Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/१२/२०१८


भाऊंचे घर
आमचे मोठे काका भालचंद्र वरणगांवकर उपाख्य भाऊसाहेब यांच्या बाबतच्या आठवणींना काल लहान बहीण मेघाली कडून चिखली हून बुलडाण्याला आल्यावर उजाळा मिळाला. मी माझी मुले, दोन बहीणी आक्का व दीपाली असे आम्ही बाबाकडे गेलो होतो. संध्याकाळी आम्ही चैतन्यवाडीतील सध्याचे “अव्दैत” नांव असलेल्या त्या वास्तूत प्रवेशीत झालो. फ्रेश झाल्यावर आमच्या भगिनी म्हणाल्या “अरे जुने घर काही आठवतच नाही, बगीचा कुठे होता ?“असे विचारत्या झाल्या.त्या जुन्या घरात बालपणी खूप काळ व्यतीत केल्याने आणि जुन्या घराचे चित्र मनपटलावर अद्याप कायम आहे. आमचे भाऊ काका दारूबंदी अधिकारी असल्याने ते दारूबंदी विषयावर उद्बोधनात्मक चित्रपट जिल्ह्यातील शहरे व खेड्यातून दाखवत असत. त्यांच्याजवळ शासकीय प्रोजेक्टर व तंत्रज्ञ चमू होती. त्या आठवणीने भाऊंच्या घराची माझ्या मनपटलावर कोरलेली चित्रे सुद्धा झर-झर समोर सारकू लागली. मोठे लाकडी फाटक त्यावर कुठलातरी एक वेल, फाटकातून आत शिरल्यावर थोडे समोर गेले की चांगली ऐस-पैस अशी बंगई. आत शिरल्यावर फाटकाच्या एका बाजूस डावीकडे गोठा व सायकल यांची जागा व मोठा बगीचा तर उजवीकडे तीन खोल्यांचे कुडाचे घर.पहील्या खोलीत एक सोफा व जिजी, वैशू ताईचे एक अभ्यासाची पुस्तके ठेवण्याचे हिरवे कपाट. याच खोलीत एक लाकडाचे छानसे शोकेस व त्यामध्ये सर्वांग हलविणारी एक बाहुली. दरवाजा जवळील बटन दाबल्यावर मिठूची बेल टीव टीव करीत असे , या बेल मध्ये खरोखर एक छोटा नकली मिठू होता. आम्हा लहान मुलांना तो मोठा आकर्षित करत असे. आंगणात जमिनी पासून आकाशात गेलेला व ब-हाणपूर केंद्राचे प्रक्षेपण खेचणारा एक भला मोठा अ‍ॅँटेना. घरात एक टीव्ही . मला वाटते “ई सी” कंपनीचा होता तो. मधल्या खोली नंतर छोटेसे स्वयंपाक घर व त्यामागे एक न्हाणीघर त्यामागे नळाचा हौद तिकडून शौचालयाकडे जाणारा रस्ता. शौचालयाकडे एक भले मोठे फणसाचे झाड. आमच्या काकांना झाडांचा मोठी हौस. म्हणूनच त्यांनी विविध प्रकारची झाडे, पँशन फ्रूट सारखा वेल ,बगीच्यात बसण्यासाठी झाडांच्या खोडाचे केलेले स्टूल, गेटच्या जवळच राजा कुत्र्याची जागा व 80 च्या दशकात येणा-या जाणा-यांना आकर्षित करणारा “लव्ह बर्डसचा” भला मोठा पिंजरा. आणि हो बगीच्यात बागडणारे “मिकी” हरीण सुद्धा सर्वांसाठी एक नवलच होते. बागेची मोठ्या हौसेने देखभाल करणारे आमचे काका काकू. त्यांची शिस्त तसेच काकांचे दिलखुलास जोक, त्यावर काकूंचे तोंडाला पदर लावून हसणे, बाबाचे ते मित्रांसोबत रंगपंचमीला रंगून येणे, जिजी,वैशूताई सोबत पाहीलेले चित्रपट, रेखाचा झुठी आम्ही टुरींग टॉकीज मध्ये पहील्याचे अजून आठवते. काकुंचा मी लाडका होतो. आमच्या काकु भाऊ काकांचा मोठा मान ठेवत व त्यांच्या कडे खूप लक्ष देत हे ओळखू येण्यास माझे बालपण आडवे नाही आले. माझ्या डोळ्यांसमोर हे सर्व येत होते आणि मी माझ्या बहीणी आक्का व दीपाली या दोघींना त्याचे वर्णन करीत होतो. आता काही दिवसांपूर्वी सुनील कुलकर्णी या गृहस्थांची औरंगाबादला भेट झाली होती त्यांनी सुद्धा बाबा व भाऊ काकांची आठवण काढली. भाऊ काका बादल्यांनी झाडांना पाणी घालत हे सुद्धा सांगितले जुन्या घराच्या स्मृती सोबत असंख्य आठवणींना सुद्धा उजाळा मिळत होता. बदल हा निसर्गाचा नियम आहे . त्याप्रमाणे हे घर सुद्धा नूतन वास्तूत परीवर्तीत झाले. नवीन घरात सुद्धा भाऊ काका व काकूंनी बराच काळ व्यतीत केला. मी तेंव्हा बुलडाण्यालाच असे अधून-मधून भाऊ काका व काकूंना भेटायला जात असे. उतारवयात सुद्धा भाऊ काका माझ्याकडे 20–25 पाय-या चढून संगणक शिक्षणासाठी काही दीवस आले होते. माझ्या एका व्यवसायात सुद्धा माझा त्यांनी स्थानिक लोकांशी परीचय करून दिला होता. नवीन घरात फिरतांना मी जुन्या घराच्या व बालपणीच्या आठवणीत रमलो होतो. तेवढ्यात मेघाली व नलू वहीनी या दोघींचीही मैत्रीण असलेल्या भाग्यश्रीने आणलेल्या चहाने मी आठवणींच्या त्या जुन्या घरातून नवीन नवीन घरात आलो. चहा घेतला. घरासाठी,मुलांसाठी,बगीच्यासाठी,घरातील प्राण्यांसाठी देह कष्टविलेल्या भाऊ काका व काकूंच्या फोटोकडे नजर गेली. फोटोतील शांत नजर असलेल्या काकू व हसतमुख भाऊ काका यांना नमन करून भाऊंच्या जुन्या घराचा हा यादो का मेला मनात घेऊन मी खामगांवला निघालो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा