Click "Follow" Button below To Follow this Blog

०१/०६/२०१८

Article on sad demise of Hon Agricuture Minister, Maharashtra State Mr Bhaushaheb Fundkar

खामगांवकरांचा ‘पांडुरंग’ गेला
काल सकाळी भाऊसाहेबांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त मिळाले आणि धक्काच बसला. विश्वास बसत नव्हता.  परंतू नंतर माध्यमांवर बातमी पसरली. परवाच भाऊसाहेबांना टीव्हीवर पाहिले होते आणि आज अचानक त्यांच्या दु:खद  निधनाची बातमी येऊन धडकली. पांडुरंग पुंडलिक फुंडकर म्हणजे भाजपातील जेष्ठ नेत्यांच्या पंक्तीतील, नरखेड सारख्या छोट्या खेड्यातून, सर्वसामान्य शेतकरी घरातून शिक्षणा नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अभाविपच्या माध्यमातून पुढे आलेले जननेते होते. सरळमार्ग असल्याने जनतेचा पाठिंबा प्राप्त करत हा नेता वाटचाल करत राहिला, पक्षनिष्ठ राहिला, पक्षाचा जो काही आदेश असेल तो शिरसावंद्य मानीत राहिला. 1978 पासून आमदार म्हणून राजकीय प्रवास सुरु केला.तद्नंतर अनेक पदे विभूषित केली.राजकारणात अत्यंत संयमी पद्धतीने माणसे जोडत त्यांनी वाटचाल केली. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आल्यामुळे स्वभाव निगर्वी होताच. तसा भाऊसाहेबांशी वैयक्तिक परिचय नव्हता परंतू 1991 मध्ये लोकसभा निवडणूक ते जिंकले त्यांची विजयी मिरवणूक पाहिली आणि त्यांचे नांव माहीत झाले. आम्ही तेंव्हा शालेय जीवनात असू. तेंव्हा भाऊसाहेब नऊ नंबर शाळेजवळ राहत असत त्यांच्या घराजवळच आम्ही खर्चे सरांकडे शिकवणी साठी जात असू त्यांचे ते साधे-सुधे घर व साधी राहणी जवळून पाहिली आणि जरी लहान असलो तरी हा नेता वेगळा आहे, सर्वसामान्यांसारखाच आहे, काही डामडौल नाही की   बडेजाव नाही ही कल्पना आली होती. म्हणूनच त्यांच्या त्या विजयी मिरवणूकीत सिव्हील लाईन मध्ये आपसूकच फटाके फोडण्यास हात सरसावल्या गेले होते. आता दोन वर्षापूर्वी भाऊसाहेब मंत्री झाल्यावर त्यांची जंगी मिरवणूक निघाली होती. आपल्या नेत्यावर जनतेचे किती प्रेम असते हे निदर्शित करणारी भर पावसातील त्या मिरवणूकीतील जनतेची अलोट गर्दी पाहून भाऊसाहेबांची लोकप्रियता लक्षात आली होती. मिरवणूक बालाजी प्लॉटमध्ये आल्यावर मी व माझे बंधू गणेश वरणगांवकर दोघांनी त्यांना दोन कमळाची फुले दिली तेंव्हा त्यांच्याच पक्ष चिन्हाची ती छोटी तरीही सूचक अशी भेट पाहून भाऊसाहेब दिलखुलास हसले आणि त्यांनी हस्तांदोलन केले होते. एकदा काही कार्या निमित्त भाऊसाहेबांना भेटण्यासाठी घरी गेलो, ते चांदे कॉलनीतील गजानन महाराज मंदिराबाबत कुणाशी तरी बोलत होते, त्यांनी बोलणे संपवले व
लगेच काय काम आहे? अशी आपुलकीने चौकशी केली व त्वरीत आमचे मित्र व भाऊसाहेबांचे सचिव जितेंद्र कुयरे यांना आमच्या कामाबाबत पुढील कार्यवाही त्वरीत करण्यास सांगितले. कालपासून त्यांच्या अनेक आठवणी ताज्या होत आहेत. पावसाळ्यात अकोला रोडवरून जातांना हमखास भाऊसाहेबांची आठवण येते. पावसाळा म्हटला की रिधो-या जवळ ‘ट्रॅफिक जाम’ ,वाहनांच्या लांबच लांब रांगा असे चित्र असे. रिधो-याचा जुना पुल अतिशय कमी उंचीचा होता, भाऊसाहेबांनी हे त्वरीत ध्यानात घेतले होते व त्यांच्या निधीतून तेथे नवीन पूल बांधला होता त्यानंतर कधीही पुरामुळे अकोला रोडवरची वाहतूक रिधो-याजवळ खोळंबली नाही.कालपासून अनेकांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या ब्लॉगवर भाऊसाहेबांप्रती व त्यांच्या पक्षनिष्ठतेप्रती सुंदर शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. पक्ष सत्तेत नसतांना, त्या नंतर कधी सत्तेत तर विरोधात अशी वाटचाल करीत भाऊसाहेब मंत्रीपदावर पोहोचले होते, मुलगा आमदार झाला होता खामगांवकरांसाठी हे भूषणावह होते आणि नियतीने नेमके याचवेळी खामगांवकरांच्या या ‘पांडुरंगास’ बोलावून घेतले याचे सर्वांनाच दु:ख झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा