शिकार करनेको आये ,शिकार होके चले
आता काही
दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची मुलाखत चर्चेत होती. शरद
पवार यांची मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत जेवढी गाजली त्या
मानाने उध्दव ठाकरे यांची मुलाखत मात्र विशेष
रंगली नाही व कमी प्रभावी वाटली. परंतू या मुलाखतीत बंदूक, शिकार, सावज अशा शब्दांचा
प्रयोग करण्यात आला. “सावज आता दमले आहे, शिकार आम्ही करणार” असे म्हणण्यात आले.
शिवसेना तशी 2014 पासूनच भाजपावर तोंडसुख घेत आहे. अफझलखानाची फौज सारख्या अनेक
शब्दांचा प्रयोग भाजपा जेष्ठ नेत्यांवर करून त्यांना हिणवण्यात आले. जनतेला या दुटप्पी
भूमिकेचे मोठे अप्रूप वाटत आहे. सत्तेत सहकारी असूनही शिवसेना नकारात्मक का आहे? भाजपा
त्यांची विशेष दखल घेत नाही आहे का ? शिवसेनेची दखल न घेणे , विशेष महत्व न देणे
हे भाजपाला मिळालेल्या संख्याबळामुळे होत आहे व त्यामुळेच शिवसेना बिथरली आहे. बाळासाहेबांच्या
काळात उलट होते शिवसेना भाजपाच्या तुलनेत खूप पुढे होती. त्यावेळी बाळासाहेब सुद्धा
“कमळाबाई” सारखे शब्दप्रयोग करून भाजपाला हिणवायचे. परंतू बाळासाहेबांचा करिश्मा
वेगळा होता असे तेच करू जाणोत इतर कुणी तसेच करते तेंव्हा मात्र काही वेगळेच अर्थ
निघतात किंवा काढले जातात. बाळासाहेबांच्या कार्यकाळात शिवसेना मोठी प्रबळ होती,
प्रभावी होती शिवाय संख्याबळ सुद्धा जास्त होते, खेडोपाडी शिवसेना चांगली फोफावली
होती. आता संख्याबळ नसूनही, सत्तेची फळे चाखत असूनही सतत आपल्या सहकारी पक्षांविरुद्ध
गरळ ओकत राहणे याचा विपरीत परिणाम शिवसेनेवरच होण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनची
अशी भूमिका पाहून शिवसनेच्या लोकप्रियतेवर परिणाम होत आहे. शिवसेना असे का करीत
आहे याचे जनतेलाच काय तर कार्यकर्त्यांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे? संजय राऊत
यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना उद्धवजी ज्यांच्या सोबत सत्ता भोगत आहे त्यांचीच
शिकार करायची आहे असे म्हणाले. 2019 मध्ये होणा-या निवडणूकांच्या अनुषंगाने हे
म्हणण्यात आले होते. परंतू महाराष्ट्रात मात्र सावज अदयाप दमले नसल्याचे सांगली व
जळगांव महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालांवरून सिद्धच झाले आहे. शिका-यांना
तर सांगली निवडणूकीत खाते सुद्धा उघडता आले नाही. तर जळगांव महानगरपालिकेत काही
विशेष निकाल लागला नाही. दोन्ही महानगरपालिकेत सावज वाकोल्या दाखवत शिका-यापासून खूप
दूर निघून गेले. कुण्याही मुख्यमंत्र्याच्या काळात झाली नसतील तेवढी आंदोलने,
मोर्चे ,मागण्या, संप हे फडणवीस मुख्यमंत्री असतांना झाले व होत आहेत. तरीही “आगमे
जलके भी जो निख्ररे है वोही सच्चा सोना“ याप्रमाणे फडणवीस हे या सर्व घटनांतून सोन्यासारखे तावून सुलाखून निघून अधिक मुरब्बी,अधिक
प्रभावी,अधिक प्रगल्भ,अधिक लोकाभिमुख,अधिक लोकप्रिय झाले आहे. विचारसरणी सारखी असल्यावर खरे तर बेरजेचे
राजकारण करणे आवश्यक आहे. तुम्ही एकमेकांच्या शिकारी केल्यात तर आपसूकच सत्ता
हातची जाईल. इतर पक्षांशी तुम्ही युती करणे शक्य नाही, तरी तुम्ही केलीच तर जनता तुम्हाला
2024 मध्ये फटका हमखास देण्याचीच शक्यता अधिक. आताशा जुळवून घेणे हे सहसा कुठेच आढळत
नाही, पूर्वी प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब यांची जुळवून घेण्याची
मानसिकता असे. सांगली, जळगांव येथील महानगर पालिका निवडणुका निकालांतून सध्या तरी
हे स्पष्टच झाली आहे की सावज काही दमलेले नाही. परंतू हे शिका-याने समजून घेणे
जरुरी आहे 2019 हे सावज व शिकारी या दोहोंनाही सोपे आहे असे नाही. सांगली, जळगांव निकालातून सावज टिपण्यास आलेल्या शिका-याची “शिकार करनेको
आये शिकार होके चले” अशी गत झाली आहे. शिका-याने उगीच सावज टीपण्यापेक्षा बेरजेचे
राजकारण करीत वाटचाल करावी अन्यथा 2019 मध्ये “शिकार करनेको आये शिकार होके चले”
अशी परिस्थिती होऊ शकते. अती ताणल्याने जर तुटले तर सावज व शिकारी दोघानांही पाठशिवणीचा खेळ खेळत बसावे लागेल आणि
कुणीतरी दुसराच राजा बनून तुमच्या पाठशिवणीच्या खेळाची गंम्मत पहात बसेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा