JNU ची 50 वर्षे
सध्या भारतात एक नाव विशेष म्हणजे एका शैक्षणिक संस्थेचे नाव सतत चर्चेत आहे. “भारत तेरे तुकडे होंगे” , “लेकर
रहेंगे आझादी” अशा ना-यांचा आधारे या संस्थेचा कन्हैय्या कुमार नामक
विद्यार्थ्याचा सुद्धा राजकीय पटलावर उदय झाला. ती शैक्षणिक संस्था म्हणजे “जे एन
यु” अर्थात जवाहरलाल नेहरु युनिव्हरसिटी. परवा या ठिकाणी विद्यार्थ्यांवर कुण्या बुरखाधारी युवकांनी हल्ला केला. भारतीय संसदेने मंजूर केलेला नागरिकता संशोधन कायदा अर्थात CAA या कायद्याच्या विरोधात या विद्यापीठाचे विद्यार्थी
रस्त्यावर उतरले. समाजवाद, सेक्युलॅरीझमच्या नावाआड येथे सतत राष्ट्रविरोधी नारे,
आंदोलने सुरु असतात. या आंदोलनांना मोठा इतिहास सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्यांना
त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आशेने शिक्षणासाठी म्हणून पाठवले असते असे येथील
काही विद्यार्थी स्वत:चा अभ्यास, करीअर याकडे पूर्णत: लक्ष देण्याऐवजी राजकीय बाबींकडेच
अधिक लक्ष देत असतात. ते कुणाच्या हातातील बाहुले बनले आहेत, त्यांना कुठून फंडिंग
होते हे प्रकाशझोतात येणे अत्यंत गरजेचे
झाले आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हरसिटीचे विधेयक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले व 1965 मध्ये शिक्षण मंत्री असलेल्या एम. सी. छागला यांनी लोकसभेत मांडले. लोकसभेने 1966 या वर्षी बील मंजूर केले व 1969 या वर्षी कायदा संमत करून JNU स्थापन झाले. JNU विधेयक सादर करणारे हे छागला महोदय जिनांचे अनुयायी व मुस्लिम लीगचे सदस्य होते, यांनी जिनांच्या हाताखाली 7 वर्षे पर्यंत कार्य केले होते. पाकिस्तानची मागणी करणा-या जिनांच्या हाताखाली कार्य करणा-या छागलांनी नंतर स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला होता. डॉ आंबेडकर यांच्या सोबत कार्य केल्यानंतर व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाल्यावर त्यांनी भारतीय स्वतंत्रता आंदोलनाला सहकार्य केले. परंतू पूर्वी जिनांची विचारसरणी मानणा-या छागला यांनी JNU विधेयक मांडले यात बरेच काही स्पष्ट होते. 1969 मध्ये स्थापना झालेले JNU आता 50 वर्षाचे झाले. एखाद्या मनुष्याने जर वयाची चाळीशी पार केली की त्याच्यामध्ये, त्याच्या विचारामध्ये एक प्रगल्भता येते, maturity येते आणि त्याची इतरजणांशी जी वागणूक असते त्यामध्ये मोठा बदल आपसूकच होत असतो. परंतू JNU ही एक शैक्षणिक संस्था आहे. जरी शैक्षणिक संस्था असली तरी ती देशातील इतर विद्यापीठाप्रमाणे प्रगल्भ झालेली का दिसत नाही? या व यासम इतर AMU,JMU सारख्या विद्यापीठातच फुटीरतावादी विचार कसे रोवले जात आहेत? JNU या शैक्षणिक संस्थेतून अनेक चांगले, देशाभिमानी नागरिक तयार झाले आहेत परंतू त्यांच्या स्टोरी माध्यमे दाखवत नाही. JNU शी संलग्नीत असलेल्या NDA या संरक्षण प्रबोधिनी मधून सुद्धा अनेक देशप्रेमी , देशासाठी सर्वस्व त्याग करणारे सैन्याधिकारी निर्माण झाले आहेत परंतू त्यांच्यावर सुद्धा प्रकाशझोत टाकला जात नाही. दाखवली जातात फक्त या डाव्यांचा प्रभाव असलेल्या विद्यार्थ्यांची आंदोलने. सतत त्यांचा भडीमार दुरचित्रवृत्तवाहिन्यांवर असतो व त्यामुळे या तथाकथित , वयाने फार मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकच चेव येतो. वास्तविक पाहता हे विद्यार्थी,फिल्मवाले, पुरस्कार वापसीवाले, आहेत तरी किती? उणेपुरे 5 टक्केही नसतील.परंतू यांना वारंवार दाखवून भारत अस्थिर असल्याचे चित्र आपल्याच वृत्त वाहिन्या का दाखवतात? आपलीच माध्यमे अशी आहेत म्हणून न्युयॉर्क,लंडन येथील माध्यमे सुद्धा आपल्या देशाची प्रतिमा खराब होईल अशी वृत्ते छापतात. डाव्यांच्या विचाराने प्रभावीत असलेले JNU सतत वादात असते. सन 2000 मध्ये इंडो-पाक मुशायरा च्या वेळी झालेला वाद, सर्वोच्च न्यायालयाने सन 2008 मध्ये येथील निवडणुकांवर स्थगिती दिली होती, 2010 मध्ये दांतेवाडा येथे नक्षल्यांनी CRPF जवानांना मारल्यावर AISA या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. 2018 मध्ये JNU च्या 100 मीटर परिसरात
आंदोलन करता येणार नाही असा दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. हे असे कितीतरी दाखले देता येतील. परवा JNU मध्ये बुरखे घालून झालेला हल्ला, दीपिका पदुकोणची मूक हजेरी. हे प्रकार व त्यामुळे वाद हे येथे सुरूच असते. JNU ला आता 50 वर्षे झाली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांच्या अभ्यासाकडे , त्यांच्या ध्येयपुर्तीकडे वाटचाल करायला हवी. कन्हैय्या सारख्या तसेच कश्यप, भारव्दाज, अख्तर, दीपिका या असल्या फिल्मी, प्रसिद्धी पिपासू, तथाकथित बुद्धीवादी, शत्रू धार्जिण्या लोकांपासून दूर राहून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी,आपली पदवी,पदव्युत्तर शिक्षण ,आचार्य पदवी पूर्ण करून त्याचा उपयोग देशसेवेसाठी करावा हे विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांना, शिक्षकांना, देशाला अपेक्षित आहे.भारताची ओळख जगाला करून देणा-या स्वामी विवेकानंद यांच्या देशात आपण राहतो हे ध्यानात ठेऊन JNU व भारतातील सर्वच शिक्षण संस्थांंनी राजकारण बाजूला सारून त्यांच्या संस्थांमधून स्वामी विवेकानंद यांचे “Man Making Education” अर्थात मनुष्य निर्माण करणारे शिक्षण कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवे.तसेच JNU प्रशासनाने सुद्धा 50 वर्षपूर्तीच्या अनुषंगाने सारासार विचार करून संस्था राजकारणापासून कशी दूर राहील यावर चिंतन करावे.
Khup Mahtvachi Mahiti Dili ahe Vinayji
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा