Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०७/२०२१

Article about renowned actor Yusuf Khan Alias Dilipkumar and his contribution to film industry and Nation.

 युसुफ खान उर्फ दिलीपकुमार




दिलीपकुमारच नव्हे तर इतरही अनेक कलाकारांना इथे मान्यता दिली गेली. पाकिस्तान कडून त्याच्या भूमीतून आतंकवादाच्या आडून किती हल्ले केले , बळी घेतले तरीही येथील कलाप्रेमी , भोळ्या हिंदू जनतेने पाकिस्तानी कलाकारांना सुद्धा इथे डोक्यावर घेतले. तसेच युसुफ खान उर्फ दिलीपकुमारलाही घेतले होते. पण दिलीपकुमार मात्र मनाने युसुफ खानच राहिला असावा का ? असा प्रश्न आवर्जून पडतो.

परवा 7 जुलै रोजी मुळ युसुफ खान असलेल्या परंतू सिनेसृष्टीत नट म्हणून दाखल होण्यासाठी दिलीपकुमार हे नांव धारण केलेल्या अभिनय सम्राटाचे निधन झाले. त्वरीत त्यावर “ट्रॅजेडी किंगचा अंत” म्हणून लेख लिहिला. परंतू तद्नंतर दिलीपकुमार यांच्यावर हा दूसरा लेख सुद्दा लिहावासा वाटला. 1970 च्या आसपास दिलिपकुमारचा गोपी चित्रपट झळकला होता. गोपीतील रफीच्या आवाजात “सुखके सब साथी दुख मे ना कोई” हे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे भजन म्हणणारा भोळा भाबडा दिलीप , त्यापूर्वी नया दौर मधला “मॅन व्हर्सेस मशीन” कथेच्या अनुषंगाने मानवाचा टांग्याचा रोजगार हिरावला जाऊ नये म्हणून लढा देणारा नायक. याप्रकारचे अत्यंत अभ्यासपुर्वक असे  चित्रपट तो करायचा. त्याने बहुतांश वेळा ग्रामीण भागातील भोळ्या नायकाच्या  भूमिका साकारल्या. त्याच्या या अशा साध्या, भाबड्या तरुणाच्या भूमिकांमुळे त्याची भोळी अशी प्रतिमा भोळ्या मनाच्या भारतीय जनमानसात निर्माण झाली. 

      भारतीय मन हे सिनेसृष्टी , संगीत , गीते , नाटक , नाट्यसंगीत , शास्त्रीय संगीत, नृत्ये आदींची आवड असलेले रसिक मन आहे. हिंदू धर्मात अनादी अनंत काळापासून , वेदांमधून आलेले शास्त्रीय संगीत तसेच कला यांना मोठे स्थान आहे. या स्थानामुळे हिंदू जनता कलाकारांचा जात , धर्म यांचा मुलाहिजा न बाळगता सदैव सन्मान करीत आली आहे. या मुळेच युसुफ खान उर्फ दिलीपकुमारला भारतीय जनतेने डोक्यावर घेतले त्याला ट्रॅजेडी किंगचा खिताब देऊन अभिनयाचा अनभिषक्त सम्राट म्हणून घोषित केले, माध्यमांनी त्यांच्यावर नेहमीच स्तुती सुमने उधळली. केवळ दिलीपकुमारच नव्हे तर इतरही अनेक कलाकारांना इथे मान्यता दिली गेली. पाकिस्तान कडून त्याच्या भूमीतून आतंकवादाच्या आडून किती हल्ले केले , बळी घेतले तरीही येथील कलाप्रेमी , भोळ्या हिंदू जनतेने पाकिस्तानी कलाकारांना सुद्धा इथे डोक्यावर घेतले. सलमा आगा, झेबा बख्तियार, नुसरत फतेह अली खान, अदनान सामी, गुलाम अली असे कितीतरी कलाकार सांगता येतील. 

हिंदूच्या घरातील मंगल प्रसंगी आजही बिस्मिल्ला खान यांनी वाजवलेल्या सनईचे मधूर स्वर वाजत असतात. सोनू निगमच्या घरात रफी साहेबांचा मोठा फोटो आहे. रफी साब मेरे वालीद जैसे है असे तो अभिमानाने सांगतो. तसेच दिलीपकुमारचे झाले. त्याला पण इथे किती मान मरातब मिळाला. धर्मेंद्र ने त्याला आपला जेष्ठ भाऊ मानले.अनेक नटांनी त्याला आपला आदर्श मानले. पण दिलीपकुमार मात्र मनाने युसुफ खानच राहिला असावा का ? असा प्रश्न आवर्जून पडतो. त्याची काही कारणे आहेत.

      आपल्या उर्दू भाषेवरील प्रभूत्वाचा त्याला अहंकार होता म्हणूनच अगदी सुरूवातीला            लता मंगेशकर यांना “मराठी लोगोके गाने मे दाल चावल की बू आती है |” म्हणून त्याने हिणवले होते. (लता दीदी मात्र काही मौलवींकडे जाऊन उर्दू शिकत होत्याच पुढे त्यांनी उर्दू शब्दोच्चारणावर प्रभुत्व मिळवले व नंतर मग दिलीकुमार यांनी त्यांचा गौरव केला होता. ) 

    पाकीस्तानातील कर्करोग इस्पितळास त्याने  दहा लाखाची मदत केली होती व त्यामुळे त्याला पाकीस्तान सरकार कडून पुरस्कार प्राप्त झाला होता. इतरही काही ऐकीव व वाचनात आलेली कारणे आहेत परंतू त्याचा ऊहापोह इथे करावासा वाटत नाही. 

  त्याला पाकीस्तान कडून पुरस्कार प्राप्त झाल्यावर त्याच्यावर मोठी टीका झाली. त्याने मग अटलजींना पुरस्कार परत करू का असे विचारले होते. परंतू यापेक्षा फाळणीपासून जो पाकीस्तान भारताशी कुरापती काढत आला आहे , ज्या  देशामुळे आपले कित्येक जवान हुतात्मा झाले आहेत त्याच पाकीस्तानातील इस्पितळास मदत करतांना मात्र त्याला काहीच गैर वाटले नाही. त्यावेळी “अशी मदत करू का ?” असा त्याने कुणाचा सल्लाही घेतला नाही. शिवाय भारतावरील संकटाच्या काळात अमिताभ बच्चन , नाना पाटेकर  अक्षय कुमार , अजय देवगण , विक्रम गोखले यांचे वडील चंद्र्कांत गोखले व इतर अनेक सिनेकलाकारांनी मदतीचा हात पुढे केला तसा दिलीपकुमार ने दिलेला कधी दिसला नाही. तसे कधी काही ऐकण्यात, वाचनात आले नाही. परंतू तरीही दिलीपकुमारला जनतेने इथे प्रेमच दिले, सन्मान दिला , सरकार कडून पद्म पुरस्कार मिळाला , दादासाहेब फाळके सन्मान मिळाला परंतू ज्या हिंदुस्थानने त्याला भरभरून सन्मान , प्रेम दिले त्या हिंदुस्तानला मात्र हा युसुफ खान उर्फ दिलीपकुमार कधी मदतीचा हात देण्यास पुढे आलेला दिसला नाही. 

०७/०७/२०२१

Tribute to Dilipkumar

 ट्रॅजेडी किंगचा अंत

आज आपण पाहतो दोन-दोन घटस्फोट देणारे अभिनेते याच चित्रपटसृष्टीत आहे. त्या घटस्फोटाचे ते समर्थन पण मोठ्या खुबीने करतात. चित्रपटातील हे अभिनेते, छोट्या छोट्या मुद्द्यां वरून वेगळे होणारे समाजातील कित्येक नवविवाहीत यांनी दिलीपकुमार-सायरा यांच्या प्रेमाचा, इतकी वर्षे प्रेमाने एकत्र राहण्याचा , संसार करण्याचा आदर्श जरूर घ्यावा.

त्याचे कृष्ण धवल चित्रपट पाहणारे अनेक लोक सुद्धा आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. परंतू 1980- 90 च्या दशकात आलेल्या त्याच्या शक्ती, कर्मा, मशाल , विधाता , इज्जतदार, कानून अपना अपना अशा चित्रपटांमुळे आता चाळीसी-पन्नाशीत असणा-यांना मात्र तो नक्कीच आठवतो. नवीन पिढीला मात्र कदाचित तो तितकासा माहित नसावा. त्याच्या प्रकृती बाबतच्या वृत्तांमुळे एक जुना अभिनेता एवढीच काय ती नवीन पिढीशी त्याची ओळख असू शकते. आजच्या चाळीसी-पन्नाशीतील अनेकांनी त्याचे जुने चित्रपट सुद्धा पाहिलेच असतील कारण या लोकांनी केवळ एकच वाहिनी असलेला दूरदर्शनचा जमाना तसेच टॉकीजमध्ये जुने चित्रपट पुनर्प्रदर्शित होण्याचा जमाना पाहिला आहे. बालपणी मी एके वर्षी 15 ऑगष्ट ला दूरदर्शनवर “ ये देश है वीर जवानो का” ही गाणे जेंव्हा पाहिले तेंव्हा दिलीपकुमार हे नांव माहित झाले. पुढे त्याचे काही चित्रपट सुद्धा पाहिले. “अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नही” , “साथी हाथ बढाना , एक अकेला थक जायेगा” अशी रफीच्या आवाजातील त्याची देशभक्तीपर गीते ऐकल्यावर , पुढे शोलेतील ठाकूर प्रमाणे दुर्जनांचा नाश करण्यासाठी तरुणांना हाताशी घेऊन लढा पुकारणारा कर्मा तील त्याचा ठाकूर विश्वप्रतापसिंग , मशाल मधील अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा पत्रकार, आपल्या गुन्हेगार मुलाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नशील असा शक्ती मध्ये अमिताभच्या पित्याची भूमिका करणारा पोलीस अधिकारी अशा नानाविध भूमिका साकारणारा दिलीपकुमार त्याचा अभिनय पाहिल्यावर आवडू लागला होता. सुरुवातीला  हॉटेलच्या व्यवसायात वडीलांना मदत करणा-या मो. युसुफ खान यांस बॉम्बे टॉकीजच्या देविकाराणी या जुन्या अभिनेत्रीने अभिनेता बनण्यास प्रेरणा दिली व दिलीपकुमार हे नांव दिले. कृष्ण धवल जमान्यात त्याने अनेक हिट चित्रपट दिले. सतत दु:खी भूमिका साकारल्यामुळे तो काही काळ नैराश्याने ग्रासला होता. म्हणून पुढे त्याने मानसिक  रोग तज्ञांंच्या सल्ल्यानुसार कोहिनूर, राम और श्याम सारख्या काही चित्रपटात विनोदी भूमिका केल्या. 

    90 च्या दशकात त्याला पाकीस्तानने “निशान- ए – इम्तीयाज” हा पुरस्कार दिल्यावर व त्याने पाकीस्तानातील इस्पितळास मदत केल्याची चर्चा यांमुळे त्याला बरीच टीका सहन करावी लागली होती. त्याने पुरस्कार परत करण्याचे सुद्धा ठरवले होते. परंतू भारत-पाक संबंधासाठी त्याला काही राजकीय मंडळीनी तसे करण्यापासून रोखले होते. मुंबई मधील बांद्रा येथील अनेक सुधारणा या दिलीपकुमारच्या पाठपुराव्यामुळे झाल्या आहेत. दिलीपकुमारमुळे धर्मेंद्र , मनोजकुमार सारख्या अभिनेत्यांना चित्रपटात येण्याची प्रेरणा मिळाली होती. अभिनयाचा बादशहा असलेल्या दिलीपकुमारची सरळ-सरळ नक्कल करून आज अनेक नट किंग, बादशहा अशी बिरुदावली मिरवतात. 

दिलीपकुमारचे चित्रपट , त्याचा अभिनय , दादासाहेब फाळके पुरस्कार , त्याचा सुरुवातीच्या काळातील संघर्ष या सर्व बाबी व त्याची चर्चा तर होईलच परंतू नवीन पिढीने दिलीपकुमार व सायराबानू या दाम्पत्यामध्ये असलेल्या प्रेमाचा आदर्श मात्र घेणे रास्त होईल. दिलीपकुमार व त्याची काळजी घेणारी त्याची पत्नी ही दृश्ये सर्वानी पाहिली आहेत. सायराबानूच्या सेवेमुळे दिलीपकुमारने नव्वदी पार केली होती. आज आपण पाहतो दोन-दोन घटस्फोट देणारे अभिनेते याच चित्रपटसृष्टीत आहे. त्या घटस्फोटाचे ते समर्थन पण मोठ्या खुबीने करतात. चित्रपटातील हे अभिनेते, छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून वेगळे होणारे समाजातील कित्येक नवविवाहीत यांनी दिलीपकुमार-सायरा यांच्या प्रेमाचा, इतकी वर्षे प्रेमाने एकत्र राहण्याचा , संसार करण्याचा आदर्श जरूर घ्यावा. 

     आज या ट्रॅजेडी किंगचा अंत झाला, त्याला सुपूर्द ए खाक केले जाईल. "राजा हो या रंक सभी का अंत एकसा होयी" (👈 click to listen song) ही त्याच्याच गाण्यातील ओळ अंताचे भान ठेवून जीवन व्यतीत करायला हवे असे सांगून जाते.

#ट्रॅजेडी_किंगचा_अंत


०१/०७/२०२१

Part - 2 MAD, Some Memories , Article series about mad persons and madness.

वेडयांच्या विश्वात - भाग 2

काही आठवणी

कुणीतरी कॅसेट बदलवली रफीच्या आवाजातील मधुर गीते वाजू लागली. टेपरेकॉर्डरवरून रफीच्या आर्त , करुण आवाजातील “खि लौsss नाsss जानकर तुम तो" या ओळी ऐकू आल्या. खिलौना चित्रपटात वेडया माणसाची भूमिका वठवणारा हरहुन्नरी अभिनेता संजीवकुमार खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून गीत गात असलेले दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले. नुकतेच त्या वेडयांच्या इस्पितळात पाहिलेले अनेक वेडे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले.

मागील भागापासून पुढे

ठाण्याच्या वेडयांच्या इस्पितळातील कर्मचारी निवास्थानात केलेला मुक्काम , मुंबई  दर्शन , जीवाची मुंबई करून आम्ही गच्छंतीस निघालो. प्रवासात मुंबईच्या आठवणी , गप्पा सुरु होत्या. तेंव्हा चार चाकी गाडयांत ऑडीओ कॅसेट प्ले होणारा कार टेप असे त्यात रेडिओ नव्हता व एफ एम बँड सुरु झाले नव्हते. कुणीतरी कॅसेट बदलवली रफीच्या आवाजातील मधुर गीते वाजू लागली. गाडीने वेग पकडला होता. सर्व पेंगू लागले होते. मला प्रवासात क्वचितच झोप लागते त्यामुळे मी बाहेरील दृश्ये न्याहाळत होतो. खिडकीचा प्रश्नच नव्हता, कमांडर जिपला दरवाजे नसत पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून मेनकापडाचे गुंडाळून ठेवता येतील असे दरवाजे असत त्यामुळे हवेशीर वाटत असे. आता तसे दरवाजे अ‍ॅटोरिक्षाला असतात. टेपरेकॉर्डरवरून रफीच्या आर्त , करुण आवाजातील “खि लौsss नाsss जानकर तुम तो" या ओळी ऐकू आल्या. खिलौना चित्रपटात वेडया माणसाची भूमिका वठवणारा हरहुन्नरी अभिनेता संजीवकुमार खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून गीत गात असलेले दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले. नुकतेच त्या वेडयांच्या इस्पितळात पाहिलेले अनेक वेडे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. आम्ही मुक्काम केलेले निवासस्थान व आत्याचे निवासस्थान यात 100-200 पावलांचे अंतर होते व या रस्त्याने जातांना अनेक वेडे दिसत होते. कुणाची भेदक नजर, कुणी शुन्यात नजर लावून बसलेले, कुणी स्वत:शीच बडबडत असलेले, कुणी मोठ्याने ओरडणारे राठ मोकळे केस सोडलेली मांडीवरील गाठोड्याला बाळाप्रमाणे थोपटणारी , त्याच्याकडे पाहून हसणारी वेडी स्त्री , कुणी येणा-या-जाणा-यांकडे पाहून हसत होते व निरर्थक बडबडत होते. मध्येच एक जण येऊन आम्हाला नमस्कार करून गेला. आम्हाला आश्चर्य वाटले "तो पण वेडा आहे , पण हिंसक नाही. म्हणून आम्ही त्याला मोकळेच ठेवले आहे" आत्या म्हणाली. प्रथम दर्शनी त्याला कुणीही पाहिले तर कुणालाही तो वेडा न वाटावा असाच दिसत होता.

ही सर्व दृश्ये त्या परतीच्या प्रवासात माझ्या डोळ्यासमोर आली होती. कुणी वेडे का होत असावे ? मेंदूवर असा काय बरे परीणाम होत असावा की एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती पार कोलमडून जावी. असे नाना प्रश्न त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाले होते. परंतू या प्रश्नांची उत्तरे मात्र माझ्याकडे नव्हती व नंतर ती शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. पुढे जीवनाच्या रहाटगाडग्यात त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा विसर पडून गेला. तो मुंबई प्रवास , ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात एक रात्र केलेला मुक्काम या गोष्टी इतक्या वर्षानंतर परत स्मरण होण्यास शाळेजवळ दोन महिन्यांपुर्वी दिसलेला तो वेडा तरुण कारणीभूत होता. त्या दिवशी दिसलेला तो तरुण व त्यामुळे आठवलेला खुप वर्षांपूर्वी ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात एक दिवस केलेला मुक्काम या दोन घटनांनामुळे मला वेडे , वेड्यांचे इस्पितळ , त्यांची हालत, रस्त्यावर फिरणारे वेडे व त्यांना आणखी वेडे करणारे काही शहाणे लोक व मुले , वेड्यांसाठी कार्य करणा-या काही संस्था , वेड्यांसाठी सेवाभावाने कार्य करणारे डॉक्टर्स हे सर्व आठवले. शाळे समोरून तो तरुण गेल्यावर मी या काही आठवणींच्या जाळ्यातून बाहेर आलो, शाळेतून घरी परत येतांना मला माझ्या जीवनात मी पाहिलेली जी मनोरुग्ण, वेडी माणसे होती त्यांचे एकापाठोपाठ एक असे स्मरण होत होते. आगामी काहीं लेखात मी तसेच अनेकांनी पाहिलेल्या या व्यक्तींबाबत येईलच.

क्रमश:

👉या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

२४/०६/२०२१

Part - 1 MAD , series about mad persons and madness.

