“जी एस” कुठे आहे बे?
शालांत परीक्षा संपली आणि कॉलेज मध्ये दाखल झालो. आम्ही कनिष्ट महाविद्यालयात
होतो आणि तू वरिष्ठ. बी.एससी. ला. तुझी ती बिना ‘कॅरीअर’ ची सायकल, खांद्यावर शबनम
बॅग, कुर्ता आणि पँट मोठ्या फ्रेमचा गॉगल असा तुझा वेश तुझ्याबाबत आकर्षण वाढवत होताच. नेहमी हसमुख
आणि दिलखुलास असणा-या तुला तुझे वर्ग मित्र "जी एस" असे संबोधत. मग
आम्हीही तुला त्याच तुझ्या नावाच्या आद्याक्षराने संबोधू लागलो. तुझ्याशी परीचय
झाला तो एनसीसीमुळे पुढे हा परिचय रोजच्या हँडबॉल
खेळण्याने आधिक वाढला. तदनंतर मैत्री झाली व जी एस पाटील म्हणजे गजानन श्रीकृष्ण पाटील
असे तुझे पूर्ण नांव कळले. आणि त्यानंतर रोज
संध्याकाळी म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर आपण सर्व हँडबॉल खेळत असू. खूप
घामाघूम होऊन धकून खेळ झाला की तुझ्या त्या पोलीस निवासस्थानात येऊन आम्ही सर्व खास
आमच्यासाठी भरलेल्या रांजणातील थंडेगार पाणी पिऊन तृप्त होऊन आपआपल्या घरी असा दिनक्रम
कित्येक दिवस सुरु होता. हँडबॉलच्या सामन्यांसाठी आपण चंद्रपूरला गेलो होतो.वर्धा स्टेशनवर
आपल्या जेवणाच्या डब्ब्याची खूप गमंत झाली होती. तुला चांगलेच आठवत असेल. पण त्या गंमतीमुळे
तुला आलेला राग तुझ्या “स्पोर्टमन स्पिरीट’ मुळे लवकरच मावळला होता. नंतर तुझी ती विना कॅरीअरची सायकल जाऊन तुझ्याकडे लुना आली
मागे इंग्रजीत “हे जीएस’ असे लिहिलेली. खामगांव येथील शिक्षण संपवून आपण सर्व विखुरल्या गेलो. “किस्मत मे जिनकी मिलना
है , वो किस तरह भी मिल जाये” याप्रमाणे जळगांव खान्देशला अचानक एक दिवस तू आमच्या
रुमच्या शेजारील घरात दिसला. तुला आवाज दिला ,पुनर्भेट झाली तू तेंव्हा “एम आर” होता.
मग आपण रोज भेटत असू. परंतू एक दिवस पुन्हा तू गायब झाला, नेहमीच्या तुझ्या पद्धतीने
काही गाठ भेट न घेता.केंव्हा,कुठे,कधी गेला काही कळले नाही. त्यानंतर आपले सर्व टीममेट
नोकरी,व्यवसायाच्या शोधात होतेच तेंव्हा तू खामगांवला संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू
केले होते, सेटअप सुद्धा छान केला होता. तद्नंतर माझ्या खामगांवात नसण्याने पुन्हा
संपर्क तुटला. मी परत खामगांवला आलो तर तुझ्या केंद्राच्या ठिकाणी दुसरेच काही
सुरु झाले होते.तू कुठे गेला हे पुनश्च एकदा एक गुपित झाले. कित्येक वर्षे लोटली ,काळ बदलला,तंत्रज्ञान आले त्या अनुषंगाने
सोशल मिडीया फोफावला,अरे अगदी शाळकरी मित्र सुद्धा फेसबुक व व्हॉट्स अॅप मुळे गवसले,आडनांव
जरी बदलले असले तरी मैत्रिणी सुद्धा गवसल्या. टेलिफोनविना , एस एम एस विना , वा इतर
कोणत्याही तंत्रज्ञानाचे सहाय्य न घेता भेटणारे आपण आज तंत्रज्ञान सहाय्यास असतांनाही
संपर्कात नाही आहोत.तुझे नांव कित्येकदा सर्च करूनही तू मात्र काही सापडला नाही. कुठे
आहेस ? कसा आहेस ? सोशल मिडीयाच्या सहाय्याने कदाचित हे पत्र तुझ्या पर्यंत पोहोचेल
अशी आशा आहे. पोहचल्यास संपर्क कर. माझ्याप्रमाणेच सर्व मित्र सुद्धा “जी एस” कुठे
आहे बे? अशी एकमेकांना विचारणा करीत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा