२१/१२/२०२३

Article about #chillai_kalan

 चिल्ला-ए-कलां

या शीत काळात मला मात्र जिज्ञासा लागली होती ती त्या वृत्तपत्राच्या शीर्षकात असलेल्या "चिलाई कालान" या शब्दाची. आणि म्हणून "चिलाई कालान" चा शोध मी घेऊ लागलो

परवाच्या एका स्थानिक वृत्तपत्रांमध्ये "चिलाई कालान" नावाच्या हवामानाबाबतच्या अंदाजाचे वृत्त वाचले. खामगावचे हवामान तज्ञ व आमचे  ज्येष्ठ नागरिक मित्र श्री प्रकाशभाई पारेख हे हवामान तज्ञ असून त्यांनी केलेले हवामानाचे अनेक अंदाज हे खरे ठरलेले आहेत. प्रकाशभाई पारेख वय वर्षे 74 परंतु या वयातही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. इंग्रजी संभाषण, हवामान अभ्यास व इतरही अनेक नवीन बाबी शिकण्यास ते नेहमी तत्पर असतात. मागच्या आठवड्यात त्यांनी 21 डिसेंबर पासून चाळीस दिवसापर्यंत खूप थंडी राहील असे भाकीत केले होते त्याचेच ते "चिलाई कालान" शीर्षक असलेले हवामानाबाबतच्या अंदाजाचे वृत्त होते. आणि खरोखरच पारेखजींच्या या भाकीताची जाणीव कालपासूनच झाली. काल म्हणजे 20 डिसेंबर पासून थंडी वाढल्याचे दिसून येत आहे. अकोला, नागपूर, अमरावती, वाशीम, यवतमाळ सर्वच जिल्हे गारठले आहेत. यवतमाळचे कालचे तापमान तर 8.5 इतके कमी होते. परंतु या शीत काळात मला मात्र जिज्ञासा लागली होती ती त्या वृत्तपत्राच्या शीर्षकात असलेल्या "चिलाई कालान" या शब्दाची. म्हणून "चिलाई कालान" चा शोध मी घेऊ लागलो. तसे तर "चिलाई कालान" वाचल्यावर थोडा अंदाज मात्र मी माझ्या मनानी काढला होता. इंग्रजी मधले "चिल" अर्थात थंड आणि संस्कृत मधले काल असा काहीतरी दोघांचे मिळून चिलाई कालान म्हणजे थंडीचा काळ असा तो शब्द असावा असे मला वाटले होते. परंतु चिलाई कालान हे आपल्या अंदाजाप्रमाणे नसून काहीतरी वेगळे असावे असेही कुठेतरी वाटत होते. म्हणून चिलाई कालानबद्दलचा शोध मी घेऊ लागलो. तेंव्हा "चिल्ला-ए-कलां" हा अति थंडीसाठी असलेला फारसी शब्द असल्याचे सापडले. तसे फारसी भाषेतील बरेचसे शब्द भारतामध्ये वापरले जातात. "जिहाले मस्कीन मुकुन बरंजीस" हे एका गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतातील शब्द हे सुद्धा फारसी भाषेतील आहेत. असो ! तर चिलाई कालान हा फारसी शब्द म्हणजे अति थंडी असा होतो. दरवर्षी 21 डिसेंबर ते 29 जानेवारीपर्यंत काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीचा काळ असतो. या 40 दिवसाच्या कडाक्याच्या थंडीला "चिल्ला-ए-कलां" असे म्हटले जाते. याच शब्दाचा अपभ्रंश पुढे चिलाई कालान असा झाला. त्याप्रमाणे काश्मीरमध्ये आता कडाक्याची थंडी आहे व त्यामुळेच आपल्या भागात सुद्धा कडाक्याची थंडी राहणार आहे. पुर्वी दिवाळीत मोठी थंडी राहात असे. दिवाळीत अभ्यंग स्नान आणि इतर विधींसाठी सकाळी लवकर उठणे सुद्धा जीवावर येत असे. त्या गारठलेल्या पहाटे बच्चे कंपनीस सुद्धा शाळा, शिकवणी आदींना जाणे नकोसे वाटते. परंतु  यंदा डिसेंबर अर्ध्यावर गेला तरी थंडी नव्हती. ऋतुचक्र बदलल्याचे हल्ली नेहमीच जाणवते. पावसाळा उशीरा आला, हिवाळा सुद्धा उशिरा आला. उन्हाळा मात्र लवकर येतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सारे बदल होत आहेत. आपल्या वैदर्भीयन लोकांना मात्र प्रतीक्षा असते ती "थंडी गुलाबी ,हवा ही शराबी" अशा हिवाळ्याची. विदर्भ खूप तापतो , म्हणून येथील तमाम जनतेला हा गारवा मोठा आल्हाददायी वाटतो. येथील जनतेला हिवाळा हवाहवासा वाटतो. आता 20 डिसेंबर पासून असा तो प्रतिक्षित "चिल्ला-ए-कलां" अर्थात बोचरा हिवाळा आता सुरू झाला आहे. समस्त नागरिकांनी आता या "चिल्ला-ए-कलां" चा आनंद घ्यावा, आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी, गरम चहाचा आस्वाद घ्यावा, उबदार कपडे जे आपल्याला कमी घालायला मिळतात त्या कपड्यांची हौस भागवून घ्यावी, पौष्टिक डिंकाच्या लाडूसारख्या हिवाळ्यातील पदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि हा "चिल्ला-ए-कलां" आनंदात व्यतीत करावा.

१९/१२/२०२३

What happened before 10 years ? , read in this article.

एक दशक लेखनाचे 

जननिनाद मधील स्तंभ व तदनंतर ब्लॉग सुरु करून 10 वर्षे झाली.लेखन सुरु केले त्यावेळी असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु वाचकांचा उदंड प्रतिसादवेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रियाप्रेरणा यामुळे आजच्या या लेखनाच्या दशवर्षपूर्ती पर्यंत येऊन पोहचलो. लेखांना मिळालेल्या
प्रतिसादाबद्दल खामगाव परिसरातील 
वाचकवर्ग तसेच वृत्तपत्र इंटरनेट आवृत्तीब्लॉग, फेसबुकच्या 
माध्यमातून वाचणारे तसेच जन-निनाद , तरुण भारत, वृत्तकेसरी, देशोन्नतीचे संपादक, आणि 
कर्मचारीवृन्दांचे आभार.

     2013 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाची होळी कुण्यातरी नतद्रष्टांनी केली. या घटनेने संताप झाला दुःख झाले आणि ते दुःख, तो रोष कागदावर लिहून व्यक्त केला आणि तोच पहिला लेख ठरला. मग 19 डिसे 2013 रोजी हा पहिला लेख प्रकाशित झाला व तेंव्हापासून दर गुरुवारी एक लेख याप्रमाणे लेख लिहिता लिहिता आज 19 डिसे 23 रोजी लेखनास 10 वर्षे सुद्धा झाली. या 10 वर्षातील आजचा हा 575 वा लेख आहे. वृत्तपत्र व ब्लॉग मिळून हे 575 लेख आहेत. लिखाण सुरु केल्यावर काही कालांतराने ब्लॉग लिहिणे सुरु केले त्यामुळे या 575 लेखांपैकी 500 लेख हे ब्लॉगवर आहेत, सुरुवातीचे 75 लेख ब्लॉगवर पोस्ट झाले नाहीत. कोणतेही एक कार्य नियमित करावे असे म्हटले जाते इतर माहीत नाही परंतु लेखन कार्य का कोण जाणे मी नियमित करू लागलो. कदाचित समाजातील विघटनवाद, निराशावाद, अपप्रवृत्ती, नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, भ्रष्ट नेते, नोकरशहा अशा बाबी व अनेक सकारात्मक बाबींनी लेखनास प्रवृत्त केले व या कार्यात नियमितता आजपावेतो तरी राखू शकलो. सहज म्हणून एक लेख लिहिला, लेख काय 15-20 ओळी रखडल्या होत्या. पण ते लिखाण सांज दैनिक जन निनादचे आमचे मित्र विशाल चांडक व अ‍ॅड अनिल चांडक या बंधुद्वयांना आवडले, तो दिवस गुरुवार होता, ते म्हणाले, ”छान लिहिले आता दर गुरुवारी लिहीत जा” , “काय लिहिणार एवढे ?” असे मी उत्तरल्यावर, ”भरपूर विषय असतात, लिहा” चांडक यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पहिलाच लेख स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लिहिल्या गेला व चांगला प्रारंभ झाला. मग दुसरा, तिसरा असे लेख दर गुरुवारी नेमाने लिहीत गेलो, कित्येकदा गुरुवार व्यतिरिक्त सुद्धा काही प्रासंगिक लेख लिहिले, तरुण भारत, देशोन्नती, लोकमत, वृत्तकेसरी, साप्ताहिक जनमंगल या वृत्तपत्रातून सुद्धा लेख प्रकाशित झाले. या लेखांपैकी निवडक 20 लेखांचा संग्रह असलेले "खामगांवचे ठासेठुसे" हे पुस्तक छापील व ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाले. अनेक वाचकांनी त्यास पसंती दिली. दोन लेख पु.ल.देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रकाशित ई-बुक मध्ये सुद्धा प्रकाशित झाले. लेख प्रकाशित होत होते, या लेखातील विचार माझ्या मनातून प्रसवले जात होते, मी जरी लिहीत असलो तरी संत तुकाराम ज्याप्रमाणे “गोविंद वदवी तेच म्हणे” असे म्हणाले होते या ओळींचे स्मरण मला कित्येकदा व्हायचे, नव्हे होतच असते. तसेच माझ्या या लेखांच्या लिहवित्यास सुद्धा मी मनोमन नमन करत होतो. लेखामागून लेख लिहिल्या गेले, वाचकांचे चांगले अभिप्राय येत गेले, त्यातून आणखी लिहिण्याची उर्मी होत गेली व लेखनाचे जणू व्यसनच जडले. खामगांव शहरातील जुन्या परंतू आता भग्न, भकास झालेल्या स्थळांबद्दलची, खामगांवातील खाद्य संस्कृतीची, वेड्यांविषयीची अशा तीन लेख मालिका सुद्धा लिहिल्या. वाचकांच्या प्रतिक्रिया येतच होत्या ज्या मला आणखी लिहिण्यास भाग पाडत होत्यामी लहान शहरातील एका सांज दैनिकातून लिहीत असल्याने माझ्या लेखांचे वाचक हे निमशहरी व ग्रामीण आहेतहो पण सोशल मीडियामुळे, माझ्या ब्लॉगमुळे व जन निनादच्या इंटरनेट आवृत्तीमुळे माझे लेख देश-विदेशातील उच्चशिक्षित लोक सुद्धा वाचत आहेत. पण पंक्चर दुरुस्तीच्या दुकानदाराने, ऊसाच्या रसाच्या गाडीवाल्याने, टँकरवाल्याने वा इतर किरकोळ विक्रेत्यांनी किंवा तळागाळातील वाचकांनी जेंव्हा माझ्या लेखांबद्दल मला प्रतिक्रिया दिली तेंव्हा मला विशेष आनंद झाला. कारण खरा भारत ग्रामीण भागातच दिसतो असे म. गांधींनी म्हटले होते, त्याच ग्रामीण भागातील हे लोक होते. यातील काहींनी त्यांना माझ्या कित्येक लेखातील सर्वांना घेऊन चालण्याची भाषा, जातीभेद न पाळण्याबाबत केलेले आवाहन, संत व थोर पुरुष हे सर्वांचेच आहेत, आपली विचारसारणी कोणती का असेना पण राष्ट्र प्रथम असले पाहिजे असे उल्लेख खुप भावल्याचे व्यक्त केले. काही जहाल लिहिल्यावर किंवा कटू असे सत्य लिहिल्यावर अनेकांनी "उगीच असे लिहीत नका जाऊ" असा सल्ला दिला पण तरीही जे विचार सत्य आहे, राष्ट्रहितैषी आहेत ते मी कोणत्याही क्षोभाची तमा न बाळगता लिहिलेच. मंगळवार/बुधवार आला की आगामी लेखासंबंधीत विचार मनात येण्यास सुरुवात व्हायला लागते व गुरुवारी लेख प्रकाशित होतो. लेख प्रकाशित झाल्यावर सोशल मिडीयावर तो शेअर पण करतो. ते आवश्यक आहे की नाही माहीत नाही कारण भगवंताने गीतेत सांगून ठेवले आहे की , “...मा कर्मफलहेतुर्भुर्मा..” अर्थात हे अर्जुना कर्माच्या फळाप्रती आसक्ती ठेवू नको. माझ्या लेखातून मात्र मला आपण निर्मिलेली गोष्ट इतरांना कळावी, त्यांना ती आवडावी ही ईच्छा म्हणजे एक प्रकारची फलप्राप्तीची सुप्त आशा कुठेतरी असतेच, लोकेषणाच ती. त्यामुळे मी करीत असलेले लेखन हे ईश्वरपर्यावसायी होत नव्हते व हे लेखन कर्म लौकिक अर्थाने जरी यशस्वी वाटत असले तरी आध्यात्मिक दृष्टीकोनातून मात्र कदाचित वाया जाणारे कर्म आहे. असे सर्व विचार आज लेखनाची दहा वर्षे पुर्ण झाल्यावर मनात आले. लेखनाचा हा छंद जडल्यावर लेखनावर प्रेमच जडले असेच वाटत आहे फक्त या कर्मातून अहंकार निर्माण न होवो हेच भगवंताकडे निवेदन. 

   हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला ते  वाचकवृंद व ज्यांच्यामुळे हे लेख वाचकांपर्यंत पोहचू शकले त्या सर्व वृत्तपत्रांच्या संपादक महोदय व कर्मचारी वृंद यांचे मनस्वी आभार.

(500 लेख पुर्ण झाल्यावर मे 2022 मध्ये मी लिहिलेल्या लेखावर आधारीत)

१४/१२/२०२३

Article about loan, home loan etc.

कर्जाच्या जाहिरातीच अधिक, 

मंजुरीस मात्र हेलपाटे.


ग्राहक जेंव्हा बँकांच्या कर्ज देण्याच्या जाहिराती , फोन यांमुळे कर्ज मिळावे म्हणून बँकेत जातात परंतु तिथे गेल्यावर त्यांचा भ्रमनिरास होतो. त्यांना म्हणावे तितके सुलभ रीतीने कर्ज मिळत नाही उलट त्याला "रुड" वागणूक, प्रतीक्षा, कागदपत्रे, नाना अटी यांचा सामना करावा लागतो.

सरकारी कार्यालयांमध्ये काही कार्यानिमित्त जाण्याचे काम पडले किंवा बँकेत कर्ज प्रकरणासाठी जाण्याची गरज भासली तर सर्वसामान्य नागरिकांना नाना अडचणींना तोंड द्यावे लागते, नाना समस्या येतात, विविध कागदपत्रे व प्रक्रियांचे दिव्य पार पाडावे लागते. विविध बँका तर कर्जांच्या गृह कर्जांच्या मोठ-मोठ्या जाहिराती करतात, भले मोठे होर्डींग्ज लावतात, ग्राहकांचे फोन नंबर मिळवून त्यांना वेळी अवेळी "आमच्या बँकेतून कर्ज घ्या" असे आवाहन करतात. परंतू प्रत्यक्षात जेंव्हा ग्राहक बँकेत जातो तेंव्हा त्याला कर्जासाठी लागणा-या अमाप कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले जाते. ते एका दृष्टीने बरोबरही आहे परंतु अनेकवेळा ते अती होते असेही अनेकांना वाटते. ही कागदपत्रे गोळा करतांना ग्राहकाच्या नाकी नऊ येतात. येनकेन प्रकारेण कागदपत्रे गोळा केली की पुन्हा एखादी तृटी निघतेच व ग्राहक हा बँक, कागदपत्र मिळवण्यासाठी न.प., नझूल, तलाठी, ऑनलाईन केंद्रे या ठिकाणी येरझा-या मारत राहतो. “घोडे मेले ओझ्यानी आणि शिंगरू मेले येरझा-यांनी” या म्हणीची आठवण त्याला येते. पण बिचारा गरजवंत असतो. बरे अनेकवेळा कर्ज प्रकरणाचे अर्जदार हे पगारदार कर्मचारी असतात म्हणजे बँकेला त्यांच्या कडून कर्ज वसूल होईल याची शाश्वती असते. यातही नवीन घर किंवा सदनिका असेल तर कर्ज मंजूरी त्वरीत मिळते परंतू पगारदार कर्ज अर्जदार जर त्याच्याच राहत्या घरात बदल किंवा पुनर्निर्माण करीत असल्यास त्याला अनेक हेलपाटे घ्यावे लागतात. बँकांनी एखादा पगारदार कर्ज अर्जदार जर एखाद्या घरात 30/40 वर्षांपासून राहात असेल तर त्याला काही कागदपत्रांत सवलत द्यायला हवी. यांसारखे काही नियम अभ्यासपूर्णरित्या बनवणे अपेक्षित आहे. कितीतरी वर्षांपासून तेच ते नियम पाहिले जातात, दाखवले जातात. सर्वसामान्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगणा-या बँका व्यापारी वर्गास मात्र सविनय पायघड्या घालतात, या वर्गातील कर्जदारांनी बँकेस ठेंगा दाखवल्याची शेकोडो उदाहरणे आहेत, एकदा तर एका व्याप-याने तारण कर्ज घेतले परंतु त्या व्यापा-याने तारणाच्या कागदपत्रांची पुर्तताच केली नव्हती परंतु तरीही त्याचे कर्ज प्रकरण मंजूर झाले ते कसे झाले कुणास ठाऊक ? पण नंतर बँक अधिकारी कागदपत्रांसाठी त्याच्या मागे फिरत होते व हा त्यांना झुलवत होता हे सुद्धा उदाहरण मी ऐकले आहे. असे असूनही त्यांची कर्ज प्रकरणे बँक कर्मचारी, व्यवस्थापक कशी काय त्वरीत मंजूर करतात कोण जाणे ? पगारदार कर्जदाराची कर्ज बुडवण्याची उदाहरणे अत्यल्प असूनही त्याला बँका विविध नियम, कागदपत्रे दाखवतात व त्याचा खुप मोठा वेळ खर्ची घालतात, नाना अडचणी, नाना दिव्ये पार पाडल्यावर कुठे त्याचे “गंगेत घोडे न्हाते”. शिक्षण कर्जासाठी सुद्धा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना ते कर्ज फेडणारे असूनही त्रास झाल्याची उदाहरणे मी पाहिली आहेत. माझ्या चांगल्या परिचित व लांबून नात्यात असलेल्या एका बँकच्या कर्ज विभागात असलेल्या व्यक्तीचा सुद्धा वाईट अनुभव माझ्या गाठीशी आहे. बँकेच्या कर्मचा-यांना जशी ग्राहकाकडून चांगल्या वागणूकीची अपेक्षा असते (तसे ते फलकही लावतात) तशीच अपेक्षा ग्राहकांना सुद्धा बँक कर्मचा-यांना कडून असते. कर्ज मंजुरीत नाना अडचणींचा सामना करावा लागल्याचे अनुभव अनेकांना आहे. आजकाल सर्वच बँका कर्ज देण्याच्या जाहिराती करतात, ग्राहकांना आकर्षित करतात, नाना बँक , वित्त पुरवठा करणारी मंडळे यांचे फोन येत असतात जणू ते त्यांना कर्जासाठी आमंत्रणच देत असतात. परंतू हेच ग्राहक जेंव्हा जाहिराती, त्यांना आलेले फोन यांमुळे बँकेत जातात तेंव्हा त्यांना म्हणावे तितके सुलभ रीतीने कर्ज मिळत नाही उलट त्याला "रुड" वागणूक(काही सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे), प्रतीक्षा, कागदपत्रे, नाना अटी यांचा सामना करावा लागतो. बँकेला ज्याप्रमाणे ठेवींची गरज असते त्याचप्रमाणे कर्ज पण द्यावे लागते आणि म्हणूनच ते जाहिरात करत असतात परंतु तुम्ही जर स्वत:हून जाहिरात करून ग्राहकाला कर्जासाठी बोलवत आहात तर त्याला सन्मानपूर्वक कर्ज देणे, कर्जाच्या अटी सुलभ करणे हे सुद्धा तुम्हाला करावे लागेल. शिवाय कर्ज जाहिरांतीसाठी तुमचा लक्षावधींचा खर्च होत असेल त्या खर्चात सुद्धा अनेकांच्या कर्जाचे खाते उघडल्या जाऊ शकते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय ग्राहक दिन आहे या पार्श्वभूमीवर बँकांनी, त्यांच्या उच्चाधिका-यांनी कर्ज ग्राहकांना कर्ज प्रक्रिया कशी अधिक सुलभ करता येईल ?  इतर ग्राहकांना कर्जा व्यतिरिक्त सुविधा कशा देता येतील यावर विचार मंथन करून तशी अंमलबजावणी करावी.

०३/१२/२०२३

Article about current political position in maharashtra position

 "ज"रा एकाच "रांगे"त आणून पाहावे.

भारत देश हा प्रगती करत आहे हा देश जर अजूनही पुढे न्यायचा असेल, महासत्ता बनवायचा असेल तर सरकारनी,  सर्व नागरिकांना एकदा "ज"रा एकाच "रांगे"त आणून पाहावे. हेच या प्रसंगी सांगावेसे वाटते.

राष्ट्रपुरुषांनी दिलेली शिकवण, भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा, संविधानाच्या उद्देशिकेत आलेला दर्जा व समानतेचा उल्लेख यांमुळे तसेच शिवाजी महाराजांनी आपले अष्टप्रधान मंडळ व अठरा पगड जातींना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणून स्थापलेल्या स्वराज्य स्थापनेचा इतिहास अंगी भिनल्यामुळे आपल्या सर्वांवर जातीभेद न करण्याचे, आपण सर्व एक असल्याचे  संस्कार बालपणीच रुजले आहेत व बालगोपालांवर रुजवले जातात. त्यामुळे सवलतीच्या बाबतीत जरी हा लेख लिहिला असला तरी कुणाविषयी किंवा कुण्याही जाती/समाजाविषयी मनात आकस मुळीच नाही. परंतू आपल्या देशात होत असलेली उच्च गुणवत्ताधारकांची उपेक्षा, सवलती नसलेल्या व अल्पउत्पन्न गटात असल्याने गुणवत्ता असूनही भरमसाठ फी न भरता आल्याने हुशार असूनही मागे पडत असलेल्या तरुणांची होणारी नकारात्मक मानसिकता, दर्जा व संधीची समानता हे जरी संविधानाच्या उद्देशिकेत म्हटले असले तरी ते प्रत्यक्षात आहे की नाही ही मनात आलेली शंका या सर्वांमुळे हे लिखाण करावेसे वाटले. तरी कोणताही पुर्वग्रह मनी बाळगू नये व तटस्थतेने वाचन करावे अशी वाचकांना विनंती.

   आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर मागे पडलेल्या घटकांना पुढे आणण्यासाठी काही सवलती ह्या काही कालावधीसाठी लागू करण्यात आल्या होत्या. परंतु राजकारण्यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी, आपल्या मतपेढ्या टिकवण्यासाठी या सवलती व या सवलतींचा कालावधी सतत वाढवत नेला. मग या सवलतधारकांच्या रांगेत धुर्त राजकारण्यांनी मतांसाठी इतरही अनेक जातींना समाविष्ट केले. तदनंतर ज्यांचा या सवलतधारकांच्या सूचीत समावेश नव्हता ते सुद्धा या सवलतींसाठी,  या सवलत धारकांच्या सूचीत घुसण्यासाठी पुढे सरसावू लागले. विविध जाती आणि विविध समाज ज्यांना या सवलती नव्हत्या तेे सवलती प्राप्त करण्यासाठी काहीही करू असे म्हणत आंदोलने करू लागले. गुणवत्तेच्या जोरावर पुढे जाण्याऐवजी सरकारी सवलतींच्या कुबड्या घेऊन पुढे जाण्यात त्यांना धन्यता वाटू लागली. अनेक प्रसंगी तर न्यायालयीन अडचणी असूनही या सवलतींचा लाभ मिळावा म्हणून आंदोलने सुरूच ठेवली गेली. त्या आंदोलनांना पुन्हा काही सत्तापिपासू राजकीय नेते खतपाणी घालत असल्याचे इतर नेत्यांनी म्हटले आहे. अनेकदा या आंदोलनांना हिंसक वळण सुद्धा मिळाले त्यात करोडो रुपयांच्या सरकारी संपत्तीचा चुराडा झाला व होत असतो. अशा सरकारी संपत्तीचा नाश करणा-यांवर नोंदवलेले गुन्हे सुद्धा मागे घ्या अशाही मागण्या होतात. वैयक्तिक व केवळ स्वत:च्याच समाजाच्या हितासाठी स्वार्थी मागण्या होऊ लागल्या मग इतर देशवासीयांचे काही का होवो ना ! स्वतःला पिछाडीस गेलेले असे म्हणवून घेण्यात धन्यता वाटू लागली. त्यासाठी विविध समाज, जाती पुढे सरसावू लागल्या. बरे स्वातंत्र्यानंतर ज्यांना सवलती मिळाल्या ते घटक आजच्या स्थितीमध्ये बरेचसे पुढे निघून गेले आहेत. नव्हे खुपच पुढे निघून गेले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती आज पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात सुधारलेली आहे त्यांना व त्यांच्या पाल्यांना विविध सवलती अनेक वेळा प्राप्त होत असतात. शिक्षणात, नोकरीत आणि एवढेच नव्हे तर पदोन्नतीमध्ये सुद्धा त्यांना लाभ मिळतो. तसेच पुढच्या पिढयांनाही वारसा हक्का प्रमाणे या सवलती सुरूच राहतात. तर दुसरीकडे जे या सवलतीच्या रांगेत नाही त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे, त्यांच्या पाल्यांमध्ये नकारात्मकता वाढते आहे, त्यांना मोठमोठ्या महाविद्यालयात भरमसाठ फी भरण्यासाठी कर्ज काढावे लागून ते कर्जबाजारी होत आहेत. पण याकडे सरकारचे तर लक्ष नाहीच परंतु एकीकडे "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत" असे मोठ्या अभिमानाने म्हणायचे आणि आपल्याच देशबांधवांकडे दुर्लक्ष करायचे, त्यांच्यातील काहींना मागे ठेवायचे आणि आपण व आपल्याच समाजाला तेव्हढे पुढे न्यायचे ही एक चढाओढ लागलेली आहे. जगात सर्वच देशांत शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रात केेवळ उच्च गुणवत्ताधारकासच निवडले जाते. केवळ भारतात विविध सवलतींचा कुबड्या देऊन निवड केली जाते. प्रसंगी अपात्र असूनही सवलतींच्या कुबड्यांनी सवलतधारक विद्यार्थी व नागरिक व नोकरदार हा पुढे जातो. त्याच्याकडून उत्कृष्ट असे कामकाज क्वचितच होतांना दिसते. भारत देश हा प्रगती करत आहे हा देश जर अजूनही पुढे न्यायचा असेल, महासत्ता बनवायचा असेल तर सरकारनी, लोकप्रतिनिधींनी सर्व नागरिकांना/ गुणवत्ता धारकांना एकदा "ज"रा एकाच "रांगे"त आणून पाहावे. हेच या प्रसंगी सांगावेसे वाटते.

३०/११/२०२३

Article about 41 labours rescued from tunnel in Uttarakhand, India

श्रद्धावान लभते ज्ञानम


आधुनिक शिक्षण घेतलेले असले आपल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट असले, विदेशी असले तरी अर्नोल्ड डिक्स हे श्रद्धावान दिसले आणि म्हणूनच "श्रद्धावान लभते ज्ञानम" असे म्हणावेसे वाटते.

अखेर त्या 41 मजुरांची सुटका झाली. पंधरा दिवसांच्या प्रयत्नाला अखेर यशप्राप्ती झाली. उत्तराखंड मधील बोगदयात अडकलेल्या त्या 41 मजुरांवर या दिवसात मोठी बिकट परिस्थिती ओढवली होती. त्या अंधाऱ्या बोगदयात इतके दिवस काढणे म्हणजे गंमत नाही. ते मोठे जिकरीचे होते, जीवावर बेतणारा तो प्रसंग होता. जरी त्यांना पाईपद्वारे खाद्य व प्राणवायू पोहोचवला जात होता तरी अशा अंधारगुहेत राहायला भाग पडणे म्हणजे एक परीक्षाच म्हणावी लागेल. कारण खाण्यापिण्याची जरी सोय झाली, प्राणवायूची जरी सोय झाली तरी त्या मजुरांना त्यांच्या शरीरधर्माची मोठी समस्या भेडसावली असेल, काहींच्या प्रकृतीवर परिणाम झालाच पण यातून सर्व सुखरूप बाहेर आले. कोणतेही क्षेत्र असो योजना असो किंवा मोहीम असो युद्ध मोहीम असो सुटकेची मोहीम असो नेतृत्व जर कणखर असेल, सक्षम असेल आणि तितकेच संवेदनशील सुद्धा असेल तर त्याचा प्रभाव संबंधित विभाग व त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर पडत असतो आणि त्यामुळे प्रचंड मोठे, जिकरीचे असणारे काम सुद्धा सोपे होते याची प्रचिती सुद्धा भारत सरकारच्या सद्यस्थितीत असलेल्या नेतृत्वामुळे या मजुरांच्या सुटकेप्रसंगी दिसून आली. मजूर सुखरूप बाहेर आले. ही जरी सरकारी यंत्रणा अधिकारी व सुटका करण्याच्या मोहिमेत समाविष्ट असलेले सर्वजण यांची मेहनत असली तरी "तेथे असावे ईश्वराचे अधिष्ठान" याप्रमाणे ईश्वरी आशिर्वाद सुद्धा कामात आले. सिलकारा बोगदयाजवळ बाबा बौखनाग म्हणून एक मंदिर आहे. रस्त्याच्या कामात या मंदिरावर गंडांतर आले. परिसरातील जनतेला बौखनागचे मंदिर पाडणे मंजूर नव्हते व त्यांची श्रद्धा आड येत होती. मंदिर पाडल्यामुळेच मजूर अडकले असे सुद्धा त्यांना वाटत होते त्यामुळे तेथे एक छोटे मंदिर उभारण्यात आले. इकडे मजुरांना वाचविण्याची मोहीम सुरू होती या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा टनेल मॅन अर्नॉल्ड डिक्स यांना सुद्धा पाचरण करण्यात आले होते. ड्रिल, ऑगर मशीन आणि इतरही अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर करत ही मोहीम राबवणे सुरू होते. परंतु मशीन सुद्धा थकल्या काही मशीन बंद पडल्या आणि शेवटी हरित लवादाने बंद केलेल्या रॅट मायनिंग याच तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागला आणि बाबा बौखनाग यांच्या कृपेने मजुरांची सुटका झाली. अर्नोल्ड डिक्स यांना सुद्धा बाबा बौखनाग मंदिराबद्दल माहिती मिळाली आणि  मजुरांच्या सुटके नंतर बाबा बौखनाग यांना आभार मानण्याचे त्यांनी वचन दिले होते. म्हणून अर्नोल्ड डिक्स यांनी मजुरांच्या सुटकेनंतर बाबा बौखनाग यांचे दर्शन सुद्धा त्यांनी घेतले. तसा व्हिडीओ सुद्धा प्रसार माध्यमांत झळकला. 

    आपल्या देशात अनेक वेळा देव, देवी, देवता, श्रद्धा, अंधश्रद्धा यावर आपलेच लोक टीकाटिप्पणी करत असतात. आपल्या देवी देवतांना नाकारत असतात. याची प्रचिती आपल्याला अनेक वेळा येते. हे लोक केवळ हिंदू धर्मातीलच श्रद्धा अंधश्रद्धा देवी देवता यांच्यावर जीभ सैल करून टीका करत सुटतात. परंतु जेंव्हा एक विदेशी व्यक्ती सुद्धा  बोगदयात अडकलेल्या मजुरांची सुटका झाल्यावर बाबा बौखनाग यांची कृपा मान्य करतो एवढेच नव्हे तर त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांचे दर्शन घ्यायला जातो यातून आपल्या हिंदू समाजातील स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी बोध घ्यावा. "श्रद्धावान लभते ज्ञानम" असे जे म्हटले गेले आहे ते खरेच आहे. एकदा का तुमची श्रद्धा जडली की ज्ञानाकडे जाणार अनेक मार्ग सुकर होतात. अर्नोल्ड डिक्स यांनी बाबा बौखनागचे दर्शन घेऊन त्यांच्यामध्ये  असलेल्या श्रद्धेचे दर्शन समस्त भारतीयांना घडवले आहे. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे सुद्धा श्रद्धावान होते, पंतप्रधान सुद्धा श्रद्धावान आहे व 41 मजुरांच्या सुटकेसाठी आलेले टनेल मॅन हे सुद्धा श्रद्धावानच म्हणावे लागतील. म्हणूनच त्यांच्या कडून घडणा-या अनेक कृत्यात त्यांच्यातील ज्ञानाची प्रचिती येते. आधुनिक शिक्षण घेतलेले असले आपल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट असले, विदेशी असले तरी अर्नोल्ड डिक्स हे श्रद्धावान दिसले आणि म्हणूनच "श्रद्धावान लभते ज्ञानम" असे म्हणावेसे वाटते.

०८/११/२०२३

Article about Maxwell magnificent batting for Austrelia

"मॅक्स" रन आणि "वेल" प्लेड

आपल्या देशाला जिंकून देण्यासाठी पायात तीव्र वेदना असतांनाही मॅक्सवेल प्राणपणाने खेळपट्टीवर उभा ठाकला होता. "डालो तुम कैसे बॉल डालते मै देखता" या आविर्भावात त्याने अफगाणी गोलंदाज व खेळाडूंना दबावात आणले. 

मॅक्सवेलने काल ऑस्ट्रेलियासाठी केलेल्या खेळीने मला क्रिकेटविषयी लिहिण्यास भाग पाडले. सुरुवातीपासूनच मला क्रिकेट या खेळामध्ये काही रुची नव्हती. माझ्या लहानपणापासून आमच्या घरी क्रिकेट या खेळाचा तिटकारा होता. इंग्रजांचा खेळ आहे , प्रगत झालेले अमेरिका , जपानसारखे देश क्रिकेट खेळत नाही, अशी वाक्ये कानावर पडत असल्यामुळे क्रिकेटमध्ये रुची निर्माण होण्यास अडथळा आला. क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा जास्त पाहिल्या नाही. कारण त्यावरही वडीलांचे म्हणणे असे की हे मॅच फिक्सिंग करतात आणि त्यांचे भाकीत पुढे खरे पण ठरले होते. काही खेळाडू मॅच फिक्सिंग मध्ये दोषी ठरले होते. त्यामुळे पुर्वी कोणत्याही मॅचेस असल्या तरी आमच्या घरी काही कोणी क्रिकेट बघत नव्हते पण आमच्या शेजारच्या कोर्टाच्या इमारतीत तेंव्हा तहसील ऑफिस सुद्धा होते. मॅच असली की, तहसील ऑफिसचे कर्मचारी आम्हाला क्रिकेटचा स्कोअर विचारायचे आणि आम्हाला तो काही माहीत नसे. तेंव्हा त्यांना आश्चर्य वाटे व ते हसतही " काय गड्या तुम्ही क्रिकेट पाहात नाही !" असे ते म्हणत  त्यांना स्कोर सांगण्यासाठी म्हणून आम्ही मग मॅच लावायला सुरुवात केली, मग त्यांना वेळ असला की ते आमच्या घरी येऊन मॅच बघत. मग पुढे आम्हीही भारत-पाकिस्तान सारख्या महत्वाच्या क्रिकेटच्या मॅचेस बघण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यात थोडाफार रस निर्माण झाला. क्रिकेटला नावे ठेवणारे माझे वडीलही भारताच्या मॅचेस बघायला लागले व  त्यांच्यासोबत आम्ही पण. मग अधेमध्ये इतरही देशांचे सामने बघायला लागलो आणि म्हणूनच कालचा ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्थानचा सामना सुद्धा दुस-या इंनिंग नंतर बघण्यात आला. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू होती, ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट गेल्या तेंव्हा मी हा सामना लावला. नंतर मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांची बॅटिंग सुरू झाली. हा रोमहर्षक सामना पाहतांना मॅक्सवेलच्या बॅटिंगने अवघ्या विश्वातील क्रिकेट प्रेमींना मोहून टाकले. सात विकेट गेल्यानंतर खेळपट्टीवर टिकून राहून हरण्याची जास्तीत जास्त शक्यता निर्माण झालेल्या ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेलने जिंकून दिले. आणि हे जिंकून देणे पूर्णपणे "वन मॅन आर्मी" प्रमाणे होते. 21 चौकार आणि 10 षटकार मॅक्सवेलने त्याच्या खेळीच्या दरम्यान लगावत 128 चेंडूत 201 धावा काढल्या. 

विशेष म्हणजे मॅक्सवेलच्या पायामध्ये कळ येत असूनही तो प्राणपणाने खेळत षटकार, चौकार हाणत होता. पायात तीव्र वेदना असतांनाही मग त्याने फुटवर्क न करता जे लिलया व अप्रतिम असे षटकार व चौकार हाणले ते वाखाणण्याजोगे होते त्याच्यासोबत पॅट कमिन्सचे पण कौतुक तो सुद्धा टिकून राहून खेळला. त्याने जरी एक-एक, दोन-दोन धावा काढल्या असल्या व कमी धावा केल्या असल्या तरी त्याचे टिकून राहणे हे सुद्धा काल तितकेच महत्त्वाचे ठरले. त्याने व मॅक्सवेलने स्ट्राईक मॅक्सवेलकडेच कशी राहील याची पण काळजी घेतली. सात विकेट गेल्याचे व आता आपल्यावरच आपल्या देशाची मदार आहे याचे पुर्ण भान मॅक्सवेेलने ठेवलेले दिसले. त्याच्या खेळातून दिसत होते. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी जसे घोडखिंडीत उभे ठाकून महाराजांना सुखरूप गडावर पोहचण्यास प्राण पणाला लावले होते त्याचप्रमाणे आपल्या देशाला जिंकून देण्यासाठी पायात तीव्र वेदना असतांनाही मॅक्सवेल प्राणपणाने खेळपट्टीवर उभा ठाकला होता. "डालो तुम कैसे बॉल डालते मै देखता" या आविर्भावात त्याने अफगाणी गोलंदाज व खेळाडूंना दबावात आणले. क्रिकेटचे जुने रेकॉर्ड खूप असतात व लोकांच्या लक्षातही राहतात पण माझ्या मात्र काही ते काही लक्षात राहात नाही परंतु तरीही मॅक्सवेलने वन डे क्रिकेटमध्ये चेंजिंग करतांना काल सर्वात जास्त रन केले शिवाय या विश्व करंडक सामन्यांमध्येे सुद्धा त्याची ही मोठी खेळी ठरली. मुजीबने त्याचा झेल सोडला हे अफगाणिस्तानसाठी मोठे महागाचे ठरले आणि मग मॅक्सवेल सुसाट सुटला. क्रिकेटवर बालपणापासून घरातूनच टीका ऐकलेला मी मॅक्सवेलची ही खेळी पाहतांना मात्र पुुरता प्रभावित होऊन गेलो होतो आणि खरंच एखादा क्रिकेटपटूू किंवा इतरही कुण्या खेळातील खेळाडू देशासाठी कीती चांगली खेळी खेळू शकतो याचा उत्कृष्ट असा नमुना म्हणजे मॅक्सवेलची कालची खेळी. भविष्यात मॅक्सवेलची ही खेळी उदाहरण म्हणून दिली जाईल. क्रिकेटचा स्कोअर क्रिकेट मधील रेकॉर्ड जरी माझ्या लक्षात राहत नसले तरी कुंबळे व श्रीनाथ या दोन गोलंदाजांनी सुद्धा शेवटच्या विकेटसाठी खेळतांना भारताला एक सामना जिंकून दिला होता. काल मॅक्सवेलची खेळी पाहतांना अनिल कुंबळे व जवागल श्रीनाथ या गोलंदाजानी केलेल्या चांगल्या फलंदाजीच्या अटीतटीच्या सामन्याची आठवण झाली. कालचा ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्थानचा सामना सुद्धा अटीतटीचाच झाला पण मॅक्सवेल ने काढलेले "मॅक्स" रन्स आणि "वेल" प्लेड खेळीमुळे ऑस्ट्रेलिया विजेता ठरला. मॅक्सवेलची ही खेळी लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील

०२/११/२०२३

Article about hindu festival Kojagiri

 एक वो भी कोजागिरी थी

कोजागिरीचं एक संग्रहित चित्र

...मला आठवले ती चुलीवर ठेवलेली एक मोठी कढई,  त्यामध्ये एक लांब सराटा आणि चुलीमध्ये धगधगणाऱ्या ज्वाला आणि दूध घोटत असलेले माझे तिर्थरूप व त्यांची जीवश्च कंठश्च मित्र मंडळी...

मुलाला आजच्या शिक्षण पद्धतीचा अविभाज्य घटक बनलेल्या क्लासला सोडून मी घरी येत होतो. त्याचा क्लास हा गावाच्या बाहेर असल्यामुळे मला गाडीवरून येता-येता कोजागिरीचा तो पूर्ण चंद्र दृष्टीस पडला. माझी गाडी जरी सुरू होती तरी काही क्षण माझी दृष्टी त्या चंद्राकडे स्थिरावली आणि एकदम मला आठवले की अरे आज तर कोजागिरी पौर्णिमा. तोच चंद्रमा नभात, धीरे धीरे चल चांद गगन मे, खोया खोया चांद सारख्या गीतांचे स्मरण होत-होत माझे मन भूतकाळात जाऊ लागले, मला आठवले ती चुलीवर ठेवलेली एक मोठी कढई,  त्यामध्ये एक लांब सराटा, चुलीमध्ये धगधगणाऱ्या ज्वाला आणि दूध घोटत असलेले माझे तिर्थरूप व त्यांची जीवश्च कंठश्च मित्र मंडळी. माझे वडील व त्यांची मित्रमंडळी दरवर्षी सहकुटुंब कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करीत असत. त्या दिवसांच्या स्मृती दूध ऊतू गेल्यावर जसे पटकन ओसंडून वाहू लागते तशा ओसंडून आठवू लागल्या. कोजागिरीच्या दिवसाची आम्हा लहान मंडळींना मोठी प्रतीक्षा असे. कारण मनसोक्त खेळ व तदनंतर स्वादिष्ट दुग्ध प्राशन असा तो योग असे. सर्व एकत्रित झाले की, मोठी मंडळी कामे वाटून घेई. चुलीची पुजा झाल्यावर मग दूध घोटायला सुरुवात होत असे. दूध घोटण्याच्या आधी भुईमुगाच्या शेंगा भाजल्या जात. सोबतीला मिरच्या सुद्धा असत. मग भुईमुगाचे शेंगदाणे, सोबत गुळ असे हिमोग्लोबिन वर्धनास सहाय्यकारी असणारे पौष्टिक खाद्य खाण्याचा सोपस्कार होई. दुसरीकडे पुरुष मंडळी दूध घोटायला बसत. दूध घोटण्यामध्ये माझ्या वडीलांचा पुढाकार असे त्यांचे दुधात काजू, बदाम, किसमिस असा सुकामेवा टाकण्याचे प्रमाण ठरलेले असे. काजू, बदाम ते भुकटी करून दुधात टाकत. दुधात चारोळी टाकलेली मात्र त्यांना आजही आवडत नाही. दूध घोटणे सुरु झाले की, आम्ही लहान मुले खूप खेळत सुद्धा असू त्या काळामध्ये मोबाईल किंवा गाणे बजावणे या तत्सम गोष्टी नव्हत्या म्हणून एकमेकांशी संवाद चांगल्या पद्धतीने साधला जायचा. सर्वजण नाना विषयांवर चर्चा करायचे आणि एकत्रितपणाची भावना वृद्धिंगत व्हायची. कढईमध्ये चंद्राचा प्रकाश पडला व दूध आटले की मग त्या दुधाचा नैवेद्य दाखवल्यावर सर्वांना वितरण होई. एका पेल्यानंतर आपापल्या क्षमतेनुसार कोणी दोन तर कोणी तीन/ चार पेले दूध प्राशन करीत असे. दूध प्राशन करताना कोणी चित्रपटांचे संवाद, विनोद व ज्याला जी कला सादर करता येई तो ती कला सादर करत असे. ताण, तणाव मुक्त आरोग्यदायी असे ते दिवस होते. 90 च्या दशकापर्यंत माझे वडील व त्यांच्या मित्र मंडळीचा हा कोजागिरीचा उपक्रम सुरू होता. त्यानंतर मात्र का कोण जाणे पण नवीन पिढीच्या व्यस्ततेमुळे व त्या व्यस्ततेेने नित्य संपर्क होत नसल्याने ते कोजागिरी साजरी करणे बंद झालेे. त्याकाळी बालक असलेलो आम्ही सर्व तरुण झालो होतो, काहींची लग्ने सुद्धा झाली होती, भगिनींचे विवाह होऊन त्या परगांवी गेल्या होत्या. वडील मंडळींच्या नेतृत्वात कोजागिरी करणा-या आम्हाला आता नवीन मित्र मंडळी जोडल्या गेल्यामुळे कदाचित पुर्वीसारखी रुची सुद्धा येत नसावी. बरे तसे म्हटले तर जुन्यातला, बालपणीच्या त्या मैत्रीतील गोडवाही कमी झाला नव्हता पण तरीही पुढे आमची कोजागिरी मात्र बंद झाली. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे व्यस्त झालेलो आम्ही तरुण आमच्या सर्वांचे वडील जसे नित्यनेमाने भेटत तसे भेटेनासे झालो. तरीही आमच्या वडील मंडळींची कंपनी (ते त्यांच्या मित्र मंडळीच्या गृपला आजही कंपनी असे संबोधतात.) जशी कोजागिरी साजरी करत तशी कोजागिरी आम्ही पुनरुज्जीवीत करण्याचा प्रयत्न केला होता खरा परंतु त्या कोजागिरी एकत्रीकरणास आम्ही बालपणी अनुभवलेल्या कोजागिरीची सर मात्र काही येऊ शकली नाही. हल्ली कोजागिरीची प्रथा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. दूध सुद्धा पुर्वीसारखे शुद्ध राहिलेले नाही त्यामुळे कितीही घोटा त्यास काही चव येत नाही. आताच्या लहान मुलांना दूध आवडेनासे झाले आहे. भुईमुगाचा पेरा कमी झाला त्यामुळे बाजारपेठेत भुईमूग सुद्धा हल्ली अभावाने दिसतो व त्यामुळे कोजागिरीत आता फरसाण, पावभाजी व तत्सम जंक फुडचा शिरकाव झाला आहे. नवरात्र संपल्यानंतरची ही पौर्णिमा, असे म्हणतात की त्या दिवशी देवी लक्ष्मी ही सर्वत्र संचार करत असते आणि "को जागृत" असे म्हणत असते को जागृत ? अर्थात कोण जागे आहे ? आणि या दिवशी जे लोक जागी असतात त्यांना ती प्रसन्न होत असते असे हिंदू संस्कृतीत मानले जाते. आपले भारतीय सण, परंपरा, उत्सव हे अनोखे असे आहेत यानिमित्ताने आपण सारे एकत्रित येत असतो हे सर्व उत्सव, सण, परंपरा, रुढी, प्रथा या टिकल्या पाहिजेत, आपल्या नवीन पिढीला याची माहिती देणे जरुरी आहे, त्यांचे महत्व सांगणे जरुरी आहे. आज शहरात राहू लागलेल्या MNC मध्ये नोकरी करणा-या दाम्पत्त्यांना पगार गलेलट्ठ जरी असला तरी आपल्या हिंदू संस्कृतीतील उत्सव मात्र म्हणावे तसे साजरे करता येत नाही. त्यातही  वेळात वेळ काढून उत्सव साजरे करणारे काही सन्मानीय लोक आजही नक्कीच आहेत. आज भुलाबाई उत्सव अगदी बोटावर मोजता येईल एवढ्या घरातून साजरा होतो. आपले सण, उत्सव हे लुप्त झाले नाही पाहिजे ते टिकले पाहिजे व त्यासाठी थोडक्यात, छोट्या का प्रमाणात होईना पण पण आपण आपल्या घरी अंगणात किंवा गच्चीवर दूध आटवले पाहिजे व नैवेद्य दाखवून त्याचे प्राशन करायला पाहिजे. 
     एव्हाना मी घरी पोहचलो होतो, थोड्यावेळाने सुपुत्र क्लास वरून आले. सौ. ने दूध आटवण्याची तयारी केली होती, दूध चांगले आटून झाले. ते स्वादिष्ट दूध पिल्यावर तृप्तीचा ढेकर दिला. दूध प्राशन करतांना माझ्या डोळ्यासमोर ती आपल्या कुटुंब व बालगोपालांसह कोजागिरी साजरी करणारी निस्वार्थी, जीवाला जीव देणारी, एकमेकांची टर उडवणारी पण तरीही एकमेकांवर नाराज न होणारी विविध जाती, भाषा, पंथाची माझ्या वडीलांची मित्र मंडळी पुन्हा पुन्हा येत होती. वडील, मी, मुलगा व सौ. असे चौघेच कोजागिरीचे दूध पित होतो. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है असे एक जुने गीत टीव्ही वरील जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमात सुरु होते. ते ऐकून मला पण एक वो भी कोजागिरी थी, एक ये भी कोजागिरी है असे वाटले व लक्ष्मी देवीस मनोमन नमन करून मी निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.


१९/१०/२०२३

Article about memories of Pune city

 पुण्यनगरीची भेट व स्मृती

1925 पुर्वीचे पुणे स्टेशन

ऐतिहासिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घडामोडींचा
पुण्याशी आलेला संबंध बालपणापासून वाचनात आल्याने या शहराशी आत्मीयता वाढली. आम्ही सकाळी पुण्याला उतरलो प्रतिक्षालयात 1925 पुर्वीचा पुणे स्टेशनचा फोटो लावलेला दिसला. मी त्याचे निरीक्षण केले. तो फोटो मला पुण्यनगरीच्या जुन्या स्मृती करून देऊ लागला. 

पुणे शहराची ओळख झाली ती अगदी बालवयात. जे पुणे आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवून बेचिराख केले होते, उजाड केले होते. त्याच पुण्याला पुढे मातोश्री जिजामातेने बाल शिवाजीच्या हातून सोन्याचा नांगर फिरवून पुनश्च वसवले. जिजामाता व बाल शिवाजी आल्यावर पुण्यात आता आपले कुणीतरी तारणहार आहे, रक्षक आहे हे पाहून इथे बारा बलुतेदार आले, पेठा वसल्या, महाल बांधले गेले, पेशव्यांच्या काळात शनिवार वाडा बांधल्या गेला. ब्रिटीश राज्यात अनेक पुल व इमारतींचे बांधकाम केले गेले. फुले, कर्वे, टिळक, आगरकर यांच्यासारख्या अनेक तत्कालीन थोर पुरुषांनी शैक्षणिक संस्था उभारल्या. त्याच विद्येच्या माहेरघरात मी आज बऱ्याच वर्षानंतर आलो होतो. वास्तविक पाहता पिढीजात व-हाडी असलेल्या माझा या शहराशी काही संबंध नाही. परंतु ऐतिहासिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घडामोडींचा या शहराशी आलेला संबंध बालपणापासून वाचनातं आल्याने या शहराशी आत्मीयता वाढली. आम्ही सकाळी पुण्याला उतरलो प्रतिक्षालयात 1925 पुर्वीचा पुणे स्टेशनचा फोटो लावलेला दिसला. मी त्याचे निरीक्षण केले. तो फोटो मला पुण्यनगरीच्या जुन्या स्मृती करून देऊ लागला. महाराजांनी शायस्ताखानाची बोटे कापून त्याला पळता भुई थोडी केली होती तो अवशेष शिल्लक असलेला लाल महाल, शत्रूला जो कात्रजचा घाट दाखवला ते कात्रज, म. फुलेंचा भिडेवाडा, शनिवार वाडा, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा स्वत:च्याच पंतप्रधानास ठोठावणारे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे,  टिळकांचा केसरी, मराठा व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यु इंग्लिश स्कुल, शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे, त्या काळात संतती नियमनाविषयी जनजागृती करणारे त्यांचे सुपुत्र रं. धो.कर्वे , महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इ. अनेक प्रख्यात व्यक्तीमत्वे, इथल्या वास्तू हे सारे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. मोठ्या कालावधी नंतर मी पुण्याला आल्यामुळे मला मोठा बदल जाणवत होता. विद्येचे माहेरघर खूपच बदललेले दिसत होते. अनेक जुन्या इमारतींच्या जागा नवीन भल्या मोठ्या इमारती व मॉलनी घेतलेल्या दिसल्या. माझ्या ओळखीच्या अनेक खाणाखुणा पुसल्या गेलेल्या दिसल्या. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून पिंपरी चिंचवडकडे जाताना गणेश खिंड भागातून आम्ही जात होतो गणेश खिंड परिसर येताच मला चाफेकर बंधूंचे स्मरण झाले माझ्या तोंडी आपसूकच "गोंद्या आला रे आला" हे वाक्य आले. सुपुत्र म्हणे हे काय बाबा? अरे, इथेच गणेश खिंड होती याच परिसरात चाफेकर बंधूंनी "गोंद्या आला रे आला" असा इशारा देत जुलमी रँडचा वध केला होता, मी म्हटले. काही शिल्लक असलेली धूळ व प्रदूषण यांनी माखलेली शेकडो वर्षे जुनी वटवृक्षे मूक साक्षीदार म्हणून उभी होती. मी आजूबाजूला निरीक्षण करीत विचार करू लागलो. चाफेकरांचे काही स्मारकादी दिसते का याचा शोध माझी नजर घेत होती. पण मला त्यांच्या स्मृतीचे अवशेष असे काही दिसत नव्हते मात्र थोड्याच वेळात एका ठिकाणी चाफेकर मित्र मंडळ नावाची पाटी दिसली, थोड्याच अंतरावर चाफेकरांचा अर्धाकृती पुतळा सुद्धा दिसला. चाफेकरांच्या पुतळ्यासमोरून वाहनांच्या रांगांच्या रांगा चाललेल्या असतात एवढी मोठी गर्दी तिथून जात असताना या गर्दीतील किती लोकांना चाफेकर बंधूंनी  देशासाठी प्राण अर्पण केल्याचे, त्यांच्या त्यागाचे स्मरण होत असेल? या विचारात असतांना  "असले काही आजकाल कोण लक्षात ठेवते सर?, सर्व लोक त्यांच्याच कामात बिझी झाले आहे, कोणाला फुरसत आहे आता" चालकाच्या आवाजाने माझी तंद्री भंग झाली. खरेच आता बोटावर मोजता येतील एवढ्यांनाच कदाचित उपरोक्त घटना ठाऊक असेल. पुतळ्यासमोरून जातांना माझ्या मुलांना चाफेकर बंधूंच्या त्या राष्ट्रीय कृत्याचे, त्यागाचे स्मरण करून दिले. पिंपरी चिंचवडला जाताना पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले औंध संस्थानातील विठ्ठल रुक्मिणीचे प्राची दगडी  मंदिर आजही त्या ऐतिहासिक काळाची आठवण करून देते त्या मंदिरात आम्ही काही क्षण थांबलो. विठ्ठल रुक्मिणींच्या सुंदर मुर्तीनी लक्ष वेधून घेतले. मंदिराच्या गाभा-यात जाण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर, गणपती आणि संत तुकारामांच्या सुंदर मूर्ती आहेत. अनेक तुळशी वृंदावने होती. कदाचित त्या पेशवे काळातील कोणाच्यातरी समाधी असाव्यात पण तिथे कुठेही तसा नामोल्लेख मात्र आढळला नाही. शिवाजीनगर, शनिवार वाडा, दगडूसेठ हलवाई, पुणे स्टेशन परिसर, पिंपरी चिंचवडकडे जाणारा रस्ता या भागात मी फिरलो, भला मोठा बदल मला जाणवला. याच पुण्यात सर्वप्रथम विदेशी कपड्यांची होळी केल्यामुळे सावरकरांना दंड झाल्याचे आठवले, महात्मा गांधी व आंबेडकरांचा पुणे करार ज्या येरवडा तुरुंगात झाला त्या भागातून आमची गाडी जात असताना त्या कराराचे स्मरण झाले. छावणीतील युद्ध स्मारकाला दिलेल्या भेटीमुळे अनेक जवान व सेनाधिका-यांच्या बलिदानाची आठवण करुन दिली. मुळा,मुठाचे पात्र पाहून दुःख वाटले. आज पुण्यामध्ये प्रचंड गर्दी असते रस्त्याने वाहनेच वाहने असतात. कितीतरी वेळ ट्रॅफिक मध्ये खर्च होतो. पूर्वीचे पुणे कसे असेल हे तर इतिहासातच सापडेल. तो ऐतिहासिक काळ सुद्धा वाचूनच अनुभवला आहे परंतु  जुन्या पुण्यातील काही चित्रे अधून मधून समाज माध्यमांवर झळकत असतात त्यांव्दारे "पुणे तिथे काय उणे" अशी म्हण सार्थ करणारे  पुणे म्हणजे एक सुबक टुमदार, मुळा मुठा नदीच्या काठी वसलेले एक शांत शहर होते याची प्रचिती येते. सांप्रत काळात मोठ मोठाले मॉल, कार्यालये, गर्दी, सिमेंटचे जंगल असे एक गजबजलेले शहर झाले आहे. या शहरातील गर्दीत अस्सल पुणेकर कुठेतरी हरवल्याचे मला जाणवले. कदाचित जुन्या पुण्यात तो असेलही. काही एकाकी जेष्ठ नागरिक मला गर्दीतून वाट काढतांना दिसत होते. एक तरुण त्याच्या वृद्ध पित्यास वरून जाणारी मेट्रो दाखवत होता. कधी काळी त्या वृद्धाने त्या तरुणास झुकझुकगाडी दाखवली असेल असा विचार माझ्या मनात येऊन गेला. या जेष्ठ नागरिकांना आताच्या या बजबजपुरी झालेल्या पुण्यात कसे वाटत असेल? असा एक प्रश्न मनात आला. काही जुन्या इमारती पाहून मात्र मनाला बरे वाटले. जुने ते सर्वच टाकाऊ नसते असेही वाटले. देवाची समाधी लागलेल्या इंद्रायणी काठची आळंदी पाहिल्यावर, माऊलींच्या समाधीचे दर्शन झाल्यावर आता पुढील आगमानावेळी ही पुण्यनागरी कशी झालेली असेल या विचारात आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.

१२/१०/२०२३

Happy Birthday Amitabh 2023

 मै आज भी फेके हुये पैसे नही उठाता


दिसायला जरी तो खूप हँडसम नसला तरी कोणालाही आकर्षित करून घेईल असे त्याचे व्यक्तिमत्व. 70 च्या दशकात हिप्पीची फॅशन होती पण ती शोभून जर कोणाला दिसली असेल तर ती एकमेव अमिताभलाच असे म्हणण्यात काही वावगे नाही.

दिवार सिनेमामध्ये चित्रपटात दावर बनलेला इफ्तेखार हा नट जेव्हा एक कामगिरी सोपवतांना अमिताभच्या टेबलवर नोटांचे एक बंडल भिरकावतो तेव्हा, "मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता" असा सलीम जावेदचा संवाद त्याने फेकल्यावर चित्रपटगृहात टाळ्या पडायच्या. बालपणीचा गरीब बुट पॉलीश करणारा हा तोच मोठा झालेला मुलगा असल्याचे दावरला कळते.  "मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता" हा संवाद त्याकाळी स्वाभिमानी आणि गरीब दर्शकांना खूप भावला होता मनुष्य कितीही जरी गरीब असला तरी प्रत्येकाला त्याचा आत्मसन्मान हा असतोच. त्यामुळे लहान थोरांना मान हा दिला गेलाच पाहिजे अशीच आशा या संवादातून व्यक्त झाली होती  त्यामुळेच या संवादावर त्या काळी चित्रपटगृहात टाळ्या पडत, शिट्ट्या वाजत. अमिताभचे दिवार, शोले असे सिनिमे जेंव्हा झळकत होते त्याच काळात माझा जन्म झाला होता. त्यामुळे अभिनेता म्हणून अमिताभचा परिचय होण्यास मला दहा-बारा वर्षे तरी लागले असतील. मला आठवते मी शाळेत असतांना जळगाव खान्देशला गेलो होतो. आम्ही सर्व सिनेमा पाहायला म्हणून गेलो. तेंव्हा तिथे दोन सिनेमागृहे अगदी समोरासमोर होती. आता ती आहेत की नाही देव जाणे. त्यावेळी सिनेमा पाहण्यापूर्वी मी अमिताभचा सिनेमा पाहण्याचा हट्ट धरला असता सोबतच्या जेष्ठ मंडळींनी मला दोन्ही सिनेमागृहात अमिताभचाच सिनेमा सुरू असल्याचे सांगितले होते त्यामुळे मी एका सिनेमाकडे बोट दाखवले व तो सिनेमा आम्ही बघितला होता. तो मी सर्वात प्रथम पाहिलेला अमिताभचा सिनेमा होता, "दोस्ताना". याच सिनेमामुळे कदाचित बालवयातच दोस्तीचे महत्त्व कळले असावे. त्यावेळी अभिनय, संवाद आदी कोणाला कळत होते! पण अमिताभचे वेगळेपण मात्र कळले होते. उंच, शिडशिडीत, डोक्यावर मोठे पण त्याला शोभणारे केस आणि लांब कल्ले अशी त्याची शरीरयष्टी. दिसायला जरी तो खूप हँडसम नसला तरी कोणालाही आकर्षित करून घेईल असे त्याचे व्यक्तिमत्व. 70 च्या दशकात हिप्पीची फॅशन होती पण ती शोभून जर कोणाला दिसली असेल तर ती एकमेव अमिताभलाच असे म्हणण्यात काही वावगे नाही. पुढे सिनेमागृहात त्याचे अनेक चित्रपट पाहण्याचे योग आले परंतु त्याचा जो सुवर्णकाळ होता त्या काळातील चित्रपट मात्र दूरदर्शन वर बघितले. आम्ही लहान होतो तेव्हा त्याचा मर्द नावाचा सिनेमा पाहिल्याचे आठवते त्यानंतर तो राजकारणात जाऊन खासदार झाल्याचे सुद्धा स्मरते. राजकारणात गेल्यावर अमिताभ चित्रपटसृष्टीपासून दूर गेला परंतु तरीही त्याची चर्चा त्याची क्रेज कायमच राहिली. शहेनशहा नावाच्या चित्रपटापासून तो  राजकारणातून पुन्हा सिनेसृष्टीत आला. पुनरागमन झाल्यानंतर मात्र अमिताभनी सुरुवातीला काही टुकार अशा सिनेमात भूमिका केल्या. शहंशाह सुद्धा त्यापैकीच एक. परंतु राजकारणानंतर सिनेसृष्टीत येतांनाचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे शहंशाहने मोठी गर्दी  खेचली. सकाळी सहा वाजता सुद्धा शहंशहाचा शो झाला होता. शहेनशहा पाहण्यासाठी भल्या मोठ्या रांगा सिनेमागृहासमोर लागल्या होत्या. "रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है शहंशाह" हा डायलॉग तेव्हा गाजला होता. परंतु शहेनशहासारखे कथानक असलेले सिनेमे पूर्वी सुद्धा झळकले होते त्यामुळे शहेनशाहने जरी गर्दी खेचली असली तरी तो एक सुमारच सिनेमा होता. त्यानंतर त्याचे आज का अर्जुन, जादूगर, तुफान, लाल बादशहा असे सुमार दर्जाचे सिनेमे झळकले होते मात्र फक्त अमिताभच्या नांवावर त्यांनी गर्दी खेचली होती. लाल बादशहा सिनेमाच्या वेळी मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो तेंव्हा अमिताभवरील प्रेमापोटी आम्ही मित्र लाल बादशहा पाहण्यासाठी म्हणून गेलो. इतकी तुफान गर्दी होती की आम्ही लाल बादशहा सिनेमा अक्षरश: जमिनीवर बसून पाहिला होता. परंतु चित्रपट पाहिल्यावर मात्र आमचा भ्रमनिरास झाला होता. अमिताभचे 90 च्या दशकातले असे चित्रपट पाहून मात्र खेद झाला होता. ज्या अमिताभने शोले,दिवार, जंजीर, कसमे वादे, आखरी रास्ता, काला पत्थर, आनंद, नमक हराम, नमक हलाल, सौदागर, खून पसीना, शान, राम बलराम, चुपके चुपके, लावारीस अशा सिनेमांमध्ये विविध भूमिका खुप चांगल्या साकारल्या होत्या त्याने व ज्या सर्वांना आजही भावतात. या सिनेमांमध्ये चांगले संवाद होते, त्यांचे कथानक चांगले होते त्याच अमिताभनी नंतरच्या काळात मात्र मिळेल ते चित्रपट का स्विकारले असावेत ? त्याने स्थापन केलेल्या कंपनीवर झालेल्या कर्जामुळे त्याने असे चित्रपट स्वीकारले होते असे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा त्याने अनेक चांगले चित्रपट केले. काल अमिताभ 82 वर्षाचा झाला परंतु तरीही त्याचा चाहता वर्ग टिकून आहे हे काल त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या गर्दीवरून दिसले. अमिताभ या नावात काय जादू आहे कुणास ठाऊक? 82 व्या वर्षीही जेव्हा ज्येष्ठ नागरिक हे घरी बसलेले असतात, आजारी असतात,  त्यांना काही कार्य करणे जमत नाही त्या वयात अमिताभ आजही "देवी और सज्जनो" म्हणत जेव्हा छोट्या पडद्यावर येतो तेव्हा त्याची कार्यप्रवणता, उत्साह हा प्रभावी व प्रेरणादायी असतो. आज अमिताभवरचा हा तिसरा लेख लिहीत आहे पूर्वीच्या लेखांमध्ये त्याचे संवाद, त्याची गाणी याबद्दल लिहिलेलेच आहे. दिवार मध्ये लहानपणी फेकलेले बुट पॉलीशचे पैसे उचलून देण्यास सांगणारा विजय मोठा झाल्यावर जेंव्हा दावरला "आज भी फेके हुए पैसे नही उठाता" असे म्हणतो तेव्हा त्याच्यातला तो अभिमानी तरुण त्याच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे चित्रपटगृहातील दर्शकांना आजही प्रभावित करून सोडतो.   अमिताभला त्याच्या शरीरयष्टीमुळे, आवाजामुळे सुरुवातीला नाकारले होते परंतु त्याच गोष्टींना त्याने असेट बनवले. वन मॅन इंडस्ट्री प्रमाणे अनेक यशस्वी चित्रपटातून भूमिका उत्कृष्ट अभिनयाने वठवल्या व सुपरस्टार झाला, आजही आहे. सुपरस्टार होण्यासाठी त्याने मेहनत घेतली, भरपूर नावलौकिक व धनसंपदा प्राप्त केली आजही तो कार्यप्रवण राहून चांगले उत्पन्न मिळवतच आहे वयाच्या 82 व्या वर्षी सुद्धा जरी पैसा हे सर्वस्व नसले तरी बक्कळ पैसा कमवतच आहे. पण ते पैसे "फेके हुए पैसे" नसून त्याच्या अंगभूत गुणांनी, मेहनतीने व त्याने स्विकारलेल्या कार्याप्रतीच्या निष्ठेने प्राप्त केलेले आहे.

०५/१०/२०२३

Article on the sad demise of Mr B.N.Kulkarni

अजो नित्य:शाश्वतोsयं पुराणो

स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली, आदर्श मूल्यांचे जतन करणारी पिढी हळूहळू आपल्यातून निघून जात आहे. शुद्ध सात्विक जीवनशैली, शाकाहार, बाहेरचे न खाणे याबद्दल बाळगलेला प्रचंड संयम, अंगी नियमितपणा असणारे, आरोग्याकडे लक्ष देणारे, शांत, संयमी, मितभाषी व नॉन करप्टेड असे लोक आपल्यातून निघून जात आहेत, बाळासाहेब हे त्यांपैकीच एक होते.

एखाद्याचे इहलोक सोडुन जाणे हे त्याच्या जवळच्या नातेवाईकांसाठी जितके क्लेशदायी असते तितकेच ते त्याचा मित्र परिवार व समाजासाठी सुद्धा वेदनादायी असते. त्यातही जाणारा व्यक्ती जर सज्जन, निस्वार्थी आध्यात्मिक वृत्तीचा असेल तर त्याच्या जाण्यामुळे झालेल्या दु:खाची तीव्रता अधिकच जाणवते. ब.ना. उर्फ बाळासाहेब कुळकर्णी हे त्यापैकीच एक. 1996-97 चे वर्ष असेल श्री ब. ना. कुळकर्णी सेवानिवृत्तीनंतर खामगांवला स्थायिक होण्यासाठी म्हणून आले. ते माझ्या आत्याचे यजमान. तेव्हा मी पदवीचे शिक्षण घेत होतो तत्पूर्वी त्यांचा माझा विशेष परिचय नव्हता. त्यांचा मुलगा शशांक हा माझा समवयीन असल्यामुळे आमचे चांगले मैत्र्य जुळले आणि बाळासाहेबांकडे माझे येणे जाणे सुरू झाले. शशांक कॉलेज जीवनानंतर नोकरी निमित्त पुण्याला स्थायिक झाला तरीही माझे त्याच्या खामगाव येथील घरी येणे जाणे कायम होते. बाळासाहेबांशी भेटण्याची, बोलण्याची ओढ मला त्यांच्याकडे घेऊन जात असे. मी त्यांच्याकडे गेलो की बाळासाहेब नेहमी त्यांच्या खुर्चीवर बसून काहीतरी वाचन, लेखन, ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यास करीत बसलेले असत. मी गेल्यावर ते राजकारणाच्या व  इतरही अनेक विषयांवरील गप्पांमध्ये रंगून जात. ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यास असल्याने ते काही भाकिते सुद्धा करीत आणि ती खरी होत असत. ते ज्योतिष्यशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांच्या जेष्ठ कन्या नीलिमाताई यांना सुद्धा ज्योतिष्यशास्त्रात रुची निर्माण झाली व त्या भारतातून ज्योतिष्यशास्त्राच्या अखिल भारतीय परीक्षेत प्रथम सुद्धा आल्या होत्या. बाळासाहेबांकडे गेल्यावर आत्या सुद्धा चर्चेत सहभागी होत. आत्या मोठ्या कौतुकाने बाळासाहेबांची विविध वैशिष्ट्ये मला वेगवेगळ्या भेटींमध्ये सांगत असत. त्यातून मला बाळासाहेबांप्रती मोठ्या आदराची भावना निर्माण झाली होती. आयुष्यभर साधी राहणी, सात्विक व मिताहार, शांत संयमी वाणी, हसतमुखपणाने लहान थोरांशी बोलणे हे सर्व मी जवळून पाहिले. बाळासाहेब उत्कृष्ट जलतरणपटू सुद्धा होते. ते पाण्यावरती कितीतरी वेळ श्वासोच्छवासांवर नियंत्रण करून "फ्लोटिंग" करू शकत. त्यांचं फिटनेसकडे विशेष लक्ष असे. वयाच्या 80 व्या वर्षी ते लीलया शीर्षासन करू शकत असत. सेवानिवृत्तीनंतर संघ विचारधारेने प्रभावित असल्यामुळे बाळासाहेब सदैव काळी टोपी परिधान करीत असत. नेहमी काळी टोपी घालून फिरत असतांना त्यांना अनेकांनी पाहिले आहे व "काळी टोपीवाले" म्हणून ते चांदे कॉलनी, जलंब नाका खामगांव या भागात सकाळी फिरणा-यांमध्ये परिचित झाले होते. त्यांच्या बोलण्यातून मला कधीही नैराश्याचे सूर, नकारात्मकता जाणवली नव्हती. आता-आता एक वर्षांपूर्वी हृदयाचा त्रास सुरू झाल्यावर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी अकोल्याला नेले होते पण दवाखान्यात असतांना सुद्धा दूरध्वनीवरून बोलताना ते म्हणाले होते की, "या गोष्टीला घाबरून काय फायदा? हे तर आता चालणारच आहे." त्यांच्यातील आत्मबलामुळेच त्या दुखण्यातून बरे होऊन ते परत घरी आले होते. ते सध्या अमरावतीला स्थायिक झाले होते. परवा रात्री अचानक त्यांना धाप लागली व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ती वार्ता ऐकून धक्का बसला, दुःख झाले. आजच्या मोहमायेच्या जगात चांगल्या खात्यात नोकरी भेटल्यावर भ्रष्टाचार करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या वार्ता आपण ऐकतच असतो. परंतु भ्रष्टाचाराची संधी असणाऱ्या खात्यात आयुष्यभर नोकरी केल्यावर सुद्धा बाळासाहेब वरकमाईच्या लोभापासून दूर राहिले. ते नॉन करप्टेड होते म्हणूनच मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागल्याने त्यांचे स्वत:चे घर वयाच्या उत्तरार्धात झाले होते. मोठा कालावधी भाड्याच्या घरात व्यतीत झाल्याचे त्यांना ना कधी दु:ख झाले ना स्वत:च्या घरात राहण्याचा अत्यानंद झाला असे ते "सुख दु:खे समेकृत्वा" हे तत्व मानणारे व्यक्ती होते. बाळासाहेबांच्या सहवासात  समोरच्या व्यक्तीच्या मनात सुद्धा चांगले भाव निर्माण होत. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली, आदर्श मूल्यांचे जतन करणारी पिढी हळूहळू आपल्यातून निघून जात आहे. शुद्ध सात्विक जीवनशैली,  शाकाहार,  बाहेरचे न खाणे या बद्दल बाळगलेला प्रचंड संयम, अंगी नियमितपणा असणारे, आरोग्याकडे लक्ष देणारे, शांत, संयमी, मितभाषी असे लोक आपल्यातून  निघून जात आहेत, बाळासाहेब हे त्यांपैकीच एक होते. बाळासाहेबांचे जाणे त्यांच्या सर्वच नातेवाईक व परिचित यांना चटका लावून गेले. बाळासाहेब त्यांच्या स्मृतीरूपाने सदैव सर्वांच्या स्मरणात राहतील बाळासाहेबांनाही शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करतो. आत्मा अमर आहे, 

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय:।

अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे॥ २०॥

या गीतेतील श्लोकानुसार

आत्मा हा ना जन्म घेतो ना मरतो. तसेच तो निर्माण होऊन पुन्हा न होणारा आहे. तो जन्मरहित, नित्य-निरन्तर, पुरातन, शाश्वत व अनादि आहे. शरीर नष्ट झाल्यावर सुद्धा हा (आत्मा)  मात्र मरत नाही.

असे असले तरीही दु:ख हे होतेच व म्हणून बाळासाहेबांना ही भावपुर्ण शब्दरूपी श्रध्दांजली.


२६/०९/२०२३

Article on the occasion of birth anniversary of eminent actor Dev Anand

सौ साल पहले...

डोक्यात हॅट, जॅकीट, सुट, बूट नेहमी "अप टू डेट" पेहरावात तो पडद्यावर दिसला की तरुणी त्याच्या प्रेमात पडत."जानपर मेरी बनी आपकी ठहरी हंसी" अशी त्यांची गत होत असे.

आजच्या तारखेच्या बरोबर शंभर वर्षे आधी त्याचा जन्म वकील पिशोरीमल आनंद यांच्या कुटुंबात तत्कालीन पंजाब प्रांतात झाला. त्याच्या दोन भावांसह शालेय शिक्षणानंतर तो बी. ए. झाला. इंग्रजी भाषेवर त्याने प्रभुत्व मिळवले. 1940 दशकात दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या चित्रपटसृष्टीने चांगलेच बाळसे धरले होते. रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी काम धंदा शोधण्यासाठी म्हणून तो स्वप्ननगरी मुंबईला दाखल झाला. मुंबईला आल्यावर त्याला डाक विभागात नोकरी मिळाली. त्यावेळी चित्रपटसृष्टीवर मराठी लोकांचा दबदबा होता आणि अशाच मराठी माणसाच्या चित्रपट कंपनीने अर्थात व्ही. शांताराम यांच्या प्रभातने त्याला नायक म्हणून "हम एक है" या हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारीत एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली. हा नट म्हणजे स्टाईल किंग, चॉकलेट हिरो धर्मदेव आनंद अर्थात देव आनंद. सुरुवातीला त्या काळाला साजेशा अशा साध्यासुध्या भूमिका त्याने साकारल्या आणि नंतर स्वत:ची अशी अनोखी शैली, लकब विकसित केली जी कुणालाही अनुसरता आली नाही. डोक्यात हॅट, जॅकीट, सुट, बूट नेहमी "अप टू डेट" पेहरावात तो पडद्यावर दिसला की तरुणी त्याच्या प्रेमात पडत."जानपर मेरी बनी आपकी ठहरी हंसी" अशी त्यांची गत होत असे. पडद्यावर त्याने त्याच्या रोमँटिक शैलीने नटीला "...तुम रुठा ना करो" असे म्हटल्यावर नटीची रुसून बसण्याची बिशाद होत नसे. त्याची वेगाने संवादफेक, त्या संवादात विशिष्ट पद्धतीने चढ उतार व "पॉझेस" घेणे, मान हलवत, डोळ्यांच्या हालचाली करत बोलणे, चालण्याची वेगळीच त-हा यांची कधी कुणाला हुबेहूब नक्कल करणे जमले नाही. 40 च्या दशकात जिद्दी, बाजी, असे त्याचे चित्रपट झळकले. 50 च्या दशकात टॅक्सी ड्रायव्हर, मुनीमजी, सीआयडी,पेइंग गेस्ट 60 च्या दशकात माईलस्टोन आर. के. नारायण यांची कथा असलेला गाईड, ज्वेलथीफ, कालाबाजार, तेरे घर के सामने, हम दोनो. 70 च्या दशकात जॉनी मेरा नाम, बनारसी बाबू, वारंट, हरे रामा हरे कृष्णा असे त्याचे चित्रपट प्रचंड गाजले. यातील काही चित्रपट हे त्याने आपल्या चेतन व विजय आनंद या बंधूंसह स्थापन केलेल्या नवकेतन या चित्रपट निर्मिती करणा-या कंपनीचे होते. 80 च्या दशकात स्वामी दादा, हम नौजवान, लष्कर असे त्याचे चित्रपट चांगले चालले. तदनंतर मात्र त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट साफ कोसळू लागले परंतू तो कार्यरतच राहिला त्याचे तो दु:ख करत बसला नाही अगदी त्याच्या गाण्यातील "गम और ख़ुशी मे फर्क ना महसुस हो जंहा" याप्रमाणे. कर्म करीत राहा या भगवानुवाचा प्रमाणे तो अखंड कर्म करीतच राहिला. देव आनंदची गाणी सुद्धा त्याच्याप्रमाणेच सदाबहारच अशी होती. रफी, किशोर, हेमंतदा यांच्या आवाजातील त्याची गाणी आजही लोक ऐकतात. आज देव असता तर 100 चा असता. तो जरी हयात नसला तरी आजही त्याच्यावर प्रेम करणारा मोठा चाहता वर्ग आहे आणि म्हणूनच 26 सप्टे 23 रोजी त्याची 100 वी जयंती असल्याने 30 शहरात 57 सिनेमागृहात 23 ते 26 सप्टे या कालावधीत त्याचे गाईड, ज्वेलथीफ असे काही चित्रपट पुन:प्रदर्शित झाले. सदैव आनंदी, उत्साही, कार्यरत राहणा-या देव आनंद याला पद्मभूषण, दादासाहेब फाळके, फिल्मफेअर व इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. झीनत अमान, जॅकि श्रॉफ इ अनेक नवोदितांना त्याने संधी दिल्या. "सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी है और कल भी रहेगा" या त्याच्यावर चित्रित झालेल्या गीताप्रमाणेच त्याच्या मोठ्या चाहत्यावर्गाचे त्याच्यावर प्रेम आहे व राहील असेच वाटते. 

२१/०९/२०२३

Article about sad death of a young man in Ganpati Procession .

उत्सवाच्या उत्साहात सावधानता बाळगावी

अतिउत्साहामुळे झालेल्या मृत्यूमुळे समस्त कुटुंबीय शोक सागरात बुडते, समाज हळहळतो. अशा मृत्युमुखी पडणा-या तरुणांमध्ये अनेक तरुण हे हुशार असे  असतात. ज्यांच्या जीवित राहण्याची देशाला सुद्धा गरज असते , त्यांच्या अस्तित्वात देशाचे भले असते, त्यांच्या अकाली मृत्यूने देशाची अपरिमित हानी होते.

तारुण्य म्हटल की भरभरून उत्साह, जोश नवोन्मेष, उर्मी हे तारुण्याला साजेसे असे गुण आले. तेजस्विता, तपस्विता, तत्परता यांचा सुद्धा अंतर्भाव त्यात असतो. परंतु तारुण्यातील या दिवसात सर्वच तरुणांनी अत्यंत काळजी बाळगायला हवीच. अतिउत्साह हा कधीकधी जीवाशी येतो आणि अकाली मृत्यू सुद्धा ओढवतो याची अनुभूती अनेकदा आली आहे. निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी काढतांना, तलावात किंवा नदीत नावेत बसून सेल्फी काढतांना, उंच पहाडाच्या टोकावर जाऊन फोटो काढतांना,  लोकल मधून स्टंट करतांना, नाईट बाइकिंग करतांना असे अपघात घडून अनेक तरुण मृत्युमुखी पडले आहेत. ऐन तारुण्यात अतिउत्साहामुळे झालेल्या अपघातामुळे,  झालेल्या मृत्यूमुळे समस्त कुटुंबीय शोक सागरात बुडते, समाज हळहळतो. असे मृत्युमुखी पडणा-या तरुणांमध्ये अनेक तरुण हे हुशार व होतकरू असे सुद्धा असतात. ज्यांच्या जीवित राहण्याची देशाला सुद्धा गरज असते. त्यांच्या अस्तित्वात देशाचे सुद्धा भले असते, असे तरुण देश कार्यात अग्रेसर होऊ शकतात परंतु त्यांच्या अशा अकाली मृत्यूने देशाची हानी होते, तरुणपणी अशा अपघाती मृत्यूस तरुणांचा जोश, अतिउत्साह हेच कारणीभूत असते. सोहम सुद्धा असाच एक तरुण होता. कालची बुलढाणा जिल्ह्यातील सोहम सावळे या तरुणाच्या मृत्यूची वार्ता  सर्वांचे मन हेलावून गेली. बुलढाणा येथील मुख्याध्यापक व आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्री भगवान सावळे यांचा मुलगा सोहम सावळे हा तरुण कटक, ओरिसा येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता. गणेश स्थापनेच्या मिरवणुकीमध्ये सोहम आपल्या मित्रांसह समाविष्ट झाला होता. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत, ढोल ताशांच्या गजरात तल्लीन असतांनाच गणपती बाप्पा विराजमान असलेल्या गाडीमध्ये उभा असलेला एका तरुण भला मोठा भगवा ध्वज डौलाने फडकवत होता. थोड्याच वेळात जे न व्हायचे तेच अघटित घडले, त्या ध्वजाच्या ॲल्युमिनियम दांड्याचा स्पर्श विद्युत तारांना झाला आणि चार-पाच तरुण विजेच्या धक्क्याने खाली कोसळले. ज्या गणेश आगमनाच्या मिरवणुकीत आनंद उत्साहाचे वातावरण होते त्यावर एकदम शोककळा पसरली. झेंड्याचा दांडा विद्युत तारेला स्पर्श होतानांची चित्रफीत सुद्धा समाज माध्यमांवर पसरली. संपूर्ण देशात गणेशाचे आगमन उत्साहात साजरे होत होत असतांना  सोहम सावळेच्या अपघातामुळे झालेल्या मृत्यूची चित्रफीत पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त झाली व होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर इतरही सर्वच नागरिकांना सोहमचा हा मृत्यू धक्का देऊन गेला. आर्ट ऑफ लिव्हिंग हि एक सुविचार प्रसारीत करणारी, सुदृढ समाज निर्माण व्हावा म्हणून कार्य करत असलेली राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेत पुढे अग्रेसर होऊन स्वउन्नती व राष्ट्रातील नागरिकांची सुद्धा आत्मोन्नती व्हावी म्हणून ओरिसात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यास गेलेल्या सोहमवर असे संकट ओढवले असा विचारही कोणी केला नसेल एका बेसावध क्षणी मिरवणुकीतील या तरुणांवर यमराजाने घाला घातला.  या घटनेमुळे तरुणांनी आपल्या उत्सवप्रिय देशात उत्सव साजरे करताना मोठी सावधानता बाळगायला पाहिजे हेेच प्रतीत होतेे. भारत देश हा तरुणांचा देश आहे, देशाला तरुणांची गरज असते त्यामुळे सर्व तरुणांनी सर्वच उत्सवांमध्ये सावध राहून सण उत्सव साजरे करावे

१४/०९/२०२३

Article about the various demands of people

मांगन मरण समान है

मांगन मरण समान है, 
मत मांगो कोई भीक |
मांगन से मरना भला 
यह सदगुरु की सिख  ||
कित्येक वर्षांपुर्वी संत कबीरांनी लिहिलेल्या या दोह्याचे स्मरण आज झाले. स्वार्थी मागण्या करण्यापेक्षा मरण बरे असे कबीर म्हणतात.  कबीराचे दोहे हे कालातीत आहे. आजही अनेक प्रसंगी ते चपखलपणे लागू होतात. स्वार्थी मागण्यांपेक्षा होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतीसाठी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शाळा यांसारख्या व समस्त
देशबांधवांसाठी जातपात, समाज न पाहता केलेल्या मागण्यांना मात्र कबीरांचे उपरोक्त वचन लागू होत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देश स्वतंत्र करण्यासाठी भारतीय लोक देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते. ज्याला जशी शक्य होईल तसे तो देशाला देण्याचा प्रयत्न करीत होता. क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले, धनिकांनी आपली धनसंपत्ती देश स्वतंत्र करण्याच्या कामासाठी दान केली, कुणी स्वदेशी कापडासाठी सुत कातत होते, बुद्धिवंत लोक इंग्रज विरोधी जागृती आपल्या लेखणीतून व भाषणातून करत होते. अशा या सर्व प्रयत्नोपरांत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र दुसऱ्याला देण्याची, त्यागाची परंपरा असलेल्या देशात हळूहळू मी, माझी जात, माझा समाज यांचाच काय तो विकास व्हावा, प्रगती व्हावी अशा मागण्या आपल्याच सरकार पुढे रेटल्या जाऊ लागल्या. स्वातंत्र्योत्तर काळात ग्राहक हक्क संरक्षण कायदा, माहिती अधिकार अशा काही लोकोपयोगी मागण्या सुद्धा झाल्या ज्यात सर्वच भारतीयांचा फायदा होता. यांसारख्या काही मागण्या या देशाच्या हिताच्याही होत्या यात शंका नाही. परंतु जास्तीत जास्त मागण्या ह्या समस्त भारतीयांसाठी किंवा देशासाठी नसून तर केवळ आपापल्या समाजासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी होऊ लागल्या. उपोषण, सत्याग्रह या शस्त्रांचा उपयोग लोक प्रशासन व सरकारला वेठीस धरण्यासाठी म्हणून करू लागले. यामुळे मग भारतात असलेल्या नानाविध जाती, पंथ, समाज यांच्यात तेढ निर्माण होऊ लागली व ती अव्याहत सुरूच आहे. त्याला काही राजकारणी सुद्धा सत्तेसाठी खतपाणी घालू लागले व घालत असतात. माझा व माझ्याच जातभाईंचा काय तो तेवढा फायदा झाला पाहिजे, हित झाले पाहिजे मग इतरांचे काहीही काय होवो ना ! ही भावना झपाट्याने रुजली व झपाट्याने विस्तारतच आहे. स्वतःच्याच पात्रात तूप कसे ओढले जाईल याचे प्रयत्न मोठ्या स्तरावर सुरू झाले, होत आहेत परंतु देशाशी काही घेणे देणे नाही, देशाचा व देशाच्या विकासाचा काहीही विचार केला जात नाही हे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी निश्चितच हितकारक नाही. स्वार्थी आंदोलने, मागण्या यांना आवर घालणे सुद्धा कठीणच आहे. बरेच प्रसंगी याला राजकीय खतपाणी सुद्धा कारणीभूत असते. आज आपल्या देशात देशाला काही देणाऱ्यांची संख्या नगण्य आहे उलट नाना प्रकारच्या मागण्या करणारे मांगीलालच मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागले आहेत. (मांगीलाल नांव असलेल्यांनी कृपा करून गैरसमज करू नये. त्यांचा अपमान करण्याचा हेतू नाही ) एका देशभक्तीपर गीतात म्हटले आहे 

देश हमे देता है सब कुछ 
हम भी तो कुछ देना सीखे 
या ओळीप्रमाणे ज्याला जे शक्य आहे त्याने तो जिथे आहे तिथूनच तो देशासाठी जे  काही चांगले कार्य करू शकत असेल तसे त्याने करावे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की, 
काही मागणे हे आम्हा अनुचित
वडीलांची रीत जाणत असो ||
म्हणजे आमच्या पूर्वजांपासूनची कुणाला काही मागणी न करण्याची रीत आम्हाला चांगली ठाऊक आहे. तुकाराम महाराजांची ही ओवी तसेच संत कबीर यांच्या उपरोक्त दोह्याला अनुसरुन इतरांकडे याचक बनून जाण्यापेक्षा स्वत: दाता कसे बनता येईल, दाता बनण्याची क्षमता निर्माण झाल्यावर जे कुणी खरे गरजू असतील त्यांना मदत कशी करता येईल हे पाहावे. देशाकडे फक्त स्वतःचा समाज, स्वतःची जात व स्वतःसाठी अशा संकुचित मागण्या करण्यापेक्षा देशाला व देशातील सर्वच समाज बांधव सर्वच भारतीय नागरिकांना हितकारक होतील अशा मागण्या कराव्या तेंव्हाच ते अधिक व्यापक अधिक सकारात्मक, देशहितकारक, सर्वसमावेशक असे होईल व अशा 
समस्त देशबांधवांसाठी केलेल्या मागण्या ह्या कबीर यांच्या म्हणण्याप्रमाणे मरणा समान सुद्धा नसतील कारण त्या स्वार्थी मागण्या नसून सर्वांसाठीच केलेल्या मागण्या आहेत. संकुचित वृत्तीने केलेल्या मागण्यांनी केवळ स्वउन्नती, स्वसमाज उन्नती होईल राष्ट्रोन्नती नाही. 

०७/०९/२०२३

Article about Stalin and Parmeshwar statement about Hindu

हिंदू कौम 
कहाँ 
से आयी ?
सनातन संस्कृतीचं या हिंदू धर्माचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की ही संस्कृती अनादी अनंत काळापासून एक जीवन पद्धती म्हणून अस्तित्वात आहे. यात प्रत्येकाला आपली आपली पूजा पद्धती , जीवन पद्धती जगण्याची अनुमती आहे , एवढेच काय तर देव न मानण्याची सुद्धा अनुमती आहे, हा एकमेव असा सर्वसमावेशक धर्म आहे

90 च्या दशकात शाळेत येता जाता भिंतीवर लिहिलेले एक वाक्य माझ्या दृष्टीस पडत असे. त्या काळात निवडणुका असल्या की आजच्यासारखा भपकेबाज प्रचार नसे. मोठ-मोठ्या प्रचार गाड्या,फ्लेक्स बोर्ड, कटआउट असे काही तेव्हा नव्हते. भिंतींवरती गेरू ,कोळसा, निळ आदीने प्रचार वाक्ये लिहून, निषाण्या, चिन्हे काढून विविध पक्षांचे उमेदवार प्रचार करीत. त्यातलेच मला जाता येता दिसणारे ते वाक्य होते. ते वाक्य माझ्या मनात कायमचेच बसले. कारण मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्माच्या उत्पत्ती बाबत प्रश्न करणारे ते वाक्य होते. ते प्रचार वाक्य होते "हिंदू कौम कहाँ से आयी?" हा तत्कालीन प्रश्न परमेश्वर यांच्या हिंदू धर्म कुठून आला, त्याचा संस्थापक कोण ?  असाच आहे भाषा व शब्द यात काय तो फरक आहे. हिंदूबहुल असलेल्या देशात बहुसंख्यांंकांनाच त्यांचा धर्म कुठून आला असे 35 वर्षांपूर्वी विचारले गेले होते, त्याआधीही अशाप्रकारच्या प्रश्नांची विचारणा झाली होती व आजही कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांच्यासारखे लोक तीच विचारणा करीत आहे. परमेश्वर यांच्या आधी तामिळनाडूचे मंत्री आणि आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करून टाकण्याचे विधान केले होते. त्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सुद्धा त्यांचीच री ओढली व त्यानंतर  परमेश्वर यांनी सुद्धा हिंदू धर्माच्या संस्थापका विषयी व हिंदू धर्माची उत्पत्ती कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून आपल्या देशात हिंदू धर्माला अनेकदा अनेकांनी दूषणे दिली. हिंदू सहिष्णू असल्याने सहनच करीत गेले त्याचाच परीणाम मग चित्रपट, कला क्षेत्रावर सुद्धा झालेला दिसला. चित्रपटातून हिंदू पात्रे, पुजारी आदी व्यंगात्मक, हास्यास्पद असे दाखवले गेले, हिंदू देवी देवतांची आक्षेपार्ह अशी चित्रे काढली गेली तरीही हिंदू मूग गिळून होते. देवी देवतांवर अनेकांनी तोंडसुख घेतले आणि अजूनही घेत आहे परंतु या देशात ग्रीक आले, शक आले, हूण आले, मुघल आले इंग्रज, डच, पोर्तुगीज आले सर्वांनी आपल्यावर राज्य गाजवले तरीही ही आपली सनातन संस्कृती टिकून आहे. धर्म बुडवण्याचे , भ्रष्ट करण्याचे नाना उपद्व्याप झाले तरीही "...हस्ती मिटती नही हमारी" याप्रमाणे हिंदू धर्म, सनातन धर्म ही संस्कृती टिकून राहिली व राहील. स्टॅलिन, प्रियांक नावातच परमेश्वर असलेले कर्नाटकचे गृहमंत्री अशा कितीही लोकांनी काहीही म्हटल्याने काही एक फरक पडणार नाही. सनातन संस्कृतीचं या हिंदू धर्माचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की ही संस्कृती अनादी अनंत काळापासून एक जीवन पद्धती म्हणून अस्तित्वात आहे. यात प्रत्येकाला आपली आपली पूजा पद्धती, जीवन पद्धती जगण्याची अनुमती आहे, एवढेच काय तर देव न मानण्याची सुद्धा अनुमती आहे, हा एकमेव असा सर्वसमावेशक धर्म आहे,  हा धर्म अनादी अनंत आहे. म्हणूनच स्वामी विवेेेकानंद म्हणाले होते की, "जिस तरह अलग-अलग स्रोतों से निकली विभिन्न नदियां अंत में समुद्र में जाकर मिल जाती हैं, उसी तरह मनुष्य अपनी इच्छा के अनुरूप अलग-अलग मार्ग चुनता है, जो देखने में भले ही सीधे या टेढ़े-मेढ़े लगें, परंतु सभी भगवान तक ही जाते हैं." कोणतीही अनुसरण पद्धती असली तरी सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात ज्याला लोक वेगवेगळ्या नावांनी ओळखतात अशी शिकवण देणारा एकमेव हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माचा कुणीही असा संस्थापक नाही हे ठाऊक असूनही परमेश्वर यांच्यासारखे लोक पुन्हा पुन्हा तेच मुद्दे का उपस्थित करतात?  याचे कारण स्पष्ट आहे की आगामी निवडणुकांच्या काळात आपली सत्ता कशी कायम राहील याचे तसेच कधी नव्हे तशा झालेल्या हिंंदू जागृृतीचे त्यांच्या मनात भय उत्पन्न झाले आहे. म्हणून हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे, वैचारिक भेद निर्माण करण्याचे अशा लोकांचे नाना प्रयत्न सुरू आहेत. परंतु अशा लोकांना कधीही मुळीच थारा मिळणार नाही आणि हिंदू धर्माची उत्पत्ती कशी झाली म्हणजेच हिंदू कौम कहाँसे आयी ? असले प्रश्न कुणी विचारु नाही. तरीही असे प्रश्न विचारले जरी गेले तरी त्याचा काहीही एक परिणाम या सनातन धर्मावर होणार नाही हे स्टॅलिन सारख्यांंनी ध्यानात घ्यावे.