वेड्यांंच्या विश्वात - भाग 1

संग्रहित चित्र

..एक तरुण रस्त्यालगतच्या एका रुईच्या झाड़ा जवळ हात जोडून बसलेला दिसला. काही पुटपुटत होता. तोंडावरील मास्क डोळ्यावर नेत होता व पुन्हा तोंडावर घेण्याचा त्याचा चाळा सुरु होता. त्याच्या त्या हालचालींवरुन त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे जाणवत होते.  मी बराच वेळपर्यंत त्याला पाहिले. तो बडबडत होता , हावभाव करीत होता,माझ्या डोक्यात असंख्य विचार मधमाशांच्या पोळ्यावर एखाद्या व्रात्य मुलाने दगड मारल्यावर मोठ्या संख्येने जशा मधमाशा घोंघावतात तसे घोंघाऊ लागले. तो माझ्या दृष्टीआड़ गेला परंतू मी तो बसलेल्या ठिकाणी बघत विचारात गर्क होऊन गेलो. वेडे , वेडेपण , त्यांच्यावरचे ईलाज, कोणी वेड का होते असे अनेक विचार मनात येत होते. काही आठवणी सुद्धा आल्या.त्यापैकीच काही आगामी लेखांत देण्याचा हा एक प्रयन्त.

काही ना काही वेडेपण हे प्रत्येकात असते आणि या वेडेपणामुळे अनेकांकडून मोठमोठी कार्ये पार पाडली जातात व जात आहेत. परंतू एखादा ध्यास मनाशी बाळगून तो पूर्ण करण्याच्या मागे वेडे झालेले वेगळे व मानसिक स्वास्थ्य बिघडून शरीर, शरीर धर्म आदींचे भान हरपून पुर्णपणे वेडे झालेले लोक ज्यांना आपण पागल म्हणतो ते वेगळे. यातील दुस-या प्रकारातील लोकांवर वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होण्यापूर्वी उपचार होत नसत , तंत्र-मंत्र वगैरे क्रिया केल्या जात व त्याने अशा रुग्णांवर अधिकच गंभीर परिणाम होत असत. अशातीलच काही लोकांना मग परिवार सोडून देत असे , घरात डांबून ठेवत असे व आजही तसे होत असावे. काही यात्रांमध्ये तर अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. मराठीतील वेडा, हिंदीतील पागल, पगला या शब्दांना इंग्रजीत Mad हा शब्द आहे ज्याचा अर्थ सर्वसामान्यपणे काम न करणारा , मनोरुग्ण असा होतो. असे नानविध विचार त्या दिवशी मनात आले कारण त्या दिवशी शाळेच्या मैदानात उभा असता एक तरुण रस्त्यालगतच्या एका रुईच्या झाड़ा जवळ हात जोडून बसलेला दिसला. काही पुटपुटत होता. तोंडावरील मास्क डोळ्यावर नेत होता व् पुन्हा तोंडावर घेण्याचा त्याचा चाळा सुरु होता. त्याच्या त्या हालचालींवरुन त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे जाणवत होते. वाढत्या कोरोनामुळे दुस-यांदा लॉकडाऊन घोषित झाले होते , त्यामुळे विद्यार्थी नसल्याने मी बराच वेळपर्यंत त्याला पाहिले. तो बडबडत होता , हावभाव करीत होता व माझ्या डोक्यात असंख्य विचार मधमाशांच्या पोळ्यावर एखाद्या व्रात्य मुलाने दगड मारल्यावर मोठ्या संख्येने जशा मधमाशा घोंघावतात तसे घोंघाऊ लागले. तो माझ्या दृष्टीआड़ गेला परंतू मी तो बसलेल्या ठिकाणी बघत विचारात गर्क होऊन गेलो. वेडे , वेडेपण , त्यांच्यावरचे ईलाज, कोणी वेड का होते असे अनेक विचार मनात येत होते. काही आठवणी सुद्धा आल्या. 

