Click "Follow" Button below To Follow this Blog

१५/०९/२०२२

Article about problem in Khamgaon

 ...आणि तो आला

तो येणार असल्यामुळे सकाळी लवकर उठलो तर तो येणार असल्याचे कळले परंतु त्याचे आगमन दोन तास उशिरानेच होणार होते. त्याच्या आगमनाचे नक्की झाल्यावर मी माझ्या परिचित व नातेवाईकांना सुद्धा तो येणार असल्याची बातमी दिली, त्यांना सुद्धा आनंद झाला आणि सर्वजण त्या तयारीमध्ये लागले.

तो बऱ्याच दिवसानंतर आज येणार होता त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वच नागरिक करत होते, नव्हे खामगावकर तर नेहमीच त्याच्या प्रतीक्षेत असतात. तो येणार असल्यामुळे सकाळी लवकर उठलो. त्याच्या आगमनाचा संदेश माझ्या भ्रमणध्वनीवर कोणी दिला आहे का? कोणाच्या स्टेटस वर आहे का? ते तपासले तर तो येणार असल्याचे कळले परंतु त्याचे आगमन दोन तास उशिरानेच होणार होते. त्याच्या आगमनाचे नक्की झाल्यावर मी माझ्या परिचित व नातेवाईकांना सुद्धा तो येणार असल्याची बातमी दिली, त्यांना सुद्धा आनंद झाला आणि सर्वजण त्या तयारीमध्ये लागले. कारण 15 दिवसांनी तो येणार होता. प्रत्येकाच्या घरातील कुटुंबीय त्याच्या येण्याने सुखावले होते. तो येणार असल्यामुळे शेजारी पाजा-यांनी सुद्धा एकमेकांना त्याच्या आगमनाची बातमी आवाज देऊन सांगितली. अशाप्रकारे तो आला आणि सर्वांना आनंद देऊन थोड्यावेळाने परत गेला सुद्धा. पुन्हा त्याचे आगमन अनिश्चितच होते बऱ्याच दिवसानंतर तो येऊन गेल्याने खामगावकर नागरिक थोडे शांत झाले होते. त्यांची चिंता काही दिवस का होईना थांबली होती. त्याच्या गच्छंतीनंतर सर्व नागरिक आपापल्या कामाला लागले. आज गुरुवार असल्यामुळे व माझ्या लेखनाचा दिवस असल्यामुळे मी लेखनाच्या विचारात मग्न झालो आज तो येऊन गेल्यामुळे त्याच्याबद्दलच लिहावे असे मनात आले आणि मग त्याबद्दलच लिहू लागलो. खरे तर त्याच्याबाबत व त्याच्या नेहमीच्या निदान खामगावात तरी दिर्घकाळाने होणाऱ्या आगमनाबाबत, विलंबाने होणाऱ्या आगमना बाबत मी कित्येकदा लिहिले आहे परंतु त्याची जी जुनी खोड आहे ती काहीही केल्या जातच नाही त्याला पाठवणारे जे कोणी लोक आहे, जी काही यंत्रणा आहे त्यांना सुद्धा त्याला पाठवण्यात नाना अडचणी येतात. त्याला सोडा, त्याला पाठवा असे सांगण्यासाठी या लोकांकडे कोणी गेल्यास हे लोक त्यांच्या स्वत:च्याच अडचणी कथन करतात, त्यामुळे त्याची ही विलंबाने येण्याची, दिर्घकाळानंतर येण्याची खोड नागरिकांच्या अंगवळणीस पडली आहे. अनेक खामगावकरांशी चर्चा केल्यावर असे पण निदर्शनास आले की त्याला मोठी शहरे आवडतात तिथे तो अगदी वेळेवर जातो तिथे त्याच्या जाण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी येत नाही. अगदी नित्यनेमाने तो मोठ्या शहरातील नागरिकांच्या घरी हजेरी लावत असतो मग खामगावातच त्याला येण्यास का विलंब होतो? का त्याची प्रतीक्षा खामगावकरांना नेहमी करावी लागते ? हा एक अभ्यासाचाच विषय झालाय आज तो पंधरा दिवसानंतर खामगावला आला होता, त्याच्या येण्यात होणाऱ्या अडचणी मात्र काही कर्तव्यदक्ष कर्मचारी नागरिकांना वारंवार देत होते या अडचणी जणू काही खामगावकरांच्या पाचवीलाच पूजल्या आहेत. त्याच्या संबंधित जे अधिकारी वर्ग आहे, जे कर्मचारी आहे त्यांना कित्येक नागरिकांनी तोंडी अर्ज केले, लेखी विनंती केल्या परंतु त्याच्या आगमनाची नेहमीच प्रतीक्षा करावी लागते. खरे तर तो ज्या ठिकाणाहून येतो ती ठिकाणे समृद्ध आहेत तरीही खामगावकर मात्र त्रस्त असतात. खामगाव एक विकसनशील शहर आहे तरीही खामगावात त्याचे येणे अनिश्चितच असते. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो परंतु खामगांवकर तरुणही त्याचे आगमन सुरळीत व्हावे म्हणून कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यांना रॅली इत्यादी तत्सम गोष्टी करण्यातच जास्त स्वारस्य दिसते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत देशांमध्ये कुठल्याही भागातील तरुण कोणत्याही प्रकारची रॅली आंदोलन मागण्या करताना दिसत नाही. मात्र हेच तरुण त्यांचे नेते, नेत्यांचे वाढदिवस इत्यादी अनेक गोष्टींच्या वेळेस मोठ्या जल्लोषात मोटरसायकल रॅली इत्यादी उपक्रम राबवतात. खामगावकर तरुणांनी एखाद्या वेळेस त्याच्या येण्यासाठी सुद्धा काहीतरी करायला नको का? 

     आज तो येऊन गेला, असाच तो सदैव येत राहो आणि त्याच्याशी संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी या सर्वांनी त्याचे आगमन हे नियमित ठेवावे अशी हात जोडून विनंती. 

    ज्याच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आज व नेहमीच, तिन्हीही ऋतूत, 12 महिने तेरा त्रिकाळ खामगांवकर असतात तो म्हणजे नळ.

(खरे तर नळाला पाणी येत असते. तरी बोली भाषेत नळ आला असेच म्हटले जाते. बोली बाषेनुसार लिखित लेख)

✍️विनय वि.वरणगांवकर ©

३ टिप्पण्या:

  1. सगळ्यात मोठा आनंद खामगाव करांसाठी नळाला पाणी येणे हाच आहे.सगळ्यांच्या मनातले भाव व्यक्त करणारा लेख.खूप छान.

    उत्तर द्याहटवा