Click "Follow" Button below To Follow this Blog

१४/०६/२०१८

Sharad Pawar changed "Puneri Pagadi" of Chhagan Bhujbal, a perticular type of cap in Maharashtra article about this political issue


टोपी, झेंडे , रंग आणि आता पगडी
त्तेसाठी आपले राजकीय  नेते काय करतील याचा नेम नसतो. वरकरणी “जातीभेद, पंथभेद, धर्मभेद  दूर करा” अशा स्वरूपाच्या पोकळ वल्गना करायच्या आणि निवडणुकांची चाहूल लागताच विविध प्रतिकांव्दारे  नागरिकांत भेदभाव वाढून, मतांचे ध्रुवीकरण होउन त्याचा सत्तेच्या पाय-या चढण्यास कसा उपयोग करता येईल अशा कृती किंवा अशी विधाने करायची. राष्ट्रपुरुष व त्यांची विविध प्रतीके जसे टोपी , झेंडे , रंग यांची याआधीच वाटणी झाली असून त्यात आता अजून एका प्रतीकाची भर पडली आहे. ती म्हणजे पुणेरी पगडी. राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्यात आले. तसे पाहिले तर ज्या कॉंग्रेस पक्षात पूर्वी जाणते राजे होते त्या कॉंग्रेस पक्षाच्या महान नेते म्हणजे महात्मा गांधी यांच्या गुरुंची ही पगडी आहे. राज्यात केंद्रात दोन्हीकडे सत्तेत नसल्याने विरोधकांना जो पोटशूळ उठला आहे तो काही केल्या शमत नाही आहे तसेच  विविध मोर्चे, आंदोलने यां सर्वाना तरुण, तडफदार, हुशार मुख्यमंत्री निष्णात राजकारणाने हाताळत आहेत हा सुद्धा एक सल आहेच म्हणून मग “छत्रपतींची नेमणूक केली” , “टोकाची भूमिका घ्या” आणि आता “पुणेरी पगडी वापरू नका” अशाप्रकारची वक्तव्ये केली जातात. केवळ पक्षाचे नांव राष्ट्रवादी असून चालत नाही तर आचार विचार वाणी यांनी सुद्धा सुद्धा राष्ट्रवादी असावे लागते. राष्ट्रवादी असले की सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते, पगडी वरुन भेद करून चालत नाही. भुजबळ तुरुंगात गेले , त्यांच्या जाण्याने नाराज झालेल्यांची मने व त्यानिमित्ताने त्यांची मते आपल्याकडे वळावी म्हणूनच हा भुजबळांची पगडी बदलवण्याचा सोपस्कार पार पडला हे कळायला महाराष्ट्रातील जनता खुळचट नाही. पुणेरी पगडी ही काही कुण्या एका जातीची मक्तेदारी नाही. काही प्रज्ञावान राष्ट्पुरुष ती पगडी परिधान करायचे म्हणून त्या पगडीला एक मान आहे. परंतू मतांचे ध्रुवीकरण करून आपला सत्तेचा मार्ग सोयीस्कर करण्यासाठी राजकीय नेते नाना प्रकारचे राजकारण व युक्त्या करीत असतात त्यातीलच ही एक पगडीची युक्ती. संपूर्ण महाराष्ट्र हा एका झेंड्याखाली होता त्या महाराष्ट्रात आता निरनिराळे झेंडे झाले आहेत. विकासाची भाषा करण्या ऐवजी जातीभेद व व्देशाची बीजे रुजवली गेली आहेत. पगडी कोणती का असेना ती घालणा-याच्या डोक्यातील विचारांचे काय ? त्या पगडीखाली जर भ्रष्टाचार, गैरव्यवहार करणारी डोकी असतील तर त्या पगडीचा उपयोग तो काय ? तेंव्हा पगडी बदलून चालणार नाही ज्या डोक्यावर ती परिधान केली आहे त्या डोक्यात सकारात्मक , बेरजेच्या , विकासाभिमुख , पारदर्शक आणि मुख्यत: राष्ट्रवादी असे विचार असावेत. एखादा व्यक्ती जर भ्रष्टाचार, गैरव्यवहाराच्या गंभीर आरोप झालेला असेल , तुरुंगवास भोगून आलेला असेल त्याने किती का उंची वस्त्रे घातली, कोणती का पगडी घातली तरी त्याचा काही उपयोग नाही. मतांच्या धृवीकरणासाठी यापूर्वी अनेक बाबींचा उपयोग आजपावेतो करण्यात आला टोप्या झाल्या, रंग वाटले गेले , नाना प्रकारचे झेंडे झाले त्यातच आता पगडीची सुद्धा भर पाडली. परंतू जनतेने राजकारण्यांची चाल ओळखून , सर्व बाबी घ्यानात घेऊन जातीभेदाचे राजकारण करणा-यांना थारा न देता विकासाची भूमिका घेणारेच लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत तरच देश प्रगतीपथावर जाईल    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा