Click "Follow" Button below To Follow this Blog

२०/०३/२०२५

Article about Chhaava cinema

छावा , भिकार नव्हे तर सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट?

तीन टक्के समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर  इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे.

एका वृत्तपत्रात नुकताच प्रदर्शित झालेला व लोकप्रियतेचे उच्चांक गाठत असलेला छावा हा चित्रपट कसा भिकार आणि दिशाभूल करणारा आहे या आशयाचा एक दीर्घ लेख वाचनात झाला. या लेखात स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका कशी चांगली होती आणि छावा हा चित्रपट कसा वाईट आहे याचा ऊहापोह केल्या गेला होता. खरे तर चित्रपट वाईट आहे हे सांगतांना लेखकाने चित्रपटाचे संकलन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय व कथानक यामधील त्रुटी यांचा उल्लेख करणे आवश्यक होते पण त्यावर मात्र लेखात काही भाष्य केलेले नाही. त्या ऐवजी लेखकाने महाराष्ट्रातील तीन टक्के समाज व छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूस अनाजीपंत व इतर हेच कसे जबाबदार होते हे स्पष्ट करण्याचा अतोनात प्रयास केलेला दिसतो. लेखकानी शिर्के यांनी छ. संभाजी राजांना पकडून दिले याचे काही पुरावे नाही असे म्हटले आहे तेव्हा लेखकाला असे विचारावेसे वाटते की त्यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांनी छ. संभाजीराजांचा घात केला तर त्याचे काही पुरावे लेखकाजवळ आहेत का ? असल्यास मग ते संदर्भ का दिले नाही ? आज-काल महाराष्ट्रामध्ये विशेषतः 1 सप्टेंबर 1990 नंतर महाराष्ट्रातील तीन टक्के समाज म्हणजेच ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेतांना, ताशेरे ओढतांना काही तथाकथित नेते व काही पत्रकार, संपादक दिसतात. या समाजात बुद्धिवादी व शांत वृत्तीचे लोक असल्यामुळे कोणी विशेष काही विरोध करत नाही, आंदोलने वगैरे होत नाही त्यामुळे या समाजावर तोंडसुख घेणे हे कोणालाही सहज सोपे वाटते. खरे तर आज आपल्या देशाला इतिहासातील जुने पुरावे शोधून काढण्यापेक्षा सद्यस्थितीतील देशातील समस्या, नक्षलवाद, दहशतवाद या मुद्द्यांवरती भाष्य करणारे, सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर, सरकारच्या त्रुटी दाखवून सरकारला योग्य मार्गावर आणणारी अशी वृत्तपत्रे आणि अशा पत्रकार संपादक मंडळीची गरज आहे. परंतु जे स्वतःला निर्भीड नि:पक्ष वगैरे मोठी मोठी बिरूदे लावतात आणि एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करतात हे पत्रकारितेच्या माध्यमातून अशोभनीय असे आहे असे येथे नम्रपणे सांगावेसे वाटते. इतिहासातील चुका तत्कालीन एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे आजच्या समाजाला दोषी धरणे यापेक्षा ऐतिहासिक थोर पुरुषांमध्ये जे गुण होते ते अंगीकृत करणे, त्या गुणांचा प्रचार आणि प्रसार करणे हे खरे तर वृत्तपत्रांनी करायला पाहिजे परंतु "ये जो पब्लिक है ये सब जानती है" पब्लिकला सगळे माहित असते आणि त्यांच्या सगळेच स्मरणात सुद्धा असते. त्यांना महाराष्ट्रातील बड्या वृत्तपत्रांची मालकी कुणाकडे कशी आली हे पण स्मरणात असते शिवाय कोण लोक कोणत्या गुन्ह्यातून सहिसलामत कसे बाहेर पडले हे सुद्धा माहीत असते. सतत एखाद्या विशिष्ट समाजाची हेटाळणी करून सवंग प्रसिद्धी प्राप्त करणे व आपल्या व आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवणे हे कितपत योग्य आहे? लेखकांनी त्यांच्या लेखात अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजावर मोठे ताशेरे ओढलेले आहे आणि छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू तुकाराम महाराजांचा मृत्यू याचे खापर सुद्धा ब्राह्मण समाजावरच फोडण्याचा प्रयत्न केला आहे पण औरंगजेबाने छ. संभाजी राजे आणि कवी कलश यांना हाल-हाल करून मारले त्याबद्दल मात्र काहीही भाष्य केलेले नाही. छावा चित्रपट वाईट कसा आहे हे सिद्ध करण्यापेक्षा लेखकाने ब्राह्मण समाजावरच तोंडसुख घेतले आहे. 

शेवटी म्हणणे हेच आहे की, सतत ब्राह्मण समाजावर ताशेरे ओढणे , तोंडसुख घेणे हे सोडून पत्रकार, संपादक अर्थात वृत्तपत्रांनी वर्तमान मुद्दे , समस्या या प्रकट कराव्या हेच इथे विनम्रपणे सांगावेसे वाटते.

तसेच हे सुद्धा सांगावेसे वाटते की, छावा हा सिनेमा भिक्कार आणि दिशाभूल करणारा नसून अभिनय, तंत्रज्ञान, चित्रीकरण, गनिमीकावा दृश्ये इ दृष्ट्या सर्वांगसुंदर आणि वास्तविकता दाखवणारा चित्रपट आहे.

टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये. 


1 टिप्पणी: