डोंगराला आग लागली पळा पळा पळा
शीर्षकातील या ओळी म्हणता- म्हणता मुले पूर्वी एक खेळ खेळत
असत. परंतू मुंबईतील नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी डोंगरातील झाडे-झुडपे यांवर
रहीवास , त्यांच्यावर अधिकाराने राहणा-या प्राणी पशू पक्षी यांना खरेच आता इतरत्र
पळावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीतील एक मोठ्या हिरव्यागार डोंगरावर
मोठी आग लागली होती. मोठी वनसंपदा त्यात नष्ट झाली. आता या आगीच्या मागील कारणाचे
किंवा भूमाफियांकडून जमीन लाटण्याचा काही घात-पात असल्याचे समोर येईलच. या
घटनेनंतर काही दिवसांनी रवी तिवारी नामक एका पर्यावरण प्रेमीने मुंबई मधील पवईतील “डोंगर
हरवला” अशा आशयाची एक तक्रार दाखल केली आहे. अफाट जनसंख्येने लदबदलेल्या मुंबईमध्ये
जमिनीला मोठी मागणी व किंमत आहे. यामुळेच मग जमिनीसाठी मुंबईला अनेक गैरकायदेशीर
कृत्ये घडली आहेत व घडत आहेत. येथे मोठ्या संख्येने भूमाफियांचे जाळे निर्माण झाले
आहे. आदर्श घोटाळा हा सुद्धा सदनिकांच्या मोहातूनच घडला होता. आज आदर्श इमारत भकास
आहे. येथे विकासक व भूमाफिया जमिनीसाठी कुठल्याही थरास जाण्यास तयार आहेत . मग ते
एखाद्याचा जीव घेणे असो किंवा मग पर्यावरणास
ईजा पोहोचवणे असो. रवी तिवारी यांनी त्यांच्या तक्रारीत पवई येथे अगदी काही
दिवसांपूर्वी डोंगर होता परंतू अल्पावधीतच हा डोंगर कसा काय पोखरला जाऊ शकतो? असे
म्हटले आहे. पवईतील नागरिकांना या डोंगरामुळे जो काही निसर्गाचा आनंद मिळत होता. त्या
आनंदास ते आता मुकले आहेत. परंतू प्रशासनाचे लक्ष कुठे आहे? पर्यावरण खाते कुठे
जाऊन बसले आहे? भूमाफिया,विकासक हे नियम, कायदे यांची सर्रास पायमल्ली करण्यास कसे
काय धजाऊ शकतात ? झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? भूमाफिया , विकासक यांनी कायदे
नियमांचा भंग करण्यासाठी देलेल्या नजराण्यांमुळे मग अशी कृत्ये घडतात. हे असेच जर घडत
राहिले तर पुढील पिढ्यांना डोंगर, पर्वत तर चित्रातूनच दाखवावे लागतील. कर्मचा-यांशी
साटेलोटे करून अत्यल्प मोबदल्यात शासकीय जमिनी, डोंगर, वन जमिनी लाटायच्या व त्यावरील
भूखंड ,सदनिका अव्वाच्या सव्वा भावात विकून गब्बर बनायचा हा धंदा राजरोसपणे सुरु
आहे. पवईच्या या घटनेबाबत भाष्य करतांना पर्यावरण
मंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचे सांगितले परंतू प्रत्यक्षात तसे घडेल की नाही
ईश्वर जाणे. आज अर्धा डोंगर पोखरल्या गेला आहे प्रत्यक्ष कारवाई होईतो कदाचित
संपूर्ण डोंगरच पोखरला जाण्याची शक्यता नाकारत येत नाही. मुंबईत सध्या मलबार ,आरे
कॉलनी,विक्रोळी, पवई अशा काही भागातच डोंगर शिल्लक राहिले आहेत. भूमाफिया , विकासक
यांची वक्रदृष्टी त्यावर आता पडलीच आहे. त्यांच्या या वक्रदुष्टी वर शासनाने
डोळेझाक करून चालणार नाही. जमिनी लाटण्याचा हा उद्योग बंद पडण्यासाठी विकासाचा
समतोल साधून महाराष्ट्रात इतरत्र सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण करणे अत्यावश्यक
झाले आहे. तसे जर झाले तर दररोज मुंबईकडे येणारे लोंढेच्या लोंढे कमी होतील. परंतू
सत्ताप्राप्तीचा उद्देशच केवळ स्वत:चेच तेवढे भले करणे हा असेल तर त्यांना डोंगर
पोखरा का आणखी काही करा याच्याशी लोकप्रतिनिधींना काहीही देणे घेणे राहिले नाही. एकीकडे
“पर्बत वो सबसे उंचा हमसाया आसमॉंका
वो संतरी हमारा वो पासबाँँ हमारा”
असे मोठ्या अभिमानाने म्हणायचे आणि दुसरीकडे
तेच पर्वत फोडायचे. नैसर्गिक डोंगर पोखरून विकासक , भूमाफिया यांच्या बेकायदेशीररित्या
जमिनी लाटण्याकडे दुर्लक्ष करून नोकरदार, अधिकारी, राजकारणी यांचेकडे पैशाचे डोंगर
उभे राहत असतील तर मग ही असली आग लावण्याची , डोंगर हरवण्याची कृत्ये घडतच राहतील
आणि या डोंगरावर राहणा-या पशुपक्षी व प्राणीमात्रांना मात्र “डोंगराला आग लागली
पळा पळा पळा” याप्रमाणे निवा-यासाठी इतरत्र जावे लागेल व इतरत्र सुद्धा कदाचित तिच
स्थिती असण्याची शक्यता असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा