दहीहंडीची उंची आणि थरांची युक्ती
भगवान
श्रीकृष्ण यशोदा माता आणि इतर गोपिकांचे दुध, दही, ताक यांचे त्याच्या सवगड्यांसह
चौर्य करून सर्व सर्व मित्र आपासांत वाटून या दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घेत
असत. आता श्रीकृष्ण असे का करत असे ? यावर निरनिराळी मते आहेत. असेही सांगितले
जाते की मथुरेचा जुलुमी राजा कंस जो नात्याने श्रीकृष्णाचा मामाच होता या कंसाच्या
स्त्रीयांना म्हणे कुणी सांगितले होते की जर त्यांनी धी तूप दुध यांनी दररोज आंघोळ
केली तर त्या चिरतरुण राहतील. त्यासाठी म्हणून गोकुळातून हे सर्व पदार्थ मथुरेत
जात असत. यासाठीच भगवान श्रीकृष्ण ‘माखनचोर’ झाले. मग त्यात नाना कथा आल्या. भारतीय
म्हणजे उत्सवप्रिय माणसे मग काय भगवान श्रीकृष्ण यांच्या कडून इतके काही
शिकण्यासारखे असताना ते विसरून जाऊन आपणास लक्षात राहिली ती फक्त दहीहंडी. आता तर तीही
बनवत दही आणि युरिया मिश्रीत दुधाची. अन्याय झाला तर हाती शस्त्र घ्यावेच लागते मग
समोर आपले अन्यायी आप्त का असोना हा आपल्या पवित्र ग्रंथ भग्वदगीता यातील संदेश
विसरून जाऊन अहिंसेच्या नको तितक्या आहारी गेलो. असो दहीहंडी हा तसा उत्साहाचा सण.
परंतू या सणामध्ये राजकारण्यांनी अति उत्साह आणला मग काय करोडो रुपये आली, मोठ
मोठ्याल्या रकमेची बक्षिसे आली, या बक्षीसांच्या प्रलोभोनामुळे गोविंदा पथके दहीहंडीचे
उंचच उंच थरावर थर रचू लागले. मग यात अनेक अपघात झाले. अनेक जण यमसदनी गेले तर
कित्येक जायबंदी झाले. थोडेफार सांत्वन करून राजकारणी मोकळे झाले आणि जायबंदी
झालेले गोविंदा त्यांचे अपंगत्व घेवून एकटेच राहिले. त्यांना आधार, धीर देण्यास त्यांच्या
कुटुंबा व्यतिरिक्त कुणीच नाही. चांगल्या चांगल्या तरुण मुलांचे नुकसान झाले. मा.
न्यायालयाने मग दहीहंडीची उंची २० फुटांच्या वर नसावी असा निर्वाळा झाला. परंतू
दहीहंडी 20 फुटांची आणि सलामी साठी वेगळा थर बिना दहीहंडीचा असा उपाय म्हणा किंवा
पळवाट म्हणा याचा शोध आपल्या प्रखर बुद्धीवंत जनतेनी लावलाच. आता दहीहंडीच्या
बाजूलाच केवळ एक गोविंदांचा उंच थर उभारला जाईल आणि ज्याचा थर जास्त उंच त्याला बक्षीस.
म्हणजे पुन्हा जैसे थेच. मा. न्यायालयाचा अवमान आणि आपला अतिउत्साहावर पण विरजण पण
नाही मग “कोई जिये या मरे हमको क्या बाबू” या प्रमाणे गोविंदां मृत्युमुखी पडो अथवा
त्यांना अपंगत्व येवो आम्हास काही पर्वा
नाही . मा. न्यायालय किंवा सरकार यांच्या नियमांचे बंधन तर पाळावेच तसेच तरुणांनी व
लहान असेल तर बालकांच्या पालकांनी बरे वाईट काय समजून दादा, भाऊ यांच्या आवहानास, त्यांच्या
बक्षीसांच्या प्रलोभोनास बळी पडू नये. दहेहांडीचा उंच थर रचणे ही एक प्रकारची पैजच
होय त्यामुळे समर्थ रामदास उक्ती “पैज होड लावू नये काही केल्या” याप्रमाणे भलतीच,
अंगाशी येणारी शर्यत लावून आपल्या प्राणास मुकू नये, कुटूम्बियांवर दु:खाची पाळी
आणू नये. ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल या म्हणीप्रमाणे ज्याला वेदना होतात
त्याचा त्रास त्याला स्वत:लाच जास्त होतो. त्यामुळे “अखंड सावध असावे” सण साजरे करावे
परंतू आपल्या अंगलट येणार नाही याची काळजी घ्यावी. शाळांनी, पालकांनी, मंडळांनी
सर्वांच्या जीविताची काळजी म्हणून तसेच मा. न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून नियमाने व अपघात विरहीत जन्माष्टमी निमित्त
असणारी दहीहंडी साजरी करावी.