांचे अनुकरण करणार नाही का ? शिवाय  आज-काल  सर्वच महामार्गांच्या  आजूबाजूला  मोठमोठ्याला  अक्षरात मद्यालयांच्या पाट्या लावलेल्या दिसतात.  या पाट्यांमुळे  महामार्गावर मद्यपानाचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यानंतर सुद्धा अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. सिट बेल्ट न बांधल्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे हे मान्य आहे परंतु वेग मर्यादेला आवर घालणे सुद्धा तितकेच जरुरी आहे. कितीही वेगाने गाडी चालवली  तरी  इप्सित स्थळी  पोहोचण्यास  केवळ पाच ते दहा मिनिटांचा फरक पडतो हे वाहन चालकाच्या ध्यानात कसे येत नाही ?  त्यामुळे  मर्यादित वेगाने वाहन चालवणे हे  नागरिकांना  शिकवले गेले पाहिजे. पुर्वी असे ऐकिवात होते की राज्य परिवहन महामंडळ  त्यांच्या बसेसचा वेग हा बांधून ठेवत असे. त्यामुळे विशिष्ट वेगापर्यंतच बस चालवता येत असे, बस चालकास  अत्यंत वेगाने बस नेता येत नव्हती.  मग  आज बाजारात अनेक अत्याधुनिक  चार चाकी वाहने उपलब्ध आहेत व यांची कमाल वेग मर्यादा खूप मोठी आहे तेव्हा सरकारने वाहन चालक कंपन्यांशी संवाद साधून तसेच तज्ञ लोकांची समिती नेमून वाहन निर्मिती करतानाच कमाल वेग हा आटोक्यात राहील एवढाच ठेवावा,  असे नाही का करता  करणार?  कमाल वेग जर  कमी झाला तर वाहन चालक अति वेगाने वाहन हाकूच शकणार नाही  व  अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटते. वेगाने वाहन चालवण्यामुळे आज कितीतरी तरुण  मृत्युमुखी पडले आहेत  व कित्येक परिवार उध्वस्त झाले आहेत  सरकारने  याबाबत आवश्यक त्या उपाययोजना  लवकरात लवकर कराव्या.  सिट बेल्ट बांधणे  अनिवार्य करणे हे ठीक आहे परंतु सिट बेल्ट न बांधण्याचा जो निष्काळजीपणा जनतेमध्ये आहे तो कसा कमी करणार ? काही नेतेमंडळी सुद्धा सिट बेल्ट बांधण्याची  हयगय करतात. तेंव्हा उपरोक्त सर्वच बाबींवर विचार व्हावा असे वाटते. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गांवर "नजर हटी दुर्घटना घटी" सारखी अनेक चांगली वाक्ये लिहिलेली असतात वाहन चालकांनी अशी वाक्ये सदैव ध्यानात ठेवावी व छोट्या स्वरूपात आप-आपल्या गाडीच्या  डॅशबोर्ड वर सुद्धा चिटकवून ठेवावी तरुण वाहन चालकांनी सुद्धा आपल्या वाहनाचा वेग मर्यादेत ठेवावा. सर्वात मोठा वेग हा  मनाचा असतो  आपल्या गाडीचा नव्हे  त्यामुळे  उगीच  बेदरकारपणे आपले वाहन  चालवून  मृत्यूला आमंत्रण देऊ नये. 
✍️विनय वि.वरणगांवकर ©

"गतीशी तुलना नसे" हा याच विषयावरील  व्हिडीओ पहा👇
https://youtu.be/I51g8oxzEMo

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा