Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०३/२०२५

Article about statements of leaders on history

 इतिहास मत पूछो ! 

इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही  दिवसांत तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात संदर्भहीन भाष्ये करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या लेखाचे जे शीर्षक आहे ते वाक्य सतत आठवत आहे. माणसाच्या स्मरणात काय राहील काही सांगता येत नाही. या वाक्याचे सुद्धा तसेच आहे. माझा ज्येष्ठ बंधू कनिष्ठ महाविद्यालयात असतांना त्यांना संगारे सर इतिहास शिकवत असत. मी सुद्धा संगारे सरांचा विद्यार्थी राहिलेलो आहे ते इतिहास खूपच चांगला शिकवत असत. तर एकदा माझ्या ज्येष्ठ बंधूच्या इतिहासाच्या पिरेडला कुणीतरी विद्यार्थ्यांनी संगारे सर येण्याच्या आधीच फळ्यावर "इतिहास मत पूछो" असे लिहून ठेवले होते. सर आल्यावर त्यांनी त्या लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मी एकदा हे वाक्य एका ॲटोच्या मागे लिहिले असलेले सुद्धा पाहिल्याचे मला स्मरते. काही लोक भेटल्यावर अनेक गोष्टींची विचारणा, नसत्या चौकशा करत राहतात या उद्देशातून खरे तर हे इतिहास मत पूछो वाक्य म्हटले गेलेले आहे. पण आपल्या भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सतत ऐतिहासिक घटना, महापुरुष, खलनायक यांच्याबद्दल जी विधाने केली जातात त्यावरून हे  शीर्षकातील वाक्य नसती वक्तव्ये करणा-यांना उद्देशून म्हणावेसे वाटते. 

   खरे तर इतिहास आपल्याला बरेच काही शिकवत असतो. इतिहास शिकल्यामुळे इतिहासातील घटनांचा बोध घेऊन मनुष्य वर्तमानामध्ये योग्य ते निर्णय घेऊ शकतो. परंतु गत काही दिवसांमध्ये अनेक तथाकथित बुद्धीवादी ( बुद्धिभेद करणारी ? ) इतिहासातील घटना, ऐतिहासिक पात्रे याबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्ये करीत आहेत. या भाष्यांमुळे काही थोर पुरुषांचा अपमान होत आहे तर काही क्रूर पुरुषांचा उदो उदो होत आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्रे यांबद्दल इतके बोलले जात आहे की जणू काही ही वक्तव्ये करणारी मंडळी तज्ञ इतिहासकार किंवा पुरातत्व तज्ञच आहे. माझ्या मागच्या छावा या चित्रपटासंबंधीत लेखात मी भाष्य केले होते की, यांना एवढेच जर का इतकेच इतिहास प्रेम असेल तर मग त्या इतिहासातील पात्रांचे गुण यांनी आपल्या अंगी बाणवायला नको का ! पण तसे मात्र आढळून येत नाही. कोणीही उठते आणि काहीही बोलून जाते परवाच काँग्रेसचे हुसैन दलवाई यांनी छ. संभाजी राजांना जी शिक्षा झाली ती शिक्षा मनुस्मृती नुसार झाली असे बेलगाम वक्तव्य केले. प्रत्यक्षात मनुस्मृती मध्ये देहदंडाबाबत काहीही सांगितलेले नाही असे तज्ञ मंडळी सांगतात. ही नाहक वक्तव्ये करणारी माणसे एका समाजाला खुश करण्यासाठी दुसऱ्या समाजाचा रोष ओढवून घेतात, दुस-या समाजाला नाराज करून लोकशाही, संविधान यांचा सर्रास अपमान करतात. यामुळे सामाजिक एकोपा भंग पावतो. विनाकारणची उपटसुंभ वक्तव्ये करण्यापेक्षा राज्यातील प्रश्न, देशातील प्रश्न, प्लास्टिक निर्मूलन, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न यांबाबत भूमिका मांडायला नको का ? अनेक शहरात तर पाण्याची समस्या वर्षांनुवर्षांपासून तशीच आहे. इतिहासामध्ये जे काही चांगले घडले त्याचा अंगीकार सर्वांनी करायला पाहिजे तसेच जे धर्मांध, क्रूर, परकीय राजे होते त्यांचा सन्मान हा मुळीच करू नये. उगीच तो आपल्या समाजाचा होता म्हणून चांगलाच होता अशी भावना वृद्धिंगत होऊ देऊ नये. चांगल्या,  देशाभिमानी, प्रजाहितदक्ष अशा ऐतिहासिक पात्रांकडून,  घटनातून  काहीतरी बोध घेत घ्यावा. रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल खालील ओळी लिहिल्या आहेत.

 शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
समर्थ रामदास स्वामींच्या उपरोक्त ओळींप्रमाणे सांप्रत सर्वच नेते, प्राध्यापक, बुद्धीवादी यांनी इतिहासाची पाळेमुळे न  शोधता किंवा संदर्भ नसलेल्या गोष्टींबद्दल विधान करणे सोडून देऊन छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे, बाजीराव पेशवे , महाराणा प्रताप, छत्रसाल अशा थोर पुरुषांविषयी तारतम्य ठेवून वक्तव्ये करावीत. ते कसे होते ते बघावे, त्यांचे गुण घ्यावे, त्यांचा पराक्रम पाहावा. कोणीही येतो आणि छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्याबद्दल आधार नसलेली वक्तव्ये करून मोकळा होतो आणि मग शासन, जनता, माध्यमे हे सर्व त्यात विषयाभोवती घुटमळत राहतात, राजकारण विकास सोडून विनाकारण केलेल्या संदर्भहीन वक्तव्यांभोवती फिरत राहते. शिवाय नवीन पिढी, तरुण वर्ग संभ्रमात पडतो की, नक्की खरा इतिहास तो होता तरी काय? त्यामुळे जनतेने सध्याच्या तथाकथित नेत्यांच्या, तथाकथित बुद्धिवाद्यांच्या इतिहासाबद्दलच्या ऐतिहासिक संदर्भ, आधार नसलेल्या विधानांकडे दुर्लक्ष करून खरा इतिहास, घटनांचा संदर्भ असलेली पुस्तके  वाचावीत. तसेच तमाम उपटसुंभ व आधारहीन वक्तव्ये करणाऱ्या लोकांना हेच म्हणावेसे वाटते की , विनाकारण इतिहास मत पूछो !
जे ज्ञात असेल व जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वक्तव्ये करावीत. उगीच कोणी काहीही विचारले नसतांना काहीही पिल्लू सोडून देऊ नये. 
अर्ल चेस्टरफिल्ड याने म्हटलेच आहे की, 
History is but a confused heap of facts.

२०/०३/२०२५

Article about Chhaava cinema

छावा , भिकार नव्हे तर सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट?

तीन टक्के समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर  इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे.

एका वृत्तपत्रात नुकताच प्रदर्शित झालेला व लोकप्रियतेचे उच्चांक गाठत असलेला छावा हा चित्रपट कसा भिकार आणि दिशाभूल करणारा आहे या आशयाचा एक दीर्घ लेख वाचनात झाला. या लेखात स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका कशी चांगली होती आणि छावा हा चित्रपट कसा वाईट आहे याचा ऊहापोह केल्या गेला होता. खरे तर चित्रपट वाईट आहे हे सांगतांना लेखकाने चित्रपटाचे संकलन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय व कथानक यामधील त्रुटी यांचा उल्लेख करणे आवश्यक होते पण त्यावर मात्र लेखात काही भाष्य केलेले नाही. त्या ऐवजी लेखकाने महाराष्ट्रातील तीन टक्के समाज व छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूस अनाजीपंत व इतर हेच कसे जबाबदार होते हे स्पष्ट करण्याचा अतोनात प्रयास केलेला दिसतो. लेखकानी शिर्के यांनी छ. संभाजी राजांना पकडून दिले याचे काही पुरावे नाही असे म्हटले आहे तेव्हा लेखकाला असे विचारावेसे वाटते की त्यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांनी छ. संभाजीराजांचा घात केला तर त्याचे काही पुरावे लेखकाजवळ आहेत का ? असल्यास मग ते संदर्भ का दिले नाही ? आज-काल महाराष्ट्रामध्ये विशेषतः 1 सप्टेंबर 1990 नंतर महाराष्ट्रातील तीन टक्के समाज म्हणजेच ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेतांना, ताशेरे ओढतांना काही तथाकथित नेते व काही पत्रकार, संपादक दिसतात. या समाजात बुद्धिवादी व शांत वृत्तीचे लोक असल्यामुळे कोणी विशेष काही विरोध करत नाही, आंदोलने वगैरे होत नाही त्यामुळे या समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर आज आपल्या देशाला इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे. परंतु जे स्वतःला निर्भीड नि:पक्ष वगैरे मोठी मोठी बिरूदे लावतात आणि एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करतात हे पत्रकारितेच्या माध्यमातून अशोभनीय असे आहे असे येथे नम्रपणे सांगावेसे वाटते. इतिहासातील चुका तत्कालीन एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे आजच्या समाजाला दोषी धरणे यापेक्षा ऐतिहासिक थोर पुरुषांमध्ये जे गुण होते ते अंगीकृत करणे, त्या गुणांचा प्रचार आणि प्रसार करणे हे खरे तर वृत्तपत्रांनी करायला पाहिजे परंतु "ये जो पब्लिक है ये सब जानती है" पब्लिकला सगळे माहित असते आणि त्यांच्या सगळेच स्मरणात सुद्धा असते. त्यांना महाराष्ट्रातील बड्या वृत्तपत्रांची मालकी कुणाकडे कशी आली हे पण स्मरणात असते शिवाय कोण लोक कोणत्या गुन्ह्यातून सहिसलामत कसे बाहेर पडले हे सुद्धा माहीत असते. सतत एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करून सवंग प्रसिद्धी प्राप्त करणे व आपल्या व आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवणे हे कितपत योग्य आहे? लेखकांनी त्यांच्या लेखात अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजावर मोठे ताशेरे ओढलेले आहे आणि छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू तुकाराम महाराजांचा मृत्यू याचे खापर सुद्धा ब्राह्मण समाजावरच फोडण्याचा प्रयत्न केला आहे पण औरंगजेबाने छ. संभाजी राजे आणि कवी कलश यांना हाल-हाल करून मारले त्याबद्दल मात्र काहीही भाष्य केलेले नाही. छावा चित्रपट वाईट कसा आहे हे सिद्ध करण्यापेक्षा लेखकाने ब्राह्मण समाजावरच तोंडसुख घेतले आहे. 

शेवटी म्हणणे हेच आहे की, सतत ब्राह्मण समाजावर ताशेरे ओढणे , तोंडसुख घेणे हे सोडून पत्रकार, संपादक अर्थात वृत्तपत्रांनी वर्तमान मुद्दे , समस्या या प्रकट कराव्या हेच इथे विनम्रपणे सांगावेसे वाटते.

तसेच हे सुद्धा सांगावेसे वाटते की, छावा हा सिनेमा भिक्कार आणि दिशाभूल करणारा नसून अभिनय, तंत्रज्ञान, चित्रीकरण, गनिमीकावा दृश्ये इ दृष्ट्या सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट आहे.

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 


१३/०३/२०२५

"मोठी विहीर"...श्रीकांत भुसारी यांच्या लेखाच्या निमित्ताने

खामगांवची मोठी विहीर 

सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ?

दिनांक 11 मार्च रोजी आमचे मित्र पत्रकार, समाजसेवक तथा पर्यावरणप्रेमी श्रीकांत भुसारी यांचा "आणि मोठी विहीर बोलायला लागली.... मला मोकळा श्वास घेऊ द्या ना"  हा लेख वाचनात आला आणि अनेक विचार मनात घोंगावू लागले. मोठी विहीर ही जवळपास सर्वच खामगावकरांना परिचित आहे. खामगावकरच नव्हे तर पंचक्रोशीतील इतर गावकऱ्यांना सुद्धा ही मोठी विहीर परिचित आहे परवाचीच गोष्ट मी बालाजी प्लॉट भागातून जात असतांना एका सत्तरीतल्या व्यक्तीने मला एका दवाखान्याचा पत्ता विचारला मी त्याला पत्ता सांगत असतांना मध्येच "म्हणजे मोठ्या हिरी जवळ का भाऊ" असे ते गृहस्थ म्हणाले "अगदी बरोबर काका , तिकडेच जा , तुम्हाला सापडेल दवाखाना" मी म्हटले. यावरून सहज लक्षात येते की त्या ग्रामीण भागातून आलेल्या मनुष्याला मोठी विहीर माहीत होती. ती आहेच खूप जुनी. या विहिरीचा विचार करतांना माझ्या डोळ्यासमोर नेहमी चित्र तरळते की इंग्रजांच्या काळात कोर्टासमोर शेती असेल, त्यात ही मोठी विहीर असेल, या विहिरी जवळच जांभळाच्या भल्यामोठ्या झाडाखाली ( भाटे वकिलांच्या घरासमोर ) सुद्धा एक लहान गोड पाण्याची विहीर आहे. या दोन्ही विहिरींनी तेंव्हा लगतच्या शेतातील पिकांना, परीसरातील  मनुष्यांना, जनावरांना जीवन दिले असेल. पुढे कोर्टासमोरच्या सर्व जागा तत्कालीन अधिवक्त्यांनी घेतल्या आणि मग या भागात वस्ती वाढली. अगदी काही वर्षे अलीकडेपर्यंत ही विहीर चांगल्या अवस्थेत होती. पण हळू-हळू ही विहीर खराब होऊ लागली. विहिरीवर जाळी लावलेली असूनही सुशिक्षित भागातील म्हणजे सिव्हील लाईन भागातील या विहिरीत निर्माल्य, कचरादी टाकले जाऊ लागले आणि या विहीरीची दुर्दशा होत गेली. माझ्या स्मरणानुसार 2002 च्या खामगांवच्या भीषण पाणी टंचाई काळात या विहिरीवर मोटार बसवून तात्पुरते नळ लाऊन पाणी पुरवठा केला गेला होता आणि त्या जल संकटाच्या काळात हीच माय माऊली मोठी विहीर अनेकांची तारणहार झाली होती. अशी ही आमची मोठी विहिर मी सर्वात प्रथम पाहिली  तेव्हा तर माझ्या बालदृष्टीला खूपच मोठी वाटली होती. मला स्पष्ट आठवते मी त्या विहिरीत तेव्हा डोकावून पाहिले होते. आजही कोणतीही विहीर दिसली की त्या विहिरीत डोकावून पाहण्याची मला का कोण जाणे पण इच्छा होत असते आणि मी पाहतोच.  मी अनेक लोकांना सुद्धा विहिरीत डोकावून पुढे जातांना बघितलेले आहे. लोक विहिरीत डोकावून पाहून मग पुढे जातात ते असे का करतात ? कारण विहिरीतले पाणी पाहिले की, "चला पाणी आहे बुवा"  असा त्यांच्या मनाला दिलासा मिळत असावा. शेवटी मनुष्याला पाहिजे तरी काय असते ? तो सर्व उपद्व्याप करतो तरी कशासाठी ?  तर अन्न पाण्यासाठीच आणि म्हणूनच जीवनावश्यक ते पाणी विहिरीत आहे की नाही ते पाहण्यासाठी विहिरीत डोकाऊन पाहण्याची सवय अनेकांना असते. बालपणी मी त्या मोठ्या विहिरीत डोकावून पाहिले होते तेव्हा मला स्पष्ट आठवते की नितळ पाणी आणि त्या पाण्यात आकाश आणि ढगांचे प्रतिबिंब दिसत होते. पुढे मग ही विहीर शिकवणीला वगैरे जातांना अनेकदा पाहण्यात आली. कधीकाळी त्यात मुलांना पोहतांना सुद्धा पाहिल्याचे स्मरते आणि पुढे चांगले दिवस पाहिलेल्या याच विहिरीची अवस्था अत्यंत खराब झालेली पाहण्याचे दुर्भाग्य सुद्धा माझ्या नशिबी आले. 

     आज देशात विकास कामांचा झपाटा लागलेला आहे रस्ते निर्माणाचा वेग अतिशय जोरात आहे परंतु हा विकास जसा जरुरी आहे तसेच जुने जलस्र्तोत टिकवून ठेवणे सुद्धा जरुरी आहे. फडणवीसांनी तशी योजना सुद्धा राबवण्याचे सुतोवाच केले आहे. मोठ्या विहिरीजवळून सुद्धा सिमेंटचा रस्ता निर्माण होत आहे. वाढती वाहन संख्या त्यामुळे वाढलेली वाहतूक यामुळे रुंद रस्ते आवश्यकच आहे परंतु मनुष्याला जगण्यासाठी जल, अन्न आणि प्राणवायू, तसेच चांगले बोलणे, वागणे यांची आवश्यकता आहे. या अनुषंगाने संस्कृत मधील एका सुभाषिताचे स्मरण होते. 

पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते'

अर्थात,  पृथ्वीवर जल, अन्न, आणि चांगले बोलणे अशी तीन रत्ने आहेत , परंतू मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला  रत्न संबोधतात. 

     आता नवीन रस्ता विहिरी जवळून जाणार आहे , विहिरीचे काय होणार माहित नाही ? पण बालवयापासून ही विहीर बघत आलो आहे त्यामुळे चिंता वाटते. भुसारी यांनी त्यांच्या लेखात खूप छान लिहिले आहे की , "माय म्हातारी झाली म्हणून मायच्या छातीवर पाय देऊन तिचा श्वास कोंडून केलेली प्रगती आम्हाला कशी काय लाभेल ?  हे वाक्य वाचल्यावर मला सुद्धा लिहायची प्रेरणा झाली. खामगांव शहरात तर दोन मोठ्या माय आहेत. एक मोठी देवी आणि दुसरी ही मोठी विहीर. त्यामुळेच शहरातील, परिसरातील अनेकांना सुद्धा चिंता वाटत आहे. विकासाच्या आड कोणी नाही परंतू आपल्या पूर्वजांनी दिलेले हे जलस्त्रोत टिकवून ठेवणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. मागे माहूर शहरात एक जुनी विहीर पुनश्च उपयोगात आणली गेली. आपल्या मोठ्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होत गेल्यास आपोआप ती सुद्धा पुर्वीसारखी  शुद्ध होईल. नुकताच जिजामाता मार्ग परीसरातील अशाच एका जुन्या विहिरीतील पाण्याचा राजीव गांधी उद्यानातील झाडांना पाण्यासाठी उपयोग झाला. मोठी विहीर वाचवण्यात, या विहिरीतून मागे एकदा पाणी पुरवठा करण्यात मोठी विहीर भागातील तरुण, नागरीक यांचे सुद्धा मोठे योगदान आहे अशी माहिती नुकतीच मिळाली तो  उल्लेख इथे करणे क्रमप्राप्त आहे व त्यांचा तो प्रयत्न स्तुत्यच आहे.

     मोठी विहीर ही पक्क्या पाण्याची विहीर आहे. मोठ्या देवी प्रमाणेच ती सुद्धा खामगांवकरांना जिव्हाळ्याची आहे. जीवनदायीनी  आहे. ती राहावी, तिची अवस्था चांगली राहावी हेच नागरिकांना वाटत आहे. सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ? मायबाप सरकारने जनभावना, जुने जलस्त्रोत, विकास या सर्वांचा सुवर्णमध्य साधून ज्या पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी जागोजागी विहिरी खोदल्या त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षात योग्य काय ते करावे हीच सर्व नागरीकांची  मनीषा आहे.  

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 

०६/०३/२०२५

Article on the occassion of World Wildlife Day and PM Modi visit to Vantara, animal rescue center, Jamnagar Gujrat.

मोदी, वनतारा आणि लहान वन्यजीव ? World Wildlife Day Special 

मोदी यांची वनतारा प्रकल्पास भेट आणि जागतिक वन्य प्राणी दिवस या अनुषंगाने 
रानससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट) असे  लहान वन्यजीव लुप्त होण्याच्या मार्गावर का आहे ? यांच्या शिकारी का व कशा होत आहे ?, कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात. 

दिनांक 2 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी जामनगर गुजराथ येथील वनतारा या उद्योगपती अंबानी यांच्या हजारो एकर परिसरात बनवलेल्या वन्यजीव उपचार. संवर्धन, संरक्षण प्रकल्पाचे उद्घाटन केले. 3000 एकरच्या रिलायंस रिफायनरीच्या परिसरात असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मानवी वस्तीत सापडलेल्या, जखमी झालेल्या तसेच ज्यांना उपचाराची गरज आहे अशा वन्य प्राण्यांवर उपचार केले जातील अशी सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून अंबानी करणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे वन्यजीव प्रेम सर्वश्रूत आहे. भारतातून चित्ते लुप्त झाले होते ते आणण्याचे कार्य मोदी यांच्याच कारकिर्दीत झाले. आता या आणलेल्या चित्त्यांची नवीन पिढी सुद्धा तयार झाली आहे. यापूर्वी सुद्धा मोदी यांची वन्यजीव, जंगल भेट, मोरांना खाऊ घालणे या प्रकारची चित्रे, चलचित्रे अनेकदा प्रसारित झाली आहेत. परवापासून मोदी यांच्या वनतारा भेटीच्या रील्स समाज माध्यमांवर लोकप्रिय होतांना दिसत आहे. वनतारा हा अंबानी यांचा वन्यजीव प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा आहे. 

    या भारतात अनादी अनंत काळापासून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण दिली गेली आहे. कण्व ऋषींची कन्या शकुंतला ही सुद्धा जखमी , अनाथ अशा हरणांच्या शावकांची देखभाल आश्रमात करीत असल्याचे महाकवी कालीदास यांच्या " अभिज्ञान शाकुंतलम" या ग्रंथात वर्णन आहे. चक्रधर स्वामींच्या मांडीवर वाघांची पिले येऊन बसत. भारतात वन्यजीव वा पाळीव प्राणी यांच्यावरील  प्रेमाचे कित्येक दाखले देता येतील  पण पुढे आधुनिक काळात भारतातून इंग्रजांच्या गच्छंतीपुर्वी मुघल सम्राट व इंग्रज यांनी भारताच्या समृद्ध जंगलातून वारेमाप शिकारी केल्या. शिकार करणे म्हणजे तत्कालीन मनोरंजनाचे साधन होते, एक खेळ होता. अनेक भारतीय राजे-महाराजे शिकारीसाठी म्हणून दूर-दूर जात, जंगलातच मुक्काम ठोकत. शिकार झाली की वाजत गाजत गावात येत व मोठ्या हौशेने वन्यप्राण्यांचे मुंडके आपल्या दरबारात लावत. त्यांचे कातडे आसन म्हणून वापरत. अशाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारींमुळे पट्टेदार वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. अगदी गत महिन्यात सुद्धा चंद्रपूर जंगलात एक वाघांचा शिकारी पकडल्या गेला. चीन पर्यंत त्याचे धागे दोरे जुळले आहेत. यावर उपाय योजना म्हणून वाघांचे संवर्धन, टायगर प्रोजेक्ट निर्माण झाले. शिकारीवर बंदी आणली गेली, अभयारण्ये निर्माण केली गेली. जंगल कायदा मात्र तोच इंग्रजांनी तयार केलेला. अनेक मोठ्या जीवांचे संवर्धन झाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल, हरीण व रोही यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ती संख्या एवढी वाढली की, शहरात बिबट व अस्वल घुसू लागली तर हरणे व रोही शेतक-यांची डोकेदुखी झाली. परंतू हे घडण्याचे कारण सुद्धा मानवच आहे कारण ज्या जमीनीवर पुर्वी वन्यजीवांचा हक्क होता त्या जमिनीवर आता मानवाने कब्जा केला आहे. त्यांच्याच जमिनीवर ते आले की आपल्याला ते आपल्या हद्दीत घुसले असे वाटते. कर्नाटकातील दोडामार्ग येथील हत्तींच्या मार्गात मानवी वस्त्या, शेती झाल्याने त्यांच्या पुर्वीच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवामुळे मग त्यांना निर्घुणपणे मारण्याच्या घटना सुद्धा घडतात. भारतात कितीतरी एकर जमीन जंगलांनी व्यापली आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त वन जमीन आपल्या विदर्भात आहे. परंतू निव्वळ जंगले असून चालणार नाही तर तेथील वन्यजीव संपदा सुद्धा टिकली पाहिजे ती टिकण्यासाठी सरकारसोबत जनतेला, वन्यजीव प्रेमींना सुद्धा अग्रेसर व्हावे लागेल. 

    03 मार्च हा दिवस "जागतिक वन्य प्राणी दिन" म्हणून साजरा केला जातो. वनतारा प्रकल्पास मोदी यांची भेट तसेच जागतिक वन्य प्राणी दिन या औचित्याने इथे असे निदर्शनास आणून द्यावेसे वाटते की, वनविभाग व सरकार यांचे लक्ष हे केवळ मोठ्या वन्यजीवांच्या संवर्धनाकडेच असल्याचे दिसते. एकीकडे वाघबिबटअस्वलहरीणरोही यांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे मात्र रानससेतितरबटेर (बाटी) / लावरीटोयी (लहान पोपट)  हे सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. यांच्या शिकारी का व कशा होत आहे ? , कोण करत आहे वनखात्याचे इकडे लक्ष आहे की नाही जसे मोठे वन्यजीव जीवनचक्र चालण्यासाठीजैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक आहे तसे लहान वन्यजीव नाहीत का तर लहान वन्यजीव सुद्धा आवश्यकच आहे परंतू केंद्र व राज्य सरकारचे मात्र लहान वन्यजीव संवर्धनाकडे मात्र  लक्ष नाही असे जाणवते. जंगल भ्रमंतीस गेल्यावर रानससा मुळी दिसतच नाही किंवा कुणाला दिसल्याचे ऐकीवात येत नाही. जंगल भ्रमंती करून आल्यावर समाज माध्यमांवर लोक जे फोटो पोस्ट करतात त्यात कधीही रानससा, साळीन्दर, टोयी (लहान पोपट ) तितर यांचे फोटो शेअर केल्याचे दिसत नाही. वन्यजीवांची जेंव्हा शिरगणती होते त्यात सुद्धा या प्राण्यांची संख्या दिलेली दिसत नाही. वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिकारी व दुर्लक्ष यामुळे आज चित्त्यासारखा चपळ, तेज, सुंदर प्राणी भारतातून केंव्हाच लुप्त झाला होता परंतू सरकारने आता काही चित्ते आफिकेतून आणले आहेत.  त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. आज कित्येक फुलपाखरांच्या जाती लुप्त झाल्या आहेत.

 आज जागतिक वन्यजीव दिवसाच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त लहान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सुद्धा पाऊले उचलली  गेली पाहिजेवन्यजीवप्रेमींनी सुद्धा यावर विचार करायला हवा.


दिनांक 03/03/2022 रोजी याच विषयावर लिहिलेल्या लेखाची ही नवीन आवृत्ती.


टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापर करू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये.