जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही
काल एबीपी माझा या वृत्तचित्र वाहिनीवर “115 वर्षाच्या आजीबाईंची गोष्ट” ही
स्टोरी दाखवली. मध्यप्रदेशातील शांती पांडे या त्या आजी. या आजींचा जन्म 12 मार्च 1903
रोजी झाला. पायात फ्रॅक्चर झाल्यामुळे उपचारासाठी म्हणून त्या नागपूरला आल्या असता
सरिता कौशिक या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्यांची ही स्टोरी प्रसारित केली.आजींनी
दिलखुलासपणे मुलाखत दिली. येणा-या-जाणा-यांशी
संवाद साधला. आपला भूतकाळ सांगितला. एवढेच नव्हे तर अनेकांना त्यांचा हात पाहून
भविष्य सुद्धा सांगितले. स्वतंत्रता संग्राम, आणीबाणी ,दंगली या सर्व आठवणी आजी
सांगतात. आजींना अजून चष्मा नाही. वॉकर घेऊन चालतात.1977 मध्ये आजींचे पती वारले. काही
वर्षांपूर्वी एका अपघातात मोठ्या मुलाचे निधन झाले. आजींनी आता त्यांच्या नातीची
नात पाहिली आहे. त्यांच्याबाबत त्यांच्या परिवारातील सदस्य देखील बोलले. आजींनी
अतिशय साधे जीवन जगले. राग केला नाही. आंनदाने , सकारात्मकतेने जीवन व्यतीत केले असे
या सदस्यांनी भाष्य केले.
ही स्टोरी पाहता-पाहता या आजीबाईंच्या
एवढ्या मोठ्या आयुष्यामागे काय रहस्य असेल याचा विचार मनात येत होता. आज आपण
अत्यंत धकाधकीचे, ताण-तणाव ग्रस्त, अशी जीवन शैली अंगिकारली आहे. आपल्या
आयुष्यातील निखळ आनंदास आपण स्वत:च अव्हेरले आहे. भौतिक सुखांच्या नादापायी शरीरस्वास्थ्यासारख्या
बाबीकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. स्वत:कडे काय आहे हे पाहणे सोडून दुस-याकडे जे
आहे ते आपल्याकडे कसे येईल यासाठी झुरत आहोत. दुस-याच्या हातात आपल्या सुखाच्या
चाव्या देत आहोत. आताशा शरीरस्वास्थ्याची जाणीव ,awareness खूप वाढला आहे. लोक
व्यायाम ,सायकलिंग करू लागले आहेत. परंतू मनाचे काय? मन आनंदी नाही , अनेक चिंता ,
तणाव , लोभ , विकार या गोष्टी मनात वास्तव्य करीत आहेत. चांगल्या शरीराप्रमाणे
निरोगी आरोग्यासाठी निर्मळ मन सुद्धा असावे लागते. पूर्वीच्या लोकांकडे हेच होते
म्हणूनच ते दीर्घायू होते. या 115
वर्षांच्या आजीबाई त्याचाच पुरावा आहे. धकाधकीचे जीवन,प्रदूषण,हॉटेलचे खाणे,यांत्रिकता,भौतिक
वस्तूंचा लोभ, शानशौकीत जीवन जगण्याची वाटत असलेली अनावश्यक ओढ, असूया, लोप पावत
असलेली प्रामाणिकता इत्यादी अनेक कारणांनी आपण स्वत:च आपले आयुष्य आपणच घटवत आहोत.
सर्व कामे हल्ली यंत्रांच्या सहाय्याने आपोआप होतात त्यामुळे शरीरास श्रम पडत
नाही. बैठे काम केल्याने विकार उत्पन्न होत आहेत, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. ताण-तणाव
हे सुद्धा मधुमेहाचे एक कारण आहे. 115 वर्षांच्या शांती आजींना अजून मधुमेह नाही. आजींनी
त्यांची हयात कष्टात घालवली. आज आपली कष्टाची कामे किती कमी झाली आहेत. शांती आजींच्या
या स्टोरीमुळे अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
मान्य आहे की आता पूर्वीप्रमाणे सकस अन्न राहिले नाही. सर्व पदार्थांत भेसळ आहे. परंतू
सकारात्मक व आनंदी जीवनशैली नक्कीच जोपासली गेली पाहीजे. डोक्यात प्रेम , माया यांऐवजी राग, व्देष भावना जोपासणे यांनी सुद्धा आपल्या
शरीरावर परिणाम होत् असतो. रक्तदाब मधुमेहासारखे विकार जडतात. आजींसारखी साधी ,सकारात्मक,आनंदी,कष्ट
करण्याची वृत्ती अंगी बाणवल्यास निरोगी व दीर्घ आयुष्य जगता येते. या वयात संपूर्ण
ठणठणीत, आनंदी , कुणाशी काही तक्रार नाही अशा शांती आजींना पाहून आनंद सिनेमातील
राजेश खन्नाचा तो संवाद आठवतो बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नाही” आजींची
115 वर्षांची “जिंदगी” अशीच “बडी” वाटते.सकारात्मक,आनंदी,कशाचे भय नसलेली , अगदी मृत्यूचे
सुद्धा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा