गतीशी तुळणा नसे
एक चकचकीत शेवाळी रंगाची मारुती 800 माझ्या समोरून गेली. बहुधा मालकाने नवीन रंग दिलेला असावा. मला मारुती 800 उत्पादनास 40 वर्षे झाल्याच्या परवाच्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या वार्तेचे स्मरण झाले. ती गाडी तर निघून गेली पण तिच्यासारखीच गती माझ्या विचारांना देऊन गेली.
आजच्या लेखासाठी मुलायम यांना पद्मविभूषण , अदानी, पूजा-यांनी जाती निर्माण केल्याचे हे विधान असे विषय मनात घोळू लागले. पण मुलायम यांच्या पद्मविभूषण पुरस्काराबाबत यापुर्वीच भाष्य करून झाले होते. अदानी, करोडो रुपये, श्रीमंतांची यादी, हिंडेनबर्ग अहवालाच्या कोटीच्या कोटी उड्डाणांवर व घसरणींवर भाष्य काही करावेसे यावेळी वाटले नाही. जाती या पंडीतांनी निर्माण केल्या या सरसंघचालकांच्या विधानाने सुद्धा लक्ष वेधले होते परंतू जाती व्यवस्था , वर्ण व्यवस्था निर्माण कशी झाली याचा विचार करण्यापेक्षा ती संपुष्टात कशी येईल यावरच जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे असे वाटले. या विचारांच्या गदारोळात मी रस्त्याने वाटचाल करीत जात असतांना एक चकचकीत शेवाळी रंगाची मारुती 800 माझ्या समोरून गेली. बहुधा मालकाने नवीन रंग दिलेला असावा. मला मारुती 800 उत्पादनास 40 वर्षे झाल्याच्या परवाच्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या वार्तेचे स्मरण झाले. ती गाडी तर निघून गेली पण तिच्यासारखीच गती माझ्या विचारांना देऊन गेली. मी तेंव्हा प्राथमिक शाळेत असेन. 1983 मध्ये भारतात मारुती 800 या गाडीचे उत्पादन सुरु झाले. मारुती गाडी आली असे काहीसे तेंव्हा ऐकायला मिळायचे. फियाट आणि अँबेसॅडर या गाड्या पाहिल्या होत्या. फियाट माझ्या मामांकडे होती आणि अँबेसॅडर आमच्याकडे आणि त्यापुर्वी काही काळ जिप सुद्धा होती. अँबेसॅडर सारखी राजा गाडी घरी असल्याने आमची सर्व वडीलधारी मंडळी मारुती कारला नांवे ठेवत होती हे मला स्मरते. "जुने ते सोने" या आमच्या वडीलधा-या मंडळीच्या विचारसरणीमुळे आम्ही कुठेही जायचे असले की पसंती अँबेसॅडरलाच द्यायचो. तेंव्हा अँबेसॅडरचा खप प्रचंड होता. होत्या. टँक्सी म्हणून सुद्धा त्या चालायच्या. ऐसपैस अँबेसॅडरच्या तुलनेत मारुती 800 म्हणजे अगदीच किरकोळ वाटायची, खुजी वाटायची काही लोक तर तिची "आगपेटीची डबी" म्हणून हेटाळणी करायचे. पण तरीही हळू हळू ती लोकांच्या पसंतीस उतरली. चालक धरून पाच व्यक्ती आरामशीर प्रवास करू शकतील अशी गाडी. 800 सीसी चे इंजिन, एसी, पेट्रोलला परवडेल असे मायलेज देणारी गाडी. मारुती लॉँच होताच अल्पावधीतच या गाडीला मागणी वाढली. सुनील गावस्कर या नामांकित क्रिकेटपटूच्या हस्ते पहिली मारुती 800 लॉंच झाली होती.
लवकरच रस्त्यावर विविध आकर्षक रंगातील मारुती 800 गाड्या दिमाखात, गतीने धावताना दिसू लागल्या. सचिन तेंडूलकर , शाहरुख खान यांनी सुद्धा ही गाडी घेतली होती. सचिनकडे तर ही गाडी अजूनही आहे व त्याच्या एका जाहिरातीत ती दिसते सुद्धा. पुढे मारूतीने झेन, ओम्नी, अल्टो, वँगनार, ईको , आर्टिगा, बलेनो अशा अनेक गाड्या निर्माण केल्या. अल्टो म्हणजे मारुती 800 चेच सुधारीत रूप. परंतू नवीन आलेल्या अल्टोपेक्षा जी अगदी सुरुवातीची मारुती 800 गाडी आहे ती अधिक मजबूत आहे. नवीन अल्टो व इतरही कंपन्यांच्या गाड्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिकच आहे. आता काही वर्षांपासून BS4 , BS 6 इंजीनच्या गाड्यांबाबतची नवीन नियमावली, विदेशी मॉडेलच्या अनेक गाड्यांची सहज उपलब्धता, 15 वर्ष जुन्या गाड्यांवर बंदीचे सरकारचे धोरण या सर्व गोष्टींमुळे मारुती 800 ही गाडी मागे सरली. या गाडीमुळे आणखी एक किस्सा घडला होता. तो म्हणजे या गाडीचे अनेक अपघात हे ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने झाले होते. कित्येक मारुती 800 गाड्या ह्या ट्रकच्या मागील बाजूने ट्रकच्या खालीच घुसल्या होत्या. त्यामुळे ट्रकला मागील बाजूने कार घुसणार नाही असा मोठा लोखंडी बार लावण्याचे आदेश सरकारनी काढले होते. अशाप्रकारच्या अपघातात बहुतांश वेळी चुक ही कार चालकाचीच होती व सुधारणा मात्र ट्रकवाल्यांना कराव्या लागल्या होता. या निर्णयाचे तेंव्हा बरेच हसे झाले होते. असो ! ती शेवाळी रंगांची मारुती 800 केंव्हाच निघून गेली होती परंतू ती गेली त्या अनेक आठवणी देऊन. मला आणखी अनेक गोष्टी आठवू लागल्या. 7/8 वर्षांपुर्वी माझा फोन खणाणला. माझे मामे भाऊ डॉ. प्रशांत नाईक
हे फोनवर होते. "मी तूला माझी मारुती 800 देतोय, घेऊन जा लवकर." त्याने नवीन गाडी घेतल्यावर ही मारुती 800 उभीच होती, त्याला ती विकायची सुद्धा नव्हती. मी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून गाडी घेऊन आलो. आजही ही गाडी सुस्थितीत आहे व चांगली चालते. या गाडीने मी भरपूर प्रवास केला व करतो. गाडीची व्यवस्थित निगा राखली,देखभाल केली तर ती कधीच धोका देत नाही असे माझे तिर्थरूप नेहमीच सांगत असतात. माझ्या काकांनी सुद्धा अँबेसॅडर अगदी कंडिशन मध्ये ठेवली होती. ते नेहमी गाडीचे तेल, हवा, पाणी व बॅटरी यांच्याकडे लक्ष असलेच पाहिजे असे म्हणत. तेल हवा पाणी म्हणजे पेट्रोल/डिझेल, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि रेडिएटर मध्ये पाणी. आता नवीन गाड्यांमध्ये कुलंट असते. उपरोक्त तीन-चार गोष्टींकडे लक्ष असले की तुमची गाडी अनेक वर्ष चांगली चालतेच. पण आता 15 वर्षांचा नियम आला आहे, गाडीला 15 वर्षे झाली की गाडी जरी चालत असली तरी तिला भंगारात काढले जाते. आजकाल क्रयशक्ती वाढल्याने व नवनवीन मॉडेल लवकर येत असल्याने लोक सुद्धा पुर्वीसारखे वर्षानुवर्षे एकच गाडी वापरत नाही. अनेक नवीन मॉडेल, गाडीला दिलेली नवीन 15 वर्षांची वयोमर्यादा यामुळे मारुती 800 चा खप कमी झाला. आता तर 800 सीसी इंजिनच्या मारुती गाडीचे उत्पादन कंपनी मार्च 23 पासून बंदच करणार आहे.
70 च्या दशकात संजय गांधी या इंदिराजींच्या ज्येष्ठ पुत्रास भारतीयांसाठी एक "पीपल्स कार" लॉन्च करावीशी वाटली त्यातूनच पुढे 1981 मध्ये भारत सरकारने MUL मारुती उद्योग लिमिटेडची स्थापन केली व मारुतीचा प्रवास सुरु झाला. 1983 पासून भारतीयांच्या पसंतीस उतरलेली, मोठा खप झालेली व तत्कालीन गाड्यांच्या तुलनेत वेगाने घावणारी अर्थात गतीशी तुळणा नसणारी हि गाडी भारतीयांच्या सदैव समरणात राहील.
||इति मारुती पुराण संपूर्णम||
छान लिहिलंय सर.
उत्तर द्याहटवामलाही ही गाडी खुप आवडते.
तुमची गाडी पाहुन आम्हाला ही अभिमान वाटतो.
👍
हटवाKhupach sundar
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाअगदी असाच अनुभव मला सुद्धा आला आहे. पण माझ्याकडे मारुती 800 नाही तरीपण मारुती स्विफ्ट आहे. तेरा वर्षे झाली आहेत. इतर कोणत्याही गाड्यांपेक्षा हीच गाडी मला आवडते. हिला विकायचं धाडस माझ्यात कधीच नव्हतं. अतिशय कमी हप्त्यावरती नवीन गाडी मिळत असतानासुद्धा आणि एक्सचेंजची सोय असतानासुद्धा ना मी या गाडीला कधी सोडलं, ना तिने मला कधी सोडलं.
उत्तर द्याहटवाघर आणि गाडी खूपच लळा लावते हे खरंच !
👍🙏
हटवा