खुप वर्षांपुर्वी मुंबईला गेलो होतो , जिप घेऊन. पहिला मुक्काम केला माझ्या एका आत्याकडे, ठाण्याला. मुंबईत गाडी चालवण्याचा अनुभव नसल्याने आत्या मुंबईतीलच चालक उपलब्ध करून देणार होती. माझी आत्या नर्स म्हणून ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये कार्यरत होती. एका रिकाम्या निवासस्थानात तिने आमची मुक्कामाची सोय केली होती. हे निवासस्थान सुद्धा आडबाजूला होते व शौचालय निवासस्थानापासून दूर होते. त्या रुग्णालयातील पागल लोकांचे आवाज ऐकू येत होते. रात्री खुप भयाण वाटले होते तिथे. पण 600 किमीचा प्रवास जिप मधून केल्याने प्रचंड थकवा होता त्यामुळे लगेच झोप लागून गेली. सकाळी आत्याच्या निवासस्थानी जातांना अनेक पागल दृष्टीस पडले. कुणाला कडक बंदोबस्तात , कुणाला बेड्या घातलेले तर कुणाला थोडीफार मोकळीक होती. त्यांच्या त्या नजरा , त्यांचा आक्रोश , त्यांचे विक्षिप्त वागणे मनाला भेदून गेले होते.                

     पुर्ण पागल झालेले लोक सर्वांनीच पाहिले असतात तसे ते मी सुद्धा पाहिले आहेत. त्यांनाच आणखी कित्येकांनी सुद्धा पाहिले असेल. जरी हे लोक पागल होते तरी ते त्यांच्या शहरात  सर्वपरिचित होते. आजपासून आगामी लेखांत वेड्या लोकांबद्दल, त्यांच्या   त-हांबद्दल लिहिणार आहे.   

👉या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

                                                    क्रमश:

१७/०६/२०२१

Article about various demands by people, organisations etc

मांगो..मांगो..मांगो 


आपल्या मागण्यांमुळे  संविधान व त्यातील प्रास्ताविकातच एकता, एकात्मता , समता यांसोबतच सर्वात मुख्य बाब म्हणजे “दर्जाची व संधीची समानता प्रवार्धित करण्याचा निर्धार करण्याचा संकल्प” असा जो उल्लेख आलेला आहे त्याला तडा तर पोहचत नाही आहे ना ? दर्जा , संधी , समानता , एकता हे केवळ शब्दमात्र असल्याचे वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षण , नोकरी या क्षेत्रात दर्जा, समानता या गोष्टी पाहण्यात येत नाही.

1980 च्या दशकात वरील शीर्षकाचे एक खळबळ उडवून देणारे “आयटेम साँग”  खुप गाजले होते. तुम्ही जे काही पाहिजे ते माग अशा आशयाचे हे गीत होते. चित्रपटातील त्या गीताचा हेतू वेगळा होता. परंतू मागणे , मागण्या यांचा या गीतात आलेला उल्लेख. हा, हे गीत आठवण्यामागचे कारण. आपल्या देशात सतत काही ना काही मागण्यांची री ओढणे सुरू असते. गेल्या काही वर्षांपासून तर मागण्यांचे हे स्तोम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कुठल्यातरी संघटना , व्यक्ती , संस्था यांच्या स्वहितासाठीसाठी काही ना काही मागण्या सरकारकडे करणे हे सुरूच असते. वृत्तपत्रातून प्रशासनातील अधिका-यांना कुठल्या ना कुठल्या मागण्यांची निवेदने देत असल्याच्या बातम्या , छायाचित्रे रोज प्रकाशित होतच असतात. मागण्यांसाठी आंदोलने , मोर्चे , बंद याचे आवाहन केले जाते. यांमुळे मग सामान्य नागरिक वेठीस धरले जातात. वाहूतक खोळंबते , क्वचित प्रसंगी हिंसक वळण लागते. या प्रकारामुळे राष्ट्राची गती तर अवरोधित होत असतेच शिवाय नागरीकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना सुद्धा क्षीण होत असते. प्रत्येकाला आपल्या मागण्या ह्या रास्तच आहे असे वाटत असते , तशा त्या असूही शकतात परंतू त्या मागण्यांमुळे दुस-यांच्या हक्कावर गंडांतर येत आहे का ? त्या मागण्यांमुळे आपल्या संविधान व त्यातील प्रास्ताविकातच एकता, एकात्मता , समता यांसोबतच सर्वात मुख्य बाब म्हणजे “दर्जाची व संधीची समानता प्रवार्धित करण्याचा निर्धार करण्याचा संकल्प” असा जो उल्लेख आलेला आहे त्याला तडा तर पोहचत नाही आहे ना ? दर्जा , संधी , समानता , एकता हे केवळ शब्दमात्र असल्याचे वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षण , नोकरी या क्षेत्रात दर्जा, समानता या गोष्टी पाहण्यात येत नाही. जास्तीत जास्त मागण्या ह्या व्यक्तिगत , स्वत:च्या संस्था , संघटना , समाज यांच्यासाठीच केल्या जात असतांनाचे चित्र दिसून येते. प्रत्यक्षात देशहीत कशात आहे याकडे मात्र संपूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.

देशा करीता , देशाच्या हिताच्या मागण्या जसे नक्षलवाद्यांचा बिमोड करा , शहरी नक्षलवाद्यांना कठोर शासन करा , आतंकवाद्यांना फाशी द्या , गैरकृत्य करणारे नेते , व्यक्ती यांना शिक्षा करा , अशा मागण्यांचे प्रमाण क्वचितच असते. उलट बरेच प्रसंगी तर आतंकवादी व गैरकृत्य करणारे नेते यांच्या मागे जनता उभी ठाकलेली दिसली. याला  आपल्या राष्ट्राचे दुर्भाग्य नाही म्हणणार तर आणखी काय ? असे जर होत असेल तर ही आपली अधोगतीकडे होत असलेली वाटचाल ठरणार नाही का ? परंतू उपरोक्त बाबींचा विचार शांत चित्ताने , सर्वांना , सर्व पक्षीयांना देशहितासाठी एकत्र येऊन होत तर नाहीच , होतांना दिसतही नाही व भविष्यातही होईल की नाही याची शाश्वती नाही. ज्या मागण्यांनी दुस-यांच्या हक्कावर गदा येत नसतील तर अशा न्याय्य मागण्या करणे रास्त आहे 

    आपला देश हा हजारो वर्षांपासून देणा-यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपली कवच कुंडले काढून देणारा  दानशूर कर्ण , दरवर्षी स्वत:ची संपत्ती दान करणारा हर्षवर्धन , मरेतो स्वत:च्या शरीराचे  मांस दान करणारा राजा शिबी अशा  कित्येक राजांचा असा देश आहे. त्यागी पुरुषांचा , महात्म्यांचा देश आहे , “वही जीते है, जो दुसरोके लिये जीते है” असा संदेश देणा-या स्वामी विवेकानंद यांचा देश आहे , देशातील गरीबी पाहून वस्त्र त्याग करणा-या महात्मा गांधींचा देश आहे. परंतू सांप्रत काळात मात्र याच देशात हे सर्व विसरून केवळ स्वत:चा स्वार्थ साध्य होईल मग दुस-याचे जे काय होईल ते होवो अशा प्रकारच्या याचनाच जास्त होतांना दिसून येत आहे. विविध मागण्या करतांना आपल्या भारतमातेवर काय संकटे आहेत , कोरोना , दहशतवाद , चिनने आता श्रीलंकेचे एक बेट तर हस्तगत केले आहेच शिवाय कोलंबो मध्ये सुद्धा त्याने शिरकाव केला आहे. आगामी काळात आपल्या देशासाठी हे मोठे आव्हानच ठरणार आहे. सरकार जी काय पाऊले उचलायची ती उचलेल परंतू नागरिक म्हणून आपले मात्र या वरील बाबींकडे दुर्लक्ष आहे. देशाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून आपल्या देशात मात्र वैयक्तिक फायदा कसा करून घेता येईल, आपल्याच पात्रात तूप कसे ओढता येईल यात चढा ओढ करतांना निव्वळ मांगो ...मांगो ...मांगो असा मागण्यांचा सपाटा सुरु आहे.