मौतसे ठन गयी
काल जनतेचे, स्वपक्ष
व विरोधी पक्षीयांचे लाडके माजी पंतप्रधान, अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती नाजूक
असल्याची बातमी येऊन धडकली. सर्व देशवासी काळजीत बुडाले. 25 डिसे 1924 रोजी
जन्मलेले वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक, पत्रकार, संपादक असा प्रवास
करीत जनसंघात दाखल झाले. कवी मनाचे वाजपेयी सत्ताधा-यांवर आपल्या अमोघ वाणीने हल्ला
करीत. त्यांच्या भाषणांच्या वेळी सभागृह स्तब्ध असे. नेहरू सुद्धा त्यांची तारीफ
करीत असत. जनसंघाच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असतांना युनो मध्ये त्यांनी हिंदीतून
भाषण केले होते. पुढे लालकृष्ण अडवाणी यांचे सोबतीने भाजपासाठी प्रचंड कष्ट घेतले.
दोन सदस्यां पासून ते आजचे बहुमतातील सरकार म्हणजे लालकृष्ण अडवाणी व वाजपेयी यांची
मेहनत. त्यातही वाजपेयी यांच्याकडे जनतेला आपल्या शुद्ध हिंदी वाणीने, कवितांनी
आकृष्ट करण्याची एक कला होती. सत्ताधा-यांवर याच वाणीने प्रखर हल्ले चढवून त्यांना
ते निष्प्रभ करीत असत. त्यांचे व्यक्तीमत्व अनोखे होते. जनता, इतर पक्षातील सदस्य
त्यांच्यातील चुंबकीय शक्तीने त्यांच्याकडे आकृष्ट होत असत. आरोप-प्रत्यारोप
करतांना कुणावर व्यक्तीगत हल्ले ते करीत नसत.1996 मध्ये 13 दिवस नंतर 13 महिने आणि
नंतर 24 पक्षांचे सरकार 5 वर्षे त्यांनी चालवून दाखवले. 24 वेगवेगळी विचारसरणी
असणा-या पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचे कसब वाजपेयींनी दाखवले. जगात असे
दुसरे उदाहरण क्वचितच आढळेल. हे करण्याचा करिश्मा एक प्रामाणिक राजकारणी, देशाला
प्रथम प्राधान्य देणारे वाजपेयीच करू जाणोत. राजकारणातील एक प्रामाणिक चेहरा
म्हणून जनता त्यांच्याकडे केवळ पहात नसे तर
जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून असे.
वाजपेयी यांचे वक्तृत्व, त्यांची प्रतिमा ओळखून असलेल्या नरसिंहराव यांनी ते
पंतप्रधान असतांना वाजपेयी विरोधी पक्षातील असूनही वाजपेयी यांना व्हीएन्ना
परिषदेत पाठवले होते. भारतातील लोकशाही किती प्रगल्भ आहे हे जगाला त्यावेळी दिसून
आले होते. नरसिंहरावांनी वाजपेयी यांना पाठवण्याचे कारण वाजपेयी यांची अजातशत्रू प्रतिमा
हेच होते. वाजपेयी विरोधी पक्षात असूनही त्यांच्याप्रती सत्ताधा-यांना आदर असे. सद्यस्थितीतील
विरोधी पक्षीयांनी वाजपेयी यांची ते विरोधी पक्षात असतांना कशी भूमिका वठवत असत
याचा जरूर अभ्यास करावा. पुढे ते औट घटकेचे पंतप्रधान झाले त्यांचे 13 दिवसांचे
सरकार कोसळले त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाने सारा देश हेलावून गेला होता. “सरकारे
आयेंगी, सरकारे जायेंगी मगर ये देश चलाना चाहिये” असे ते म्हणाल्यावर लोकसभेत जरी
विश्वासमताने हरले , तरी करोडो देशवासीयांच्या मनातील त्यांनी यापूर्वीच कमावलेला विश्वास अधिक वाढला. पुढे
जेंव्हा ते “मै आपना त्यागपत्र देने जा रहा हूं” असे म्हणाले तेंव्हा जनतेने कौल
दिलेले, जनतेला हवे असलेले हे वाजपेयी सरकार कोसळले. परंतू देश प्रथम मानणा-या
वाजपेयी यांनी त्यांचे सरकार पाडण्या-यांचा सुद्धा व्देष केला नाही. मतभेद असला
तरी चालेल परंतू मनभेद नसावा अशी त्यांची भूमिका असे. “Right Person with wrong party” अशी त्यांच्यावर
टीका होत असूनही पार्टी सोडण्याचा विचार सुद्धा कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. पुढे जनतेने पुनश्च वाजपेयी यांनाच
कौल दिला. सुवर्ण चतुष्कोण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, काश्मीर नीती,जगात
भारताची मान उंचावणारी अणुचाचणी असे अनेक चांगले निर्णय वाजपेयी सरकारने घेतले.
अजात शत्रू,प्रामाणिक,कवी, स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते
असलेले वाजपेयी गेल्या कित्येक वर्षांपासून मौन बाळगून आहेत. त्यांना भारतरत्न
मिळाले त्यावेळी सुद्धा त्यांची प्रकृती काही ठीक नव्हती गेल्या 66 दिवसांपासून ते
“एम्स” मध्ये भरती आहे. काल ते “व्हँटीलेटर” असल्याचे वृत्त आले आणि देश चिंतेच्या
गर्तेत गेला आहे. वाजपेयी मृत्यूशी झुंज देत आहेत. आपल्या एका कवितेत वाजपेयी म्हणाले
होते, “मौत से ठन गयी” या कवितेत वाजपेयी म्हणाले होते , “तू दबे पांव चोरी छुपे न
आ , सामने वार कर फिर मुझे आजमा“ आज खरोखरच वाजपेयी यांची “मौत से ठन गयी है” सर्व
देश त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहे. ईश्वर देशवासीयांची प्रार्थना
पूर्ण करो व अटलजींच्या प्रकृतीत सुधारणा करो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा