Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/१२/२०१८

Article about BSNL worst service


ग्राहकांप्रती उदासीन BSNL 
दि 24 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाला. नेमेची येतो मग पावसाळायाप्रमाणे महसूल विभागात हा दिवस साजरा होतो. महाराष्ट्र शासनाचे आदेश असूनही हा दिवस कुठे साजरा होतो तर कुठे नाही. जिथे होतो तिथे निव्वळ एक formality म्हणून साजरा केला जातो. शासनाच्या वतीने ज्याप्रमाणे महसूल विभाग ग्राहक दिन साजरा करते त्याच प्रमाणे शासनाच्या इतर विभागांनी सुद्धा हा दिवस साजरा करणे अपेक्षित आहे. व याची सुरुवात व्हावी ती BSNL या भारत सरकारच्या कंपनी पासून असे वाटते. कारण तशी सर्वप्रथम आवश्यकता बीएसएनएल लाच आहे. BSNL तशी टेलीकॉम क्षेत्रातील मोठी कंपनी. परंतू अत्यंत सुस्त कारभारामुळे रसातळाकडे वाटचाल सुरु करीत असलेली कंपनी. खरे म्हटले तर एखाद्या राष्ट्राची जर कोणती कंपनी असेल तर त्या कंपनीच्या खात्याने तीला  नफ्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असले पाहिजे. BSNL चे संचार खाते काय करते आहे ? मोबाईल , इंटरनेट या क्षेत्रात BSNL च्या कितीतरी नंतर आलेल्या खाजगी कंपन्या आज चांगला नफा कमवून गबर बनीत आहे. BSNL काय करते आहे ? BSNL त्यांचे जे काही ग्राहक आहेत त्यांना सुद्धा गमावण्याच्या चांगल्याच तयारीस लागले असल्याचे असे चित्र आहे. BSNL लँड लाईन धारकांकडे तर त्यांचे मुळीच लक्ष नाही. तुम्ही कितीही तक्रार करा निवारण करण्यासाठी कुणीही येत नाही. मारे ओंनलाईन तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करतात , त्याची जाहीरात करतात , त्या जाहिरातींवर लाखो रुपये उधळतात. परंतू ओंनलाईन तक्रार दाखल करण्याच्या तक्रारीचे निवारण करण्यास कुणीही येत नाही. बुलडाणा जिल्ह्यात BSNL ने अक्षरश: मागे लागून-लागून,रोज फोन, लघु संदेश पाठवून ग्राहकांना 4G सीम कार्ड घेण्यास सांगितले.अनेकांनी ते घेतले. मात्र आज अशी परिस्थिती आहे की, हे 4G सीम तर आले परंतू BSNL मोबाईल धारक मात्र अत्यंत धीम्या गतीने चालणा-या नेटमुळे त्रस्त झाले आहेत. आज पंतप्रधानांच्या आवाहनामुळे कित्येक लोक डिजिटल पेमेंट करीत आहेत व पंतप्रधांनांच्या आवाहनास प्रोत्साहित होऊन प्रतिसाद देत आहेत. परंतू माहीती व दूरसंचार खात्या अंतर्गत येत असलेलेले BSNL मात्र आपल्या अतिशय वाईट सेवेने स्वत:च्याच ग्राहकांना त्रस्त करून सोडीत आहे. ग्राहकांना जेरीस आणीत आहे. तरीही अद्यापही काही राष्ट्रीय विचारांचे ग्राहक बीएसएनएल ला धरून आहेत. परंतू बीएसएनएल मात्र आपल्या ग्राहकांप्रती शंभर टक्के उदासीन आहे. लँड लाईन धारकांकडे तर बीएसएनएल साफ कानाडोळा करीत आहे. लँड लाईन च्या कित्येक तक्रारी निवारण त्वरीत होत नसते किंवा होतच नाही. अनेक लँड लाईन धारकांनी त्रस्त होऊन लँड लाईन सुविधा बंद केली आहे. त्यांची अनामत रक्कम नंतर मिळेल असे सांगून संपूर्ण देशभरात अब्जाबधी रुपयांची रक्कम अद्यापही बीएसएनएल कडेच जमा आहे. त्या रकमेवर ते व्याजही मिळवत आहेत. ग्राहक लँड लाईनची तक्रार, अनामत रक्कम, मोबाईल फोनची तक्रार, याबाबत बोलण्यास गेले असता त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते. अनेक खाजगी मोबाइल कंपन्या सूनियोजित कारभार करून, ग्राहक सेवा देऊन, जीवघेण्या स्पर्धेत नफा कमवित असतानाचे चित्र सर्व पाहतच आहेत.परंतू माहीती व प्रसारण खाते, त्या खात्याचे मंत्री मात्र कुंभकर्णी निद्रेत आहे.त्यांच्या डोळ्या देखत खाजगी कंपन्या ग्राहकांकडून नफा मिळवीत आहेत.परंतू यांना मात्र राष्ट्राची कंपनी बीएसएनएल ला उभारी देण्याची काही एक भावना दिसत नाही आहे.इतर देशात त्या-त्या देशांच्या कंपन्या चांगल्या जोमात सुरू असल्याचे चित्र असते.भारतात मात्र राष्ट्राच्या कंपनीस डबधाईस आणून काही लाडक्या उद्योगपतींच्या खाजगी कंपन्यांना पुढे आणले जात आहे. प्रसंगी हे नियमबाह्य पद्धतीने पद्धतशीर पद्धतीने करण्यात येत आहे.हीच का यांची राष्ट्रीय भावना? केंद्र सरकार मधील एका मंत्री महोदयांनी मागे व्यायाम करण्याचे चँलेंज सोशल मिडीयाद्वारे तरुणांना दिले होते. तंदुरुस्त राहणे योग्यच आहे परंतू शारीरीक तंदुरुस्ती प्रमाणेच आपल्या राष्ट्रीय भारतीय कंपनी BSNL ला सुद्धा तंदुरुस्त कसे कर्ता येईल हे पाहणे, BSNL च्या सेवा ,इंटरनेटचा स्पीड चांगला करणे हे सर्व करण्याचे चँलेंज टेलिकम्युनिकेशन मंत्र्यांनी स्वत: स्विकारावे.BSNL ला बळ द्यावे, कंपनीच्या सेवेत सुधारणा (Drastic Change) करून इतर खाजगी कंपन्यांना चँलेंज द्यावे. असे केल्यास एका राष्ट्रीय कंपनीबाबत,तिला सावरण्याबाबत,मा. पंतप्रधानांच्या डिजीटल इंडीयाच्या संकल्पनेबाबतची आपली राष्ट्रीय भावना जनतेच्या नजरेस पडेल .   

२०/१२/२०१८

"Zindagi Badi Honi Chahiye ,Lambi nahi ", A story of 115 years old lady of Madhyapradesh , India


जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही
     काल एबीपी माझा या वृत्तचित्र  वाहिनीवर “115 वर्षाच्या आजीबाईंची गोष्ट” ही स्टोरी दाखवली. मध्यप्रदेशातील शांती पांडे या त्या आजी. या आजींचा जन्म 12 मार्च 1903 रोजी झाला. पायात फ्रॅक्चर झाल्यामुळे उपचारासाठी म्हणून त्या नागपूरला आल्या असता सरिता कौशिक या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांची ही स्टोरी प्रसारित केली.आजींनी दिलखुलासपणे मुलाखत दिली.  येणा-या-जाणा-यांशी संवाद साधला. आपला भूतकाळ सांगितला. एवढेच नव्हे तर अनेकांना त्यांचा हात पाहून भविष्य सुद्धा सांगितले. स्वतंत्रता संग्राम, आणीबाणी ,दंगली या सर्व आठवणी आजी सांगतात. आजींना अजून चष्मा नाही. वॉकर घेऊन चालतात.1977 मध्ये आजींचे पती वारले. काही वर्षांपूर्वी एका अपघातात मोठ्या मुलाचे निधन झाले. आजींनी आता त्यांच्या नातीची नात पाहिली आहे. त्यांच्याबाबत त्यांच्या परिवारातील सदस्य देखील बोलले. आजींनी अतिशय साधे जीवन जगले. राग केला नाही. आंनदाने , सकारात्मकतेने जीवन व्यतीत केले असे या सदस्यांनी भाष्य केले.  
ही स्टोरी पाहता-पाहता या आजीबाईंच्या एवढ्या मोठ्या आयुष्यामागे काय रहस्य असेल याचा विचार मनात येत होता. आज आपण अत्यंत धकाधकीचे, ताण-तणाव ग्रस्त, अशी जीवन शैली अंगिकारली आहे. आपल्या आयुष्यातील निखळ आनंदास आपण स्वत:च अव्हेरले आहे. भौतिक सुखांच्या नादापायी शरीरस्वास्थ्यासारख्या बाबीकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. स्वत:कडे काय आहे हे पाहणे सोडून दुस-याकडे जे आहे ते आपल्याकडे कसे येईल यासाठी झुरत आहोत. दुस-याच्या हातात आपल्या सुखाच्या चाव्या देत आहोत. आताशा शरीरस्वास्थ्याची जाणीव ,awareness खूप वाढला आहे. लोक व्यायाम ,सायकलिंग करू लागले आहेत. परंतू मनाचे काय? मन आनंदी नाही , अनेक चिंता , तणाव , लोभ , विकार या गोष्टी मनात वास्तव्य करीत आहेत. चांगल्या शरीराप्रमाणे निरोगी आरोग्यासाठी निर्मळ मन सुद्धा असावे लागते. पूर्वीच्या लोकांकडे हेच होते म्हणूनच ते दीर्घायू होते. या 115  वर्षांच्या आजीबाई त्याचाच पुरावा आहे. धकाधकीचे जीवन,प्रदूषण,हॉटेलचे खाणे,यांत्रिकता,भौतिक वस्तूंचा लोभ, शानशौकीत जीवन जगण्याची वाटत असलेली अनावश्यक ओढ, असूया, लोप पावत असलेली प्रामाणिकता इत्यादी अनेक कारणांनी आपण स्वत:च आपले आयुष्य आपणच घटवत आहोत. सर्व कामे हल्ली यंत्रांच्या सहाय्याने आपोआप होतात त्यामुळे शरीरास श्रम पडत नाही. बैठे काम केल्याने विकार उत्पन्न होत आहेत, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. ताण-तणाव हे सुद्धा मधुमेहाचे एक कारण आहे. 115 वर्षांच्या शांती आजींना अजून मधुमेह नाही. आजींनी त्यांची हयात कष्टात घालवली. आज आपली कष्टाची कामे किती कमी झाली आहेत. शांती आजींच्या या  स्टोरीमुळे अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. मान्य आहे की आता पूर्वीप्रमाणे सकस अन्न राहिले नाही. सर्व पदार्थांत भेसळ आहे. परंतू सकारात्मक व आनंदी जीवनशैली नक्कीच जोपासली गेली पाहीजे. डोक्यात प्रेम , माया यांऐवजी  राग, व्देष भावना जोपासणे यांनी सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होत् असतो. रक्तदाब मधुमेहासारखे विकार जडतात. आजींसारखी साधी ,सकारात्मक,आनंदी,कष्ट करण्याची वृत्ती अंगी बाणवल्यास निरोगी व दीर्घ आयुष्य जगता येते. या वयात संपूर्ण ठणठणीत, आनंदी , कुणाशी काही तक्रार नाही अशा शांती आजींना पाहून आनंद सिनेमातील राजेश खन्नाचा तो संवाद आठवतो बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नाही” आजींची 115 वर्षांची “जिंदगी” अशीच “बडी” वाटते.सकारात्मक,आनंदी,कशाचे भय नसलेली , अगदी मृत्यूचे सुद्धा.

१४/१२/२०१८

Article on being happy by the defeat of others

असुरी आनंद
 

नंद हा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे कुणाच्यातरी भल्यातून झालेला आनंद तर दूसरा कुणाच्या नुकसानामुळे किंवा दुस-याच्या पराभवामुळे झालेला आनंद. यातील पहीला आनंद हा दैवी आहे, नैसर्गिक आहे परंतू दूसरा आनंद हा मात्र असुरी आनंद आहे. या असूरी आनंदचा उपभोग घेण्याची वृत्ती अनेकांत दिसून येते. याच असुरी आनंदाची प्रचिती “नमोहरम” या शब्दावरुन आली. “नामोहरम” या शब्दाचा चपखल वापर करून भाजपाचा पाच राज्यात झालेल्या पराभवातून असुरी आनंद घेतल्या जात आहे. असा असुरी आनंदाचा उपभोग घेतांना त्यांना स्वत:चे सुद्धा आत्मपरीक्षण करणे जरूरी आहे. मोठा भाऊ आता म्हणावा तितका प्रभावी असल्याचे दिसून येत नाही. मित्रपक्षासोबत सत्तेचा वाटेकरी बनतो व त्याच मित्रपक्षाच्या पराभवातून असुरी आनंद घेतो. 2014 पासून या असुरी आनंद घेणा-यांनी स्वत:च्याच मित्रपक्षावर वारेमाफ तोंडसुख घेतांना, अफझलखान सारखी मुक्ताफळे उधळतांना जनतेने पाहीले आहे. एखाद्याचा द्वेष करतांना आपण किती द्वेष करीत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. ज्या राज्यांच्या निवडणूका होत्या तेथे अनेक वर्षे येथे भाजपाने सत्ता उपभोगली. कार्य सुद्धा चांगले केले. जनतेला बदल आवश्यक वाटला त्यामुळे जनतेने तसा कौल दिला. परंतू विजयी कोंग्रेसपेक्षाही जास्त आनंद हे असुरी आनंद घेणारे घेत आहेत. कोंग्रेस नेतृत्वाने तरी विनम्रतेने हा विजय स्विकारून, सुयोग्य भाष्य करून आपण सुद्धा राजकीय प्रगल्भ झालो आहोत हे दाखवले. परंतू ज्या कोंग्रेसचा तिटकारा यांचे साहेब करीत आले,ज्या कोंग्रेसवर वारेमाप तोडसुख घेत आले त्याच कोंग्रेसबद्दल यांना अचानक मोठा पुळका आलेला आहे. त्यांची मोठी स्तुती काल हे नमोहरम म्हणणारे खासदार महाशय करीत होते. हे कोंग्रेस नेतृत्वाचे मोठे गुणगान करीत होते तर ज्यांचे स्वत:चे आमदार,खासदार कुणीही नाही त्यांना त्वरीत तीन राज्यात विजयी झालेल्यांचे नेतृत्व लगेच “परमपूज्य” सुद्धा वाटू लागले आहे. मुद्दा हा आहे की कुणी हारणार कुणी जिंकणार परंतू दुस-याच्या पराभवातून आनंदी होणे हे मात्र योग्य वाटत नाही. तसेच सत्ताधारी असो वा विरोधी वृथा अहंकार, फाजील आत्मविश्वास सुद्धा नको. या असुरी आनंद घेणा-यांना एकच सूचना करावीशी वाटते. आज तुम्ही समविचारींच्या पराभवातून असुरी आनंद घेत आहात. परंतू निवडणूका जवळच आहेत. स्वत:च्या विजयाचे सूत्र बांधा, महाराष्ट्रात आता पूर्वीसारखा जोर राहीला नाही, राष्ट्रीय पातळीवर तर आपला काही विशेष प्रभाव नाही. गुजराथ विधानसभा निवडणूकीतील आपला “परफॉरमन्स” जनतेने पाहीला आहे. त्यामुळे असुरी आनंद घेणे योग्य नव्हे. तुमच्या हितचिंतकांना तुम्ही समविचारी, नैसर्गिक मित्र सोबतच हवे वाटतात व तेच तुमच्या, तुमच्या पक्षांच्या व देशाच्या सुद्धा हिताचे आहे. त्यामुळे आपल्या वरीष्ठांनी ज्याप्रमाणे समविचारींशी, नैसर्गिक मित्रांशी सलगी ठेवली त्याचप्रमाणे ठेवली तर तेच रास्त ठरेल.         

१२/१२/२०१८

"Woods are lovely dark and deep" .... lines used to tribute Mr Hemant Desai Sir on his sad demise

.....And miles to go before I sleep.

     नव्वदच्या दशकाच्या मध्यावर महाविद्यालयीन शिक्षण गो.से. महाविद्यालय खामगांव येथे सुरु होते. प्रा. हेमंत देसाई हे नांव महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच ऐकून होतो. सर उत्कृष्ट इंग्रजी शिकवत. इंग्रजी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. जरी माझा इंग्रजी साहित्य हा विषय नसला तरी इंग्रजी भाषा सरांकडून शिकण्याचे भाग्य मात्र माझे होते. बहुतांश वेळा तासिका बुडवणे याबाबत महाविद्यालयीन तरुण बदनाम होत असतात. परंतू देसाई सरांची तासिका असली की “पिन ड्रॉप सायलेन्स” असलेला व सर्व विद्यार्थी उपस्थित असलेला वर्ग मी अनुभवला आहे. इंग्रजी साहित्याचा नुसताच अभ्यास नाही तर साहित्याचा व्यासंग , अफाट शब्दसंग्रह असलेले देसाई सर शिकवत तेंव्हा विद्यार्थी भारावून जात. महाविद्यालयीन तरुण असूनही शेरेबाजी किंवा काही इतर गोंधळ वर्गात होत नसे. सरांचा चेहरा सुद्धा करारी होता. गोरेपान , इंग्रजी माणसाप्रमाणेच “अप टू डेट” पोशाख घातलेले सर वर्गात आले की त्यांच्या व्यक्तीमत्वाची एक वेगळीच छाप विद्यार्थ्यांवर पडत असे.मी जरी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी नसलो तरी माझी बहीण , मित्र-मैत्रिणी यांच्याकडून मला इंग्रजी साहित्यातील सर शिकवत असलेल्या गोष्टींची माहिती मिळत होती.त्यातूनच मग शेक्सपिअर, फ्रॉस्ट, ब्राउनिंग , वर्डस्वर्थ, ओ हेन्री  यांचा जुजबी का होईना परंतू परिचय झाला. इंग्रजी , पाश्चात्य देशातील  खेड्यापाड्यातून बोलली जाणारी खेडवळ इंग्रजी , आपण ज्याला मराठीत अमुक-ढमुक म्हणतो किंवा हिंदीत ऐरा-गैरा, फलाना असे म्हणतो त्याला इंग्रजीत टॉम डिक हॅरी म्हणतात , किट्सच्या कवितेतील सुंदर परंतू निष्ठूर स्त्रीला इंग्रजीत ला बेल डेम म्हटले जाते हे सरांकडूनच कळले होते.  सरांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवले होते. सर आधुनिक विचारांचे होते. सरांकडे स्कूटर होती. सरांनी त्यांच्या पत्नीला व मुलीला स्कूटर शिकवली होती. त्या काळात खामगांवात स्कूटर चालवणा-या त्याच दोघी महिला असाव्यात. सर सकाळी नियमित फिरण्यासाठी जात असत. त्यांचे येणे-जाणे माझ्या घरा समोरूनच असे. त्यामुळे रोज त्यांना नमस्कार होत असे. पाश्चात्य शैलीची आवड असल्याने सरांचा पोशाख नीटनेटका व कडक इस्त्रीचा असे.सरांचे खामगांवाततील टुमदार घर सुद्धा पाश्चात्य शैलीच्या घरांची झलक दाखवणारे आहे. उतरत्या छपराच्या कौलारु घराप्रमाणे सरांच्या घराचा प्रथमदर्शनी भाग आहे आणि हो त्यावर पाश्चात्यांच्या घरातील फायर प्लेस साठी जसे धुरांडे असते तसे धुरांडेही आहे. येणा-या जाणा-यांचे चित्त वेधून घेणारे सरांचे हे घर सरांच्या स्मुती जागवून जाते. महाविद्यालयाच्या त्या तीन वर्षात सरांचा काही विशेष सहवास प्राप्त झाला नाही. कारण त्याच कालावधीत सर सेवानिवृत्त झाले होते. परंतू त्या अल्पावधीत शिक्षक /प्राध्यापक कसा असावा हे सरांच्या अनोख्या शैलीतून, त्यांच्या शिकवण्यातून ,त्यांच्या मॅनर्स,एटीकेट्स मधून जाणवत असे. एखाद्या व्यक्तीमध्ये इतरांना आकृष्ट करून घेण्याची , इतरांना प्रभावित करण्याची एक विशिष्ट शक्ती असते. ती जन्मजात असते किंवा प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे किंवा वागणुकीने त्याच्याकडे लोक आकृष्ट होत असतात. सरांकडे हे दोन्ही होते त्यामुळेच विद्यार्थी त्यांच्याकडे आकृष्ट होत असत.विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा प्रभाव पडला होता. परवा सरांच्या दुख:द निधनाची वार्ता समजली. विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व खामगांववासीयांना तीव्र वेदना झाल्या.  आता काही दिवसांपूर्वी त्यांचा फोटो फेसबुकवर पहिला होता. गो-यापान करारी चेह-यावरचे ते मंदस्मित ब-याच कालावाधीनंतर पाहिल्याने फार बरे वाटले होते. परंतू 15 दिवसांतच निधन वार्ता ऐकून माझ्यासह आम्हा सर्वच मित्रांना अतीव दु:ख झाले. श्रद्धांजली म्हणून काहींनी माध्यमांवर स्टेटस, स्टोरी मध्ये सरांचा फोटो किंवा शब्दसुमन ठेवले होते.
The woods are lovely, dark and deep,
 But I have promises to keep,.
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
रॉबर्ट फ्रॉस्टची “Stopping by woods by snowy evening” या कवितेतील कवितेसह वरील ओळींचा अर्थ सरांनी सांगितला होता. “जीवनरुपी सुंदर जंगलातून प्रवास करतांना मला माझी अनेक कर्तव्ये पार पाडायची आहेत, ध्येये गाठायची आहेत, जीवनाचा हेतू साध्य करायचा आहे अनेक जबाबदा-या आहेत आणि त्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जीवनरुपी मोठे अंतर कापावे लागणारे आहे.” असा या ओळींचा अर्थ. सरांनी त्यांच्या जीवनात अनेक promises keep करून उत्कृष्ट विद्यादानाचे miles to go before sleep करून सर्वांचा निरोप घेतला. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली                

०६/१२/२०१८

A complaint of hill lost filed in Pawoi, Mumbai by a environmentalist man, article elaborate this


डोंगराला आग लागली पळा पळा पळा
     शीर्षकातील या ओळी म्हणता- म्हणता मुले पूर्वी एक खेळ खेळत असत. परंतू मुंबईतील नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी डोंगरातील झाडे-झुडपे यांवर रहीवास , त्यांच्यावर अधिकाराने राहणा-या प्राणी पशू पक्षी यांना खरेच आता इतरत्र पळावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीतील एक मोठ्या हिरव्यागार डोंगरावर मोठी आग लागली होती. मोठी वनसंपदा त्यात नष्ट झाली. आता या आगीच्या मागील कारणाचे किंवा भूमाफियांकडून जमीन लाटण्याचा काही घात-पात असल्याचे समोर येईलच. या घटनेनंतर काही दिवसांनी रवी तिवारी नामक एका पर्यावरण प्रेमीने मुंबई मधील पवईतील “डोंगर हरवला” अशा आशयाची एक तक्रार दाखल केली आहे. अफाट जनसंख्येने लदबदलेल्या मुंबईमध्ये जमिनीला मोठी मागणी व किंमत आहे. यामुळेच मग जमिनीसाठी मुंबईला अनेक गैरकायदेशीर कृत्ये घडली आहेत व घडत आहेत. येथे मोठ्या संख्येने भूमाफियांचे जाळे निर्माण झाले आहे. आदर्श घोटाळा हा सुद्धा सदनिकांच्या मोहातूनच घडला होता. आज आदर्श इमारत भकास आहे. येथे विकासक व भूमाफिया जमिनीसाठी कुठल्याही थरास जाण्यास तयार आहेत . मग ते एखाद्याचा जीव घेणे असो  किंवा मग पर्यावरणास ईजा पोहोचवणे असो. रवी तिवारी यांनी त्यांच्या तक्रारीत पवई येथे अगदी काही दिवसांपूर्वी डोंगर होता परंतू अल्पावधीतच हा डोंगर कसा काय पोखरला जाऊ शकतो? असे म्हटले आहे. पवईतील नागरिकांना या डोंगरामुळे जो काही निसर्गाचा आनंद मिळत होता. त्या आनंदास ते आता मुकले आहेत. परंतू प्रशासनाचे लक्ष कुठे आहे? पर्यावरण खाते कुठे जाऊन बसले आहे? भूमाफिया,विकासक हे नियम, कायदे यांची सर्रास पायमल्ली करण्यास कसे काय धजाऊ शकतात ? झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? भूमाफिया , विकासक यांनी कायदे नियमांचा भंग करण्यासाठी देलेल्या नजराण्यांमुळे मग अशी कृत्ये घडतात. हे असेच जर घडत राहिले तर पुढील पिढ्यांना डोंगर, पर्वत तर चित्रातूनच दाखवावे लागतील. कर्मचा-यांशी साटेलोटे करून अत्यल्प मोबदल्यात शासकीय जमिनी, डोंगर, वन जमिनी लाटायच्या व त्यावरील भूखंड ,सदनिका अव्वाच्या सव्वा भावात विकून गब्बर बनायचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. पवईच्या  या घटनेबाबत भाष्य करतांना पर्यावरण मंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे सांगितले परंतू प्रत्यक्षात तसे घडेल की नाही ईश्वर जाणे. आज अर्धा डोंगर पोखरल्या गेला आहे प्रत्यक्ष कारवाई होईतो कदाचित संपूर्ण डोंगरच पोखरला जाण्याची शक्यता नाकारत येत नाही. मुंबईत सध्या मलबार ,आरे कॉलनी,विक्रोळी, पवई अशा काही भागातच डोंगर शिल्लक राहिले आहेत. भूमाफिया , विकासक यांची वक्रदृष्टी त्यावर आता पडलीच आहे. त्यांच्या या वक्रदुष्टी वर शासनाने डोळेझाक करून चालणार नाही. जमिनी लाटण्याचा हा उद्योग बंद पडण्यासाठी विकासाचा समतोल साधून महाराष्ट्रात इतरत्र सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण करणे अत्यावश्यक झाले आहे. तसे जर झाले तर दररोज मुंबईकडे येणारे लोंढेच्या लोंढे कमी होतील. परंतू सत्ताप्राप्तीचा उद्देशच केवळ स्वत:चेच तेवढे भले करणे हा असेल तर त्यांना डोंगर पोखरा का आणखी काही करा याच्याशी लोकप्रतिनिधींना काहीही देणे घेणे राहिले नाही. एकीकडे
“पर्बत वो सबसे उंचा हमसाया आसमॉंका 
वो संतरी हमारा वो पासबाँँ हमारा” 
असे मोठ्या अभिमानाने म्हणायचे आणि दुसरीकडे तेच पर्वत फोडायचे. नैसर्गिक डोंगर पोखरून विकासक , भूमाफिया यांच्या बेकायदेशीररित्या जमिनी लाटण्याकडे दुर्लक्ष करून नोकरदार, अधिकारी, राजकारणी यांचेकडे पैशाचे डोंगर उभे राहत असतील तर मग ही असली आग लावण्याची , डोंगर हरवण्याची कृत्ये घडतच राहतील आणि या डोंगरावर राहणा-या पशुपक्षी व प्राणीमात्रांना मात्र “डोंगराला आग लागली पळा पळा पळा” याप्रमाणे निवा-यासाठी इतरत्र जावे लागेल व इतरत्र सुद्धा कदाचित तिच स्थिती असण्याची शक्यता असेल.            

०३/१२/२०१८


भाऊंचे घर
आमचे मोठे काका भालचंद्र वरणगांवकर उपाख्य भाऊसाहेब यांच्या बाबतच्या आठवणींना काल लहान बहीण मेघाली कडून चिखली हून बुलडाण्याला आल्यावर उजाळा मिळाला. मी माझी मुले, दोन बहीणी आक्का व दीपाली असे आम्ही बाबाकडे गेलो होतो. संध्याकाळी आम्ही चैतन्यवाडीतील सध्याचे “अव्दैत” नांव असलेल्या त्या वास्तूत प्रवेशीत झालो. फ्रेश झाल्यावर आमच्या भगिनी म्हणाल्या “अरे जुने घर काही आठवतच नाही, बगीचा कुठे होता ?“असे विचारत्या झाल्या.त्या जुन्या घरात बालपणी खूप काळ व्यतीत केल्याने आणि जुन्या घराचे चित्र मनपटलावर अद्याप कायम आहे. आमचे भाऊ काका दारूबंदी अधिकारी असल्याने ते दारूबंदी विषयावर उद्बोधनात्मक चित्रपट जिल्ह्यातील शहरे व खेड्यातून दाखवत असत. त्यांच्याजवळ शासकीय प्रोजेक्टर व तंत्रज्ञ चमू होती. त्या आठवणीने भाऊंच्या घराची माझ्या मनपटलावर कोरलेली चित्रे सुद्धा झर-झर समोर सारकू लागली. मोठे लाकडी फाटक त्यावर कुठलातरी एक वेल, फाटकातून आत शिरल्यावर थोडे समोर गेले की चांगली ऐस-पैस अशी बंगई. आत शिरल्यावर फाटकाच्या एका बाजूस डावीकडे गोठा व सायकल यांची जागा व मोठा बगीचा तर उजवीकडे तीन खोल्यांचे कुडाचे घर.पहील्या खोलीत एक सोफा व जिजी, वैशू ताईचे एक अभ्यासाची पुस्तके ठेवण्याचे हिरवे कपाट. याच खोलीत एक लाकडाचे छानसे शोकेस व त्यामध्ये सर्वांग हलविणारी एक बाहुली. दरवाजा जवळील बटन दाबल्यावर मिठूची बेल टीव टीव करीत असे , या बेल मध्ये खरोखर एक छोटा नकली मिठू होता. आम्हा लहान मुलांना तो मोठा आकर्षित करत असे. आंगणात जमिनी पासून आकाशात गेलेला व ब-हाणपूर केंद्राचे प्रक्षेपण खेचणारा एक भला मोठा अ‍ॅँटेना. घरात एक टीव्ही . मला वाटते “ई सी” कंपनीचा होता तो. मधल्या खोली नंतर छोटेसे स्वयंपाक घर व त्यामागे एक न्हाणीघर त्यामागे नळाचा हौद तिकडून शौचालयाकडे जाणारा रस्ता. शौचालयाकडे एक भले मोठे फणसाचे झाड. आमच्या काकांना झाडांचा मोठी हौस. म्हणूनच त्यांनी विविध प्रकारची झाडे, पँशन फ्रूट सारखा वेल ,बगीच्यात बसण्यासाठी झाडांच्या खोडाचे केलेले स्टूल, गेटच्या जवळच राजा कुत्र्याची जागा व 80 च्या दशकात येणा-या जाणा-यांना आकर्षित करणारा “लव्ह बर्डसचा” भला मोठा पिंजरा. आणि हो बगीच्यात बागडणारे “मिकी” हरीण सुद्धा सर्वांसाठी एक नवलच होते. बागेची मोठ्या हौसेने देखभाल करणारे आमचे काका काकू. त्यांची शिस्त तसेच काकांचे दिलखुलास जोक, त्यावर काकूंचे तोंडाला पदर लावून हसणे, बाबाचे ते मित्रांसोबत रंगपंचमीला रंगून येणे, जिजी,वैशूताई सोबत पाहीलेले चित्रपट, रेखाचा झुठी आम्ही टुरींग टॉकीज मध्ये पहील्याचे अजून आठवते. काकुंचा मी लाडका होतो. आमच्या काकु भाऊ काकांचा मोठा मान ठेवत व त्यांच्या कडे खूप लक्ष देत हे ओळखू येण्यास माझे बालपण आडवे नाही आले. माझ्या डोळ्यांसमोर हे सर्व येत होते आणि मी माझ्या बहीणी आक्का व दीपाली या दोघींना त्याचे वर्णन करीत होतो. आता काही दिवसांपूर्वी सुनील कुलकर्णी या गृहस्थांची औरंगाबादला भेट झाली होती त्यांनी सुद्धा बाबा व भाऊ काकांची आठवण काढली. भाऊ काका बादल्यांनी झाडांना पाणी घालत हे सुद्धा सांगितले जुन्या घराच्या स्मृती सोबत असंख्य आठवणींना सुद्धा उजाळा मिळत होता. बदल हा निसर्गाचा नियम आहे . त्याप्रमाणे हे घर सुद्धा नूतन वास्तूत परीवर्तीत झाले. नवीन घरात सुद्धा भाऊ काका व काकूंनी बराच काळ व्यतीत केला. मी तेंव्हा बुलडाण्यालाच असे अधून-मधून भाऊ काका व काकूंना भेटायला जात असे. उतारवयात सुद्धा भाऊ काका माझ्याकडे 20–25 पाय-या चढून संगणक शिक्षणासाठी काही दीवस आले होते. माझ्या एका व्यवसायात सुद्धा माझा त्यांनी स्थानिक लोकांशी परीचय करून दिला होता. नवीन घरात फिरतांना मी जुन्या घराच्या व बालपणीच्या आठवणीत रमलो होतो. तेवढ्यात मेघाली व नलू वहीनी या दोघींचीही मैत्रीण असलेल्या भाग्यश्रीने आणलेल्या चहाने मी आठवणींच्या त्या जुन्या घरातून नवीन नवीन घरात आलो. चहा घेतला. घरासाठी,मुलांसाठी,बगीच्यासाठी,घरातील प्राण्यांसाठी देह कष्टविलेल्या भाऊ काका व काकूंच्या फोटोकडे नजर गेली. फोटोतील शांत नजर असलेल्या काकू व हसतमुख भाऊ काका यांना नमन करून भाऊंच्या जुन्या घराचा हा यादो का मेला मनात घेऊन मी खामगांवला निघालो.