Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०४/२०१७

Veteran Actor, Politician Vinod Khanna passed away yesterday article about him and his movies

“विनोदा”चे दु:ख

आता काही दिवसांपूर्वी अत्यंत कृश झालेल्या देखण्या रुबाबदार विनोद खन्नाचे चित्र माध्यमांवर झळकले, त्याच्या निधनाची खोटे वृत्त सुद्धा सर्वदूर पसरले होते आणि काल पुन्हा त्याच्या निधनाची बातमी माध्यमांवर झळकली. दुर्दैवाने कालची बातमी मात्र खरी होती. विनोद गेला दु:ख देऊन गेला. त्याला कधी राजेश खन्ना सारखी लोकप्रियता नाही मिळाली किंवा अमिताभ सारखे “ग्लॅमर” नाही मिळाले परंतू कुठे ना कुठे तो त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये एक स्वतंत्र जागा करून बसला होता. “मन का मीत” या त्याच्या प्रथम चित्रपटापासूनच तो चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांच्या “मीत” बनला. सुरुवातीला खलनायकी भूमिका करून नंतर नायक बनलेला विनोद खन्ना अभिनयात कुणापेक्षाही तसूभर सुद्धा कमी नव्हता. पूर्वी जुने चित्रपट पुन:प्रसारित होत असत.असाच “मेरा गांव मेरा देश” हा चित्रपट खामगांवच्या “श्याम टॉकीज” आताचे “सनी पॅलेस येथे झळकला होता” मी तो बघीतला विनोद खन्नाने “जब्बार” डाकूची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. येथेच विनोद खन्नाशी परिचय (पडद्यावरचा) झाला. तशी आमची पिढी म्हणजे अमिताभ,विनोद खन्ना यांचा काळ ओसारतांनाची पिढी. परंतू त्यांचे चित्रपट आणि अभिनय पाहिलेली पिढी. विनोद खन्ना आणि अमिताभ या जोडगोळीचे अनेक चित्रपट नंतर पाहण्यात आले. जमीर,खून पसीना,परवरीश,मुकद्दर का सिकंदर,हेरा फेरी या सर्वात अमिताभ सोबत विनोदने सुद्धा भूमिका यथायोग्य साकारल्या होत्या.यशाच्या शिखरावर असतांना विनोदच्या जीवनात कलाटणी आली आणि तो आचार्य रजनीश अर्थात “ओशो” यांच्या कडे आकर्षिला गेला आणि त्यांनी काही वर्षे संन्यास घेतला. पुनरागमना नंतर सुद्धा त्याने चांदनी, सूर्या,जुर्म,दयावान असे सरस चित्रपट दिले. त्यानंतर राजकारणात सुद्धा ठसा उमटवला.“इम्तिहान” चित्रपटात गुंड प्रवृतीच्या बेशिस्त विद्यार्थ्यांना सुधारण्याची इच्छा बाळगणा-या आदर्श प्राध्यापकाची भूमिका विनोद खन्नाने छान वठवली होती.महाविद्यालय अध्यक्षाची मुलगी या प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप लावते आणि मग या प्राध्यापकास कशी परीक्षा अर्थात “इम्तिहान” द्यावी लागते
असे कथानक. यातील “रुक जाना नही तू कंही हार के” असे आशावादी गीत विनोद खन्नावर चित्रित झाले होते.ज्यांना कुणाला निराशा वाटत असेल,जे निराशावादी झाले असतील,“फ्रस्टेट” झाले असतील त्यांनी हे गीत एकदा जरूर ऐकावे. नक्कीच त्यांना जगण्याची नवी उमेद मिळेल.विनोदला अनेक सुंदर गाणी सुद्धा मिळाली होती. “नैनोमे दर्पण है, दर्पण मी कोई” , “प्यार जिंदगी है” , “चाहिये थोडा प्यार” , गुलजारच्या मेरे अपने ज्यातून तो खलनायकी भूमिका सोडून नायक बनला होता त्यातील “कोई होता जिसको अपना” आणि अलीकडील चांदनी मधील “लगी आज सावन की फिर वो झडी है” आणि जुर्म मधील “जब कोई बात बिगड जाये”. अशी मधुर गीते त्याच्यावर चित्रित झाली आहेत.वडीलांशी विद्रोह करून सिनेमा क्षेत्रात प्रवेश केला त्या नंतर संन्यास पुन्हा सिनेमा पुढे राजकारण असा प्रवास विनोद खन्नाने केला. त्याचे काल निधन झाले. आपले सर्वांचे राजकारण, चित्रपटसृष्टी आणि क्रिकेटपटू या सर्वांशी कसे अनामिक नाते जुळले आहे. या क्षेत्रातील लोक त्यांचे कार्य करीत असतात त्यांची शैली, त्यांच्या भूमिका त्यांचा खेळ पाहून आपले त्यांच्याशी अनामिक असे नाते जुळते. त्यांना आपण ठावूक सुद्धा नसतो , त्यांचे प्रताप,दोष सुद्धा आपणास ठाऊक असतात तरीही त्यांच्या जाण्याने समाजाला दु:ख होते.विनोदच्या जाण्याने सुद्धा तसेच झाले. जरी तो “सुपरस्टार” नव्हता “लाईमलाईट” मध्ये नव्हता परंतू रसिकांच्या मनात मात्र घर करून होता काल  तो गेला आणि प्रथमच रसिकांना सुख देणारा, आपल्या अभिनयाने काही वेळ का होईना त्यांना “रीलॅक्स” करून त्यांचे  दु:ख विसरवणारा “विनोद” काल मात्र दु:ख देऊन गेला. 

२६/०४/२०१७

Increasing fees of Private English Medium Schools

आजचे गजनवी, नादीरशहा 
रवा मा.शिक्षण मंत्र्यांनी शाळांना आवाहन केले की १५ टक्क्यांच्या वर शुल्क वाढ करू नये. तसेच पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल. हे आवाहन केले गेले ते दरवर्षी खाजगी विना अनुदानित शाळा वाढवीत असलेल्या त्यांच्या शाळातील शुल्कामुळे. दरवर्षी इंग्रजी माध्यमांच्या या शाळा अवाजवी फी आकारून स्वत:च्या तुमड्या भरत आहेत. खाजगी विना अनुदानित शाळा या “Quality Education” च्या नावाखाली पालकांना लुटत आहेत अगदी जसे पूर्वी मोहम्मद गजनवी आणि नादीरशहा हे लुटारू लुटून गेले. पुणे , मुंबई आणि इतर अनेक शहरांमधील शाळा पालकांचे ओळख पत्र, नाचण्याचा क्लास तो सुद्धा ठराविक व्यक्ती कडूनच अशा काही अनावश्यक बाबींचे अवाजवी शुल्क सुद्धा आकारत आहेत. तसेच विशिष्ट दुकानातूनच नामांकित कंपनीच्या बूटांची व गणवेशाची सक्ती करीत आहेत. करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या या शाळामध्ये शिक्षकांना वेतन मात्र अत्यंत तुटपुंजे असते शिवाय बहुतांश शिक्षक हे अप्रशिक्षित असतात. वाढती महागाई आणि पाल्यांचा अवाजवी शिक्षण खर्च हे सर्व करतांना पालकांच्या नाकी-नऊ येत आहे. खाजगी विना अनुदानित इंग्रजी शाळांतील काही शिक्षिका या घरी वेळ जात नाही म्हणून नोकरी करीत असतात. काही शिक्षिकांना तर नोकरी करण्याची गरज सुद्धा नसते तरी त्या येथे नोकरी करीत असतात त्यांना शिकविण्याची आवड वगैरे काहीही नसते. काही शिक्षिकांची शिकवण्याची मुळी पात्रताच नसते खरे तर पात्रतेपेक्षा लायकी हा शब्द वापरणे जास्त योग्य आहे.“Honorable” चे स्पेलिंग “O” पासून सुरु करणारे “M A, B.Ed” शिक्षक आहेत, बेरीज, वजाबाकी न येणा-या, साधे अर्ज न लिहिता येणा-या शिक्षक /शिक्षिका या खाजगी विना अनुदानीत शाळांत आहेत यात काहीही अतिशयोक्ती नाही. बेरोजगार तरुण-तरुणी निव्वळ कमी वेतनात नोकरीसाठी मिळतात म्हणून यांना या Profit Making” संस्था नियुक्ती देतात. तरुण शिक्षक- शिक्षिका यांचा शाळेतील कितीतरी वेळ “What’s App” “Facebook” वर जातो. यांच्यावर त्यांच्याच संस्था चालकांचे लक्ष नसते. पालक संघटीत नाही. एखादा पालक जर आवाज उठवायला गेला तर त्याच्या पाल्यांना “Corner” केले जाण्याची भीती असतेच. शासनाचे अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे तसेच खाजगी विना अनुदानित शाळा या गब्बर असल्याने त्यांच्याकडे सरकार काना डोळा करीत आहे. अमेरिकेत चाळीस मराठी शाळा सुरु झाल्या आणि आपल्या कशा बशा तग धरून उभ्या आहेत. आताचे बोलके पोपट निर्माण करणारे शैक्षणिक धोरण आपणास नक्कीच हानिकारक ठरणार आहे. शुल्कवाढी विरोधात पालक संघटीत होऊ शकत नाही झाला तर त्यांच्याकडे वकिलाच्या फीचे पैसे नाही. गब्बर खाजगी विना अनुदानित संस्था वकिलाची लाखो रुपयांची फी सहज भरून काही कार्यवाही झाली तर “स्टे” आणू शकतात. पालकाला मात्र स्वत:च्या पाल्याच्या भविष्याची चिंता आणि त्या चिंतेमुळे तो निमूटपणे फी, डोनेशन भरतच राहतो. डोनेशन/ अवाजवी शुल्क हे सर्वच शाळां कडून घेतले जात आहे. मग त्या कुण्या संघटनेच्या असोत वा इतर अन्य. या शाळांना हे पक्के माहीत आहे की आपल्या शिवाय हे जाणार कुठे? आणि म्हणून या शाळा पालकांच्या “मजबूरी”चा फायदा उचलत आहेत. महर्षी कर्वे, टिळक, आगरकर, फुले यांनी संस्था काढल्या ते शिक्षण महर्षी म्हणवले गेले. त्यांच्या या महाराष्ट्रात आता शिक्षण सम्राट आणि शिक्षण माफिया निर्माण होत आहेत. ज्या महाराष्ट्रात पूर्वी विद्यार्थ्यांची कदर करणा-या, प्रसंगी त्याची फी माफ करणा-या, गरीब विद्यार्थ्याची जेवणाची सोय करणा-या शाळा होत्या त्याच महाराष्ट्रात आता पालकांना शिक्षणाच्या पडद्याआडून लुटणा-या शाळा, संस्था निर्माण झाल्या आहेत. या अशा संस्था, शाळा म्हणजे आजचे नादीरशहा , गजनवी त्यांनी जसे भारताला लुटले होते तशी लुट या संस्था आता करीत आहेत. त्यातल्या त्यात दुदैव असे आहे की या शाळांतील शिक्षक/शिक्षिका हे सुद्धा काही सन्मानीय अपवाद वगळता सुमारच आहेत.       

२०/०४/२०१७

Vijay Mallya arrested, got bail in London article about him and bank stategies about loan recovery etc


इकडून सटक,तिकडे अटक, नंतर जमानत

काल विजय माल्या या भारतातून फरार कर्जबुडव्या माणसाला लंडन येथे अटक झाली. ती बातमी भारतात येऊन धडकत नाही तोवर तिकडे ‘वेस्टमिनिस्टर’ कोर्टाने त्याला जमानत सुद्धा दिली होती.बरे झाले जमानत झाल्याचे लवकर कळले नाहीतर नेहमी जल्लोष करणा-या आपल्या काही लोकांनी म्हणा अथवा बँकांनी म्हणा लगेच आनंद, उत्साह आणि ढोल बजावणे सुरु केले असते. करोडो रुपयांचा चुना भारतातील बँकांना लाऊन फरार झालेला हा आरोपी इंग्लंड मध्ये हजारो एकरात पसरलेल्या आलिशान बंगल्यात निवास करतो. भारताच्या हातावर तुरी देऊन स्वत:च्या विमानाने फरार झालेला हा कर्जदार, हा थकबाकीदार राज्यसभा सदस्य आता इंग्लंड मध्ये सुद्धा कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत आहे. तिथे निदान त्याला पकडण्यासाठी तरी गेले, पकडले आणि नंतर जमानत मिळाली येथे तर पकडण्यासाठी तर जातच नाही आणि अटक पण करीत नाही. काल तर उत्तर प्रदेशात मैनपुरी येथे पोलिस स्टेशन मध्ये हाणामारी झाली आणि पोलिस पळून गेले. हेच पळतात तर अटक कोण करणार? भारतातातील जवळपास सर्वच शहरात करोडो कर्ज बुडवे लोक आहेत,काय होते त्यांचे? त्यांनी घेतलेले करोडो रुपयांचे कर्ज आजही थकीत आहे. काय करतात बँका आणि प्रशासन? का नाही कायद्यात सुधारणा करत? स्वातंत्र्य मिळवून झालीत ना ७० वर्षे. विरोधाभास असा आहे की या बँका यांच्या कर्ज योजनांची वृत्तपत्रातून जाहिरात देतात त्या जाहीरांतींवर लाखो रुपये खर्च करतात. पुढे एखादा सामान्य माणूस ती जाहिरात पाहून जर बँकेत कर्ज मागण्यासाठी गेला तर संबंधीत अधिकारी असा वागतो की जसे त्याच्याकडे कुणी भिक मागायला आले आहे किंवा तो बँक कर्मचारी त्याच्या स्वत:च्या खिशातून कर्ज देतो आहे.कर्ज मंजूर करतांना सुद्धा हे कर्मचारी अतिशय हीन दर्जाची वागणूक कळत-नकळत त्या कर्जदारास देत असतात. प्रमाणिक कर्जदाराचे दोन चार हफ्ते थकले तर त्याच्या मागे याच बँका फोन, पत्र याचा ससेमिरा लावतात. यांना साधे हे सुद्धा ओळखू येत नाही की कोण कर्ज बुडवणारा आहे आणि कोण कर्ज फेडणारा. प्रामाणिक कर्जदारांना हे सळो की पळो करून सोडतात आणि जे कर्ज बुडवतात त्यांच्या पुढे नांग्या टाकतात. या बँकावाल्यांना म्हणावे की धमक असेल तर वसूल करून दाखवा ते कर्ज जे तुमच्या कडून प्रसंगी तुम्हाला फसवून माल्यासारख्या अनेक गब्बर लोकांनी घेतले आहे. करून दाखवा कारवाई त्या कर्जबुडव्या व्यक्तींवर परंतू तसे होत नाही याचे कारण स्पष्ट आहे “पैसा पैस्याला ओढतो” माल्या सारख्या पैस्याने गब्बर व्यक्तीपुढे या बँका,यांचे कर्मचारी झुकतात म्हणूनच असे होते.माल्याला “स्कॉटलंड यार्ड” निदान अटक तरी करायला गेले. येथे तर काहीही होत नाही एखादा कुणी कर्ज बुडवत असेल तर आपल्या बँका जमानतदाराच्या मागे लागतात. कर्जदार हात वर करतो, राजरोसपणे गावात फिरतो आणि बँका जमानतदाराच्या मागे लागतात. हे सर्व कधी सुरळीत होणार? सरकार बँकांच्या कर्ज वितरण आणि वसुली प्रणालीच्या नियमांमध्ये कधी बदल करणार? की हे असेच सुरु राहणार? यात नेत्यांची काही भूमिका आहे का ? नेते लोकांची माणसे कर्जे घेऊन आपल्या नेत्याच्या पाठीमागे लपून कर्ज बुडवण्यास धजावतात काय ? प्रमाणिक कर्जदारास त्याच्या प्रामाणिक कर्जफेडी बद्दल काही सवलत, कर्जामध्ये काही सूट देता येवू शकत नाही काय ? हफ्ता चुकला तर तुम्ही व्याज कसे जास्त लावता मग परतफेड केली तर काही बक्षीस काही सूट नको का द्यायला ? याने प्रमाणिक कर्जदार परतफेडीस साठी अजून प्रेरित नाही का होणार ? परंतू या सर्व बाबींचा विचार करणार कोण ? सरकार आणि विरोधी पक्ष ते कोणत्याही पक्षाचे असू देत ते नेहमी एकमेकांचे उणे-दुणे काढण्यात मश्गुल असतात,विकास राहतो बाजूला. बँकाना अधिक सक्षम करणे, कर्ज नियम सूटसुटीत करणे, प्रामाणिक कर्जदारास भिकारी न समजणे, कर्जबुडव्यांकरीता कठोर नियम बनवणे हे सर्व आपल्या देशात कधी होणार? सर्व बँकाना जर त्यांच्या बुडीत कर्जाची माहिती विचारली तर नक्कीच डोळे विस्फारायला लावणा-या बुडीत रक्कमेचा आकडा समोर येईल. या माल्या सारख्या अनेक कर्जबुडव्यांना काहीच होत नाही न्हणून इतर कर्जदार सुद्धा कर्ज  बुडवण्यास मागे पुढे पाहत नाही. त्यांना काहीही होत नाही म्हणून म्हटले की इंग्लंडमध्ये निदान पोलीस पकडण्यास तरी गेले जमानत मिळाली तो भाग वेगळा येथे तर ‘किंगफिशरने’ अटक करण्यास जाण्याची संधी सुद्धा पोलिसांना दिली नाही.

१७/०४/२०१७

Media blames Sun for increase in heat but is it correct to blame only Sun ?

काय सूर्य एकमेव दोषी ?
          दरवर्षी उन्हाळा सुरु झाला एप्रिल महिन्यात तापमान वाढीस सुरुवात झाली की, मग माध्यमांमध्ये “सूर्य आग ओकतोय” , “सूर्य तळपतोय” “सूर्य कोपलाय” अशा शीर्षकाच्या बातम्या सुरु होतात. खरंच सूर्य आग ओकतोय ? , खरंच सूर्य कोपलाय ? आजची जी तापमान वाढीची कारणे आहेत ती काय केवळ सूर्यामुळे आहेत ? वरील आशयांच्या बातम्यांमुळे Global Warming अर्थात जागतिक तापमान वाढीस केवळ सूर्यच जबाबदार असल्याचे सूचित होते. आपला काही दोष नाही? जगाला प्रकाशमान करणा-या सूर्याच्या माथ्यावर तापमान वाढीचे खापर आपण फ़ोडत आहोत. तसेही आपल्या अपयशाचे खापर दुस-याच्या माथी फ़ोडण्यात मानव जात वाकबगार आहेच. ठीक आहे सूर्य आग ओकतो आहे, कोपला आहे परंतू तुमच्या लाखो करोडो “ए सी” चे काय ? तुम्ही सर्वत्र केलेल्या डांबरी व सिमेन्ट रस्त्यांचे काय? तुम्ही चालविलेल्या वृक्षांच्या सर्रास कत्तलीचे काय ? तुम्ही नष्ट करीत असलेल्या जल स्त्रोतांचे काय? चांगल्या-चांगल्या विहिरी लोकांनी अक्षरक्ष: कचरा कुंड्या करून टाकल्या, नळाचे पाणी डांबरी रस्त्यावर शिंपडतात स्वत:च्या घरासमोरचा रस्ता तर खराब करतातच शिवाय पाण्याचा विनाकारण अपव्यय करतात. कुणाला म्हणायची काही सोय नाही कारण उत्तर ठरलेले “आमचा नळ 
आहे आम्ही पाहू काय करायचे ,तुम्ही कोण शिकवणारे?” पाण्याचे, नैसर्गिक जाल स्त्रोतांचे जतन न करणे, “ए.सी” , वाढलेली वाहन संख्या, सिमेंट रस्ते हे सर्व घटक पारा ४० ते ५० पर्यंत वाढण्यास कारणीभूत आहेत केवळ सूर्य नव्हे. “ए सी” घरातील उष्णता बाहेर फेकतो, असे कित्येक घरातून, कार्यालयातून, वाहनातून असंख्य “ए सी” बाहेर उष्णता फेकत आहेत यानी नाही वाढत तापमान? रस्त्यांसाठी संपूर्ण भारतात करोडो वृक्षांची कत्तल सुरु आहे त्या मानाने लागवड अत्यल्प आहे. हमरस्ते रुंद करताना मोठ-मोठाली झाडे तोडली जातात आणि कन्हेरासारखी छोटी झाडे लावली जातात.महामार्गावरील सावलीच आता गायब झाली आहे.“सर्विस लाईन” मध्ये सुद्धा सिमेंट रस्ते तयार करतात, काय गरज आहे? सिमेंट रस्ते अनधिकृत बांधलेल्या सिमेंटच्या अधिकृत इमारती ज्या शासनच पुन्हा अधिकृत करते या सिमेंट च्या चाललेल्या अनिर्बंध बांधकामांमुळे नाही वाढत का तापमान? लाखो वाहने त्यांचे “ए सी” त्यांच्या धुरामुळे नाही वाढत का प्रदूषण व तापमान? वाहनांच्या विक्रीवर, वापरावर काहीही बंधने नाहेत.ओझोन वायूच्या थराला भगदाड पडत आहेत, आम्लवर्षा होत आहे. हे सर्व घटक भविष्यातील चित्र आताच “ट्रेलर” प्रमाणे दाखवत आहे. परंतू आपण सुस्त आहोत तंत्रज्ञानाने परिपूर्ण परंतू निसर्गास हानिकारक अशा उपकरणांसह भौतिक सुखात आणि आत्म सुखात मश्गुल आहोत जगाचे काही घेणे-देणे नाही. पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जाबदारीच नव्हे तर कर्तव्य सुद्धा आहे.तापमान वाढ जर रोखायची असेल तर या सर्व बाबी सुद्धा सरकारला आणि सरकारच्या पर्यावरण खात्याला तसेच नागरीकांनी सुद्धा ध्यानात घेणे जरुरी आहे. केवळ ध्यानात घेऊन चालणार नाही त्यासाठी शासनास कठोर उपाय योजना करणे व नागरीकांनी स्वयंशिस्त लावणे सुद्धा क्रमप्राप्त आहे. निव्वळ सूर्य भगवानास दोष देवून काय फायदा ?

१३/०४/२०१७

The Great Shivaji Maharaj death annivarssary celebration 2017



तारतम्य       
      आजकाल आपल्या देशात वागण्याचे आणि बोलण्याचे काहीही तारतम्य राहिले नाही. कुणीही येतो काहीही बोलतो , त्याच्या बोलण्यावर मग काही दिवस वादंग निर्माण होते, माध्यमांवर चर्चा केली जाते हे सारे शमत नाही तो दुसरा येतो तो काही तरी बरळतो आणि नवीन वाद उफाळून येतो. देशातील महत्वाचे मुद्दे, विकास हे बाजूला राहते आणि यांचे तारतम्य न बाळगता वागणे बोलणे हेच निस्तरता निस्तरता नाकी नऊ येते. लोकशाहीच्या या देशात कापून टाकू, गळा कापू असे काहीही बोलल्या जाते. तारतम्य न बाळगता बोलण्यातून असे वाद निर्माण होतात तर क्वचित प्रसंगी वागण्याची तारतम्यता न बाळगल्याने सुद्धा वादाचे मुद्दे निर्माण होत असतात. आता परवाचेच उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले गेले. दिवस दु:खाचा आणि ढोल वाजवून राहिले याला काय म्हणावे. त्यानंतर नेहमीप्रमाणेच सारवासारव झाली. विरोधकांनी आणि सामान्यांनी टीका केली. ढोल वाजवणा-यांनी तर वागण्याचे तारतम्य बाळगले नाहीच परंतू त्यांना विरोध करतांना विरोधी पक्षातील एक पुण्याचा पदाधिकारी माध्यमावर बोलताना म्हणाला की, “आता आम्ही सुद्धा संघाच्या नेत्यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल वाजवू” याला म्हणतात स्वत:ची बुद्धी न वापरणे त्यांनी ढोल वाजवले का मग आम्हीही वाजवू अशाने मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय उरला ? हे तर अगदी बालिश बुद्धीचे वक्तव्य झाले. त्यांनी थोर पुरुषाचा अनादर केला म्हणून तुम्ही सुद्धा तसा अनादर करावा काय ? आज काल ढोल बडवण्याचे स्तोम इतके वाढले आहे की विचारू नका काहीही झाले की ढोल असतोच. यामुळेच मग आपण कुठे आहोत बाजूला शाळा किंवा इस्पितळ आहे का? हे न पाहता ढोल बडवले जातात.ढोल कुठे वाजवावा याचे साधे तारतम्य राहिले नाही.  त्यांनी पुण्यतिथीला ढोल वाजवला तर विरोधकांनी सत्ताधा-यांचे फोटो असलेले ढोल वाजवून निषेध केला म्हणजे विरोधकांनी सुद्धा ढोल बडवण्याचा आनंद घेऊनच घेतला. राजकारणी तर जनतेला हाती धरून काही कार्यभाग साधतात परंतू जनतेने सुद्धा तारतम्य बाळगावे की कुठे ढोल वाजवावा आणि कुठे नाही. सत्ताधारी आणि विरोधक यांनी निव्वळ थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साज-या करण्यापेक्षा त्यांनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण जर आचरणात आणली तर ते जास्त महत्वाचे आहे. उत्सव साधे पणाने सुद्धा साजरे केले जाऊ शकतात , उत्सव प्रसंगी काही समाजसेवा सुद्धा केली जाऊ शकते , उत्सव कोणता आहे जयंती आहे की पुण्यतिथी ? दु:खाचा प्रसंग आहे की आनंदाचा याचे तारतम्य लोकप्रतिनिधी आणि जनता दोघांनीही ठेवणे आवश्यक नाही का? थोर पुरुषांना मानवंदना देणे जरुरीच आहे परंतू ही मानवंदना देतांना नेहमी ढोलच बडवणे जरुरी नाही. कधी समाजसेवेचे, रक्तदानाचे, वह्या पुस्तके वाटपाचे , मा. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेचे उपक्रम हाती घ्या ना ! तुम्ही जर थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी या प्रसंगी योग्य वर्तणुकीचे तारतम्य बाळगले, कुठे ढोल बडवावा आणि कुठे नाही याचे सुद्धा तारतम्य बाळगले आणि जनतेच्या हितासाठी सुयोग्य शासन केले तर तुमच्या कर्तुत्वाचा , चांगल्या कार्याचा, तुम्ही जो जाहीरनामा दिला होता तो पूर्ण केल्याचा ढोल आपसूकच बडवला जाईल.