कार्यसिद्धीस नमो
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने आणलेल्या काही योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न येथे करीत आहे. कुणाला हा लेख एखाद्या अंधभक्ताने लिहिला आहे असेही वाटेल. परंतू जे काही आहे ते डोळसपणे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी यांच्यापुर्वी सुद्धा अनेक लोककल्याणाच्या योजना येऊन गेल्या हे सुद्धा तितकेच खरे आहे.
आजचा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे कालच्या स्थानिक वृत्तपत्रात आमदार आकाश फुंडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वृत्त. त्या वृत्ताच्या शीर्षकाने लक्ष वेधले व ते वृत्त वाचले.“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात जनसेवेचा संकल्प घ्या” असे त्या वृत्ताचे शीर्षक होते. राष्ट्रनेता आणि राष्ट्रपिता या दोन शब्दांनी लेख लिहिण्यास प्रवृत्त झालो. राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांना उद्देशून होते तर राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. एकाच राज्यातून आलेले हे दोन व्यक्ती, एकाने स्वातंत्र्यपुर्व काळात जगाला आकर्षून सोडले तर दुस-यास स्वतंत्रताप्राप्तीच्या 70 वर्षानंतर जगभरात अफाट सन्मान,प्रेम व लोकप्रियता मिळाली. लोकप्रिय नेत्यांच्या जागतिक यादीत स्थान मिळवले व भारत एक मजबूत राष्ट्र आहे हे जगाच्या निदर्शनास आणून दिले. मोदींच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपा हा सेवा पंधरवाडा साजरा करीत आहे. याच वृत्तामुळे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने आणलेल्या काही योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न येथे करीत आहे. कुणाला हा लेख एखाद्या अंधभक्ताने लिहिला आहे असेही वाटेल. परंतू जे काही आहे ते डोळसपणे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी यांच्यापुर्वी सुद्धा अनेक लोककल्याणाच्या योजना येऊन गेल्या हे सुद्धा तितकेच खरे आहे. परंतू तरीही मोदी यांच्या कार्यकाळात आलेल्या पुढील योजना या देशातील सामान्यातील सामान्य माणसासाठी आहेत , त्याचा उदय व्हावा अशाच आहेत. "अंत्योदय" सत्यत्वात आणण्याचाच जणू मोदींनी चंग बांधल्याचे दिसत आहे. मे 22 मध्ये मोदी यांच्या कार्यकाळास 8 वर्षे झाली व या काळात आपल्या अनेक योजनांद्वारे ते लोकप्रिय झाले, सलग दोन वेळा ते पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यांनी प्रधान सेवक म्हणून हाती घेतलेले कार्य सिद्ध करून दाखवले आहे केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत राबवलेल्या पुढील काही योजना लोकप्रिय झाल्या व त्यांची आकडेवारी सुद्धा बोलकी आहे.
1. मोफत लसीकरण योजना- जगभरातील कोरोना महामारीमुळे संपुर्ण जगावर भय व मृत्यूचे सावट होते , परंतु देशातच निर्माण केल्या गेलेल्या लसीच्या सहाय्याने लसीकरण करून कोरोना विरोधात महत्त्वाची भूमिका भार ताने व सक्षम नेतृत्वाने बजावली. जगातील सर्वात मोठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू केली शिवाय इतर अनेक देशांना लस सुद्धा पाठवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपावेतो 192.52 कोटी डोस देण्यात आले आहेत.
2. स्टार्टअप इंडिया- नरेंद्र मोदींनी स्टार्टअपला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. भारत सरकार स्टार्टअप इंडिया नावाची मोहीम राबवत आहे. या स्टार्टअप मोहिमेचे जगभरातून कौतुक होत आहे. 2014 मध्ये देशात फक्त 300 ते 400 स्टार्टअप होते, आज या योजनेमुळे त्यांची संख्या 70 हजार झाली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअपला प्रोत्साहन देणारा देश झाला आहे.
3.मोफत रेशन योजना - कोरोना काळात नरेंद्र मोदी सरकारने मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची घोषणा केली. कोरोना संकटामुळे आणि लॉकडाऊननंतर गरीबांना मोफत रेशन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेस सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ देण्यात आली आहे. 80 कोटी रेशन कार्ड धारकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ हे प्रती सदस्यास दिले जाते.
4.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - देशातील अनेक महिलांच्या डोळ्यात चुलीच्या धुरामुळे येणारे अश्रू पुसण्याचे काम या योजनेतून मोदी सरकारने केले आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. वर्ष 2016 मध्ये ही योजना सुरू केली. पहिल्या वर्षी 2.2 कोटी लोकांनी कनेक्शन घेतले. मार्च 2020 पर्यंत वंचित कुटुंबांना 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट 7 सप्टेंबर 2019 रोजीच गाठल्या गेले.
5.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - आपल्या देशाच्या बळीराजासाठी आणलेली ही योजना आहे पीएम किसान योजना ही 100% निधी असलेली योजना आहे. ही योजना 2018 मध्ये सुरू झाली. यात सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत केली जाते. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच घेता येतो. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा केला जातो. वर्ष 2022 पावेतो 11,11,96,895 लोकांना लाभ झाला असल्याची माहिती आहे.
6. हर घर जल योजना - मोदी सरकारची ही एक महत्वाकांक्षी व आशादायी अशी योजना आहे. आज आपण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र पाहतो व धरणात विपुल पाणी असूनही वितरण व्यवस्था कोलमडलेली असते. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2020-21 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात जल जीवन मिशन म्हणजेच हर घर जल योजनेची घोषणा केली होती. देशातील सर्व घरांमध्ये पाईपलाइनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 2024 पर्यंत लक्ष्यपुर्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेवर सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. लोकांना घरपोच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, त्यांना पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही, तसेच पाण्याच्या समस्येपासून पूर्णपणे सुटका होणार आहे.
असेही निदर्शनात येते की, योजना चांगल्या असतात पण लोक त्यातून चुकीचे मार्ग, पळवाटा शोधतात असे मुळीच व्हायला नको यासाठी सुद्धा उपाययोजना करायला हव्यात.
मोदी सरकारच्या योजनांपैकी या काही उपरोक्त योजना आहेत. या योजनांमध्ये सामन्यातील सामान्य माणसाचा विचार केला गेला आही. या देशात "अंत्योदय" व्हावा अर्थात समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीपर्यन्त विकास पोहचावा असा विचार या योजनांमध्ये केला असल्याचे दिसते. आगामी काळात व आगामी सरकारने सुद्धा हाच विचार पुढे नेत गेल्यास देशाचे व येथील नागरीकांचे भवितव्य हे उज्वलच राहील अशी आशा आहे. मोदी देशहिताचे कार्य, योजना राबवत आहेत. देश व सामान्य नागरीक यांच्यासाठी केलेले कार्य सिद्ध होतांना दिसत आहे म्हणून कार्यसिद्धीस
नमो असे म्हणावेसे वाटते.
(संदर्भ- विविध वृत्तपत्रात आलेली वृत्ते व आंतरजाल)
✍️विनय वि.वरणगांवकर ©
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा