Click "Follow" Button below To Follow this Blog

१८/०४/२०१९

Article on a common lady who is working hard since here childhood for her family

"पुष्प”संघर्ष                                                                                         
          1954 या वर्षात दोन भावांच्या पाठीवर तीचा जन्म झाला. दोन्ही भाऊ लहानपणीच वारल्यामुळे आजी-
आजोबा, आई-वडीलांची ती लाडकी झाली.तीचे नामकरण पुष्पा असे झाले. पुष्पा लहानपणापासूनच सहनशील त्यामुळे जास्त लाडाची झाली. बालपणीचा काळ सुखात व्यतीत झाला. जमा खर्चाची कामे करणारे वडील अत्यंत तुटपुंजा कमाईतून घर चालवत असत. त्यात पुष्पाला आता लहान बहीण झाली. तीची प्रकृती नाजूक असल्याने सतत दवाखाना सुरू झाला. पुष्पाचे वडील विश्वनाथ जाधव हे एकटेच कमावते. आई,पत्नी,अपंग बहीण दोन मुली, त्यातील एक सतत आजारी. हे पाहून आत्या व लहानगी पुष्पा सुद्धा वडीलांना हातभार म्हणून कामे करू लागल्या त्यानंतर पुष्पाला दोन भाऊ झाले. खाणा-या तोंडांमध्ये आणखी भर पडली. मग काय लहानग्या पुष्पावर जबाबदा-या येऊ लागल्या. छोटी पुष्पा शाळेतून घरी आली की आत्यासोबत कामावर जात असे.कामे करून,घासलेटच्या दिव्यावर अभ्यास करून पुष्पा वर्गात गुणानुक्रमाने उत्तीर्ण सुद्धा होत होती. लहान मुलीच्या वैद्यकीय खर्चाची निकड पुरी व्हावी म्हणून पुष्पाच्या वडीलांनी हॉटेलचा व्यवसाय थाटून पाहीला.पुष्पा व तिची आत्या हॉटेलवर राबू लागल्या.परंतू त्यामुळे पुष्पाची शाळा मात्र कायमचीच सुटली.नियतीने पुढे काय वाढून ठेवले असते कुणालाच ठाऊक नसते त्याचप्रमाणे सोनाजींचा लहान मुलगा सुद्धा सतत आजारी राहू लागला. आय कमी व व्यय जास्त, वैद्यकीय खर्च अधिक वाढला. नोकरी सोडून हॉटेल सुरू केलेले सोनाजी ठराविक मासिक उत्पन्नासाठी पुन्हा नोकरीकडे वळले.खडतर दिवस सुरू असतांनाच वयाच्या 14 व्या वर्षी पुष्पाचे लग्न झाले.आपला जावाई हा बहीणीकडे राहत असल्याने विश्वनाथरावांनी त्याला नोकरी लावून दिली. पुष्पा, तीचे यजमान व पुष्पाचे माहेरचे आता एकाच गावात म्हणजे खामगाव येथे राहू लागले. पुष्पाचा संसार सुरू झाला. परंतू तेच खडतर आयुष्य कायम होते. बालपणीपासूनच कष्टात दिवस काढण्याची सवय जडलेली पुष्पा पहील्या मुलाच्या वेळी गरोदरपणात सुद्धा कामे करीतच होती किंबहुना परिस्थितीमुळे करावी लागतच होती.एक दिवस मिरच्या कुटणीचे काम आटोपून घरी आल्यावर पहील्या मुलाचा जन्म झाला. कष्टमय जीवनाचा रहाटगाडगा सुरूच होता. पुढे दोन मुले व दोन मुली झाल्या. पतीच्या आजारपणात तर पुष्पाची कठीण परीक्षा ईश्वर घेत होता. रोज 10 किलोच्या पोळ्या,ते झाल्यावर सद-यांना काज-बटन शिवणे,घरची कामे,पतीची सेवा,मुलांची देखभाल सर्व एकाच वेळी पुष्पा तारेवरच्या कसरती प्रमाणे करीत होती. “जीवन कही भी ठहरता नही है“ याप्रमाणे दिवसामागून दिवस जात होते. पुष्पाची दोन्ही मुले कामावर जाऊ लागली, आता तीच्या मोठ्या मुलाचे मुलीचे लग्न झाले.पुष्पा चातकाप्रमाणे चांगल्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होती.तीला चांगल्या दिवसांचे मेघ दाटून आल्याचे दिसत होते परंतू त्यातून सुखाची वर्षा मात्र झालीच नाही. तीच्या पदरात निराशाच आली.पती हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. पुष्पाला खूप आर्थिक भार सोसावा लागला.पुष्पा खचली नाही.दू:ख बाजूला सारून पदर खोचून पुन्हा पुष्पा नियतीला आव्हान देऊन उभी राहीली.लहान मुलगी व मुलाचे लग्न केले. दैव मात्र पुष्पाची किती परीक्षा घेणार होते कुणास ठाऊक.एक दिवस एका अपघातात पुष्पाच्या मुलाचा करूण अंत झाला.काही महीन्यांनी एका अपघातात लहान जावई वारले.दोन्ही तरुण माणसे गेल्यावर छातीवर दगड ठेवत पुष्पा पुन्हा सावरली.“आग मे जलके भी जो निखरे है वही सच्चा सोना” याप्रमाणे ही “सोनाजी” यांची पत्नी पुष्पा अनेक संकटरूपी आगेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा संकटांचा सामना करण्यास सज्ज होतच होती. मुलाच्या मुली व मुलीच्या मुली म्हणजे आपल्या गुणी,हुशार नातींसाठी पुष्पाला पुन्हा सज्ज होणेच होते. परीवारासाठी लहानपणापासून परीस्थितीशी संघर्ष करीत असलेली पुष्पा आजही वयाच्या 64 व्या वर्षी मुलीच्या मुलाच्या संसारात आर्थिक हातभार लागावा,नातींचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून अनेक संकटे झेलून,कठीण परीस्थितीशी लढा देत आपले पुष्पा हे नाव सार्थ करीत पुष्पा सोनाजी भारंबे या खंबीर स्त्रीचा हा रुक्ष जमिनीत कमी पाण्यातही फुलणा-या या “पुष्पाचा” जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे.                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा