Click "Follow" Button below To Follow this Blog

०८/०६/२०२३

Article about food adulteration

क्या जाने किस चिज में क्या हो....

क्षणिक फायद्यासाठी आपल्याच देश बांधवांना, लहान मुलांना कृत्रिम, भेसळयुक्त अन्न खाऊ घालणे अत्यंत हीन व देशद्रोही कृत्य आहे. आपले पुर्वज बाहेरचे अन्न खात नसत.  बाहेरच्या पदार्थांना मागणी वाढायला लागल्यापासून व मनुष्याला कमी मेहनतीत जास्त पैसे कमावण्याची हाव लागली तेंव्हापासून भेसळ होण्याचे प्रमाण वाढले.

            लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे व दिवसागणिक हा आकडा वाढतच जात आहे. या लोकसंख्येला पुरेल एवढे उत्पादन होते का? भारतात हरित क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढले. हरीत क्रांती नंतर धवल क्रांती, नील क्रांती सुद्धा झाल्या व त्या अनुषंगाने दुग्धोत्पादन, मत्स्योत्पादन सुद्धा वाढले. परंतू हे अन्नधान्य पुर्वीच्या गावरान अन्नासारखे कसदार राहिले नाही. शिवाय या उत्पादनापासून नाना प्रकारची इतर उत्पादने निर्माण केली जातात उदा. बेकरी उत्पादने, आईस्क्रीम, मिठाई इ. या उत्पादनांना मोठी मागणी असते. “मागणी तसा पुरवठा” या अर्थशास्त्राच्या नियमानुसार असलेल्या मोठ्या मागणीला पुरवठा करण्यासाठी तेवढे उत्पादन मात्र नसते व इथूनच सुरुवात होते ती भेसळीची. कित्येकदा आपण नकली दुध पकडल्या गेल्याचे वृत्त ऐकत असतो. नकली खवा सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होतो. नाना प्रकारच्या मिठाया, खवा, आईस्क्रीम इ प्रचंड प्रमाणात बाजारपेठेत उपलब्ध असते, परंतू इतके दुग्धोत्पादन आपल्या देशात खरंच आहे का ? असेलही तर एवढ्या मोठ्या भारतात लाखो हॉटेल्स, चहाच्या टप-या नव्याने सुरु झालेली चहाची झकपक दुकाने, त्यांच्या शाखा व करोडो ग्राहक यांनाच मोठ्या प्रमाणात दुध लागते मग मिठाई, आईस्क्रीम आदींसाठी दुध शिल्लक राहते का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मागे एका मोठ्या चहा विक्रीचे जाळे असणा-या व्यावसायिकावर चहा पावडर मध्ये भेसळ केल्याबाबत कारवाई झाली होती. वाटाण्यांना हिरवा रंग देणे, फळे चमकवणे, बर्फाच्या गोळ्याचे रंग हलक्या प्रतीचे असणे, तळलेल्या पदार्थांसाठीचे तेल भेसळयुक्त व हलक्या प्रतीचे असणे आणि आईस्क्रीम वनस्पती तेलापासून बनवणे अशा खाद्य पदार्थात होणा-या नाना प्रकारच्या भेसळीमुळे लोक विविध व्याधींनी ग्रस्त होत आहे. प्रत्येक घराचा दवाखान्याचा खर्च वाढतच चालला आहे. या सगळ्या गोष्टी सरकारने, सामाजिक संघटनांनी ध्यानात घ्यायल्या हव्यात.  खामगांव जि बुलढाणा येथे सुद्धा गेल्या तीन-चार महिन्यात अचानक काही मिठाईची दुकाने सुरु झाली. आपल्या संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा मिठाईंच्या नव्या दुकानांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सा-या उहापोहाचे कारण की, नुकताच बुलढाणा जिल्ह्यात 69,129 रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केल्याचे व नियमांचे उल्लंघन करणा-या व्यावसायिकांकडून 26 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे वृत्त आले आहे. प्रमाणित दर्जाचा माल नसणे, मिठाईवर ती किती वेळात खावी याचा उल्लेख नसणे अशा अनेक बाबी अन्न व औषधी प्रशासनास आढळून आल्या आहेत. अन्न व औषधी प्रशासनाने जेवणाचे कंत्राट घेणारे तसेच भाजीपाला व फळे विकणारे, हॉटेल्स मधून विकली जाणारे मांसाहारी पदार्थ यांची सुद्धा वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. मनुष्य स्वत:च्या फायद्यासाठी काय करेल काही नेम राहिला नाही. क्षणिक फायद्यासाठी आपल्याच देश बांधवांना, लहान मुलांना कृत्रिम, भेसळयुक्त अन्न खाऊ घालणे अत्यंत हीन व देशद्रोही कृत्य आहे. भेसळखोरांविरोधात नागरीकांच्या जिविताशी खेळण्याच्या गुन्ह्याबाबत कठोरात कठोर कायदे बनवले पाहिजे. जनतेने सुद्धा तशी मागणी लावून धरायला पाहिजे. आपले पुर्वज बाहेरचे अन्न खात नसत त्यांच्या या प्रकाराला नवीन पिढी हसण्यावर नेते, अनेक तथाकथित बुद्धिवादी सुद्धा या गोष्टीला जुने बुरसटलेले विचार असे म्हणतात. परंतू परान्न , विकतचे पदार्थ न खाण्याचा आपल्या पुर्वजांच्या नियम योग्य असल्याचे आता जाणवायला लागले आहे. अनेकांनी बाहेरचे खाणे वर्ज्य केले आहे. बाहेरच्या पदार्थांना मागणी वाढायला लागल्यापासून व मनुष्याला कमी मेहनतीत जास्त पैसे कमावण्याची हाव लागली तेंव्हापासून भेसळ होण्याचे प्रमाण वाढले असे म्हणायला हरकत नाही कारण 1960 च्या दशकात म्हणजे आजपासून सुमारे 65 वर्षांपूर्वी नीलकमल नावाच्या चित्रपटात सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता मेहमूदवर चित्रित

खाली डब्बा खाली बोतल ले ले मेरे यार खाली से मत नफ़रत करना खाली सब संसार

असे भरलेल्या वस्तूंची काही शाश्वती / गॅरंटी नाही त्यापेक्षा खाली म्हणजे रिकामे डबे व बाटल्याच चांगल्या असे सांगणारे एक गीत आहे. 

 या गीतात कोणत्या पदार्थात कशी भेसळ होते याचा उल्लेख कवीने सुंदर शब्दांत केला आहे. भेसळीचे वर्णन करतांना गीतकार साहीर म्हणतो,

खाली की गारंटी दूंगा भरे हुए की क्या गारंटी शहद में गुड के मेल का डर है, घी के अंदर तेल का डर है तम्बाकू में खाद का खतरा, सेंट में झूठी बास का खतरा मक्खन में चर्बी की मिलावट, केसर में कागज़ की चिलावट मिर्ची में ईंटों की घिसाई, आटे में पत्थर की पिसाई व्हिस्की अंदर टिंचर घुलता, रबड़ी बीच ब्लॉटिंग तुलता क्या जाने किस चिज में क्या हो, गरम मसाला लीद भरा हो

1960 च्या दशकात उपरोक्त ओळींप्रमाणे अन्न पदार्थांत अशाप्रकारची भेसळ होत होती. आज तर या भेसळीचे प्रमाण नक्कीच अनेक पटींनी वाढलेलेच असेल नव्हे आहेच तेंव्हा "क्या जाने किस चिजमे क्या हो ?" म्हणून आपल्या रसनेंद्रियावर ताबा मिळवण्याचा सराव करा,  बाहेरचे पदार्थ खातांना सावध राहा व लहान मुलांना बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी त्यांना सातूचे पीठ, कच्चा चिवडा, गुळ दाणे, सातूच्या पिठाच्या मुटकळ्या इ. पदार्थ तयार करून खाऊ घाला कदाचित त्यांना आवडतील सुद्धा, मुलांना लेखात दिलेल्या विविध पदार्थात केल्या जाणा-या भेसळीची जाणीव करून द्या अन्यथा रस्ते, फ्लाय ओव्हर, मोबाईल, मॉल, बाईक, कार इ सर्व भौतिक बाबी तर असतील परंतू त्यांचा वापर करणारे लोक मात्र व्याधीग्रस्त राहतील, त्या सर्व सुविधा वापरण्यास ते सक्षम, सुदृढ राहणार नाही असा धोका जाणवायला लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा