Click "Follow" Button below To Follow this Blog

१२/१२/२०१८

"Woods are lovely dark and deep" .... lines used to tribute Mr Hemant Desai Sir on his sad demise

.....And miles to go before I sleep.

     नव्वदच्या दशकाच्या मध्यावर महाविद्यालयीन शिक्षण गो.से. महाविद्यालय खामगांव येथे सुरु होते. प्रा. हेमंत देसाई हे नांव महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच ऐकून होतो. सर उत्कृष्ट इंग्रजी शिकवत. इंग्रजी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. जरी माझा इंग्रजी साहित्य हा विषय नसला तरी इंग्रजी भाषा सरांकडून शिकण्याचे भाग्य मात्र माझे होते. बहुतांश वेळा तासिका बुडवणे याबाबत महाविद्यालयीन तरुण बदनाम होत असतात. परंतू देसाई सरांची तासिका असली की “पिन ड्रॉप सायलेन्स” असलेला व सर्व विद्यार्थी उपस्थित असलेला वर्ग मी अनुभवला आहे. इंग्रजी साहित्याचा नुसताच अभ्यास नाही तर साहित्याचा व्यासंग , अफाट शब्दसंग्रह असलेले देसाई सर शिकवत तेंव्हा विद्यार्थी भारावून जात. महाविद्यालयीन तरुण असूनही शेरेबाजी किंवा काही इतर गोंधळ वर्गात होत नसे. सरांचा चेहरा सुद्धा करारी होता. गोरेपान , इंग्रजी माणसाप्रमाणेच “अप टू डेट” पोशाख घातलेले सर वर्गात आले की त्यांच्या व्यक्तीमत्वाची एक वेगळीच छाप विद्यार्थ्यांवर पडत असे.मी जरी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी नसलो तरी माझी बहीण , मित्र-मैत्रिणी यांच्याकडून मला इंग्रजी साहित्यातील सर शिकवत असलेल्या गोष्टींची माहिती मिळत होती.त्यातूनच मग शेक्सपिअर, फ्रॉस्ट, ब्राउनिंग , वर्डस्वर्थ, ओ हेन्री  यांचा जुजबी का होईना परंतू परिचय झाला. इंग्रजी , पाश्चात्य देशातील  खेड्यापाड्यातून बोलली जाणारी खेडवळ इंग्रजी , आपण ज्याला मराठीत अमुक-ढमुक म्हणतो किंवा हिंदीत ऐरा-गैरा, फलाना असे म्हणतो त्याला इंग्रजीत टॉम डिक हॅरी म्हणतात , किट्सच्या कवितेतील सुंदर परंतू निष्ठूर स्त्रीला इंग्रजीत ला बेल डेम म्हटले जाते हे सरांकडूनच कळले होते.  सरांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवले होते. सर आधुनिक विचारांचे होते. सरांकडे स्कूटर होती. सरांनी त्यांच्या पत्नीला व मुलीला स्कूटर शिकवली होती. त्या काळात खामगांवात स्कूटर चालवणा-या त्याच दोघी महिला असाव्यात. सर सकाळी नियमित फिरण्यासाठी जात असत. त्यांचे येणे-जाणे माझ्या घरा समोरूनच असे. त्यामुळे रोज त्यांना नमस्कार होत असे. पाश्चात्य शैलीची आवड असल्याने सरांचा पोशाख नीटनेटका व कडक इस्त्रीचा असे.सरांचे खामगांवाततील टुमदार घर सुद्धा पाश्चात्य शैलीच्या घरांची झलक दाखवणारे आहे. उतरत्या छपराच्या कौलारु घराप्रमाणे सरांच्या घराचा प्रथमदर्शनी भाग आहे आणि हो त्यावर पाश्चात्यांच्या घरातील फायर प्लेस साठी जसे धुरांडे असते तसे धुरांडेही आहे. येणा-या जाणा-यांचे चित्त वेधून घेणारे सरांचे हे घर सरांच्या स्मुती जागवून जाते. महाविद्यालयाच्या त्या तीन वर्षात सरांचा काही विशेष सहवास प्राप्त झाला नाही. कारण त्याच कालावधीत सर सेवानिवृत्त झाले होते. परंतू त्या अल्पावधीत शिक्षक /प्राध्यापक कसा असावा हे सरांच्या अनोख्या शैलीतून, त्यांच्या शिकवण्यातून ,त्यांच्या मॅनर्स,एटीकेट्स मधून जाणवत असे. एखाद्या व्यक्तीमध्ये इतरांना आकृष्ट करून घेण्याची , इतरांना प्रभावित करण्याची एक विशिष्ट शक्ती असते. ती जन्मजात असते किंवा प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे किंवा वागणुकीने त्याच्याकडे लोक आकृष्ट होत असतात. सरांकडे हे दोन्ही होते त्यामुळेच विद्यार्थी त्यांच्याकडे आकृष्ट होत असत.विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा प्रभाव पडला होता. परवा सरांच्या दुख:द निधनाची वार्ता समजली. विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व खामगांववासीयांना तीव्र वेदना झाल्या.  आता काही दिवसांपूर्वी त्यांचा फोटो फेसबुकवर पहिला होता. गो-यापान करारी चेह-यावरचे ते मंदस्मित ब-याच कालावाधीनंतर पाहिल्याने फार बरे वाटले होते. परंतू 15 दिवसांतच निधन वार्ता ऐकून माझ्यासह आम्हा सर्वच मित्रांना अतीव दु:ख झाले. श्रद्धांजली म्हणून काहींनी माध्यमांवर स्टेटस, स्टोरी मध्ये सरांचा फोटो किंवा शब्दसुमन ठेवले होते.
The woods are lovely, dark and deep,
 But I have promises to keep,.
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
रॉबर्ट फ्रॉस्टची “Stopping by woods by snowy evening” या कवितेतील कवितेसह वरील ओळींचा अर्थ सरांनी सांगितला होता. “जीवनरुपी सुंदर जंगलातून प्रवास करतांना मला माझी अनेक कर्तव्ये पार पाडायची आहेत, ध्येये गाठायची आहेत, जीवनाचा हेतू साध्य करायचा आहे अनेक जबाबदा-या आहेत आणि त्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जीवनरुपी मोठे अंतर कापावे लागणारे आहे.” असा या ओळींचा अर्थ. सरांनी त्यांच्या जीवनात अनेक promises keep करून उत्कृष्ट विद्यादानाचे miles to go before sleep करून सर्वांचा निरोप घेतला. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा