..आणि ब्रिटिश सोल्जर भेटला
आमची नजरानजर झाली, काही क्षण थबकलो आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो तो चेहरा मला त्वरित आठवला त्याला पण पूर्वाश्रमीचे सर्व दिवस आठवल्याने तो सुद्धा माझ्याकडे पाहून हसला आणि मी जोरात उद्गारलो "अरे , ब्रिटिश सोल्जर ! " मग तो दिलखुलास हसला.
हा ब्रिटिश सोल्जर म्हणजे काही खरोखरचा इंग्रज सैनिक नव्हे हे सुरुवातीलाच स्पष्ट करणे संयुक्तिक वाटते. महाविद्यालयीन जीवनात तो आमचा एक सहपाठी होता. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी. मध्ये आम्ही सोबत होतो. मला स्मरते आम्ही ज्युनिअर कॉलेजला होतो तर तो सिनियर कॉलेजला. एन.सी.सी. परेडमधे मात्र आम्ही सोबत येत असू. 90 च्या दशकात खामगावात गो.से. महाविद्यालयाव्यतिरिक्त पदवीसाठी म्हणून एकही कॉलेज नव्हते त्यामुळे मोठी विद्यार्थी संख्या होती व तशीच संख्या एन.सी.सी. मध्ये सुद्धा असे. आम्ही जरी कनिष्ठ महाविद्यालयीन असलो तरी एन.सी.सी. मुळे वरीष्ठ महाविद्यालयातील अनेक मुलांशी मित्रत्व प्रस्थापित झाले होते. या मित्रांमध्ये अशफाक, सलीम बेग, फारूक, शेख शब्बीर शेख मन्नू, अब्दुल मतीन, पठाण, फरझान हाश्मी यांसारखी अनेक मुस्लिम मुले सुद्धा होती. एक लईक नावाचा मुलगा होता त्याला सर्व लैक्या म्हणत. डोळ्यात काजळ घालणारा हसतमुख अशफाक "चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" ही कव्वाली सुरेख गात असे. त्या एन.सी.सी.च्या दिवसात परेडमध्ये, कॅम्पमध्ये मुलांमध्ये मोठे खेळीमेळीचे वातावरण असे. एन.सी.सी.च्या गणवेशात सर्वच विद्यार्थी उठून दिसत असत, त्यांचे व्यक्तिमत्व खुलत असे, व प्रभावी वाटे. गणवेशात तीच जादू आहे. त्या सा-यातच वरीष्ठ महाविद्यालयातील तो सुद्धा एक होता. गोरापान वर्ण, तपकिरी पण विरळ केस, सरळ नाक, माध्यम उंंची आणि मजबूत बांधा अशी त्याची शरीरयष्टी मला आजही स्मरते. पु.लंच्या "नंदा प्रधान" या पात्राशी जवळपास साधर्म्य साधेल असा तो त्याकाळी दिसे. काळा गॉगल घातला की त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडत असे. एन.सी.सी.च्या गणवेशात तर तो अधिकच सुंदर दिसत असे जणू काही इंग्रज अधिकारीच. तो आमच्या सोबतच परेड करीत असे. मधल्या सुटीत आमच्याशी जुजबी बोलणे पण होत असे. पण घनिष्ट अशी मैत्री मात्र काही झाली नाही. कदाचित तो वरिष्ठ महाविद्यालयात असल्याने तसे झाले असावे. एकदा एन.सी.सी.च्या मोकळ्या वेळेमध्ये माझा हरहुन्नरी व दिलखुलास मित्र धनंजय टाले हा त्याला प्रथमच पहात होता. रुबाबदार अशा दिसणा-या , त्याला पाहून "यार तुम तो ब्रिटिश सोल्जर ही दिखते हो" असे उत्स्फूर्तपणे तो म्हणाला व तेंव्हापासून आमचा गृप त्याला 'ब्रिटिश सोल्जर" असेच म्हणू लागला तो सुद्धा त्याला हसून दाद देत असे. "आछे दिन पाछे गये" याप्रमाणे ते महाविद्यालयीन दिवस हा हा म्हणता सरले जो तो आपापल्या रोजीरोटी शोधण्याच्या कामकाजास लागला. आयुष्यात आपले इप्सित ध्येेय गाठण्यासाठी पुढे सरसावू लागला. जीवनाच्या धकाधकीत कॉलेज जीवनातील मित्र विभक्त झाले, दुरावले, आपापल्या व्यापात गुंतले. पण देव्हा-यातील दिवा विझू नये म्हणून जसे जपतात तसेच प्रत्येकच तरुण/तरुणी शैक्षणिक जीवनातील, महाविद्यालयीन जीवनातील आपल्या आठवणी जपून ठेवत असतात. हा ब्रिटिश सोल्जर सुद्धा असाच आठवणीत जपल्या गेला, कायमचा लक्षात राहिला. त्याला आम्ही ब्रिटिश सोल्जर असेच संबोधित होतो व त्याच नादात त्याचे मूळ नांव सुद्धा जाणून घेण्याचे भान राहिले नाही. कॉलेजमध्ये हाय हॅलो होत असे. कधीकाळी थोडे बहुत बोलणे होई. आज गो. से. महाविद्यालय सोडून 25 वर्षे झाली परंतू हा ब्रिटिश सोल्जर मात्र कधी दिसला नाही. परंतू "छोटिसी ये दुनिया पहचाने रास्ते है , तुम कहीं तो मिलोगे , कभी तो मिलोगे, तो पुछेंंगे हाल" या गीतकार शैलेन्द्रच्या ओळींची प्रचिती परवा आली. पण शैलेंद्रने या ओळी लिहिल्या त्यावेळी जग खरेच आजच्यासारखे सोशल मिडियामुळे जसे लहान झाले तसे नव्हते. पण तरीही उपरोक्त ओळीची प्रचिती येण्याचे निमित्त घडले ते बहिणीला सोडायला म्हणून बस स्टॅन्ड वर जाण्याचे. बस मध्ये आपली जागा पटकवण्यासाठी असलेल्या खास इंडियन शैलीचा म्हणजे खिडकीतून रुमाल टाकून जागा मिळवण्याच्या पद्धतीचा वापर करून मी जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात माझ्या बाजूला डोक्यावरील केस थोडे कमी झालेला, गोरापान हसमुख चेह-याचा व्यक्ती सुद्धा तसाच प्रयत्न करत होता. आमची नजरानजर झाली, काही क्षण थबकलो आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो. तो चेहरा मला त्वरित आठवला त्याला पण पुर्वाश्रमीचे सर्व दिवस आठवल्याने तो सुद्धा माझ्याकडे पाहून हसला आणि मी जोरात उद्गारलो "अरे , ब्रिटिश सोल्जर ! " मग तो दिलखुलास हसला. अनेक जुन्या आठवणी निघाल्या मोबाईल मध्ये असलेले मित्रांचे फोटो एकमेकांना दाखवले, एकमेकांची विचारपूस झाली कॉलेजमध्ये जरी आम्ही सोबत होतो तरी त्याचे नाव मला तेव्हा माहित नव्हते. त्याने नंबर दिला मी नांव टाईप करतांना थोडा बावचळलो, त्याचे लक्ष माझ्या मोबाईलच्या स्क्रीनकडेच होते, डोक्यात काही तरी खान आहे असे पुसटसे आठवत होते काय टाईप करावे म्हणून मी ब्रिटीश... ही तीन अक्षरे टाईप करताच ,"भाई तू नाम भूल गया, अकील खान लिख" असे तो म्हणाला मी तसे लिहिले. तो भुसावळला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असल्याचे कळले. तोवर आम्ही इंडियन स्टाईल ने रिझर्व्ह केलेली सिट आमच्या दोघांच्याही नातेवाईकांना मिळाली होती, बस निघाली. अकील खान उपाख्य ब्रिटिश सोल्जरशी समारोपाचा संवाद साधला, सोबत जोडलेले स्वत:च काढलेले छायाचित्र काढले. दिड तासाने आलेल्या त्या बसमधे आटापिटा करून मिळवलेल्या जागेवर बसलेल्या प्रवाशांच्या मुखमंडलावर आनंद पसरला होता तर बाहेर पुनर्भेटीमुळे आमच्या, माझ्या व महाविद्यालयीन जीवनांत प्रेमाने ब्रिटिश सोल्जर असे नांव दिलेल्या त्याच्या. प्रवाशांना घेऊन बसने स्थानक सोडले व अनेक स्मृतींना घेऊन आम्ही.