राजकारणातील पुतणे
घोषणा :- हा लेख मी काल 14/06/23 रोजी माझ्या ब्लॉगवर लिहला. आज सकाळी याच विषयावरचा लेख एका वृत्तपत्रात दिसला. लेखक वेगळे होते. शीर्षकात सुद्धा साधर्म्य होते. मला आश्चर्य वाटले. ज्या वृत्तपत्रात हा लेख प्रकाशित झाला त्यांना मी माझा लेख e mail केला होता. माझा या विषयावर लेख येत आहे अशी जाहिरात सुद्धा मी काल ब्लॉग वाचकांसाठी केली होती. असो ! हा योगायोग असावा असे गृहीत धरू. वाचकांना गैरसमज नको म्हणून ही घोषणा करीत आहे.
भारतीय राजकारणात पुतण्या हा प्राचीन काळापासून तर अद्यापपर्यंत डावलल्याच गेला आहे, डावलला जात आहे. महाभारतात धृतराष्ट्र त्याचा पुतण्या युधिष्ठीर हा सत्तेचा दावेदार असूनही पुत्रमोहापोटी दुर्योधनाला सत्ता कशी मिळेल याचीच चिंता / प्रतीक्षा करीत राहिला. कौरव पांडव युद्धानंतरही त्याने त्याचा कनिष्ठ पुतण्या भिमाला कवेत घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होताच. महाभारत काळापासून तर आजपावेतो भारतीय राजकारणात पुतण्यांची नेहमीच उपेक्षा झालेली आहे. ऐतिहासिक काळात सुद्धा सत्तेसाठी पुतण्या नारायणराव मारल्या गेला होता. या महाभारत व ऐतिहासिक काळातील पुतण्यांच्या दाखल्यांनंतर आता काही सांप्रत कालीन राजकारणातील काही पुतणे व त्यांचे डावलले जाणे याचाच ऊहापोह केला आहे.
सर्वात प्रथम राष्ट्रवादीतील पुतणे अजित पवार यांचा दाखला घेऊ. परवा भाकरी फिरली (तशी ती फिरली नाहीच परंतू फिरली असे भासवले गेले) आणि सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल हे कार्याध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवार यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही कारण त्यांच्याकडे राज्याचे विरोधी पक्ष नेतेपद आहे असे कारण पुढे करण्यात आले. अजित पवार राष्ट्रवादी पक्षात जलसिंचन प्रकरण, धरणाबद्दलचे वक्तव्य व तद्नंतर आत्मक्लेश वगैरे होऊनही एक दबंग नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांच्या राजीनाम्यावेळचे त्यांचे वागणे, बोलणे हे सर्वांनीच पाहिले आहे. राष्ट्रवादीत मोठे नेते असूनही अजित पवार यांना नेहमी मागेच ठेवण्यात आले अशी चर्चा होते. विलासरावांच्यावेळी राष्ट्रवादीच्या जास्त जागा असूनही मुख्यमंत्री पद काँग्रेसला दिले गेले होते. पुढे गृहमंत्रालयासारखे महत्वाचे खाते सुद्धा आर. आर. पाटील यांना दिले होते. त्यांचा मुलगा पार्थच्या उमेदवारीच्यावेळी सुद्धा रुसवेफुगवे झाले होते. पहाटेच्या शपथविधीचे गुपित सुद्धा दादा अजून सांगत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांचे पुतणे अद्यापपर्यंत तरी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकले नाही.
दुसरे पुतणे म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारे, आपल्या थेट, बेधडक बोलण्यातून सर्वसामान्यांना आकर्षित करणारे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे. बाळासाहेबांसोबत सुरुवातीपासून राजकीय सभांमध्ये जाणारे तरुण, आकर्षक राज सर्वांनाच भावत असत आजही भावतात अनेकांना राज हेच पुढे शिवसेनेचे सूत्रधार होतील असे वाटत असतांनाच शिवसेना कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला राज यांनी सहमती दिली तेंव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. आजही राज यांना त्यांच्या जुन्या चांगल्या दिवसांचे स्मरण होते, टाळीसाठी त्यांनी हातही पुढे केला होता पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बाळासाहेबांच्या हयातीतच त्यानी नवीन पक्ष काढला. आजही बाळासाहेबांचे हे पुतणे त्यांचा पक्ष पुढे आणण्यासाठी झटत आहे.
तिसरे पुतणे म्हणजे आपल्या विविध प्रकरणांबाबत बहुचर्चित झालेले गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे. भाजपाची जोडगोळी प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी “माधवं” राजकारण करीत भाजपाला सत्तेकडे नेण्यात यश मिळवले. पुढे धनंजय मुंडे भाजपात सक्रीय झाले. परंतू पंकजाताई व प्रीतम मुंडे भाजपात पुढे आल्यावर मात्र धनंजय यांना डावलले जाऊ लागले, त्यांची कुणाला "करुणा" आली नाही व ते भाजपातून राष्ट्रवादी कंपूत दाखल झाले.
चौथे पुतणे म्हणजे राष्ट्रीय राजकारणातील वरूण गांधी. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सत्तेची सूत्रे आपल्याकडे वळविणारे संजय गांधी यांचे पुत्र वरुण गांधी हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुतणे परंतू तीन-तीन पंतप्रधान झालेल्या कुटुंबातील वरूण गांधी मात्र गांधी कुटुंबात उपेक्षितच राहिले, भाजपावासी झाले व राजकारणात अजूनही म्हणावे तसे स्थिरावले नाही. राजीव गांधी पुत्र व पुत्री हे मात्र आजही काँग्रेस पक्षाची सुत्रे राखून आहेत, “आलाकमान” आहेत.
या चार पुतण्यांव्यतिरिक्त आणखीही काही पुतणे असतील की ज्यांना राजकारणात आपले स्थान निर्माण करायचे असेल. तुर्तास तरी या चार पुतण्यांचे स्मरण होत आहे. इतरही कुणी असतील तर त्यांचीही गत या चौघांसारखीच असण्याची शक्यता अधिक. वर दिलेल्या महाभारताच्या दाखल्यावरून ते आजतायागत हेच निदर्शनास येते की अंध धृतराष्ट्राप्रमाणे बहुतांश राजकारणी हे पुत्र(त्री) प्रेमाने आंधळे झालेले असतात. त्यामुळे मग घराणेशाहीचा वारसा पुढे नेण्यासाठी अपत्यावरील त्या आंधळ्या प्रेमापोटी आपल्याच अपत्यांना पुढे आणले जाते, जनतेवर लादले जाते असेही म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या अशा लादण्याने पक्षाची गत काय होते हे सुद्धा वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. ते महाराष्ट्राने पाहिलेच आहे. तेंव्हा राजकारणातील पुतण्यांनी राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी सावध पाऊले टाकावी, भविष्यातील राजकीय स्थितीचा अंदाज घेऊनच पुढील वाटचाल करावी अन्यथा कैक वर्षे पक्षासाठी कार्य करूनही बाजूला सारले जात असेल तर काय फायदा. भारतीय राजकारणात एक तर बाप बनावे नाही तर मुलगा, पुतण्या नाही असेच या राजकारणातील पुतण्यांच्या वरील उदाहरणांवरून लक्षात येते.
सुरेख विवेचन!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवासुंदर लेख...
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा