Click "Follow" Button below To Follow this Blog

२२/०६/२०२३

Article about traditional Indian musical instrument Sanai / Shahanai

शहनाई ना बोले

एकीकडे डिजेच्या अति नादाने अनके लोकांचे मृत्यू झाल्याची वृत्ते, चित्रफिती आलेल्या आहेत. तर दुसरीकडे सनई वादन ही कला लुप्त होण्याच्या मागावर आहे. पुर्वी विवाह पत्रिकांवर सुद्धा सनई चौघड्याचे चिन्ह दिसायचे. आताच्या आकर्षक पत्रिकांवरुन हे चिन्ह सुद्धा पुसले गेले आहे. सनई चौघडा बंद झाला आहे. सर्वत्र फक्त भेसूर डिजेचा नुसता धुमाकूळ माजला आहे.

तेरी शहनाई बोले , सुनके दिल मेरा डोले

1960 च्या दशकातील गुंज उठी शहनाई या चित्रपटातील गीताचा हा मुखडा. माझे वडील आजही गुणगुणतात. संगीतकार वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत. शहनाई अर्थात सनई या वाद्याच्या अवतीभवती फिरणारे कथानक असलेला हा सिनेमा असावा. सिनेमा तर पाहिला नाही परंतू काही गाणी मात्र ठाऊक आहेत. आपल्या शहनाई वादनाच्या जोरावर नायिकेस भेटण्यासाठी म्हणून येण्यास भाग पाडल्यावर उपरोक्त गीतात "बैरी काहे को सुनाये ऐसी तान रे" असे नायिका म्हणते. खरेच सनई जर कान देऊन ऐकली तर कुणीही मंत्रमुग्ध होईल असे ते स्वर असतात. संगीतकार वसंत देसाई यांनीच स्वरबद्ध केलेले आणखी एक अजरामर गीत म्हणजे “उठी उठी गोपाळा”. या गीतात “राजव्दारी झडे चौघडा” असा चौघड्याचा उल्लेख येतो. सनई, चौघडा ही भारतातील मंगल


वाद्ये. आमच्या लहानपणी वडीलांनी आमच्यासाठी भारतातील प्रख्यात सनईवादक शहनाईनवाज बिस्मिल्ला खान यांच्या सनई वादनाच्या ध्वनिफिती आणल्या होत्या. आम्ही रोज सकाळी त्या टेपरेकॉर्डवर लावत असू. सकाळी सनईचे मंगल सूर कानी पडल्यावर आम्हाला प्रसन्न वाटत असे. पुर्वी शुभप्रसंग असला की सनई चौघडा वादकांना हमखास आमंत्रित केले जायचे. मला आठवते माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात अमडापूर येथील सनई वादकांना बोलावले होते. अमडापूर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे गांव परंतू येथील सनई वादक प्रसिद्ध होते. पुर्वी प्रत्येकच लग्नात लग्न कार्यालयात एका कोप-यात हे सनई वादक हमखास बसलेले दिसत व कार्यालयात सनईच्या मंगल स्वरांची बरसात मंगलमय वातावरण निर्मिती करण्यास भर घालत असे. 1990 च्या दशकापर्यंत सनई वादक लग्नप्रसंगी दिसत असत. आज मात्र सनई वादक अभावानेच दिसतात. लग्नसोहळे निव्वळ झकपक व फोटोसेशन केंद्रे झाले आहेत. विधींऐवजी फोटोलाच जास्त महत्व दिले जात आहे. असो ! तो तर एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. 

    आज सनईची आठवण होण्याचे कारण म्हणजे असेच एकदा रस्त्याने जात असतांना एक वरात चालली होती. वरात म्हटली की हल्ली मोठा कानठळ्या बसवणारा डिजे हा हमखास असतोच. तसा या वरातीतही तो होता. वरातीतील एक जेष्ठ नागरीक रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून वाहनांना रस्ता मोकळा करून देत होता. असा एक समाजिक भान असलेला व्यक्ती सुद्धा सर्वच वरातीत असतो. मी डिजेच्या जवळ पोहचताच अचानक विविध कंपने माझ्या शरीरात जाणवायला लागली, हृदयात सुद्धा वेगळीच अशी धडधड जाणवली. तिथून लवकरात लवकर पुढे जावे असे मला वाटू लागले. तिथून दूर जाताच “अरे भाऊ बहोत बेकार है ये डिजे” असे माझ्या शेजारचा गाडीवाला माझ्याकडे पाहात मला म्हणत पुढे गेला. डिजेच्या आवाजाने माझी झालेली अस्वस्थता त्याने हेरली होती की काय देव जाणे. कुठून आला हा डिजे तेे भले मोठे स्पिकर,  कर्णकर्कश्श वाद्ये आणि ती डिजेची चित्रविचित्र दिसणारी अजब गाडी ? डिजेमुळे अनेकांना रोजगार मिळतो हे जरी खरे असले तरी विना डिजे केवळ वाद्ये वाजवूनही त्यांना तो मिळू शकतो. त्या दृष्टीने विचार करणे आता गरजेचे झाले आहे. कुणी म्हणेल लोकच डिजेची मागणी करतात. हे सर्व काहीही असो परंतू हा डिजे वाजला की शरीरात वेगळीच कंपने, लहरी निर्माण होतात. नवजात अर्भकांची स्थिती कशी होत असेल देव जाणे. शिवाय हे डिजे रुग्णालये, बाल रुग्णालये, शाळा यांच्या जवळून जातात. त्याच्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी प्रदूषणाचा काही एक विचार होतांना दिसत नाही. रस्त्याने अनेक जेष्ठ नागरीक, वृद्ध असतात त्यांना डिजेमुळे काही त्रास होईल हे सुद्धा ध्यानात घेतले जात नाही. डिजेेेच्या गोंगाटाने पक्षी व जनावरे सुद्धा किती घाबरून जात असतील. अनके लोकांचे मृत्यू या डिजेमुळे झाल्याची वृत्ते, चित्रफिती आलेल्या आहेत. या डिजेमुळेच मला पुर्वीचे मंगल कार्यक्रम, विवाह यांत वाजवल्या जाणा-या सनई या मंगल वाद्याचे स्मरण झाले. दोन वर्षांपूर्वी भुसावळ येथे माझ्या भाचीच्या विवाहास गेलो असता तिथे मुक्ताईनगर का जवळच्या ग्रामीण भागातून सनईवाले बोलावले होते. एक जुने गाणे त्या सनई वादकाने अत्यंत उत्कृष्ट असे वाजवले. मला राहवले नाही मी त्याला ते गाणे पुन्हा वाजवण्यास सांगितले, त्याचे कौतुक केले, त्याला बक्षीस दिले. तो खुलला, बोलू लागला आनंदून त्याने सनईला दिवसागणिक मागणी कशी कमी होत आहे हे कथन केले, “साहेब आता कलाकारांच्या कलेचा सन्मान कुणी करत नाही” तो म्हणाला. त्याने त्याचे कार्ड पण दिले. आज हे सनई वादक, ही कला लुप्त होण्याच्या मागावर आहे. पुर्वी विवाह पत्रिकांवर सुद्धा सनई चौघड्याचे चिन्ह असायचे. आताच्या आकर्षक पत्रिकांवरुन हे चिन्ह सुद्धा  पुसले गेले आहे. सनई चौघडा बंद झाला आहे. भेसूर डिजेचा नुसता धुमाकूळ माजला आहे. काळाने अनेक चांगल्या गोष्टी हिरावून नेल्या आहेत ख-या पण आज पुन्हा लग्नकार्ये, घरे बांधण्याच्या पद्धतीत जुन्या पद्धतीचा अवलंब होतांना क्वचित दिसत आहे तेंव्हा जुनी मंगल वाद्ये वाजवणा-या सनई, चौघडा वादकांना सुद्धा लोक लग्नात पुन्हा बोलावू लागतील का ?  असा विचार मनात डोकावला. खरे तर आपण त्यांना हुडकून बोलवायला हवे. सनईचे सुर शुभ प्रसंगी ऐकू आले की, "शहनाई ना बोले" असे म्हणण्याऐवजी 

        तेरी शहनाई बोले , सुनके दिल मेरा डोले

असे चित्र पुन्हा दिसायला वेळ लागणार नाही. शहनाई बजे हो मेरे अंगना मे असे मंगलमय वातावरण लग्न कार्यात पुनश्च स्थापित होऊन कर्ण कर्कश्श अशा डिजेऐवजी आपल्या परंपरागत सनईचे मंगल, कर्णमधुर असे स्वर आसमंतात घुमू लागतील व गुंज उठी शहनाई असे ख-या अर्थाने म्हणता येईल.  

६ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर लेख. सनई - शहनाई पुन्हा वाजली पाहिजे. शक्य असेल तर सनई - शहनाई वादकांचे नाव व संपर्क क्रमांक सोशल मीडियावर प्रसारित करा. लोकांना जुने दिवस आठवून पुन्हा मंगल प्रसंगी सनई - शहनाई वाजू लागेल.

    उत्तर द्याहटवा