Click "Follow" Button below To Follow this Blog

०२/०१/२०२०

Article on the Maharashtra cabinet expansion and disappointed Shivsena MLAs

नाराज मावळ्यांचा मुख्यमंत्री 

   शिवसेना नेहमीच शिवाजी महाराजांची महती सांगत असते. शिवाजी महाराज म्हणजे शिवसेनेंचे आदर्श. त्या अनुषंगाने मग शिवसेनेची भाषा , वागणूक सुद्धा तशीच असते. बाळासाहेबांचे सिंहासन , मातोश्री हा शब्द हे त्याचे दाखले देता येतील .आणखी असे बरेच काही शिवसेनेमध्ये व त्यांच्या नेत्यांचा वागणूकीतून दिसून येत असते. त्याअर्थी शिवसेनेचे आमदार म्हणजे शिवसेनेचे मावळेच म्हणता येतील. उद्धव ठाकरे टोकाची विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांशी बाळासाहेबांना दिलेल्या शब्दासाठी राजकीय निवडणुकीत्तोर युती करूनस्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले व ज्या घराणेशाहीवर बाळासाहेबांनी नेहमीच टीका केली ते विसरून आपल्या पुत्रास सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिले. आदित्यला दिलेले कॅबिनेट मंत्रीपद , शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास दिलेली मंत्रीपदांची संख्या ही शिवसेनेच्या मंत्रीपदांपेक्षा अधिक आहे. यांमुळे शिवसेनेत नाराजी पसरलेली आहे. इतर पक्षांत सुद्धा खात्यांवरून नाराजी आहेच. सदैव तो-यात वावरणारे “हेडमास्तर” संजय राऊत भावाला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज आहे. भास्कर जाधव, रामदास कदम, प्रताप सरनाईक , संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याने भावना गवळी, वरिष्ठ नेते दिवाकर रावते , सुनील राऊत, दीपक केसरकर असे अनेक मावळे नाराज आहेत. हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांना आता भेटतीलच तेंव्हा उद्धव यांना या नाराज
मावळ्यांची समजूत काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. तिकडे काँग्रेस चे “आदर्श” नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मंत्रीपदी वर्णी लागलेले सर्व दिल्लीच्या “मातोश्री” कडे खातेवाटपाबाबत भेटून आले. दिल्लीच्या मातोश्रींनी “बाबांना” थांबण्यास सांगितले आहे. माजी मुख्यमंत्र्यांना आता उद्धव यांच्या नेतृत्वाखाली कार्य करावे लागणार आहे. तीन-तीन दिवस बैठका होऊनही खातेपावाटप होऊ शकलेले नाही. काँग्रेस नेते महत्वाच्या खात्यांबाबत आग्रही असल्याने तुटेपर्यंत ताणू नका असा सल्ला अजित पवार यांनी त्यांना दिला आहे. अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते देण्यास त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांचा विरोध आहे. सुनील राऊत यांच्या बांधकाम खात्यावर सुद्धा काही टपून बसले आहेत. अशी नाराज, असंतुष्टांची यादी वाढतीच आहे. तरुंगातून वापसी झालेले व सध्या प्रकृती एकदम ठणठणीत असलेले छगन भुजबळ कोणतेही खाते मिळाले तरी चालेल असे म्हणत आहेत. पण काही ना काही हवेच ही त्यांची वृत्ती त्यांच्या मागणीतून दिसून येत आहे. जनतेच्या मनातील नसलेले व सत्तेसाठी विचारसरणी दूर सारलेल्या पक्षांचे हे अभद्र आघाडीचे सरकार कसेतरी दिवस काढणार आहे असे स्वत: जयंत पाटील म्हणतात. पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की “असेच थोडे-थोडे दिवस पूर्ण करून आम्ही पाच वर्ष पूर्ण करू”. पाटील साहेब याचा अर्थ तुमचे सरकार हे दिवस काढू सरकार असणार. तुमच्या कार्यकाळात राज्याचा विकास वेग धरेल अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. मोदी सरकारला “अफझल खानाची फौज” असे म्हणणारे उद्धव ठाकरे शिवसेनेची, बाळासाहेबांची सर्व जुनी तत्वे बासनात गुंडाळून मातोश्री वरील माळोच्यावर ठेऊन आता वर्षावर दाखल झाले आहे. त्यांना दंगेखोरांना रोखण्यासाठी केलेली कारवाई जालियानवाला बाग हत्याकांडासारखी वाटते, याकुब मेमनची फाशी रोखावी यासाठी  केलेल्या अर्जावर सही करणारे अस्लम शेख यांना ते मंत्री मंडळात घेतात , पूर्वी बाळासाहेबांना अटक करण्यास सरसावलेल्या नेत्यास सुद्धा त्यांनी मंत्री मंडळात घेतले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेत नाराजी आहे आणि उद्धव ठाकरे या शिवसनेसाठी झटलेल्या , शिवसेना वाढविलेल्या शिवसैनिकांना , शिवसेनेच्या या मावळ्यांना दूर सारून नाराज मावळ्यांचे मुख्यमंत्री बनले आहेत. आपल्या मावळ्यांना नाराज करून याकुब मेमनच्या पाठीराख्यास मंत्रीपद देणारा असा शिवसैनिक मुख्यमंत्री हा बाळासाहेबांना कदापी आवडला नसता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा