Click "Follow" Button below To Follow this Blog

१९/१२/२०२४

Article about crowd gathered to see pushpa 2 screening.

 क्रेझी किया रे ! 

बलम सामी हे गाणे खूप गाजले होते. विविध अंगविक्षेप असणारी उत्तेजक अशी गाणी आजकालच्या gen z पिढीतील तरुणाईला तर खूपच आवडतात. परंतु  स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवावर बेतणारी अती आवड सुद्धा नको. भारतीयांच्या अशाच चित्रपट आवडीबाबत अर्थात क्रेजबाबत थोडेसे....

भारतात चित्रपट निर्मिती ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली आहे. चित्रपट तेव्हा चित्रपटच होता, त्याचा बोलपट झालेला नव्हता. म्हणजे बोलपट होण्याच्याही आधीपासून  चित्रपटांचे वेड हे भारतीय जनतेला लागले. कारण त्या काळात हे तंत्र नवीनच होते. पडद्यावर कुणीतरी आपल्यासारखीच हालचाल करतांना दिसते आहे, हे पाहणे म्हणजे तत्कालीन जनतेसाठी नवलाईचीच बाब होती. ते नवल पाहण्यासाठी म्हणून अबाल-वृद्ध, गरीब-श्रीमंत सर्वच लोक गर्दी करू लागले. आज जसे जनतेला तरुणांना मोबाईलचे वेड आहे, तसे तेंव्हा चित्रपट वेड होते असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे चित्रपटवेड अधिकच वाढत गेले, कारण चित्रपट बोलू लागला होता, अर्थात त्यात आवाज, संगीत, गीतांचा समावेश होऊन तो बोलपट झाला होता. चांगली गाणी, संगीत यांचा समावेश झाल्याने व पुढे हा चित्रपट रंगीत झाल्यावर तर चित्रपटांचे वेड अधिकच वाढले. ज्या गावात टॉकीज नव्हत्या त्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने अथवा सायकलने सुद्धा मोठ्या शहरात डबे घेऊन चित्रपट पाहण्यासाठी जात असत. मला आठवते मी लहान असतांना राजकारणात गेलेला अमिताभ जेंव्हा पुन्हा चित्रपटात प्रवेश करता झाला त्यावेळी त्याचा शहेनशहा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा शो सकाळी सहा वाजेपासून ठेवण्यात आला होता. खामगावच्या मोहन टॉकीज मध्ये हा चित्रपट तेंव्हा लागला होता. तेव्हा सकाळी सहाच्या शोसाठी पाच वाजेपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अशी आठवण आजही तत्कालीन तरुण सांगतात. अशी चित्रपटाची प्रचंड क्रेझ , वेड, दिवानगी भारतीयांना आहे.

 जनतेचे हे चित्रपटवेड चित्रपट निर्मात्यांना सुद्धा लक्षात आले व ते सुद्धा लोकांना आवडतील असे चित्रपट बनवू लागले. चित्रपटांचे वाढते वेड यावर आधारित सुद्धा चित्रपट निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ गुड्डी आणि रंगीला या चित्रपटांमध्ये चित्रपटवेड्या तरुणी चित्रपटासाठी किंवा त्या अभिनेत्यासाठी, त्याला भेटण्यासाठी म्हणून काय-काय प्रयत्न करतात. पण ते कसे खुळेपणाचे आहे भुलवणारे आहे हे नंतर त्यांच्या लक्षात येते. दिग्दर्शकांनी चित्रपट, अभिनेते यांच्याप्रती त्या दोन चित्रपटातील तरुणींना वाटणारे वेडे प्रेम, आकर्षण हे अत्यंत उत्तम रीतीने दाखवले आहे. पण तरीही चित्रपटवेड हे अजून काही कमी झालेले नाही आज मोबाईल, ओटीटी, विविध वाहिन्या यांच्या गदारोळात सुद्धा चित्रपट हे तग धरून आहे आणि आजही अनेक चित्रपट हे गर्दी खेचतात. नुकताच पुष्पा 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला. पुष्पाचा पहिला भाग व त्यातील गाणे खूप गाजल्याने तसेच पुष्पा 2 या सिनेमातील एक गाणे सुद्धा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप गाजल्याने लोक पुष्पा 2 या सिनेमाची वाटच पाहत होते. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा 2 या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चार डिसेंबर रोजी मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यात रेवती नामक एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा श्रीतेज नावाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला. तो इतका गंभीर जखमी झाला की, आता त्याचा ब्रेनडेड झालेला आहे. या स्क्रीनिंगच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने तिथे एकच झुंबड उडाली व चेंगराचेंगरी झाली. त्यामध्येच श्रीतेज जखमी झाला. त्याला आता आवश्यक ती मदत सरकार देणार आहे. स्क्रीनिंगच्या वेळी चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन तिथे उपस्थित झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी म्हणून चाहत्यांनी गर्दी केली होती.  या घटनेत  दोषी म्हणून अल्लू अर्जुन तुरुंगवासात सुद्धा जाऊन आला.

चित्रपटांचे एवढे वेड भारतीयांना का आहे? हा ही एक प्रश्नच आहे. अमिताभ बच्चनच्या काळात प्रस्थापित सरकार, गुंड यांच्याविरोधात आवाज उठवणारा तरुण पाहिला की, लोक त्यात स्वतःलाच बघत असत. ते जे प्रत्यक्षात करू शकत नव्हते ते हा पडद्यावरील तरुण करतो आहे यातच त्यांना समाधान वाटत होते. याच देमार पठडीतल्या, अँग्री यंग मॅन हिरोटाईप सिनेमांना लोक गर्दी करत असत. आज सिनेमा निर्मिती व तंत्रज्ञानात अनेक बदल झाले आहेत, मनोरंजनाची अनेक नवीन साधने आलेली आहेत परंतु भारतीयांचे चित्रपटवेड तसेच पूर्वीसारखे कायम आहे पण चित्रपट पाहण्यास जातांना, एखाद्या स्टार मागे धावतांना ते आपल्या जीवावर तर बेतणार नाही याची काळजी जनतेने घेणे सुद्धा आवश्यक आहे. पडद्यावर खूप चांगली भूमिका वठवणारा स्टार हा प्रत्यक्ष जीवनात चांगला असेलच याची खात्री देता येत नाही. पुष्पा व पुष्पा 2 हे दोन्ही सिनेमे मी काही बघितलेले नाही परंतु पुष्पा या सिनेमात नायक हा डॉन असतो, गुंडा का स्मगलर असतो पण तरीही तो कसा चांगला आहे हे दिग्दर्शकाने व्यवस्थित रंगवले आहे. याचा वाईट परिणाम समाजावर व लहान मुलांवर होत असतो हे सुद्धा जनतेने विशेषतः चित्रपटप्रेमी जनतेने समजून घेतले पाहिजे. जुन्या काळात व आजही अनेक चित्रपट समाजाला काहीतरी शिकवण देणारे, बोधप्रद असे होते. आजही तसे काही क्वचित निर्माण होतात परंतु दुर्दैवाने असे सिनेमे जनतेला सुद्धा विशेष आवडत नाही. चित्र-विचित्र हावभाव, अश्लील हालचाली,  शेकडो अतिरिक्त कलाकार घेऊन चित्रित केली जाणारी तशीच अश्लील गाणी हे मात्र जनतेला खूप आवडते. बलम सामी हे गाणे तर खूप गाजले होते. विविध अंगविक्षेप असणारी उत्तेजक अशी गाणी आजकालच्या gen z पिढीतील तरुणाईला तर खूपच आवडतात. प्रत्येकाला आपली आपली आवड असते, त्याने ती जपली सुद्धा पाहिजे. परंतु आपल्या आवडीमुळे आपल्यासह इतरांवर सुद्धा संकट येत असेल तर अशी आवड जपतांना आपण विचार करणे आवश्यक आहे. चित्रपटांची आवड नसावी असे म्हणणे नाही परंतु चित्रपटांची अति आवड अति वेड, खुळा नाद नसावा की ज्यामुळे आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतेल म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यातच खरी हुशारी आहे. शिवाय पहिल्या काही दिवसातच करोडोंचा गल्ला गोळा करणारे हे स्टार आणि निर्माते यामुळे समाजाला काय फायदा होतो याचाही विचार होणे गरजेचे आहे. चित्रपट बघूच नाही असा या लेखाचा उद्देश नाही. चांगले चित्रपट जरूर पाहावे परंतु त्याचे अतिवेड, अति क्रेझ नसावे की ज्यामुळे आपल्या जीवावर संकट येईल.

१२/१२/२०२४

Article about old pension in Maharashtra

देवाभाऊ तुमी आले, जुनी पेन्शन बी आना.

देवाभाऊ राजेहो तुमच्या आमदार लोकाईच असते का असं शाळा कर्मचा-याईसारखं ? की कोनाले कमी आणि कोनाले जास्त मानधन ? मले तुमी सांगा यखादा आमदार 2005 च्या नंतर आमदार झाला तर मग त्याले काय कमी फॅसिलिट्या देते काय सरकार ?

23 नोव्हेंबर रोजी महायुती लयी मोठ्या मताईन निवडून आली. देवाभाऊ तुमी मराठी अन् हिंदी दोनी भाषेत पुना येईन असं म्हनलं होतं अन् तस तुमी आले बी. महायुतीन अन् पवार सायबाच्या महाआघाडी न बयनींसाठी योजनाईच आश्वासन देलतं या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर लई तान पडला हाय असं बी हे ते तज्ञ कां कोन असतात ते लोक म्हनू रायले राजा. पण देवाभाऊ तुमी म्हनता की सरकारवर काईबी तान येनार नाई, सारं बरोबर होईन. बयनी बी लयी खुश हायेत.  वाढीव पैसे भेटतीन न बापा आता. पन जे सरकारी कर्मचारी हायेत त्याईचं काय भाऊ ?    सा-याईले पैसे भेटू राहिले कुन्या ना कुन्या योजनेतून. पन सरकारी कर्मचाऱ्याईला राजकारनी लोक काऊन दाटू रायले कोन जाने ? 17 नोव्हेंबर 2005 ले एक जी आर काढला अन् जुनी पेन्शन योजना लागे बंदच केली अन् सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेन्शनवर तवाच्या सरकारंन गदा आनली राजेहो. साऱ्या लोकायले तुमी लोक हे योजनाईतून फुकटछाप पैसे वाटता अन् लागे सरकारी कर्मचाऱ्याईचे पेन्शनच तुमाले म्हंजे तवाच्या सरकारले दिसलं बंद क-याले. काय तर म्हने त्याईच्यासाठी म्हंजे कर्मचाऱ्याईसाठी डीसीपीएस आणि यन. पी. एस. या योजना आनल्या. डीसीपीएसचा बदल बी लगे यनपीएस मदे केला. बाबू लोकाईले शाळेचे मास्तर इचारू लागले मी कायच्यात बसतो डीसीपीएस की यनपीएस मदे ? कोनी मास्तर म्हनते, "मी अजूक 20% वरच हाय राजेहो, मी रिटायर होईलोक 20% वरच राहील का हो बावा ? "काही पेन्शन भेटन की नायी तुम्हाले जवाईबापू" असं राजा सासरा बी विचारते मले, निरा परेशान झालो ना मी.  कोनाले ईचाराव त त्यालेबी काई  माहीत नसते. कोनी म्हनते ते शेयर बाजार का काय असते ना त्यात आपले पैसे टाकतात मंग यनपीएस न लय फायदा होते. भाऊले म्हनल नीरा कन्फुज करून टाकलं न हो ! एकपरी सा-या पार्ट्या संविधान-संविधान म्हनतात , सारा भारत यक हाय म्हनतात अन् दुसरीकडे एका राज्यात जुनी पेन्शन त एका राज्यात नवीन पेन्शन. कायची समानता हो ? बायको म्हनते तुम्हाले पेन्शन नायी पन मले मात्र माझ्या भावान चालू केले मले पैसे.  आजकाल तर मास्तर लोकायले सारेच बोलून घेतात भाऊ. जो उठला तो मास्तरलेच बोलते. ते तुमचे कोन हाय ते आमदार प्रशांत बंब त्याईच्या आडनांवापरमानं बम बोलून घेतात मास्तर लोकायले. त्याईले हे दिसत नायी की त्याईले बी एका मास्तरनच शिकवेल हाय. अनुदानित शाळा मास्तरचा लयीच खार करते राजा हे बंब सायेब. देवाभाऊ तुमीच मले सांगा आता आमदार लोकाईले सारे लोक सारे कर्मचारी सारखेच हाय का नायी? तशी शपत बी घेतात ना ते ! मंग  मास्तर लोकाईशी या बंब बुवाची कायच दुश्मनी हाय कोन जाने? या बंब भाऊले दुसर कायी दिसत नाही सदानकदा मास्तर लोकायईरुद्ध बोलत रायतात.  माय म्हनन हे हाय की तुम्ही सा-याईले वाटू रायले त मंग कर्मचाऱ्याला काऊन दाटू रायले ? मले हे सांगा पयले कर्मचाऱ्याईन तुमचं काय घोडं मारल हो?कर्मचारी हा बिचारा गरीब असते अन् मास्तरची जात तर बेजाच गरीब. सरकारन काई नवं टुमन आनल की मास्तर भेते , त्याच्याच मागं लावतात न हो नवे टुमने. मास्तर हा घाबरते हे तुमाले चांगलं माहित आहे मंग देता त्याच्याच मागं लाऊन. राजेहो तुमच्यासारखा मानूस करू शकते हे पेन्शनच काम. तुमी यकदा म्हनलं बी होतं की, "जुनी पेन्शन आम्हीच देऊ शकतो" पायजा मागचा व्हिडिओ यखादा. बरं  जुनी पेन्शन बंद केली तर केली त्यात अजून एक पॉईंट काढला ज्या शाळा 2005 च्या अगोदर अंशत: अनुदानावर हाय अन् नंतर शंभर टक्केवर आल्या त्या शाळा कर्मचा-याईले बी पेन्शन नायी, अन्  पहिल्यापासून ज्या शंभर टक्के वर आहे त्याईले पेन्शन.  हे असं काढणारा लयीच  दिमागबाज  दिसते मले. कुठून त्यांन हे आयडिया काढली कोन जाने. मले त वाटते त्याले साऱ्या कर्मचाऱ्याईन साष्टांग दंडवत घाल्याच एक आंदोलनच करावं. देवाभाऊ राजेहो तुमच्या आमदार लोकाईच असते का असं की कोनाले कमी आणि कोनाले जास्त मानधन ? मले तुमी सांगा एखादा आमदार 2005 च्या नंतर आमदार झाला तर मग त्याले काय कमी फॅसिलिट्या देते काय सरकार ? काय राजे हो संविधान म्हनते समानता हाय मंग कर्मचा-याईले अलग न्याय अन् आमदाराईले अलग? काही समजत नाही राजेहो. देवाभाऊ, तुमच्यावर लोकाईचा लयी ईश्वास हाय. विरोधी पक्षबी तुमाले मानते, मोदी शहा सायबाचे बी तुमी लाडके हाय, जमवा न मंग आमचं काम ! कायी बी म्हना  तुमचा सोशिक स्वभाव लोकाईले समजला हाय. तुमाले लोकाईनं कायी-कायी श्या दिल्या, कायी बी बोलले पन तरी तुमी शांत रायले. तुमचा स्वभाव दुस-याला समजून घेनारा,  दुस-याईच दु:ख समजून घेनारा हाय. आमचं बी दु:ख समजून घ्या. भाऊ बस जस तुमी पुना आले तस आमची जुनी पेन्शन बी पुना द्या आता. तुमाले साऱ्या कर्मचाऱ्याईच्या वतीन हात जोडून विनंती. 

०५/१२/२०२४

Article about devendra fadanvis

"...है वोही सच्चा सोना"

राजकारणात आल्यावर गब्बर झालेले अनेक नेते आपण बघितले आहेत. परंतु निवडणूक आयोगासमोर फडणवीस यांनी त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती बघून कोणालाही आश्चर्यच वाटेल.

आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तिस-यांदा शपथ घेणार आहे. हा लेख वाचकांपर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित शपथविधी  झालेला सुद्धा असेल. पण पुन्हा येईन असे त्यांनी म्हटले होते ते प्रत्यक्षात आले आहे म्हणून हा लेखन प्रपंच.

     पाच वर्षांपुर्वी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे  आपल्या वडीलांची विचारसरणी आणि पक्षाची  भूमिका यांना गाठोड्यात गुंडाळून माळोच्यावर ठेवून आणि एक शिवसैनिक म्हणून स्वत: शरद पवार व कॉंग्रेसच्या कुबड्या घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत "मी पुन्हा येईन" ही कविता म्हटली होती. त्यावरून बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी त्या शब्दांवरून सुसंस्कृत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली सुद्धा उडवली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशा मोठ-मोठ्या पदांवर राहिलेल्या देवेंद्र  फडणवीस यांच्यावर गतकाळात अनेकांनी शिवराळ भाषेत, महाराष्ट्राला न शोभणा-या अशा भाषेत टीका केली, शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या पत्नीवर सुद्धा गलिच्छ भाषेत टीका केली. शरीरावरून सुद्धा टीका केली परंतू देवेंद्र यांनी त्याला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी प्रत्युत्तर न देऊन त्यांच्यावर टीका करणा-यांना, त्या शिव्या देणा-या तमाम लोकांना नेटक-यांना त्यांची लायकी दाखवून दिली. इतिहास हा शिव्या देणा-यांना नव्हे तर कर्तुत्वाला, कर्तुत्ववान लोकांनाच लक्षात ठेवतो हे देवेंद फडणवीस यांनी एका भाषणात म्हटल्यावर त्यांची राजकीय उंची व विचारसरणी महाराष्ट्राने पाहिली. आपण सर्व भारतवासी जरी विविध जाती-धर्मांचे असू तरी सर्वप्रथम आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे मागील काही काळामध्ये सत्ता प्राप्तीसाठी महाराष्ट्रातील जनतेमध्ये जातीभेदाचे विष काही राजकारणी लोकांनी पेरण्याचे काम केले, त्याला खतपाणी सुद्धा घातले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे गढूळ वातावरण निर्माण झाले. जनता सुद्धा एकमेकांना जातीच्या चष्म्यातून पाहू लागली. समाज माध्यमांवर तर गलिच्छ स्तरावर जातीवाचक उल्लेख करून फडणवीससारख्या नेत्यांची हेटाळणी करताना लोक दिसून येतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वात जास्त गलिच्छ भाषा जर कुणाबद्दल वापरली गेली असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे होत. पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामाला प्राधान्य दिले पक्षाला वाढवण्यास प्राधान्य दिले आणि त्याची परतफेड म्हणून जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिले. या निवडून देण्यावर सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातून विरोधी पक्ष शंका-कुशंका घेत आहेत.  त्यांच्या हे लक्षात येत नाही किंवा ते मुद्दामच जाणून घेत नाही की, या निवडणुकीत त्यांची आमदार संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. 2014 मध्ये फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात अनेक विकास कामे सुरु झाली व पार पडली यात काहीच दुमत नाही परंतू नंतर युतीचा काडीमोड झाला आणि तद्नंतर उद्धव ठाकरे यांची बदलेली भूमिका, टोमणे मारणे, फडणवीस यांच्या काळात सुरु झालेल्या योजनांना खीळ घालण्याचे एकमेव काम केले. 2019 मध्ये पण जनतेने फडणवीस यांनाच कौल दिला होता परंतू हा कौल हिसकावून घेतल्या गेला हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेने पाहिले आहे. काल भाजपा कोअर कमिटी व वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नांव आता गटनेता आणि तदनुषंगाने मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले याचा आनंद तमाम महाराष्ट्रवासियांना झाला आहे. आता "तू पुन्हा येशील तर मी पण पुन्हा बसेल" असे म्हणणारे, एकेरी भाषेत बोलणारे फडतूस कलंक अशी विशेषणे फडणवीस यांना लावणारे काही विघ्नसंतोषी लोक तर आहेतच म्हणा. ती तर आता आणखी चवताळतील. ते निव्वळ शिवीगाळ व जात धर्मावरून हेटाळणी करणारी विधाने करतील, त्यांना तेवढेच काय ते येते. पण अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.  पण ते लोक हे सुद्धा मानायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही. वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर राजकारणात आलेले असे लोक कुठे, तर वयाच्या 22 व्या वर्षापासून स्वतःच्या जोरावर राजकारणात आलेले  नगरसेवक, आमदार व मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले कर्तुत्ववान देवेंद्र फडणवीस कुठे. देवेंद्र फडणवीस हे पद, प्रतिष्ठेकरीता राजकारणात आलेले व्यक्ती नाही. इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी कुठल्याही संस्था वगैरे उघडलेल्या नाही. राजकारणात आल्यावर गब्बर झालेले अनेक नेते आपण बघितले आहेत. परंतु निवडणूक आयोगासमोर फडणवीस यांनी त्यांच्या संपत्तीची दिलेली माहिती बघून कोणालाही आश्चर्यच वाटेल. त्यांच्या नावावर दोन घरे, शेती, काही लाख रुपयांचे सोने व 62 लाख रुपये कर्ज आहे. अशा स्वच्छ प्रतिमा असलेल्या, सुसंस्कृत असलेल्या व्यक्तीला केवळ दोष देण्याचे, शिव्या देण्याचे कार्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे आणि दुर्दैवाने नेटकरी जनतेने सुद्धा केलेले आहे. त्यांनी फडणवीस यांची एवढी हेटाळणी केली की जनतेला सुद्धा ती आवडली नाही आणि जनतेने महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिले. "आगमे जलकेभी जो निखरे है वही सच्चा सोना" या एका गीतातील ओळीप्रमाणे शिव्यांची लाखोली, विविध दोषारोपणे, त्यांच्या पत्नीबाबत केलेली गलिच्छ विधाने, त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून केलेली विधाने, मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने त्यांना फडतूस, कलंक, नालायक असे संबोधणे या अशा हेटाळणीरुपी आगीतून फडणवीस हे तावून सुलाखून सोन्याप्रमाणे पूर्वीपेक्षा अधिक उजळून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे "ते पुन्हा आले" आहे.

२८/११/२०२४

Article about maharashtra election victory

निवडणूकपुर्व स्थिती आणि महायुतीच्या यशाची कारणे

महायुतीने मोठा विजय प्राप्त केला, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. महायुतीच्या या यशाची व भाजपाच्या जास्त जागा येण्याची कारण मिमांसा सुद्धा इथे करणे आवश्यक आहे.

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालावरती अनेकांची भाष्ये, विश्लेषणे लगेचच येऊन गेली आहेत. आता तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर ऊहापोह सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघेही दिल्लीला जात आहे. तूर्तास अशी स्थिती असली तरी पुनश्च एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल भाष्य करावेसे वाटते. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जेव्हा जाहीर झाली त्यावेळी कधीकाळी काँग्रेस सोबत कट्टर वैर असलेली शिवसेना तसेच शरद पवारांचा राष्ट्रवादी गट व काँग्रेस हे तिघेही मांडीला मांडी लावून बसले व नाना प्रकारे त्यांचाच पक्ष किंवा त्यांचीच आघाडी महाराष्ट्राला कशी तारू शकते, कशी पुढे नेऊ शकते असे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली. त्या अनुषंगाने विविध प्रकारचे विमर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागली. याच काळात विविध आंदोलने सुद्धा सुरू होती व या आंदोलनाचे लक्ष्य देवेंद्र फडणवीस हे होते. त्यांच्याबद्दल विरोधकांनी अनेक आचरट विधाने केली, तसेच खालच्या स्तरावरची भाषा वापरली. सत्ताधारी पक्षात सुद्धा अजित पवार यांचा जेव्हा शिरकाव झाला तेव्हा ते जनतेला रुचले नव्हते. त्यामुळे निवडणुकीत महायुती जिंकते की महाआघाडी जिंकते अशी मतदारांमध्ये चर्चा होती. भाजपाने सत्तेसाठी अजित पवार यांना सोबत घेतले हे अनेकांना आजही आवडलेले नाही. निवडणुकीनंतर निवडणुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या सर्वच अंदाजकांनी महायुती व महाआघाडी यांच्या जागा जवळपास सारख्याच येतील असे म्हंटले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र  महायुती ही जास्त जागा घेऊन विजयी झाली. शरद पवार यांनी पुन्हा एकदा पावसात भिजून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु शरद पवार यांचे राजकारण आता महाराष्ट्रातील जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे. जनतेला आता टिकाऊ सरकारचे महत्त्व कळलेले आहे. पाच वर्षे टिकणारे सरकार असेल तर ते फायद्याचे असते, त्याने विकासाची कामे व्यवस्थित होत असतात, पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता नसते व त्यामुळे मोठा खर्चही वाचतो हे सर्व आता सुज्ञ मतदारांच्या लक्षात आले आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुद्धा चांगलाच वाढलेला होता. हा मतदानाचा टक्का वाढला त्याचा अर्थ सुशिक्षित लोकांनी मतदान केले, नवतरुणांनी मतदान केले असा काढला जातो. त्यातच लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय झाल्यामुळे महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे या निवडणुकीत दिसून आले. निवडणुकीच्या पूर्वी अनेकांनी महाराष्ट्रात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवला होता. भाजपच्या जागा घटतील असेही अनेक लोक म्हणत होते परंतु प्रत्यक्षात मात्र महायुतीने मोठा विजय प्राप्त केला, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. महायुतीच्या या यशाची व भाजपाच्या जास्त जागा येण्याची कारण मिमांसा सुद्धा इथे करणे आवश्यक आहे. भाजपाने विकासाची कामे प्रामाणिकपणे राबवण्याचे धोरण राबवले आहे. तसेच विकासाची कामे करताना सबका साथ सबका विकास हे भाजपाचे धोरण असल्यामुळे सर्वांनाच भाजप हा पक्ष व्यवस्थित काम करू शकतो, सर्व घटकांसाठी काम करू शकतो अशी खात्री वाटली. तसेच पुर्वीचे जे लायसन्स राज होते ते बंद झाले. उद्योग, लघुउद्योग, घरगुती उद्योग हे सुरू होण्यात जे अडथळे होते ते आता राहिलेले नाही, उद्योग लवकर कसे सुरू होतील याची काळजी भाजपाने घेऊन तसे धोरण अवलंबले आहे.  भाजपा शेतकरी विरोधी आहे असा सुद्धा एक विमर्श प्रस्थापित झाला होता परंतु गतकाळात महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कामे बघता शेतकरी वर्ग सुद्धा यावेळेस महायुतीच्या पाठीशी उभा राहिला आहे असे दिसते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात झोकून देऊन काम केले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगवर भाजपाचा जोर आहे, लोकांना रोजगार, चांगले रस्ते, शिवारात पाणी हवे आहे ते मिळत आहे. यावेळी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली. तसेच महायुतीच्या योजनांचा लाभ हा सर्वच नागरिकांना झाला त्याचप्रमाणे तो मुस्लिम नागरिकांना सुद्धा झाला आहे. मुस्लिम कुटुंबे मोठी असतात त्या मोठ्या कुटुंबांमध्ये लाडकी बहिण योजनेची येणारी रक्कम ही फार मोठी आहे त्यामुळे मुस्लिम महिलांचे मतदान सुद्धा महायुतीला झाल्याचे दिसते. तसेच घरकुल योजनेचा लाभ सुद्धा अनेक मुस्लिमांना झाला आहे. या सर्व कारणांमुळे नागरिकांनी महायुतीला भरभरून मतदान केले असे दिसून येते. भाजपाचे मायक्रो प्लॅनिंग , संघ परिवाराने 100 टक्के मतदान होण्यासाठी केलेले कार्य हे सुद्धा महायुतीचे उमेदवार निवडून येण्याचे एक महत्वाचे कारण आहे. ईव्हीएम घोटाळा वगैरे हे काहीही नाही. ईव्हीएम हॅक होत नाही. ती नेटशी कनेक्ट नसते. लोकसभेत जेव्हा विरोधकांना जास्त जागा मिळाल्या, झारखंडमध्ये सुद्धा जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगली आणि हारले की मात्र ईव्हीएम घोटाळा असे कसे काय? यावेळी निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरे यांची सततची तीच-तीच  वाक्ये, संजय राऊत यांचे वारंवार मीडियासमोर येऊन त्वेशात बोलणे, फडणवीस शिंदे यांची हेटाळणी  करणे त्यांना सतत गद्दार,  मिंधे अशी नाना प्रकारची संबोधने हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला आवडले नाही. आताचा मतदार हा पुर्वीच्या  मतदारासारखा नाही आताच्या मतदारासमोर मोबाईल आहे, विविध वाहिन्या आहे त्यामुळे त्याला सर्व राजकारण चांगल्या पद्धतीने कळते. काहीही विधाने करून त्याला उल्लू बनवता येत नाही. आजच्या मतदाराला "करेक्ट पिक्चर" काय आहे ते स्पष्टपणे दिसते हे सर्वच राजकारणी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आजचा मतदार हा प्रगल्भ आणि सुज्ञ झाला आहे आणि त्यामुळेच त्याने विकास कोण करू शकते, टिकाऊ सरकार कोण देऊ शकते, हिताचे राजकारण महाराष्ट्राला शोभेल असे सुसंस्कृत राजकारण कोण करू शकते हे जाणून मतदान केले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरभरून यश प्राप्त झाले. महायुतीच्या यशाची हीच कारणे असतील तर इतर पक्षांना सुद्धा राजकारण हे विकासाच्या मुद्द्याभोवती करावे लागेल असेच येथे म्हणावेसे वाटते. 

२१/११/२०२४

Article after maharashtra election 2024

 कौन बनेगा आमदार ?

जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून अनेक अपेक्षा असतात त्यांची पूर्तता विजयी उमेदवाराने करायची असते. खामगाव शहरात असलेली पाणीटंचाई आणि सतत विस्कळीत होणारा पाणीपुरवठा हा यक्षप्रश्न विजयी उमेदवाराने त्वरीत निकाली काढणे हीच खामगाव शहरवासियांची अपेक्षा विजयी उमेदवाराकडून राहील.

काल महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये मोठे वाक्-युद्ध रंगले होते. तसेच घोषणांचा मोठा पाऊस पडला. अनेक ठिकाणी उमेदवार म्हणून नातेवाईकच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अनेक मतदान केंद्रांवर शिवीगाळ, हल्ले होणे, जखमी होणे असे प्रकार घडले. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर घड्याळाचे चित्र असलेल्या चिठ्ठ्या वाटपाचा आरोप झाला.  अनिल देशमुख यांच्यावर हल्ला होणे, अमरावतीला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर जमावाचे धाऊन जाणे असे प्रकार घडले. करोडो रुपयांची रक्कम सुद्धा या निवडणुकीदरम्यान जप्त झाली. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे सुद्धा पैसे वाटप करताना आढळून आले. अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. महायुती व महाआघाडी या दोघांनीही मतदारांना अनेक काही गोष्टी देण्याचे आश्वासन दिलेले आहे. महायुतीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना विजयाची खात्री आहे, शिवाय त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम सुद्धा  वाढवण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे त्यांना त्याचा फायदा या निवडणुकीत होणार असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. परंतु जनतेच्या पैशाची अशी खैरात वाटणे हे राज्याच्या हिताचे नाही तसेच अशा योजनांमुळे जनतेला श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व वाटत नाही.  या निवडणुकीत मोदी व योगी यांनी "बटेंगे तो कटेंगे" आणि "एक है तो सेफ है" हे जे दोन नारे दिले त्या ना-यांमुळे त्याचा फायदा महायुतीला होणारच अशी त्यांना खात्री वाटत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर यंदाच्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा चांगले मतदान केल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे परंतु तरीही पुणे, ठाणे, नागपूरसारख्या इतरही मोठ्या शहरातील मतदारांचा उत्साह मात्र कमीच आढळून आला. काही शहरांमध्ये अनेक निवासी संस्थांमध्ये (रहिवासी फ्लॅट / सोसायटी) मतदानाची केंद्रे यंदा होती तरीही शहरांमधील मतदानाची कमी झालेली टक्केवारी ही आश्चर्य वाटेल अशीच आहे. यंदा अनेक छोट्या शहरातील मोठ्या शहरात शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी गेलेले नव मतदार व तरुण मतदारांना आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. ती कितपत यशस्वी झाली ठाऊक नाही परंतु मतदानवाढीसाठी तो एक चांगला व  स्तुत्य प्रयत्न आहे. आपल्या खामगाव मतदारसंघात सुद्धा यावेळेस मोठी चुरस दिसून आली. खामगाव मतदारसंघात एकूण 18 उमेदवार उभे होते. मुख्य लढत भाजपचे आकाश फुंडकर तर काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांच्यातच आहे. इतर ठिकाणाप्रमाणे खामगावात सुद्धा उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्याचे चित्र दिसून आले. खामगाव मतदारसंघात मोठ्या सभा एखाद दोनच झाल्या. प्रचारात मोठी चिखलफेक एकमेकांवर करण्यात आली. काँग्रेस उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांच्याबाबत सर्वत्र प्रसारित झालेले पत्र आणि ते पत्र खोटे असल्याची त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली तक्रार हा मुद्दा चांगलाच गाजला. तसेच मतदान केंद्रावरती बाचाबाची करणे, शिवीगाळ करणे असे प्रकारही खामगांव येथे झाले. दिलीपकुमार सानंदा यांच्या विषयीचे समाज माध्यमांवर प्रसारित झालेले ते पत्र धादांत खोटे असल्याचे  दिलीपकुमार सानंदा यांनी व्हिडिओ प्रसारित करून सुद्धा स्पष्टीकरण दिले. खामगावात भाजप व काँग्रेस या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावला असल्याचे चित्र दिसले. भारतातील निवडणुका म्हटल्या की जात-पात आणि धर्म हे येतेच त्या अनुषंगाने खामगावातील दोन्ही उमेदवारांच्या मागे विविध जाती धर्म व समाजातील त्यांच्या परंपरागत मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसले. खामगाव मतदारसंघात अनेकांशी संपर्क केल्यावर असे दिसून आले की  भाजप व काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये कोणीही एक जर निवडून आला तर तो फार कमी फरकाने निवडून येईल असेच मत सर्वांचे दिसून आले. ग्रामीण भागात जे मतदान झाले त्या मतदानाची टक्केवारी सुद्धा चांगली झालेली आहे आकाश फुंडकर यांना त्यांनी खामगाव शहरात केलेल्या विकास कामांमुळे तसेच गतकाळात ग्रामीण भागात झालेल्या जलयुक्त शिवारसारख्या कामांमुळे आत्मविश्वास आहे तर नेहमीच चर्चेत असलेले दिलीपकुमार सानंदा हे दहा वर्षानंतर उभे असल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या कार्यामुळे त्यांनाही विजयाची आशा आहे. जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून अनेक अपेक्षा असतात त्यांची पूर्तता विजयी उमेदवाराने करायची असते. खामगाव शहरात असलेली पाणीटंचाई आणि सतत विस्कळीत होणारा पाणीपुरवठा हा खामगावकरांचा एक यक्षप्रश्न आहे तो विजयी उमेदवाराने गांभीर्याने व त्वरित निकाली काढणे हीच सर्व खामगाव शहरवासियांची अपेक्षा विजयी उमेदवाराकडून राहील. तसेच विजयी उमेदवाराने खामगावातील इतर अनेक समस्या निकाली काढाव्या, खामगाव मतदारसंघात रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न करावे ही सुद्धा आशा तमाम मतदारांना आहे. आता 23 तारखेपर्यंत खामगावकर जनतेसोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील जनतेला त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात  कौन बनेगा आमदार ? हाच प्रश्न पडलेला राहील.

१४/११/२०२४

Article about voting awareness

चला मतदान करूया !

भारत स्वतंत्र होऊन 77 वर्षे झाली तरी भारतातील नागरिकांना सतत मतदान करा, मतदान करा अशी जागृती का करावी लागते हा एक प्रश्नच आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे आणि या निवडणुकांमध्ये विजय व्हावा म्हणून सर्व उमेदवार हे प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन लोकांनी अधिकाधिक मतदान करावे म्हणून जनजागृतीचे कार्यक्रम जोरात राबवत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी असा शासनाचा हेतू असतो आणि तो बरोबरही आहे. लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी मतदान हे अवश्य करायला पाहिजे. मतदान करणे हा जसा आपला हक्क आहे तसेच  तसेच ते आपले कर्तव्य सुद्धा आहे. परंतु बऱ्याच वेळा असे दिसते की या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असल्यामुळे लोक मतदानाला जाण्याचा कंटाळा करतात. काही लोक तर सुट्टी असल्यामुळे पर्यटनाला किंवा इतर काही कार्यक्रमांना जातात. अनेक वेळा तर चांगले सुशिक्षित लोक सुद्धा  मतदानाला जाण्याचा आळस करतात. मतदान करण्यात उच्चभ्रू लोकांचे प्रमाण सुद्धा नगण्य असते. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते मतदानाची टक्केवारी घसरली तर योग्य उमेदवार निवडून न येण्याचीच अधिक शक्यता असते. भारत स्वतंत्र होऊन 77 वर्षे झाली तरी भारतातील नागरिकांना सतत मतदान करा, मतदान करा अशी जागृती का करावी लागते हा सुद्धा एक प्रश्नच आहे. भारतात मतदानाची टक्केवारी कमी असण्याचे कारण हे सुद्धा आहे की अनेक वेळा निवडून दिलेले लोक हे जनतेचा भ्रमनिरास करतात पक्ष बदलणे, भ्रष्टाचार करणे, या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारणे, उपटसुंभ वक्तव्य करत राहणे, समाजात फूट पाडणे अशी कृत्ये या नेत्यांकडून होताना जनता नेहमीच पाहत असते. अनेक लोक हे त्यांच्या दैनंदिन समस्यांमुळे ग्रस्त असतात त्यातच जेव्हा  त्यांच्या जीवनावश्यक गोष्टी सहजरीत्या उपलब्ध होत नसतील, अंतर्गत भागातील रस्ते खराब असतील, सांडपाणी आणि स्वच्छता इत्यादीची व्यवस्था ठीक नसेल तर हे लोक आणखीनच त्रस्त होतात. शिवाय त्यांच्या या मागण्या पूर्ण  करण्यासाठी जेव्हा ते संबंधित विभाग व नेत्यांशी भेट घेतात, आपले गा-हाणे मांडतात तेव्हा सुद्धा त्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन बोळवण केली जाते व त्यांची समस्या कायमच राहते. असे नेते पाहिल्यावर जनतेला हेच वाटते की यापेक्षा मतदान न केलेले बरे ! परंतु असे लोक राजकारणापासून दूर ठेवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा मतदान करण्याचीच आवश्यकता असते जेणे करून मतदानाने निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी त्यातल्या त्यात चांगला उमेदवार जनता निवडू शकते. मतदानाबाबतची उदासीनता ही आपल्या देशाच्या हिताला किंवा देशाच्या आगामी भविष्याला हानिकारक अशी आहे आणि म्हणूनच शासन जनतेला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. परंतु जनतेला हे प्रोत्साहन देताना शासन प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना हाताशी धरत असते. हे कुठेतरी वेगळेच वाटते म्हणजे लहान मुले हे मोठ्यांना सांगत असतात की मतदान करा. खरं पाहता लहानांनी मोठ्यांना शिकवणे हे मोठ्यांसाठी अपमानास्पदच असे आहे,  मोठ्यांना विचार करायला लावणारे आहे. परंतु तरीही शासनाने मतदान प्रोत्साहन कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन तरुणांना सुद्धा समाविष्ट करून घ्यावे असे इथे सांगावसे वाटते. महाविद्यालयीन तरुण हे नवमतदार असतात त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले तर ते अधिक परिणामकारक होईल याचा सद्धा शासनाने विचार करायला पाहिजे. भारतातील लोकशाही ही अधिकाधिक प्रगल्भ होण्यासाठी ज्याप्रमाणे चांगल्या सुशिक्षित, सुज्ञ अशा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे जागरुक  मतदारांची सुद्धा नितांत आवश्यकता आहे. मतदार जर जागरुक असेल तर तेच या देशाचे भविष्य बदलवू शकतात, त्यासाठीच शासन मतदार जनजागृतीचे कार्यक्रम राबवत असते. याप्रसंगी हेच नमूद करावेसे वाटते की जरी आपण विविध समस्यांपासून ग्रस्त असाल, आपल्या मागण्या कुठेतरी पूर्ण झाल्या नसतील वा आपण  लोकप्रतिनिधी विषयी नाराज असाल तरीही आपण मतदान हे केलेच गेले पाहिजे. आपल्यासोबत आपला मित्र परीवार व परिचितांना सुद्धा मतदान करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. 2024 च्या मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर ही आता अगदी समीप आलेली आहे. तेव्हा इथे  चला मतदान करूया हेच म्हणावेसे वाटते.

०७/११/२०२४

Article about the victory of Marathi man in American election.

...थानेदार आया है

श्रीनिवास ठाणेदार

एक भारतीय, एक मराठी माणूस अमेरिकेत काय जातो आणि तेथील आपल्यापेक्षा शिस्तबध्द, नियमबद्ध निवडणूक प्रक्रिया पार पाडून स दोन वेळा खासदार बनतो हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती  दोघेही सत्ता प्राप्तीसाठी मोफत योजनांची आश्वासने व ज्या जुन्या योजना आहेत त्यातून मिळणाऱ्या निधीमध्ये सुद्धा वाढ करून देण्याच्या आश्वासनांची खैरात लुटत आहे. विविध पक्षातील विविध नेते हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत  आहे. येन केन प्रकारेण जोरात प्रयत्न सुरू आहे, असे वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. तर तिकडे अमेरिकेतील निवडणूक संपन्न झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. अमेरिकेत अनेक भारतीय लोक कित्येक वर्षापासून स्थायिक आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या नेत्या सुद्धा उभ्या होत्या परंतु त्यांना विजयी मात्र होत आले नाही. ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत तसेच ट्रम्प यांनी भारताचा आशिया खंडातील एक शक्ती असा उल्लेख यापूर्वी केला आहे. ट्रम्प यांचा आगामी कार्यकाळ भारतासाठी कसा असेल हे लक्षात येईलच. अमेरिका किंवा इतर देशातील निवडणुका आणि भारतातील निवडणुका यांच्यात खूप मोठा फरक आहे पण त्याच्या विश्लेषणात आपल्याला जायचे नाही. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका येत्या 20 नोव्हे रोजी होत आहे. या निवडणुकीत काका-पुतणे, भाऊ-भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत असले तरी तिकडे अमेरिकेच्या निवडणुकीत मात्र एक मराठी उमेदवार खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहे. त्यांचे  नाव आहे डॉ. श्रीनिवास ठाणेदार. डॉ. ठाणेदार यांचा जन्म बेळगाव मध्ये झाला असून ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहे. अल्प उत्पन्न कुटुंबात वाढलेल्या ठाणेदार यांचे वडील वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्त झाले. लहान वयातच ठाणेदार यांनी त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अनेक नोकऱ्या केल्या. रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर  त्यांनी मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना बँकेत नोकरी लागली परंतु विज्ञान शाखेनंतर बँकेत का नोकरी करायची म्हणून त्यांनी बी. ए. आर. सी. म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर या नामांकित संस्थेत नोकरी केली. 1979 मध्ये ते अमेरिकेत गेले, आणि 1988 मध्ये ते अमेरिकेचे नागरिक झाले. अमेरिकेच्या अक्रोन विद्यापीठात त्यांनी पीएचडी केली आणि नंतर पॉलिमर उद्योगात प्रवेश केला. त्यांनी अनेक बुडीस जाणाऱ्या उद्योग , कंपन्या विकत घेऊन त्या कंपन्यांना नफ्यात आणले. 2018 मध्ये ते राजकारणात उतरले आणि मिशिगन गव्हर्नेटरीय निवडणुकीत डेमोक्रॅट म्हणून उभे राहिले. नोव्हेंबर 20 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि जानेवारी 21 मध्ये त्यांनी खासदार पदाची शपथ घेतली. ठाणेदार यांनी 2021 ते 2023 पर्यंत मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य म्हणून काम केले. आता ते पुन्हा दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे.  त्यांनी काही पुस्तके सुद्धा दिली आहेत. "This is Shri's Wish" हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे. 69 वर्षे वय असलेले ठाणेदार यांचे कर्नाटक विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील अक्रोन विद्यापीठ येथे शिक्षण झाले आहे. अशी ही श्रीनिवास ठाणेदार यांची माहिती आहे.

   भारतातील निवडणुका म्हटल्या की जातीपातीचे-धर्माचे राजकारण, चुनावी जुमले, फोडाफोडीचे राजकारण, या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या,  या पक्षातून त्या पक्षात पक्षनिष्ठा दावणीस बांधून जातांना सुद्धा केली जाणारी प्रसिद्धी, मतदारांना, कार्यकर्त्यांना प्रलोभने, नागरिकांना लावलेली फुकटची सवय या सगळ्या गोष्टी येतात. अमेरिकेत व इतर देशात मात्र विकासात्मक आणि विकासाच्या भोवती राजकारण फिरते. देशहित आणि देशाचा विकास या मुद्द्यांवरती निवडणूका होतात. उमेदवारी मिळवताना तेथील अनेक कंपन्या या  उमेदवारांचा पूर्ण इतिहास शोधून काढतात आणि त्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडून मगच उमेदवारी निश्चित केली जाते. त्यामुळेच श्रीनिवास ठाणेदार यांचा विजय हा उल्लेखनीय व गौरवास्पद आहे. एक भारतीय मराठी माणूस अमेरिकेत काय जातो आणि तेथील आपल्यापेक्षा शिस्तबध्द, नियमबद्ध निवडणूक प्रक्रिया पार पाडून सलग दोन वेळा खासदार बनतो हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे आणि म्हणूनच ...थानेदार आया है असे हिंदीत म्हणावेसे वाटते.

०३/११/२०२४

Article about Dastur Ratanji Library, Khamgaon

खामगांवचे "रतन"

ज्या पारशी समाजाला भारताने आश्रय दिला आणि तो समाज सुद्धा इथेच रमला, या देशाला त्यांनी आपले मानले इथे अनेक वैद्यकीय संस्था, उद्योग, इमारती, इतर संस्था उभारल्या, गरजूंना देणग्या दिल्या.  त्याच समाजाच्या एकाने  खामगांवला सुद्धा एक अमूल्य ठेवा दिला आहे, तो कोणता ठेवा आहे या लेखात वाचा.

गत आठवड्यात देशाचे थोर उद्योगपती तसेच समाजसेवेत अग्रेसर अशा रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने समस्त भारतीयांना दुःख झाले. कोट्याधीश असूनही आपल्या साध्या राहणीने आणि दानशूरतेने त्यांनी समस्त भारतवासीयांना आकर्षित केले होते. त्यांच्या निधनाने भारताच्या औद्योगिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त वाचल्यावर टाटा समूह आणि तो उद्योग उभा करणारे जमशेदजी टाटा आणि ते ज्या समाजाचे होते तो पारशी समाज त्या पारशी समाजातील चालीरीती, प्रार्थना मंदिर, अंतिम संस्कार पद्धती, पारशी समाजाने देशाच्या विकासात घातलेली भर या सर्व गोष्टींचे स्मरण झाले. त्याच अनुषंगाने आठवण झाली ती कधीकाळी खामगावात वास्तव्यास असलेल्या एका ग्रंथप्रेमी पारशी सदगृहस्थाची. इंग्रजांनी खामगावला जिनिंग प्रेसिंग सुरू केल्यानंतर खामगावच्या कायापालटास प्रारंभ झाला. 1870 चा तो काळ होता. इंग्रजांनी खामगावला नऊ जिनिंग प्रेसिंग मंडळे स्थापन केली. हा जिनिंग प्रेसिंग उद्योग सुरू झाल्यानंतर अनेक उद्योगपती, अधिकारी लोक खामगावात वास्तव्यास आले. उद्योग, व्यवसाय  वाढवण्यासोबत तत्कालीन लोक हे ज्ञान लालासी सुद्धा होते. अशा लोकांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी त्यांना पुस्तकांचे खुप सहाय्य होत असे. त्यांच्यासाठी खामगांवात एक खाजगी ग्रंथालय त्या काळात उपलब्ध होते. हे ग्रंथालय होते दस्तूर रतनजी या पारशी सदगृहस्थाचे. परंतु या ग्रंथालयात फक्त उच्चभ्रू लोकांनाच प्रवेश होता. सर्वसाधारण नागरिकांना त्याचा काही उपयोग नव्हता. पुढे श्री दस्तूर रतनजी यांचे पुत्र माणेकशा दस्तूर हे खामगांव येथे उपविभागीय अधिकारी पदावर रुजू झाले. त्यांना त्यांच्या वडिलांचे चिरंतन, ज्ञानदायी असे स्मारक खामगावला असावे अशी इच्छा झाली. त्यांनी 1889 रोजी आपले खाजगी ग्रंथालय सार्वजनिक ग्रंथालयात परिवर्तित केले. हे वाचनालय उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात होते. त्याकाळी महसूल विभागाचा दरारा होता. तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर उभे राहण्यास सुद्धा लोक घाबरत असत त्यामुळे या वाचनालयात जाण्यास सर्वसामान्य लोक धजावत नसत. यावर तोडगा म्हणून काही उत्साही नागरिकांनी प्रताप वाचनालय खामगांव या नावाचे वाचनालय सुरू केले होते. ( हे वाचनालय सुरू करणारी कोण मंडळी होती ही माहिती तूर्तास तरी उपलब्ध नाही. ) 

1912 मध्ये पंचम जॉर्जच्या राज्यरोहणप्रसंगी खामगावच्या रेल्वे स्टेशन समोरील एक मोकळी जागा (आजच्या  डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानातील काही भाग) श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयाकरिता शासनाकडून मिळवून दिली व कायमस्वरूपी अशी इमारत सुद्धा दिली. या कार्यात नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. 1912 मध्ये हे ग्रंथालय स्वतःच्या जागेत आले. 1913 मध्ये प्रताप वाचनालय व श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय यांचे एकत्रीकरण झाले. प्रताप वाचनालयाचा मोफत वाचन विभाग सुद्धा श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयात कायम ठेवण्यात आला. तो  अजूनही कार्यरत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात वाचनालयाची घटना, निधी, इमारत बांधकाम, विविध गणमान्य लोकांच्या भेटी अशी वाटचाल करत श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय हे बुलढाणा जिल्ह्यातील एक अग्रगण्य असे ग्रंथालय म्हणून नावलौकिक प्राप्त करते झाले. ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या सुद्धा वृद्धिंगत होत गेली. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात येथे आजही उपलब्ध आहे. 1989 रोजी ग्रंथालयाने शंभर वर्षे पूर्ण केली या अनुषंगाने विविध कार्यक्रम तेंव्हा घेण्यात आले होते. ग्रंथालयाने शंभर वर्षे पूर्ण केल्यावर विविध मान्यवरांची पत्रे सुद्धा ग्रंथालयास आली. त्यात मेहकरचे कवी ना. घ. देशपांडे यांचे सुद्धा पत्र आहे. त्या पत्रात ना.घ. म्हणतात की, ते जेव्हा खामगावला शिकत होते तेव्हा श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयात जात होते आणि या ग्रंथालयामुळेच त्यांच्यामध्ये साहित्य प्रेम व साहित्यिक भावना विकसित झाली. दस्तूर रतनजी ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुने व सर्वात जास्त ग्रंथ संख्या असलेले असे हे ग्रंथालय आहे. येथील 125 चौरस फुटाहून अधिक जागा ही ग्रंथांनी व्यापलेली आहे. शेकडो संदर्भ ग्रंथ येथे उपलब्ध आहे. या ग्रंथालयाने खामगावकरांसाठी केलेले सर्वात मोठे काम म्हणजे या ग्रंथालयातील ग्रंथ तसेच येणारी विविध वृत्तपत्रे वाचून अनेक तरुणांना त्याचा फायदा  स्पर्धा परीक्षा देतांना झाला आणि ते तरुण अनेक विभागात विविध पदांवरती नियुक्त झाले. 1939-40 या कार्यकारणीचे अध्यक्ष खामगांवचे माजी नगराध्यक्ष व खासदार राहिलेले तसेच गो.से. महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष शंकरराव बोबडे यांचे वडील श्री बाजीराव बोबडे हे होते. ते व्यवसायाने अधिव्याख्याता होते. त्यानंतर खामगावातील श्री साने, श्री एकबोटे, श्री मुंशी, श्री भट्टड इ. अनेक गणमान्य व्यक्तींनी या वाचनालयाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तूर्तास या वाचनालयाचे अध्यक्ष श्री विठ्ठलभाऊ लोखंडकार हे आहेत. दस्तुर रतनजी ग्रंथालय हे आता 135 व्या वर्षात वाटचाल करीत असून खामगाव शहरात विविध बौद्धिक कार्यक्रम, उपक्रम आयोजित करीत असते. "ग्रंथ हेच खरे मित्र" अशी काही वाक्ये आपण ऐकत असतो ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ग्रंथ कसे वाचावे याबद्दल सांगितले आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे भ्रमर हा फुलातील परागकण हळूवारपणे शोषून घेतो त्याप्रमाणे ग्रंथ सुद्धा हळुवारपणे व नीट आकलन करून वाचले गेले पाहिजे. खामगावच्या ऐतिहासिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावत असलेले श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय हे खामगावचे एक भूषणच म्हणावे लागेल. ग्रंथालयांनी अनेक वर्षापासून ग्रंथसेवा देऊन बौद्धिक चळवळ रुजवली आहे तसेच वेळेप्रसंगी वाचकांना आपल्या ग्रंथातून योग्य ते मार्गदर्शन करून साथ दिलेली आहे. म्हणूनच आज जरी मोबाईल इंटरनेटचा काळ असला तरी आपण सुद्धा या ग्रंथालयांना भेट देऊन त्याचे सभासद बनून त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून साथ द्यायला नको का ? ज्या पारशी समाजाला भारताने आश्रय दिला आणि तो समाज सुद्धा इथेच रमला, या देशाला त्यांनी आपले मानले इथे अनेक वैद्यकीय संस्था, उद्योग, इमारती, इतर संस्था उभारल्या, गरजूंना देणग्या दिल्या.  त्यांपैकी एकाच्या म्हणजेच दस्तूर रतनजी यांच्या ग्रंथ संपदेतून खामगांवला सुद्धा एक भले मोठे, अद्ययावत असे ग्रंथालय निर्माण झाले. त्याच श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयाने सुद्धा ज्याप्रमाणे दिवाळीतील दिवे जसे सर्वत्र प्रकाश पसरवतात तसेच 135 वर्षांपासून खामगांव शहरात ग्रंथरुपी पथदर्शक प्रदीप अर्थात ज्ञानदीप तेवत ठेवला आहे आणि म्हणूनच श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयास खामगांवचे "रतन" असे म्हणणे यथार्थच ठरेल.

विनय वि. वरणगांवकर

खामगांव

7588416238

टीप - एवढा मोठा ठेवा खामगांवकरांसाठी ठेऊन जाणा-या दस्तूर रतनजी, माणेकशा दस्तूर यांचे छायाचित्र अद्यापपावेतो कुठूनही प्राप्त झाले नाही.

माहिती स्त्रोत - श्री दस्तूर रतनजी ग्रंथालय, खामगांव

३१/१०/२०२४

Pre election condition of khamgaon

 मतदार बुचकाळ्यात !

खामगांव मतदारसंघाची निवडणूक कधी नव्हे अशी रंगणार असे तूर्तास तरी दिसत आहे,    एकाच विचारधारेचे आकाश फुंडकर भाजपा कडून तर वि.हिं.प.चे माजी विदर्भ प्रांत सह मंत्री  अमोल अंधारे हे अपक्ष असे उभे ठाकले आहे तसेच दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा एका दशकानंतर "शड्डू ठोकून" मैदानात उतरले आहे. 

20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. खामगांव विधानसभा मतदारसंघात एकूण 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यातील चार अर्ज हे अपात्र ठरले त्यामुळे आता एकूण 22 उमेदवार हे खामगांव विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उभे ठाकले आहे. राज्यातील यंदाची निवडणूक ही जरांगे आंदोलन, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित दादांचे युतीत दाखल होणे,  मविआचे आरोप आणि त्यांची आपापसात असलेली चढाओढ, लाडकी बहिण, कर्मचारी जुनी पेन्शन यांसारख्या मुद्द्यांमुळे जशी चांगलीच रंगणार आहे तशीच खामगांव मतदारसंघाची निवडणूक सुद्धा कधी नव्हे अशी रंगणार असे तूर्तास तरी दिसत आहे, खरे चित्र हे चार नोव्हेंबर नंतर स्पष्ट होईल कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ही अखेरची तारीख आहे. खामगांवात दाखल झालेले अर्ज पाहता सद्यस्थितीत तरी खामगाव मतदार संघातील मतदार हे बुचकाळ्यात पडल्यासारखे दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष भाजपकडून आकाश फुंडकर यांना उमेदवारी मिळाली तर विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत सह मंत्री राहीलेले आणि ब-याच काळापासून आमदार पदासाठी ईच्छूक असल्याचे म्हटले जाणारे अमोल अंधारे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

     बजरंग दलातून पुढे आलेले अमोल अंधारे हे उच्चविद्यावभूषित असून तरुणांमध्ये लोकप्रिय असा चेहरा आहे. मतदार संघातील विविध गावात बजरंग दलाच्या शाखा उघडल्यामुळे मोठा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. या तरुण वर्गात सर्वच जाती, धर्मातील तरुण आहेत हे सुद्धा उल्लेखनीय आहे. 

     दुसरीकडे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा दहा वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत पोहोचलेल्या सानंदा यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे तसेच त्यांची एक विशिष्ट मतपेढी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी निघालेल्या त्यांच्या मिरवणूकीत कुण्या एका कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकून एक प्रकारे भाजपाला आव्हानच दिले आहे. दहा वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात येत असल्यामुळे सानंदा हे पूर्ण प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.

     त्याचवेळी दहा वर्षापासून आमदार असलेले ॲड.आकाश फुंडकर यांनी सुद्धा खामगाव मतदार संघात अनेक विकास कामे केलेली आहेत. सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित, भाऊसाहेबांचा राजकीय वारसा, सुशिक्षित तरुण वर्गाचा पाठींबा, सुशिक्षित महिला वर्गात लोकप्रियता या जमेच्या बाजू असलेला हा चेहरा असून त्यांचा सुद्धा एक मोठा चाहता वर्ग मतदारसंघात तयार झाला आहे. सुरुवातीच्या कार्यकाळानंतर आकाश फुंडकर हे बरेच कार्यशील झालेले सर्वांनी बघितले आहे विधानसभेत सुद्धा त्यांनी अनेक वेळा विविध प्रश्न उपस्थित केले आहे.

वरील प्रमाणे या प्रमुख तीन उमेदवारांची स्थिती  आहे. या तिघांव्यतिरिक्त बसपा, मनसे, एमआयएम, वंचित, रिपब्लिक सेना, मुस्लिम लीग अशा आठ पक्षांचे व अमोल अंधारे यांच्यासह 11 उमेदवार हे अपक्ष उभे आहेत. अशा प्रकारच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन नक्कीच होणार आहे असे सद्यस्थितीत वाटत आहे.

अमोल अंधारे, दिलीप सानंदा आणि आकाश फुंड कर या तीन उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. इतर 19 उमेदवार खामगांव मतदार संघात विशेष परिचित असे उमेदवार नाही. परंतु तरीही जातीपातीच्या धर्माच्या नावावर हे उमेदवार काही मते खातीलच अमोल अंधारे व आकाश फुंडकर हे दोघेही एकाच विचारधारेचे, त्यामुळे फुंडकरांच्या सगळ्याच नाही परंतू अनेक मतदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी उमेदवारास मत देतांना कोणास मतदान करावे हा संभ्रम तूर्तास तरी निर्माण झाला आहे. लोकशाहीत पात्र व्यक्तीस निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे पण अमोल अंधारे व आकाश फुंडकर हे दोघेही एकाच विचारधारेचे आहे आणि तरीही अमोल अंधारे यांनी उमेदवारी अर्ज कसा काय दाखल केला असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत असल्याचे आणि तशा चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. खामगाव मतदारसंघाच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच चार नोव्हेंबर नंतर मतदारांना दिसणार आहे तोपर्यंत खामगाव मतदारसंघातील मतदार हे बुचकाळ्यातच पडलेले राहणार आहे.

👉 Picture used in article is edited by my daughter Shalaka 

१७/१०/२०२४

Article on the occasion of World Food Day

मुखी घास घेता करावा विचार...


भारतातील लोकांना जरी अन्नाचे महत्व असले, अन्नात ते भगवंत बघत असले तरी  संतुलित आहाराबाबत मात्र ते निष्काळजी आहेत. कुपोषणाबाबत त्यांना म्हणावी तितकी चिंता नाही. अन्नाची नासाडी पण भारतीय खुप करतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कॉफी, समोसे, चिप्स आदी पदार्थांचे भारतात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळे भारतात मधुमेहींची संख्या झापाट्याने वाढत आहे असा निष्कर्ष निघाला आहे.
 
काल दिनांक 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन जगभर साजरा झाला. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण अनादी अनंत काळापासून अन्नाला महत्व देत आलेलो आहोत. अन्नास आपण देव समजत आलेलो आहोत म्हणून आपण अन्नाचा अपमान सुद्धा करीत नाही. भारतातील थोर ऋषी मुनींनी आपल्याला अन्नास, अन्न उत्पादन करणा-या कृषीवलास, त्याला मदत करणा-या वृषभास सन्मान देण्याची शिकवण दिली आहे. तसे अनेक दाखले सुद्धा आहे. 

ॐ ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना' 

हा भोजन मंत्र, रामदास स्वामींनी म्हटलेले 

अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म 

अशा कितीतरी ऋचा, मंत्र, श्लोक यातून आपणास अन्नाची महती कळते. परंतू काळ झपाट्याने पुढे सरकला. पंक्ती बसण्याऐवजी उभ्याने जेवण करण्याची इंग्रजी पद्धत अगदी ग्रामीण भागात सुद्धा रूढ झाली. वेगवान जीवनशैलीमुळे घरोघरी जेवणाला बसण्यापूर्वी म्हटले जाणारे उपरोक्त  भोजन मंत्र, श्लोक हे आता कालबाह्य होत चालले आहेत. भोजनापूर्वी अन्नास नमस्कार करून व चित्रावती घालून जेवणास आरंभ केला जात असे. या चित्रावतीत शेतकरी, अन्न बनवणारी गृहिणी व उपाशी लोक, कृमी कीटक यांची आठवण करून काही शिते ताटाच्या बाजूला ठेवली जात. परंतू आता मात्र भारतात अन्नाला पुर्वी जसा सन्मान होता तसा सन्मान राहिलेला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. आज मुलांना पानात अन्न टाकले तर काहीही म्हटले जात नाही, वडीलधारी मंडळी त्यांना हटकत नाही. पुर्वी चांगले तूप अगदी निपटून खायला लावत, तूप मोरीत गेले नाही पाहिजे असे सांगत. अशी काही कारणे सांगून मुलांना पानातील सर्व अन्न संपवण्याचे शिकवले जायचे. आमचे आजोबा जेवतांना आमच्यासोबत कुणाच्याही ताटात एकही शीत उरले नाही पाहिजे अशी शर्यत लावत व म्हणून मग आम्हाला पानात न टाकण्याची सवय जडली, जी आजही कायम आहे. आता मात्र हे सर्व लुप्त होत चालले आहे.  पुर्वी पैसा कमी असायचा त्यामुळे वस्तू , अन्न, पाणी सुनियोजित पद्धतीने वापरले जायचे. आज लोकांच्या हाती पैसा आहे , अपत्य एकच आहे त्यामुळे मग चैन आणि उधळपट्टी होत आहे. बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्न व इतर कार्यात बुफे जेवण पद्धती असते. या इंग्रजी पद्धतीत हल्ली यजमान नाना प्रकारची व्यंजने ठेवतात. आमंत्रित लोक सर्वच पदार्थ पानात वाढून घेतात आणि मग एवढे सारे अन्न पदार्थ खाणे मोठे मुश्कील होते आणि अन्न पानात टाकून दिले जाते. बुफे जेवण पद्धतीचा सर्वात मोठा दोष म्हणजे या पद्धतीत अन्नाची मोठी नासाडी होते.  ब-याच लग्न कार्यालयात 

उतनाही लो थालीमे की व्यर्थ न जाये नाली मे |

अशाप्रकारची घोषवाक्ये अन्न वाया घालवू नये म्हणून  लावलेली असतात. पण या घोषवाक्यांकडे साफ कानाडोळा केला जातो, ती केवळ नावापुरतीच असतात. ज्या भारतात अन्नाला भगवंत समजले जाते, ज्या देशात अन्नास, अन्न पिकविणा-यास, अन्न बनवणा-यास मोठा सन्मान दिला जातो त्याच देशात आज अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना पाहून खंत वाटते. आजही या देशात अनेक लोक एकच वेळ जेवतात , त्यांना दोन वेळचे भोजन मिळत नाही. अनेकांना संतुलित आहार मिळत नाही व त्या अभावी ते कुपोषित राहतात, दुर्गम भागात कुपोषणामुळे बालकांचे मृत्यू होतात. हा चिंतेचा विषय आहे.  1981 पासून FAO अर्थात फुड अँड अँग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था जागतिक अन्न दिन साजरा करीत आहे. अन्न, आहार, कुपोषण आदींबाबत जागृती म्हणून हा दिवस साजरा करतात. भारतातील लोकांना जरी अन्नाचे महत्व असले, अन्नात ते भगवंत बघत असले तरी संतुलित आहाराबाबत ते निष्काळजी आहेत. कुपोषणाबाबत त्यांना म्हणावी तितकी चिंता नाही. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कॉफी, समोसे, चिप्स आदी पदार्थांचे भारतात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळे भारतात मधुमेहींची संख्या झापाट्याने वाढत आहे असा निष्कर्ष निघाला आहे. अन्न दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण भारतवासियांनी यावर विचार करणे क्रमप्राप्त आहे. शेगांव या गजानन महाराजांच्या भूमीत महाप्रसाद बारीत भली मोठी  अन्नपूर्णेची मुर्ती आहे , 


 गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहे अशी प्रतिमा आहे. तरीही अनेक भक्त हल्ली पानात प्रसाद टाकून देतांना दिसून येतात. ज्या गजानन महाराजांनी अन्न वाया घालवू नये त्याचा सन्मान करावा असे आपणास शिकवले आहे त्याच गजानन महाराजांच्या शेगांवात लोक अन्न वाया घालवतांना पाहून दु:ख होते. इतरही अनेक तीर्थस्थळी, भांडारे, महाप्रसाद, लग्नकार्ये यात मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. जागतिक अन्न दिन हा शाळा, महाविद्यालये यातून सुद्धा साजरा करण्यात यावा जेणे करून विद्यार्थ्यांना अन्नाचे महती पटेल. शाळांतून जे मध्यान्ह भोजन वितरीत केले जाते यात सुद्धा अनेक विद्यार्थी खिचडी पानात टाकून देत असतील. अन्न दिन जर शाळेत साजरा झाला तर मध्यान्ह भोजनाची सुद्धा नासाडी होणार नाही असे वाटते. जागतिक अन्न दिनाच्या पार्श्वभूमीवर अन्नग्रहण हे देशसेवेसाठी सुद्धा व्हावे असे सांगणा-या खालील ओळी सुद्धा स्मरतात 

मुखी घास घेता करावा विचार , 

कशासाठी हे अन्न मी सेवणार

घडो माझिया हातून देशसेवा

म्हणूनी मला शक्ती द्यावी देवा.   

जागतिक अन्न दिनापासून आपण सर्व अन्नाचा सन्मान करण्याचा, अन्न वाया न घालविण्याचा आणि नवीन पिढीला सुद्धा अन्नाची महती पटवून देण्याचा संकल्प करूया. 

१०/१०/२०२४

Tribute to Ratan Tata Sir

भावपुर्ण "टाटा"


टाटा या नावाची भारतात एवढी जादू फिरली की निरोप घेतेवेळी सुद्धा लोक एकमेकांना "टाटा" असे म्हणतात आणि म्हणूनच आज रतन टाटा यांच्या बाबतीत भावपुर्ण श्रद्धांजली असे लिहिण्याऐवजी भावपुर्ण "टाटा" असे लिहावेसे वाटले.

भारतात जन्म झालेल्या प्रत्येक बालकास बोलणे यायला लागल्यानंतर त्याला सर्वात प्रथम कोणत्या कंपनीचे नाव ठाऊक होत असेल तर ते म्हणजे टाटा हे नाव होय. टाटा हे पारसी समुदायातील अडनाव आणि हा शब्द भारतामध्ये एकमेकांचा निरोप घेतेवेळी म्हणण्याची  पद्धत रूढ आहे. निरोप घेतेवेळी हे असे टाटा ( बाय ) म्हणणे कसे काय रूढ झाले कोण जाणे. परंतु एकमेकांचा निरोप घेतेवेळी आजही अनेक लोक टाटा म्हणत असतात अशी या टाटा शब्दाची करामत आहे. जमशेदजी टाटा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुहूर्तमेढ रोवलेल्या टाटा उद्योग समूहाने भारतात उद्योग क्षेत्रात मोठी गरुडझेप घेतली. याच उद्योग समूहाचे 2016-2017 मध्ये अंतरीम अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांचे काल निधन झाले आणि देश हळहळला. टाटा हे नांव उद्योग क्षेत्रात एक विश्वसनीय असे नांव, असा ब्रँड म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले नांव आहे. या देशाच्या उभारणीत टाटाचा मोठा वाटा आहे. मीठापासून तर लोह उद्योग, वाहने असे जवळपास सर्वच उद्योग क्षेत्रात विविध उत्पादने असणा-या या उद्योग समूहात 1962 मध्ये रतन टाटा यांनी कार्यभार स्विकारला. शॉप फ्लोवर पासून उद्योगक्षेत्रातील विविध बारकावे शिकत ते पुढे वाटचाल करू लागले. लाजाळू, अंतर्मुख स्वभावाचे, दूरदृष्टीचे रतन टाटा हे टाटा समूहास अधिक अग्रेसर कसे करता येईल हे व्हिजन ठेऊन पुढे वाटचाल करू लागले. 1990 मध्ये ते टाटा गृप व टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. 2012 पर्यंत त्यांच्याकडे ही धुरा होती. रतन टाटा यांची मेहनत, साधी राहणी कपंनीला पुढे घेऊन जाण्याची जिद्द, कर्मचारी, कामगार यांना आपल्या परिवारातील सदस्य समजणे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणे, समाज हिताकडे सुद्धा लक्ष देणे व त्यासाठी अनेक प्रकारच्या देणग्या, आर्थिक मदत ग्रामीण भागातील संस्था, शैक्षणिक संस्था व इतरही अनेक प्रकारच्या संस्थांना करणे ही रतन टाटांची वैशिष्ट्ये होत. कोरोना काळात देशाला केलेली 500 कोटी रुपयांची मदत कुणी कशी काय विसरेल. 1990 च्या दशकात टाटांच्या इंडिका या कारने खुप लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर इंडिगो, सफारी आणि इतर अनेक विदेशी मॉडेल्सच्या तोडीस तोड अशी मॉडेल्स टाटा कंपनीने लाँच केली व त्यांनी मोठी लोकप्रियता सुद्धा मिळवली. गरिबांना सुद्धा कार घेता यावी हे स्वप्न रतन टाटांनी पाहिले होते व म्हणून त्यांनी नॅनो ही कार आणली होती. सुरुवातीच्या काळात ही गाडी मोठ्या प्रमाणात विकल्या गेली होती. रतन टाटांच्या कारकीर्दीत जग्वार हा जगप्रसिद्ध विदेशी ब्रँड टाटांनी अँक्वायर केला ही केवळ टाटा कंपनीसाठीच नव्हे तर कधी काळी उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर अत्यंत पिछाडीस असलेल्या भारतासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब होती. जग्वारच नव्हे तर इतरही काही विदेशी ब्रँड टाटाने खरेदी केले आहेत. रतन टाटा यांना अनेकदा अपयश आले, त्यांचे काही निर्णय चुकले पण त्यांनी हार मानली नाही व पुढे वाटचाल करीत राहिले. नवल टाटा यांचा हा पुत्र रतनजी टाटा यांचा नातू व जमशेदजी टाटा यांचा पणतू नम्र,   साधा व दानशूर होता आणि म्हणून तमाम भारतवासियांच्या ह्रुदयात त्यांनी स्थान मिळवले होते. 

आता सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी त्यांचा मांडी घालून खाली बसलेला फोटो, त्यांचा वाढदिवस झाला त्यावेळी एक छोटासा केक कापतांनाचा फोटो, असे फोटो माध्यमांवर झळकले होते तेंव्हा सर्वानाच त्यांचा तो साधेपणा भावला होता. धन ही अशी गोष्ट आहे की ते वाजवीपेक्षा जास्त असेल की त्याची हवा डोक्यात शिरते, मनुष्य त्याचा गर्व करू लागतो, त्याची वागणूक बदलते परंतू भारतातील सर्वात जुन्या, नामांकित, विश्वप्रतिष्ठित अशा टाटा समूहाचे अध्यक्ष असूनही रतन टाटांच्या डोक्यात संपत्तीची हवा शिरली नाही. टाटा मोटर्स मधील माझ्या एका मित्राने आज रतन टाटा यांच्याविषयी बोलतांना त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतलेला किस्सा व काही आठवणी सांगितल्या तो म्हणाला, "रतन टाटा साहेब हे जेंव्हा त्यांच्या उद्योग कंपन्यांना भेटी देत तेंव्हा कामगारांच्या कॅन्टीन मध्ये रांगेत उभे राहून जेवण घेऊन कामगारांसह भोजन घेत, मशीन मधील ज्ञान सुद्धा त्यांना अफाट होते, कामगार अधिकारी यांना ते आपले मित्र समजत असत." म्हणूनच ते लोकप्रिय होते. अफाट पुस्तक संग्रह आणि अनेक कुत्री असलेल्या फ्लॅट मध्ये ते बॅचलर जीवन जगत होते. टाटा म्हणजे पारशी, इराण मधून निष्कासित झालेला झोराष्ट्रियन अर्थात पारशी लोकांना भारताने आश्रय दिला. ते इथेच रुळले त्यांनी या देशाला आपले मानले इथे शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा यांची अनेक केंद्रे उभारली व या देशाच्या उभारणीत कुणी कधीही विसरू शकणार नाही अशी कामगिरी केली. रतन टाटा त्यापैकीच एक.

  सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे टाटा या नावाची भारतात एवढी जादू फिरली की निरोप घेतेवेळी सुद्धा लोक एकमेकांना "टाटा" असे म्हणतात आणि म्हणूनच आज रतन टाटा यांच्या बाबतीत भावपुर्ण श्रद्धांजली असे लिहिण्याऐवजी भावपुर्ण "टाटा" असे लिहावेसे वाटले.

०३/१०/२०२४

Article about feliciting of Mithun Chakraborty by Dadasaheb Phalke award.

एका नक्षलवादयाने मारलेली मजल.

 एक नक्षलवादी पुढे अभिनेता आणि अनेक पुरस्कार ही त्याची स्टोरी. मनुष्याने जर ठरवले तर तो नक्कीच चांगल्या मार्गावर येऊन गगन भरारी सुद्धा घेऊ शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. त्याची ही स्टोरी नक्षलवादी व इतरांनाही नक्कीच प्रेरणादायी राहील.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस त्याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत प्रवेश केला. दिसायला सर्वसाधारणच, काळा-सावळा आणि विशेष आकर्षित करणारे व्यक्तिमत्व नसलेला असा हा तरुण. पदार्पणातच तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले या उक्तीनुसार तो लोकांना काही आकर्षित करू शकला नाही परंतु पहिल्याच सिनेमात त्याला राष्ट्रीय पुरस्कार मात्र प्राप्त झाला आणि त्याचे अभिनयाच्या क्षेत्रात बस्तान बसण्यास सुरुवात झाली. पुढे त्याने अनेक व्यवसायिक चित्रपट केले त्यातले बहुतांश चित्रपट हे सुमार दर्जाचे होते परंतु एक अभिनेता म्हणून तो चांगलेच पाय रोवून ऊभा राहिला आणि स्थिरावला. त्याच्या समकालीन अशा अनेक अभिनेते व अभिनेत्रींसोबत त्याने भूमिका वठवल्या. काही भूमिकातून त्याने अभिनयाचा चांगला ठसा उमटवला. दर्शकांचे लक्ष वेधून घेणारा त्याचा पहिला सिनेमा म्हणजे डिस्को डान्सर त्या काळात सिनेमांमध्ये पाश्चात्य नृत्याचा वापर फारच कमी होत असे. मेहमूद हा हास्य अभिनेता रॉक अँड रोल हे नृत्य करीत असे. पण पाश्चात्य शैलीचा अधिकाधिक वापर सुरू झाला तो डिस्को डान्सर या चित्रपटानंतर. सत्तरच्या दशकातील तरुण पिढी या शैलीकडे आकर्षित झाली आणि मिथुन चक्रवर्ती स्टार झाला. पुढे त्याने अनेक बी ग्रेड, सी ग्रेड चित्रपट केले त्यातले कित्येक चित्रपट साफ कोसळले त्याच्या काही चित्रपटांमध्ये अनेक अविश्वसनीय, अचाट अशी दृश्ये त्याच्यावर चित्रीत करत की, तसे प्रत्यक्ष जीवनात कुणीही कधीही करू शकणार नाही. ती दृश्ये इतकी अशक्यप्राय अशी असत की दर्शक अवाक होऊन जात असे. दवाखान्यात भरती असताना देखील बेडसह लिफ्ट मध्ये जाऊन तिथून निसटण्याचा प्रयत्न करणे, किल्ल्यावर/भिंतीवर बिना आधाराचे घोरपडीप्रमाणे चढणे या प्रकारची ती दृश्ये असत. हे मिथुनच करू जाणे. परंतु काही चित्रपटांमधून मिथुनने त्याच्या अभिनयाची चूणूक दाखवून दिलेली आहे. त्याला पद्मश्री, पद्मभूषण असे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अतिशय कमी बजेटमध्ये त्याचे चित्रपट निर्माण होत असत म्हणून त्याला गरिबांचा अमिताभ सुद्धा म्हटले जात असे. उटी या ठिकाणी त्याची काही प्रतिष्ठाने आहेत. या ठिकाणी तो  निर्मात्यांना अतिशय कमी दरात शूटिंगसाठी जागा उपलब्ध करून देत असे. मिथुन चक्रवर्ती सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असल्याची वृत्ते अनेक वेळा झळकली आहे. हिंदू व मुस्लिमांना यात्रांसाठी जाण्यासाठी तो मदत करतो असे ऐकिवात आहे. त्या काळात अनेक तरुण हे मिथुनचे चाहते होते ते मिथुनची स्टाईल मारत असत. टी-शर्ट त्यावर उघडा शर्ट, गळ्यात लंबी पट्टी , घट्ट अशी पॅन्ट आणि मोठे वाढलेले केस  अशी शैली त्या काळात अनेक तरुणांनी स्वीकारली होती. चित्रपटात बंबैय्या भाषा  मिथुनच्याच तोंडी जास्त वापरली आहे. खूपच भडक कपडे घातलेल्या तरुणाला कॉलेजमध्ये मिथुन चक्रवर्ती म्हणून संबोधत. टेलिव्हिजन वाहिन्यांचा सुळसुळाट नसण्याच्या काळात सिनेमागृहांमध्ये व व्हिडिओ गृहात मिथुनदांचे चित्रपट एकापाठोपाठ एक झळकत असत. मुद्दत, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, वतन के रखवाले,  हम पांच,  प्रेम प्रतिज्ञा, घर एक मंदिर, प्यार का देवता, गुलामी, अग्निपथ यासारख्या अनेक चित्रपटांनी 80 च्या दशकात चांगलाच गल्ला कमावला होता. मो अजीज, किशोर कुमार यांनी आवाज दिलेली मिथुनची काही गाणी आजही हिट आहेत. सिनेसृष्टीला शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय प्रथमच करून देणारा चित्रपट सुद्धा मिथुनदांचाच. तो चित्रपट म्हणजे डिस्को डान्सर. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा सर्वात पहिला चित्रपट असल्याचे म्हटले जाते. योगिता बाली सोबत त्याचा विवाह झाला पुढे श्रीदेवी सोबत नांव जुळले गेले होते. त्याच्या मुलाचा मिमोहचा एकच सिनेमा झळकला व आपटला. काश्मीर फाईल हा मिथुनचा अलीकडचा सिनेमा त्यातील त्याची भूमिका वाखणली गेली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा आजपर्यंत चित्रपट क्षेत्रातील अनेक चतुरस्त्र, दिग्गज अभिनेते, अभिनेत्री व इतर नामांकित व्यक्ती जसे प्राण, देव आनंद, मन्ना डे, आशा पारेख, विनोद खन्ना,  आशा भोसले, कवी प्रदीप यश चोप्रा इ एकाहून एक महानुभाव अशा व्यक्तींना प्राप्त झाला आहे. मिथुनला हा पुरस्कार मिळाला त्यावेळी अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. अद्यापही सिनेसृष्टीत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते व इतर कलाकार असतांना मिथुन चक्रवर्तीची या पुरस्कारासाठी कशी काय निवड झाली ? असा प्रश्न अनेकांना पडला. गतकाळात मिथुन चक्रवर्ती यांची सत्ताधाऱ्यांशी वाढलेल्या जवळीकीमुळे त्याची या पुरस्कारासाठी वर्णी लागली असेही अनेकांना वाटत आहे. ते काहीही असो पिटातील प्रेक्षकांना मात्र मिथूनने अनेकवेळा दैनंदिन धकाधकी, ताणतणाव यापासून दूर नेऊन मनोरंजित केले आहे. त्यामुळे तळागाळातील त्याचे चाहते हे उच्चशिक्षित व कधीकाळी नक्षलवादी असलेल्या त्यांच्या मिथुनदाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने "अबे sss ए sss , सुना क्या ? अपने मिथुनदा को फाळके पुरस्कार मिल गया बे , आयी बात समज मे ? कोई शक ? असेच सांगत असतील. 

     एक नक्षलवादी पुढे अभिनेता आणि हा फाळके पुरस्कार ही मिथुनदांची स्टोरी. मनुष्याने जर ठरवले तर तो नक्कीच चांगल्या मार्गावर येऊन गगन भरारी सुद्धा घेऊ शकतो हे मिथुनदांनी दाखवून दिले आहे. टीकेकडे दुर्लक्ष करून तो मार्गक्रमण करीत राहिला. त्याची ही स्टोरी नक्षलवादी व इतरांनाही नक्कीच प्रेरणादायी राहील.

टीप - नक्षलवादी असल्याचा संदर्भ 01/10/24 रोजीच्या दैनिक तरुण भारत मधून घेतला आहे.

०३/०९/२०२४

Article about Khamgaon Silver business history

खामगांव एक चंदेरी शहर


खामगावात चांदीचा व्यवसाय चांगलाच वृद्धिंगत झाला, येथे चांदीच्या अनेक वस्तू, दागिने बनविण्याचे छोटे-मोठे असे कित्येक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. खामगावात बनलेल्या भरवशाच्या चांदीच्या वस्तू, दागिने खरेदीसाठी देश-विदेशातून लोक, देवस्थाने, कंपन्या, सेलिब्रिटी खामगावला येतात.

 खामगाव महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटेसे परंतु टुमदार शहर कापसाच्या अमाप उत्पादनामुळे व बाजारपेठेमुळे संपूर्ण भारतात नावलौकिक प्राप्त झालेले गाव "कॉटन सिटी" म्हणून ओळखले जात असे. "खामगांव नामे तालुक्यात | व्यापार चाले जेथ मोठा ||" असा उल्लेख दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या पोथीत सुद्धा केला आहे. यावरून खामगांव शहर हे फार पुर्वी पासून व्यापारा बाबत  प्रसिद्ध असल्याचा दाखला मिळतो. प्राथमिक शाळेच्या भूगोलच्या पुस्तकात सुद्धा खामगाव आणि कापसाची बाजारपेठ असा उल्लेख पूर्वी असायचा. कापसाच्या या मोठ्या व्यापारउदीमामुळे परतंत्र भारतात मुख्य रेल्वे लाईन पासून खामगाव पर्यंत अशी रेल्वे लाईन त्या काळात निर्माण केली गेली. मात्र शासनाची नवीन धोरणे, कापूस एकाधिकार योजना यामुळे कापसाचा हा व्यवसाय घटत गेला. शेतकरी सुद्धा कापूस अर्थात पराटीचे पिक कमी घेऊ लागले. एक-एक करून खामगावच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी बंद झाल्या. आज एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जिनिंग फॅक्टरी खामगावात आहे.

    कापसाच्या मोठ्या व्यापाराच्या त्या काळात खामगावात आणखी एक पांढऱ्याच वस्तूचा व्यवसाय बाळसे धरत होता, तो व्यवसाय म्हणजे चांदीचा व्यवसाय. पुढे याच व्यवसायामुळे चांदीच्या खाणी जरी खामगाव पासून शेकडो मैल अंतरावर असल्या तरीही मुंबई येथून चांदी आणून उत्कृष्ट प्रतीच्या चांदीच्या वस्तू दागिने खामगांवात बनवल्या जाऊ लागल्या. आता खामगांव "सिल्व्हर सिटी" म्हणून ओळखले जाते. खामगावच्या जुन्या सराफा भागात सोनार मंडळींनी सोन्या चांदीची छोटी-छोटी दुकाने त्या काळात सुरू केली होती. आजही तो जुना सराफा अस्तित्वात आहे. प्रचंड रहदारी आणि बाजार असलेल्या या भागात म्हणूनच पोस्ट ऑफिसने सुद्धा एक शाखा सुरू केली होती. आता ती पुर्वीची सोन्या-चांदीची दुकाने ही खामगावच्या मेन रोडवर स्थलांतरित झाली आहे. या हमरस्त्यावर आता सोन्या-चांदीची अनेक मोठी दुकाने आधुनिक व आकर्षक स्वरूपात उभी आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ज्याप्रमाणे शोले सिनेमा वगळताच येणार नाही अगदी तसेच खामगावची चांदी म्हटली की जांगीड हे नाव सुद्धा वगळताच येणार नाही.  जांगीड यांचे 50 करोड रुपयांची वार्षिक उलाढाल असलेले विश्वकर्मा सिल्वर हाऊस आज देशभर प्रसिद्ध आहे. चांदी आणि जांगिड ही नांवे जणू समरसच झाली आहेत त्यामुळे खामगांव येथे चांदी व्यवसायाची मुहूर्तमेढ कशी झाली ?, इथला नावलौकिक कसा वाढला ?  हे सांगतांना जांगीड परिवाराचा इतिहास येथे सांगणे क्रमप्राप्तच आहे. 

    जांगीड यांच्या चार पिढ्यांच्या पूर्वी म्हणजे 1889 मध्ये, 135 वर्षांपूर्वी श्री केशवरामजी जांगीड हे राजस्थानातील चुरी जिल्ह्यातील रामगड या गावावरून खामगावात आले. केशवरामजी जांगीड यांची कथा मोठी रंजक आहे. त्यांचे वडील शिवरामजी जांगीड हे रामगड येथे सुतारीचा व्यवसाय करत. त्यांना तीन मुले होती केशवरामजी, बालूरामजी, आणि गुलाबजी. केशवरामजी आणि बालूरामजी हे दोघे बंधू उत्कृष्ट असे कारागीर होते. त्या काळात त्यांनी रामगड येथील राजासाठी जेवणाच्या गोलाकार अशा मेज वरती फिरणारी चांदीची आगगाडी तयार केली होती. चांदीचे कारंजे सुद्धा त्यांनी तयार केले होते. त्या काळात इंग्रज लोक भारतीय शिल्पे उध्वस्त करीत, कारागीरांवर जुलूम करीत. कुणीतरी त्यांना असे सांगितले की,  इंग्रजांना तुमची ही कुशल कारागिरी जर का माहित पडली तर ते तुमचे हात तोडून टाकतील. म्हणून केशवरामजी आणि बालूरामजी हे दोघे बंधू दूर कुठेतरी राहण्याच्या बेताने रामगड सोडून निघाले. केशव रामजी यांच्या पत्नी जवळ काही तुटपुंजी रक्कम होती त्या अल्पशा जमापुंजीवर हे दोघे बंधू त्यांच्या राहत्या घरापासून शेकडो मैल अंतरावर असलेल्या खामगावला मजल-दरमजल करीत दाखल झाले, आणि इथलेच झाले. कालांतराने बालूरामजी मात्र परत निघून गेले. केशवरामजी मात्र खामगावला तन-मन-धनाने, झोकून देऊन चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसाय करू लागले. त्यांची पत्नी घरोघरी जाऊन लोकांना त्यांच्या व्यवसायाची माहिती देत व काम मिळवत असे. "Every cloud has a silver border" या इंग्रजी म्हणीप्रमाणे अनेक संकटे झेलत आपल्या जन्मभूमीपासून दूर खामगाव सारख्या छोट्या गावात तुटपुंजी रक्कम सोबत घेऊन आलेल्या केशवरामजी जांगिड यांना सुद्धा खामगावात चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायामुळे यशाची चंदेरी किनार लवकरच प्राप्त झाली. परंतु दुर्दैवाने केशवरामजी यांना अपत्यप्राप्ती काही झाली नाही. त्यांनी आपला पुतण्या जवाहरमल यांना दत्तक घेतले. जवाहर यांनी सुद्धा वडिलांचा व्यवसाय चांगला प्रस्थापित केला. जवाहरमलजी नंतर त्यांचे पुत्र चिरंजीलालजी यांनी सुद्धा हा व्यवसाय  वृद्धिंगत केला आणि 1937 मध्ये जुन्या सराफ्यातून नवीन सराफ्यात हमरस्त्यावर "विश्वकर्मा सिल्वर हाऊस (SVSH)" स्थापन केले. चिरंजीलाल जांगिड यांनी त्या काळात व्यवसाय वाढीसाठी खामगावातील धनिक श्री सोनी यांच्यासोबत भागीदारी केली आणि 39 हजार रुपयांचे भाग भांडवल मिळाल्यावर व्यवसाय आणखी वाढवला त्यांची ही भागीदारी 2007-2008 पर्यंत कायम होती. नंतर त्यांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने ही भागीदारी बंद केली. चिरंजीलाल यांच्यानंतर त्यांचे पुत्र जगदीशप्रसाद जांगिड यांनी या व्यवसायात आधुनिकता आणून आपला व्यवसाय अधिक पुढे  नेण्यास सुरुवात केली. जगदीशप्रसाद हे दूरदृष्टी असलेले असे गृहस्थ होते. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या शहरातून आणि राज्यातून कारागीर आणले.  शुद्ध चांदी ग्राहकांना कशी मिळेल याकडे लक्ष दिले. विश्वकर्मा येथील चांदी ही 99.50% शुद्ध असते. विश्वकर्मा सिल्वर हाऊसने हॉलमार्कला सुद्धा नाकारले. याचे कारण असे की हॉलमार्क 92.50% शुद्ध चांदीला प्रमाणित करते पण विश्वकर्माची चांदी मात्र त्याही पेक्षा जास्त शुद्ध असते. जगदीशप्रसाद जांगिड यांनी अनेक नवनवीन प्रयोग या व्यवसायात केले प्लास्टिकच्या डब्यांवरती चांदीचे आवरण हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे डबे लोकांना खूप आवडले आणि लोक ते भेट म्हणून एकमेकांना देऊ लागले. जगदीशप्रसाद यांनी नागपूरच्या महानुभाव मंदिरात सुद्धा चांदीचे दागिने दिले. त्यानंतर अनेक मंदिरांमध्ये विश्वकर्मा सिल्वर हाऊसने चांदीचे दागिने व इतर वस्तू करून दिलेल्या आहेत. महानुभाव मंदिर नागपूरने जेव्हा चांदीचे दागिने वितळवण्यासाठी विश्वकर्मा ज्वेलर्सला विकले तेव्हा त्यातील काही चांदीच्या वस्तू या चांदीच्या नसून सोन्यावर चांदीचा मुलामा असल्याच्या दिसल्या तेंव्हा जगदीशप्रसाद यांनी त्या सोन्याच्या वस्तूंची किंमत महानुभाव मंदिराला दिली. हे जगदीशप्रसाद यांचे व्यापारातील प्रामाणिकतेचे (Business Ethics) एक उत्कृष्ट उदाहरण आहे.  जगदीश प्रसाद जांगिड यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत शिवाय व्यापारा संबंधीच्या एका "केस स्टडी" च्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुस्तकात त्यांच्यावर आयर्न मॅन नावाचा मोठा लेख जांगिड कुटुंबीयांच्या वंशावळी सहित प्रकाशित झालेला आहे. तसेच इतरही अनेक वृत्तपत्रातून खामगावच्या चांदीबाबत लेख प्रकाशित झालेले आहेत.

आज विश्वकर्मा सिल्वर हाऊस हे जगदीश प्रसाद यांचे पुत्र डॉ. कमल जांगिड व नातू राहुल जांगीड हे पुढे नेत आहे. डॉ कमल जांगीड हे एम.बी.बी.एस. असूनही त्यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्यासाठी म्हणून वैद्यकीय क्षेत्र सोडून याच व्यवसायात कार्यरत झाले. कमल जांगीड यांचे बंधू अजय जांगिड हे "विश्वकर्मा सिल्वर एम्पोरियम" या नावाने मुंबईमध्ये व्यवसाय सांभाळतात. विश्वकर्माचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील चांदीवरती विश्वकर्माचे एक चिन्ह निर्माण केले जाते व पुन्हा कितीही वर्षांनी ती वस्तू मोड म्हणून द्यायची असल्यास त्या वस्तूची घटाई लावली जात नाही असे वैशिष्ट्य क्वचितच इतरत्र आढळते. खामगावच्या विश्वकर्मा सिल्वर हाऊसने आज रोजी पर्यंत अनेक नामांकित व्यक्ती व संस्थांना चांदीच्या वस्तू, दागिने बनवून दिलेल्या आहे. यामध्ये इन्फोसिस, व्हिडिओकॉन सारख्या नामांकित कंपन्या,  नागपूरचे टेकडी गणेश मंदिर, महानुभाव मंदिर, अंबादेवी संस्थान अमरावती, वैष्णव देवी मंदिर कटरा जम्मू, सिद्धिविनायक मंदिर मुंबई, नांदेडचे गुरुद्वारा तसेच राजकारणी लोकांना, विदर्भ क्रिकेट असोसिएशनला आणि देशातील अनेक दागिन्यांच्या दुकानांना पुरवलेल्या आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महानायक अमिताभ बच्चन हे सुद्धा विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे ग्राहक आहे. यंदाच्या जालना येथील गणेशोत्सवासाठी जी 40 किलो वजनाची चांदीची मुर्ती बसवणार आहेत ती सुद्धा विश्वकर्मा सिल्व्हर हाऊस येथेच बनवली गेली आहे. जांगिड यांच्यापासून प्रेरणा घेऊन खामगावला अनेक चांदीचे व्यवसायिक व्यवसाय करत आहेत. तसेच अनेक कारागीर विविध कारखान्यांमधून काम करत आहेत.  

   या ठिकाणी खामगांवकरांना विशेष अभिमानास्पद अशी गोष्ट नमूद नाही केली तर हा लेख अपुरा राहील. ती विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारताने दोन वर्षापूर्वी यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेल्या चांद्रयानासाठी  चांदीचे रॉड आवश्यक होते तेंव्हा ते रॉड सुद्धा खामगांव येथील शेखर भोसले यांच्या श्रद्धा रिफायनरीने सप्लाय केले आहेत. त्यावेळी देशभरात खामगांव चे नांव झळकले. खामगांवच्या चांदीची ख्याती चंद्रापर्यंत गेली.

     आज खामगावात चांदीचा व्यवसाय चांगलाच वृद्धिंगत झाला आहे. येथे चांदीच्या अनेक वस्तू आणि दागिने बनविण्याचे छोटे-मोठे असे कित्येक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे आणि खामगावात बनलेल्या भरवशाच्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून देश-विदेशातून लोक, देवस्थाने, कंपन्या, सेलिब्रिटी खामगावला येतात. केशवरामजी जांगीड यांनी मुहूर्तमेढ केलेल्या या चांदीच्या व्यवसायाच्या इवल्याश्या रोपट्याच्या वेलूला त्यांच्या पुढील पिढ्यांनी गगनावरी नेले आहे आणि ते  सुद्धा व्यवसायातील प्रामाणिकतेचे खत-पाणी घालून. खामगांवचे चांदी व्यवसायिक सचोटीने दर्जेदार, उत्कृष्ट वस्तू व दागिने सातत्याने निर्मिती करत असल्याने खामगांव शहर सिल्व्हरसिटी म्हणजेच चंदेरी शहर हे बिरूद मोठ्या अभिमानाने मिरवत आहे.  

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव

9403256736

२९/०८/२०२४

Article about falling if Shivaji Maharaj statue and politics and allegation

पक्ष कार्यकर्ते की गुंडांची टोळकी ?

इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते.

राजकोट किल्ल्यावरचा आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि एकच गदारोळ महाराष्ट्रात सुरू झाला. ज्या छत्रपतींचे किल्ले अद्यापही शाबूत आहे त्याच छत्रपतींचा पुतळा इतक्या अल्पावधीत कोसळावा ही खरोखरच दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. हा पुतळा कोसळल्यावर तो कोणी उभारला ?  मूर्तिकार कोण ? कंत्राटदार कोण ? लोखंड किती वापरले गेले होते ? आदी बाबींवर उहापोह होण्यास सुरुवात झाली. या गोष्टीचे राजकारण जर झाले नाही तर नवलच आणि ते राजकारण पण सुरू झाले. काल राजकोट किल्ल्यावर मोठे महानाट्य झाले. ठाकरे गट आणि भाजपा मध्ये राजकोटच्या पवित्र भूमीत मोठी हाणामारी झाली. राजकोटला प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नारायण राणे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे असे नेते पोहोचले. जयंत पाटील सुद्धा होते. या नेत्यांच्या गटांकडून महाराष्ट्राला अशोभनीय अशा अर्वाच्य भाषेत एकमेकांना , एकमेकांच्या नेत्यांना हिणवण्याचा प्रयत्न झाला. पेंग्विन, कोंबड्या चोर, अंगार, भंगार अशी घोषणाबाजी झाली. आमचा इतिहास ठाऊक नाही का ? ( या वाक्यात ते अप्रत्यक्षरीत्या स्वतःच सांगत आहे की ते कोण होते ) , एकाही घरात जाता आले नसते, घरात घुसून एकेकाला मारून टाकेन, शिवसेना राडे करूनच पुढे आली , उद्धव ठाकरे यांना काही समजत नव्हते , आदित्य शेंबडा होता. असेही राणे यांनी धमकावले व हिणवले. नारायण राणे यांनी आव्हान दिल्यावर आणखीनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते. हा गदारोळ पाहून महाराजांच्या आत्म्याचा किती तळतळाट झाला असेल, त्यांना किती वेदना झाल्या असतील. बरं, महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून हे कार्यकर्ते तिथे गोळा झाले होते त्याच ठिकाणी, महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरच यांच्या हमरीतुमरीने, झटापटीमुळे, लोटपोटिने किल्ल्याची सुद्धा हानी झाली, मोडतोड झाली, किल्ल्याला क्षती पोहचली. या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटते की, पुतळा कोसळला म्हणून तेथे एकत्र यायचे आणि किल्ल्याची हानी करायची. हे असे कसे यांचे छत्रपतींवरचे प्रेम ! जनतेने तमाम राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांना आता पुरते ओळखले आहे म्हणून लोकसभेच्या गत निवडणूकीत मतदार मतदान केंद्राकडे फिरकलाच नाही. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूकीत सुद्धा संमिश्र असे निकालच पाहायला मिळतील असे वाटते. पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात मोठा फरक आहे आताची पिढी ही हुशार आहे, त्यांना राडे नको आहे तर त्यांना विकास पाहिजे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपल्या पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत, देशाचा विकास करायचा आहे की निव्वळ फुकटचे पैसे वाटून मते मिळवायची आहेत आणि सत्ता उपभोगायची आहे यावर त्यांचे चिंतन होणे जरुरी आहे, कारण देशाचा खजिना लुटून मध्यमवर्गीयांनी आणि व्यापाऱ्यांनी भरलेल्या कराचे पैसे खुशाल उधळणे हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. सत्तेसाठी महाराष्ट्रात चाललेले राजकारण सुज्ञ जनतेस पटलेले नाही याचे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चिंतन करायला हवे. त्यांनी संयमित राहणे जास्त शोभानीय आहे व त्यांनी संयमित भाषा वापरायला हवी, तोलून मापून बोलायला पाहिजे. जरांगेंनी जेष्ठ नेत्यांबाबत बोलतांना अरे-तुरेची भाषा वापरणे सुरू केले. आता सर्वच नेत्यांनी एकमेकांना अरे-तुरेत बोलणे सुरू केले आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे योग्य नव्हे. या अशा प्रकारच्या वागण्यामुळे नेत्यांच्या भाषेमुळे कार्यकर्ते सुद्धा भरकटले, नेत्यांची आजची एक भूमिका आणि उद्याची वेगळी यामुळे ते संभ्रमात पडत आहे. आपल्या नेत्याची तुला पाहून घेईल, तू राहशील नाहीतर मी या प्रकारची धमकीवजा वक्तव्ये पाहून या तरुण कार्यकर्त्यांचेही  भान हरपत आहे, त्यांचे हात शिवशिवत आहेत. त्यांच्या अंगातील जोमाला, जोशाला आपले नेते गुंडगिरीकडे वळवण्याचे काम करीत आहेत. कालच्या राजकोटला सर्वच मोठ्या पक्षांच्या उपस्थिती झालेल्या राड्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असे राडे करणारे राजकीय पक्ष कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा जनतेनेच त्यांच्या मतदानाच्या अधिकारातून आगामी निवडणुकीद्वारे या नेत्यांना दिले पाहिजे.

०८/०८/२०२४

Article about Khamgaon water problem.

खामगांव पाणी पुरवठा यंत्रणा
ज्ञानगंगा धरणात बुडवून टाका

भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा संघ समुद्रात बुडवून टाकावा आणि भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष विसर्जित करावा अशी दोन प्रसिद्ध विधाने आहेत. या दोन्ही विधानांप्रमाणे खामगाव पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा ज्ञानगंगा धरणात बुडवून टाकावी असे खेदाने म्हणावेसे वाटते.

पाणी समस्या ही खामगावकरांच्या पाचवीला पुजलेली आहे. आजरोजी पावेतो खामगावच्या पाणी समस्येबद्दल माझे अनेक लेख लिहून झाले आहेत. खामगाव शहरात असलेल्या पक्क्या पाण्याच्या अशा वीस विहिरींची यादी सुद्धा वृत्तपत्रातून जाहीर केलेली आहे तसेच ती नगर परिषद माजी मुख्याधिकारी यांना सुध्दा दिली होती. परंतु तरीही या लेखांनी विशेष असा काही परिणाम झाल्याचे जाणवले नाही. नागरिकांनी तेवढे कौतुक केले खरे परंतु प्रशासनाने मात्र त्या लेखांची काहीही एक दखल घेतल्याचे दिसले नाही. (पाणी समस्यांचे माझे इतर लेख माझ्या ब्लॉगवर वाचक शोधू शकतात.) यंदा पावसाळा चांगला सुरू आहे. या चांगल्या सुरू असलेल्या पावसाळ्यात चातकाची तहान नक्कीच भागली असेल पण खामगांवकर मात्र नळाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पहात बसलेले असतात, स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या पाणीपुरवठाच्या वेळापत्रकाकडे डोळे ठेवून असतात. उन्हाळ्यात पण तेच आणि पावसाळ्यात पण तेच. नागरिक पाण्याअभावी अगदी हवालदिल होऊन गेलेले आहेत परंतु कोणी काही बोलत नाही. गेल्या 10 दिवसांपासून खामगावचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. नेहमीप्रमाणेच यंत्रणेत बिघाडाचे कारण सांगितले जात आहे. आमच्या भागातील पाणीपुरवठा हा 28 जुलै रोजी झाला होता त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे आजरोजी पर्यंत नळाला पाणी आलेले नाही. खामगावच्या पाणीपुरवठा यंत्रणेत एवढा बिघाड कसा काय होत राहतो ? हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. कधी बूस्टर पंपात बिघाड तर कधी पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड, कधी विद्युत पुरवठ्याचे कारण तर कधी पाईपलाईन फुटल्याचे. पाणीपुरवठा जेव्हा विस्कळीत होतो तेव्हा अशी नाना कारणे सांगितली जातात. मला आश्चर्य वाटते की मुंबई, पुणे वा आणखी इतर मोठ्या शहरांमध्ये पाणीपुरवठा कसा होत असावा? तिथे  कधी  खामगाव शहरात येतात तशा व तितक्या पाणीपुरवठ्याच्या नाना प्रकारच्या समस्या येत असल्याचे कधी काही ऐकिवात आले नाही. शहरातील माझ्या मित्रांशी याबाबत बोललो असता त्यांनी सुद्धा धरणात जर का पाणी असेल तर आमच्याकडे व्यवस्थित पाणी येत असल्याचे सांगितले. माझ्या एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्राला मी एकदा विचारले की तिकडे पाणीपुरवठा कसा होतो ? तो तिथे गेल्या अनेक वर्षापासून राहतो. त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की, "रोज नळ येतात पण पाईपलाईन कुठून आहे, नळाला पाणी कोण सोडते, कुठून सोडते हे अजूनही आम्हाला कळलं नाही, कधी कुठे पाईपलाईन दुरुस्तीचे कामही दिसले नाही किंवा कधी कुठे पाईपलाईन फुटलेली ही दिसली नाही फक्त आमच्याकडे नळाला पाणी मात्र नियमित येत असते एवढे आम्हाला पक्के माहित आहे. पण आपल्या भारतात आणि त्या अनुषंगाने खामगावात धरणामध्ये पाणी असून सुद्धा नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. खामगावसारख्या काही ठिकाणी तर पाणी समस्या इतकी अंगवळणी पडली आहे की आता तर लोकांना 15-15, 20-20 दिवस पाणी आले नाही तरीही काही वाटत नाही. खामगाव शहराला पूर्वी जनुना तलावावरून पाणीपुरवठा होत असे. ती पाईपलाईन अद्यापही आहे, ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते व शहराच्या अगदी लगतच्या मोठ्या जलसाठ्याचा लाभ खामगांवकरांना होऊ शकतो. पण त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. सध्या ज्ञानगंगा धरणातून खामगावला पाणीपुरवठा सुरू आहे. आता खामगावची लोकसंख्या वाढली, पाण्याची मागणी अधिक होऊ लागली आहे. पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगावला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती म्हणून तेंव्हा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला तो आजतायागात कायमच आहे. त्यातच कधी बूस्टर पंप खराब होणे तर कधी पाईपलाईन फुटणे, विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने किंवा फांद्या कोसळल्याने धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणे व त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, तर कधी बिबट्याच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा कार्यासाठी न जाणे, यंत्रणेत बिघाड होणे अशा अनेक समस्या खामगावचा पाणीपुरवठा करताना येत असतात. त्या जाहीर झाल्यावर नागरिक मूकपणे आप-आपली पाण्याची व्यवस्था करतात. कुणी टँकर, कोणी कॅन तर कुणी लीक झालेल्या व्हॉल्व वरून आपली पाण्याची गरज भागवतात. पूर्वी पाणी नसले की घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा असे किमान ऐकू तरी यायचे, वृत्तपत्रातून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांच्या बातम्या वाचनात यायच्या, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे गा-हाणे मांडले जायचे पण आता खामगांवकरांना विस्कळीत पाणी पुरवठा इतका अंगवळणी पडला आहे की उपरोक्त मागण्या सुद्धा आताशा होणे बंद झाले आहे. 

भारतीय क्रिकेट बोर्ड का संघ हा समुद्रात बुडवून टाकावा अशा आशयाचे विधान बिशनसिंग बेदी यांनी एकदा केले होते तसेच भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष सुद्धा विसर्जित करावा असे विधान गांधीजींनी केले होते. या दोन्ही विधानांप्रमाणे तसेच खामगाव पाणीपुरवठ्यात येणाऱ्या नाना अडचणींमुळे व कुचकामी यंत्रणेमुळे खामगाव पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा खामगावला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्ञानगंगा धरणात बुडवून टाकावी असे खेदाने म्हणावेसे वाटते.