शितें वेंचती दयाघन ।
आज गजानन महाराज प्रगट दिन, विदर्भात अनेक ठिकाणी भंडारे होतात, जेवणावळी होतात. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये समस्त भाविक गण लीन होऊन जातात. मात्र या व इतरही कार्यक्रमात आपल्याकडून अन्नाचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे.
आज गजानन महाराज प्रगट दिन माघ सप्तमी दिनी संत गजानन महाराज शेगावी प्रगटले.
बंकटलाल आगरवाला ।होता रस्त्यानें चालला ।
त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥
याप्रमाणे बंकटलालास ते उष्ट्या पत्रावळीवरील शिते खातांना दिसून आले.
ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।
शोधन पत्रावळीचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥
उष्ट्या पत्रावळीवरील शिते खाणारा हा कोणीतरी श्रेष्ठ संत पुरुष दिसतो आहे अशी त्याची खात्री पटली.
शीत पडल्या दृष्टीप्रत।तें मुखीं उचलुनी घालीत ।
हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥
म्हणून बंकटलालाने त्या योगिराजास चांगले भोजन आणून दिले. ते सर्व भोजन या ब्रह्मांडनायक गजानन महाराजांनी एकत्र करून भक्षण केले आणि आणि अन्न हे पुर्णब्रह्म असल्याचे समस्तांना
निर्देशित केले.
कां कीं गर्जोन सांगे श्रुती। अन्न हेंच ब्रह्म निगुती ।
"अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥
दासगणू महाराज लिखित गजानन महाराजांच्या पोथीतील या संदर्भातील ओळी आपण नेहमीच वाचत असतो, स्मरत असतो. भक्तप्रतिपालक गजानन महाराज मंदिरात जेव्हा आपण प्रसाद भक्षण करण्यासाठी जात असतो त्या ठिकाणी सुद्धा गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते खातांनाचे चित्र आपल्याला बरेच काही सांगून जाते. संत पुरुषांनी त्यांच्या कृतीने, त्यांच्या लिखाणाने आपणास खूप काही असे मार्गदर्शन केलेले आहे परंतु आज आपण समाजात पाहतो तर अन्नाचा म्हणावा तसा सन्मान होताना दिसत नाही. आज तरुणाई जेव्हा वाढदिवस साजरी करते तेव्हा एक केक हा निव्वळ तोंडाला फासण्यासाठी म्हणून घेतला जातो. तसेच ज्याचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्याच्या अंगावर टमाटे, अंडी व इतर काही खाद्य पदार्थांची फेकफाक केली जाते आणि अन्नाला
पुर्णब्रह्म समजणा-या आपल्या देशात अन्नाचा असा नाश होताना आपण पाहतो. शिवाय आजकाल विवाह कार्यामध्ये हळदीचे कार्यक्रम सुद्धा जोरात साजरे केले जातात. पुर्वी नवरदेव, नवरीस थोडीफार हळद लावून हा कार्यक्रम होत असे. परंतु आजकाल सर्वच सणसमारंभ साजरे करण्यामध्ये मोठा दिखावा, मोठी झकपक आलेली दिसते. हळदीच्या कार्यक्रमात सुद्धा हळद खेळण्याचा एक कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित नवरदेव नवरीसह उपस्थित सर्वांना सुद्धा हळदीने रंगवले जाते आणि यात हळद या खाद्यपदार्थाचे व पाण्याचे मोठे नुकसान होताना आपल्याला दिसते. परंतु त्यात कोणालाही वावगे असे वाटत नाही. आज गजानन महाराज प्रगट दिन आहे बुलढाणा जिल्ह्यात, विदर्भाच्या काही भागात अनेक ठिकाणी भंडारे आयोजित केले जातात. या भंडा-यात मोठ्या प्रमाणात जेवणावळी होतात. गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये समस्त भाविक गण लीन होऊन जातात. मात्र या सर्व कार्यक्रमात आपल्याकडून अन्नाचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे. रामदास स्वामींनी सुद्धा
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
असे आपणास सांगितले आहे त्यामुळे या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी वाढदिवस, हळद या कार्यक्रमांमध्ये अन्नाचा नाश कसा टाळता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या पानात सुद्धा जितके लागेल तितकेच अन्न आपण घ्यायला पाहिजे. असे जर आपण केले तर आपण संत गजानन महाराज यांनी दिलेली शिकवण थोडी का होईना आचारतो आहे याचे आपणास स्वतःला समाधान वाटेल व ते गजानन महाराजांना जास्त आवडेल.
गजानन महाराज की जय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा