Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०८/२०१८

Article elaborates Raj Kapor , R K Studio, its films and news of R K Studio selling


“आग” ने सुरुवात,अंतही आगीनेच


परवाच्या वृत्तपत्रात रसिकांचे मनोरंजन होईल असे विविध चित्रपट निर्माण करणारा, समाजिक संदेश देणारे चित्रपट निर्मित करणारा सुप्रसिद्ध आर. के. स्टूडीओ विकणार असे वृत्त झळकले. पन्नासच्या दशकात राज कपूर या अभिनेत्याने हा स्टूडीओ उभारला. आमच्या पिढीच्या पूर्व पिढीचा हा काळ , ती पिढी सुद्धा त्याकाळी बाल्यावस्थेत होती. तरीही आर. के. विकणार हे वाचल्यावर कुठेतरी दु:ख वाटले. कपूर कुटुंबियांसाठी सुध्दा हा एक भावनीक निर्णय होता. कारण पन्नासच्या दशकातील सुमधुर संगीत असलेल्या चित्रपटांचा हा स्टूडीओ साक्षीदार होता. आर के नांव माहीत होण्याचे कारण ठरले ते नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर दाखवलेला बरसात हा चित्रपट. तेंव्हा सर्वप्रथम आर.के चे नांव व नटाने एका हातात व्हायोलिन धरलेला व एका हाताने नटीला धरलेले असे या आर.के स्टूडीओचे ते सुप्रसिद्ध बोधचिन्ह पहायला मिळाले. दूरदर्शन ही एकमेव वाहीनी असल्याने सर्वांना तीच वाहीनी पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे हाच चित्रपट घरी पाहून शाळेत आलेल्या एका मित्राने ज्ञानात भर टाकली. “अबे आर.के. च्या त्या लोगो मधले दोघे म्हणजे राज कपूर व नर्गिस आहे”, दूसरा म्हणाला “राज कपूरचा पहीला चित्रपट आग सपशेल पडला व म्हणून त्याने आग बुझ गयी अब बरसात लाउंगा असे म्हटले व बरसात हीट झाला. भारतात कुठेही आर.के. हा शब्द ऐकला की अनेकांना राज कपूरचा स्टूडीओ आठवतो. आर.के. शी ओळख झाल्यावर पुढे तेथे निर्मित अनेक चित्रपट पहाण्याचा योग आला. घरी रेडीओ होताच त्यामुळे बिनाका व तत्सम हिन्दी गाण्यांच्या कार्यक्रमातून “मेरा जुता है जपानी” सारखी गाणी ऐकण्यात येतच होती. राज कपूर म्हणजे चित्रपट सृष्टीतील एक मोठे व्यक्तीमत्व. “शोमॅन” बिरुद मिरवणारा. संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार शैलेन्द्र, हसरत जयपुरी यांच्यासह बरसात, श्री 420, बूट पॉलिश, डाकूंच्या पुनर्वसनावर आधारीत जिस देशमे गंगा बहती है, सुप्रर डूपर हीट बॉबी असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्याने दिले होते. सिनेतारकांचे अंगप्रदर्शन सुरु करून दर्शक खेचण्याचा ठपका सुद्धा त्याच्यावर पडला आहे. आपल्या चित्रपटातून कलात्मक पद्धतीने अंगप्रदर्शन होईल व सेन्सॉरच्या कैचीत सापडणार नाही अशी दृश्ये देण्यात राज कपूरचा हातखंडा होता. राम तेरी गंगा मैली, मेरा नाम जोकर मधील दृश्ये ही त्याची काही उदाहरणे. परंतू तरीही राज कपूर या नावाला एक वलय होते. त्याने त्याच्या आर. के. स्टूडीओव्दारे चित्रपट निर्माण करून रसिकांचे मनोरंजन नक्की केले आहे. मेरा नाम जोकर हा त्याचा दोन मध्यांतर असणारा दीर्घ चित्रपट मात्र साफ कोसळला होता, मेरा नाम जोकर सुपर फ्लॉप झाल्यावर प्राणने म्हणे राज कडून फक्त एक रुपया मानधन घेतले होते. राज कपूरने बरीच वर्षे रसिकांचे मनोरंजन केले.                                                        अखेरच्या दिवसांत त्याला दादासाहेब
फाळके पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते. राजने पुथ्वीराज कपूर या आपल्या वडीलांकडून अभिनयाचा वारसा घेऊन आर.के.ची उभारणी केली होती.मुंबईतील चेंबूरच्या या स्टूडीओने मोठा काळ पाहीला आहे. अनेक रंगपंचमी उत्सव पाहीले आहे. राज येथे रंगपंचमी मोठ्याप्रमाणात साजरी करीत असे. अनेक सिनेकलावंत रंगपंचमीला आर.के.त हजेरी लावत. अनेक चित्रपटांचे चित्रण या स्टूडीओ ने पाहीले आहे. न्यायालयाचा सेट तर येथे कायम बनवलेला होता. पन्नासच्या दशकापासूनच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा स्टूडीओ मेंटेन करता येत नाही म्हणून विकल्या जाणार आहे हे ऐकून अनेक सिनेरसिकांना निश्चितच दु:ख वाटत असेल. परंतू सद्यस्थितीत स्टूडीओ ही कल्पना सुद्धा नामशेष झाली आहे. लोक आऊट डोअर चित्रण जास्त करतात. इन डोअरसाठी बंगले भाड्याने घेतात. अशा काळात कपूर परीवाराने हा निर्णय घेतला तो योगी का अयोग्य हा भाग निराळा. परंतू त्या जागेवर एखादे मल्टीफ्लेक्स, राज कपूर, पृथ्वीराज यांच्या चित्रपटांचे, दुर्मिळ छायाचित्रांचे संग्रहालय सुद्धा उभारता येऊ शकले असते असे वाटते. अत्यंत नावाजलेल्या या आर के स्टूडीओची सुरुवात “आग” चित्रपटाने झाली होती. आता काही महीन्यांपूर्वी आर के ला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. कदाचित ही आग सुद्धा हा स्टूडीओ विकण्याचे एक कारण असावे. राज कपूरचा आग हा सिनेमा आपटला होता पुढे राजने उभारी घेतली परंतू त्याचा स्टूडीओ मात्र वास्तवातील आगीतून उभारी घेऊ शकला नाही. आग चित्रपटाने सुरुवात झालेल्या या स्टूडीओचा अंत आगीनेच व्हावा हा सुद्धा एक दुर्दैवी योगायोगच म्हणावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा