Click "Follow" Button below To Follow this Blog

२७/०२/२०२०

Article about Delhi violence and current position of nation

... जगाना देश है अपना |
देश सध्या ज्या परीस्थितीतून  जात आहे ते अत्यंत
भीषण आहे. कित्येक दिवसांपासून रस्ता रोखून सुरु असलेले शाहीनबाग आंदोलन , CAA  वरून झालेली हिंसा , तोडफोड , सार्वजनिक संपत्तीचे केलेले नुकसान , काल इशान्य दिल्लीत झालेला हिंसाचार , निमसैनिकांवरचा अॅसिड हल्ला, 180 पेक्षा जास्त लोक जखमी झाले त्यात कितीतरी जवान आहेत. अशा हिंसा करणा-यांवर पोलिसांनी गोळीबार,  लाठीमार केला की मानवाधिकारवाले , सेक्युलॅरीझमची री ओढणारे  , मेणबत्ती गँगवाले धावत येतात परंतू निरपराध नागरिक मारले गेले , सुरक्षा जवान किंवा अधिकारी या हिंसेत जायबंदी झाले अथवा हुतात्मा झाले तेंव्हा हीच मंडळी कोणत्या कोप-यात जाऊन मूग गिळून बसलेली असते ? हे सर्व देशाच्या आगामी परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. ईशान्य दिल्लीतील कुणीही वास्तव्य करीत नसलेल्या इमारतीत कुठून आला एवढा दगडांचा साठा ? कुठून आले एवढे पेट्रोल बॉम्ब ? दिल्ली पोलीस काय करीत होते ? इमारतीच्या छतावर एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्लेखोर जमा झाले तरी त्याची खबर पोलिसांपर्यंत कशी गेली नाही ? अंकित शर्मा नावाचा एक अधिकारी हरवल्याची तक्रार त्याचे कुटुंबीय करतात व त्याचे प्रेत नंतर नाल्यात सापडते ! किती आश्चर्यकारक व धक्कादायक आहे. या देशात सुरक्षा अधिका-याची ही अवस्था होते तर  तर सामान्य नागरिकाने कुणाकडे पहावे ? “घरसे निकलना होगा” , “आर या पार करना होगा” अशी चिथावणीखोर वक्तव्ये काँग्रेसचे वरीष्ठ नेते मंडळी सर्रास करतात, व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेत वारीस पठाण "भारी पडेंगे" सारखी  हमरीतुमरीची भाषा करण्याची हिम्मत करतो. कुठून येतो एवढा जोर? शेजारी देशांंच्या भरवस्यावर ? 
कालच्या हिंसाचारात  आम आदमी पार्टीच्या ताहीर हुसैन या नेत्याचे नाव समोर येत आहे. चित्रफितीत तो दिसतो सुद्धा आहे. त्यावर त्याला विचारणा केली असता तो दंगेखोरांना रोखण्यासाठी गेलो होतो अशी थाप मारत आहे.   ही अशी आहे का "आम" आदमी पार्टी?  पोलिसांवर गोळी झाडणारा शाहरुख कुठे फरार झाला कुणास ठाऊक ?  आता गरज आहे ती कठोर होण्याची अन्यथा हे माथेफिरू हिंसाचारी आणखी धजावतील . पोलिसांनी, सुरक्षा यंत्रणांनी काही ठराविक कालांतराने संशयित परिसराची , त्यांच्या घरांची झडती घेणे अनिवार्य व्हावे. एका इमारतीत एवढा शस्त्रसाठा टर अन्य घरांत सुद्धा तो आणखी मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंसाचारी , दंगेखोर यांना अशा शिक्षा व्हाव्यात जेणे करून इतरांची हातात दगड, पेट्रोल बॉम्ब , बंदूक घेण्याची हिम्मत सुद्धा न व्हावी. सर्वच राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण न पाहता देशहित पाहून याबाबत एकत्र बसून चर्चा करणे त्या चर्चेतून सहमतीने देशहिताचा निर्णय घेणे आता अत्यावश्यकच झाले आहे. नागरीकांनी सुद्धा जागरूक राहून कुठे काही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पोलिसांना देणे सुद्धा आता अत्यावश्यक आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे हे चित्र भयावह आहे, देशाला जाणून बुजून अराजकतेच्या खाईत लोटून येत्या काळात सत्ताप्राप्तीचा मार्ग बनवला जाण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी देशात घुसलेल्या घुसखोरांना सुद्धा हाताशी घेतले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सत्ताप्राप्तीसाठी नीच प्रयत्न करणारे भ्रष्ट, भ्रष्ट नोकरशाही, शेकडो "जयचंद" ही अशी मंडळी या देशात आहे. या देशाला अधिक सुंदर, सक्षम, विकसित, सुरक्षित बनवायचे असेल तर येथील प्रत्येकास जागे व्हावे लागेल, आप आपल्यापरीने कार्य करावे लागेल. आगामी काळात अतिरेकी हल्ले न होता दिल्लीत जसे झाले तसे हल्ले  गल्ली गल्लीत सुद्धा होऊ शकतात. जर उद्या देशातील गल्ली गल्लीत आपल्याच देशातील हल्लेखोरांनी असे हल्ले करतील तेंव्हा काय कराल ? असे न होण्यासाठी सर्वानीच खडबडून जागे होण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. केवळ जागे होऊन सुद्धा चालणार नाही तर आपल्याला आपल्यातील मतभेद सुद्धा दूर करावे लागतील व राष्ट्राची शक्ती वाढण्यासाठी एकत्र यावे लागेल.
"स्वयं अब जाग कर हमको, जगाना देश है अपना"
याप्रमाणे देशाला जागृत करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.कारण
समय है अब नहीं कोई गहन निद्रा में सोने का
समय है एक होने का न मतभेदों में खोने का
बढ़े बल राष्ट्र का जिससे वो करना मेल है अपना 
जगाना देश है अपना जगाना देश है अपना

२०/०२/२०२०

Veer Savarkar again targeted in the magazine 'Shidori'

व्देषाची शिदोरी
शिदोरी म्हटले की एका स्वच्छ कपड्यात आपल्या धन्यासाठी त्याच्या कारभारीणने प्रेमाने बनवलेली रुचकर अशी भाकरी , झुणका , ठेचा, व सोबतीला कांदा असे दृश्य डोळ्यासमोर येते. शिदोरी हा शब्द जरी खाण्यासंबंधी असला तरी मुंबईतील एका मासिकाने शिदोरी हा शब्द त्यांच्या मासिकातील तथाकथीत विचारांकरीता वापरला आहे. त्यांच्या वाचकांसाठी या मासिकाव्दारे वैचारीक शिदोरी मिळेल असे त्यांना अभिप्रेत असावे. म्हणून मासिक प्रकाशित करणा-यांचे विचार हे जनसामान्यांपर्यन्त पोहचावेत म्हणून “जनसामान्यांची शिदोरी” असे या  मासिकाचे नामकरण त्यांनी केले आहे. राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याने हे मासिक ज्या जनसामान्यांच्या विचारांसाठी काढले त्यांना मात्र फारच कमी प्रमाणात ठाऊक आहे. मागील आठवड्यात मात्र हे मासिक एका वृत्तामुळे जनसामान्यांना ज्ञात झाले. हे वृत्त होते त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रकाशित केलेल्या लेखांमुळे. 'स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर'  व 'अंधारातील सावकर' असे ते दोन लेख आहेत. सावरकर माफीवीर वगैरे असा काही आशय असलेले ते दोन लेख “द वीक” आणि इतर आणखी एक मासिक यांचा आधार घेऊन छापलेले आहेत. सावरकरांवर या लेखांत काय लिहिलेले आहे याची पुनरोक्ती सुद्धा येथे कराववीसी सुद्धा वाटत नाही इतके ते खालच्या स्तरावरचे व निराधार असे विचार आहेत. हे मासिक प्रकाशन करणारे व संपादक मंडळ हे सुज्ञच असतील ही अपेक्षा. परंतू त्यांची सुज्ञता ते व्देषमूलक विचार पसरविण्यात खर्ची घालत आहेत. हल्ली जो उठला तो सावरकर यांच्या विरोधात गरळ ओकतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर वगैरे म्हणून त्यांची निर्भत्सना करणा-या कंपूला जनता चांगलीच ओळखून आहे त्या कंपूची बौद्धिक कुवत सुद्धा चांगलीच ठाऊक आहे व वेळोवेळी ती प्रकट सुद्धा होत असते. सावरकर हे कसे होते , त्यांची जाज्वल्य देशभक्ती , त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग, त्यांची साहित्य संपदा , चीनचा संभाव्य हल्ला ओळखण्यासारखी त्यांची दूरदृष्टी इ. गुण या कंपूच्या एकाही नेत्याकडे नव्हते आणि यांच्या सद्यस्थितीतील नेत्यात तर नाहीच नाही. मग करणार 

तरी काय ? तर दे सावरकरांना  शिव्या ,कर त्यांचा अपमान , पूसा त्यांच्या काव्यपंक्ती , शाळा , कार्यालयातून काढ त्यांचे फोटो , पाठयक्रमात लिह त्यांच्या विरोधात काही. असे उपद्व्याप हा कंपू करीत असतो. यांच्या हे सुद्धा लक्षात येत नाही की हे असे केल्याने आपण आपल्याच पायावर कु-हाड मारून घेत आहोत. आज या कंपूची दयनीय परीस्थिती उभा भारत पाहत आहे तरीही यांना अद्यापही निव्वळ आणि निव्वळ सावरकरच दिसतात. ज्याप्रमाणे स्वराज्याच्या शत्रूच्या घोड्यांना पाण्यात संताजी , धनाजी दिसत त्याचप्रमाणे या कंपूला आजही जळी , स्थळी ,काष्ठी, पाषाणी स्वातंत्र्यवीर सावरकरच दिसतात. म्हणून हे अशी व्देष भावना ठेवतात व ती प्रसारीत करतात. वास्तविक पाहता वर्तमानपत्रे, मासिके यांनी सकारात्मक अशा बाबी छापणे अपेक्षित असते. हे जनसामान्यांची शिदोरी या मासिकाच्या ज्ञानी, अभ्यासू संपादकांना कळत नाही का? ते तरी काय करणार म्हणा त्यांच्या हाय कमांडची खप्पामर्जी कोण ओढवून घेणार ?   या देशातील जनतेला  इतिहास चांगला ठाऊक आहे तुम्ही जनसामान्यांची म्हणून जी द्वेषाची शिदोरी त्यांना  देण्याचा प्रयत्न  करीत आहात ती    सावरकर द्वेषाची शिदोरी त्यांना नको. ती देण्याचा तुम्ही जेवढा प्रयत्न कराल तेवढे तुम्ही खोलात जाल शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणा-यांना व आता मूग गिळून बसणा-यांना सुद्धा आगामी काळात सावरकरांचा हा अपमान मूकपणे बघत बसल्याने चांगलेच महाग पडेल हे लक्षात घ्या.

१२/०२/२०२०

Article about love and old movie Sarswatichandra song, on the occasion of Valentine Day

प्यारसे भी जरुरी कई काम है
उद्या व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्यांच्या संस्कृतीतून आपल्या भारतीय संस्कृतीत आलेला हा दिवस. या दिवसाच्या आगे मागेही अनेक दिवस येतात आणि जातात आणि मग आज प्रेम आणि उद्या ब्रेकअप सुद्धा होते. प्रेम , प्रेमाची भावना भारतीय संस्कृतीत जेवढी उदात्त आहे तशी ती इतर देशात नाहीच. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या आपल्या भारत देशात प्रेम कसे असावे हे अनेक कथा, सत्यकथेतून प्रकट झाले आहे. 
“एक राधा एक मीरा , 
दोनो ने कृष्ण को चाहा
अंतर क्या दोनो की चाहमे बोलो
एक प्रेम दिवानी , एक दरस दिवानी”
याप्रमाणे कृष्णावर प्रेम करणा-या राधा व मीरा. असे प्रेमाबाबतचे कितीतरी दाखले या देशात मिळतात. दुष्यंत-शकुंतला, सोहनी-महिवाल, हिर–रांझा या प्रेमी युगलांच्या अजरामर प्रेमाच्या कथा सुद्धा आहेतच. परंतू या उदात्त, निसिम्म प्रेमाची, प्रेमातील त्यागाची संस्कृती असलेल्या या भारत देशात हल्ली मात्र प्रेम तेवढे पवित्र आहे की नाही हे सांगता येणे कठीण आहे. मुलींवर होणारे हल्ले, प्रेमविवाह करूनही अल्पावधीत होणारे घटस्फोट हे काय दर्शवतात. जीच्यावर प्रेम आहे तिच्यावरच तो हल्ला करतो. तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याचे आप्तस्वकीय तिला नकोसे वाटतात.
प्रेमाच्या बाबतीत बोलायचे, लिहायचे म्हटले तर तो अनंत असा विषय आहे. जगात प्रेमच सर्व काही आहे काय ? हा सुद्धा एक प्रश्न आहे. "मै तो भूल चली बाबूल का देश", " चंदनसा बदन" अशी एकापेक्षा एक सरस गीते असणा-या सरस्वतीचंद्र या जुन्या चित्रपटात  “छोडदे सारी दुनिया किसीके लिये” हे सुद्धा एक जीवनात केवळ प्रेम हेच काही जरूरी नाही हे सांगणारे सुंदर गीत आहे. हे गीत हाच प्रश्न अधोरेखित करते. आजच्या पिढीला, त्यातही विकृत मानसिकता असलेल्या तरुणांना प्रेम हेच सर्वात जास्त जरुरी वाटत आहे आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ पहात आहेत. परंतू या जगात प्रेमापेक्षाही खूप जरुरीची अशी कार्ये असतात. सरस्वतीचंद्र चित्रपटातील नायिकेला, नुतनला तिच्या इच्छित  तरूणासह विवाह करता येत नाही आणि म्हणून तो तरुण व्यथीत होऊन हे जग सोडून जाण्याचे ठरवतो या पार्श्वभूमीवर “छोड दे सारी दुनिया किसी के लिये, ये मुनासिब नही आदमीके लिये” हे सुंदर, श्रवणीय, एखाद्याला मरणाच्या वाटेपासून दूर नेण्यास प्रवृत्त करणारे गीत लताच्या आवाजात अभिनेत्री नुतन गाते आणि रसिकांना प्रेमाचा नवीन अर्थ, प्रेम कसे असावे  हे अधिक चांगल्याप्रकारे कळते.
“कहां चला ऐ मेरे जोगी, जीवनसे तू भागके ,
किसी एक दिलके कारण ये दुनिया त्यागके
या गीताच्या आरंभीच गीताचा आशय कळतो. प्रेमाचे तत्वज्ञान प्रकट करतांना गीतकार इंदिवरने खूप सुंदर शब्दांची गुंफण केली आहे.
खुशबू आती रही दूरहीसे तो क्या, सामने हो चमन कोई कम तो नही
एक दुनिया उजडही गयी है तो क्या , दुसरा तुम जहां क्यूं बसाते नही
या ओळींतून प्रेमभंग झाल्यावरही नायिका आपल्या नायकास जीवन जगण्याची प्रेरणा देऊन जाते. “तनसे तनका मिलन हो ना पाया तो क्या  मनसे मन का मिलन कोई कम तो नही” यातून निर्मळ, उदात्त प्रेमाची भावना गीतकार व्यक्त करतो. परंतू आता असे प्रेम आहे का ? खरोखरच्या जीवनातील त्यातही हल्लीच्या पिढीतील नायक, नायिका यांची प्रेम भावना अशीच असते का ? आता प्रेमप्राप्ती झाली नाही तर अतिशय टोकाची भूमिका घेऊन स्वत:चे व दुस-याचे जीवन उध्वस्त करणा-या तरुण पीढीने व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेम निट समजून घ्यावे , वाचन करावे, जुनी आशयघन अशी गाणी , कविता वाचाव्यात . जीवनात प्रेम हेच काही फक्त एकमेव कार्य नाही तर "प्यारसे भी जरुरी कई काम है" याबाबत जरूर विचार करावा.
गाणे नक्की ऐका ->
https://www.youtube.com/watch?v=FFW6dBHPcTo&list=RDFFW6dBHPcTo&start_radio=1  

१०/०२/२०२०

Article on the occasion of Valentine Day with memories of Vasu-Sapna's "Ek Duje Ke liye" Movie,

वासू - सपना 
     आता पन्नाशीच्या घरात असलेल्या सर्वांनाच वासू-सपना वाचताच 80 च्या दशकात झळकलेला कमल हासन व सुंदर रती अग्निहोत्री यांचा “एक दुजे के लिये” हा चित्रपट झरकन डोळ्यांसमोर तरळून गेला  असेल.  आम्ही त्यावेळी अगदीच शाळकरी. हायस्कूल मध्ये प्रवेशित झाल्यावर सिंधी गल्लीतून आमच्या शाळेच्या बाजूने विद्युत विभागाच्या कार्यालया समोरून येणारा जो रस्ता आहे त्या बाजूने वर्ग खोल्यांची मागील बाजू आहे. यातील एका वर्गाच्या मागच्या बाजूस “वासू-सपना” अशी काळ्या अक्षरात लिहिलेली नांवे आम्हाला दिसत. कारण बरेचदा तेथून येणे-जाणे होत असे. कोळशाने लिहिलेली ती नांवे त्या भिंतीवर कितीतरी वर्षे तशीच होती. अनेकांच्या हे स्मरणात असेल. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा तो प्रताप असावा. कारण त्यावेळी त्या वर्गांत कनिष्ठ महाविद्यालयाची मुले बसत. येता-जाता ती नांवे सहज दृष्टीस पडत. परंतू हे वासू-सपना काय आहे? ते का लिहिलेले आहे हे मात्र काही कळत नसे. पुढे कधी तरी “एक दुजे के लिये” हा गाजलेला, दु:खद प्रेमकथा असलेला चित्रपट पाहण्यात आला. त्यावेळी गोव्याच्या समुद्र किना-यावर चित्रित झालेल्या या चित्रपटात नायक-नायिकांनी आपली नांवे किना-यावरील एका मोठ्या शिळेवर लिहिलेली दाखवली आहेत. ते दृश्य दिसले आणि आमच्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेल्या त्या वासू-सपना नावांची लिंक लागली. 1981 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप गाजला होता. स्वातंत्रोत्तर काळात झालेली भाषावार प्रांतरचना ही अनेक भारतीयांना रुचली नव्हती. भाषांमुळे राज्या-राज्यात तेढ निर्माण होईल असे अनेकांचे भाकीत होते. बेळगांव प्रश्न आजही सुटलेला नाही. इतरही काही राज्यात असे प्रश्न आहेतच. या प्रेमकथेला दिग्दर्शकाने याच भाषावादाची जोड दिली आहे. हिंदी भाषिक व तमिळ भाषिक कुटुंब गोव्यात एकमेकांचे शेजारी असतात. त्यांच्यात मतभेद असतात. त्यातच तमिळ भाषिक नायक “वासू” व हिंदी भाषिक नायिका “सपना” यांच्यात अनुराग निर्माण होतो. दोघांच्याही कुटुंबियांना हे पटत नाही. परंतू वासू-सपना मात्र ठाम असतात. प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना एक वर्ष विभक्त राहण्याची अट घातली जाते. या अटी मागे ती दोघे 
एका वर्षात प्रेम वगैरे सारं विसरून जातील हा हेतू असतो. अशा अटी वगैरै आताची शिघ्रकोपी पिढी स्विकारून प्रेमासाठी त्या पुर्ण करू शकतील का ? चित्रपटात वासू-सपना काही अपरीहार्य परीस्थितीत आत्महत्या करतात. त्यांच्या आत्महत्येचे कारण ते दोघेही अत्याचारामुळे मरणासन्न झालेले असतात हे असते, प्रेमातील अपयश नव्हे. हे येथे नमूद करणे जरूरी आहे कारण सद्यस्थितीत प्रेमात अपयश आल्याने काही विकृत कोणत्या थराला जात आहेत हे आपण पहातच आहोत.  
वासू-सपनाच्या एक दुजे के लिये या सुपरहिट चित्रपटाची प्रेमकथा ही अशी होती. “जिसने हमे मिलाया, जिसने जुदा किया उस वक्त, उस घडी, उस डगर को सलाम“ अशी लता व एस.पी बालसुब्रमण्यमच्या आवाजातील सुमधुर गीते आणि संगीत अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे. उद्या "व्हॅलेंटाईन डे" वासू-सपनाचे स्मरण झाले. प्रत्येक पिढीत वासू-सपना असतातच. परंतू आता किती बदल झाला आहे. प्रेमासाठी, प्रेम सिद्ध करण्यासाठी परीक्षा देणारे वासू-सपना या पिढीत आहेत का ? प्रेमाला नकार दिला तर अ‍ॅसिड हल्ला करणारे, हिंगणघाटच्या विकेश नगराळे सारखे पेट्रोल टाकून जाळणारे विकृत तरूण, चाकू हल्ला करणारे यांचे प्रेम खरेच प्रेम आहे का ? जिच्याप्रती तुमच्या मनात हळुवार अनुरागाची भावना आहे तीच्यावर अ‍ॅसिड, पेट्रोल टाकले तरी कसे जाते ? “हमे प्यार निभाना आता है” अशा भारतासारख्या देशात प्रेम दिवस साजरा करण्यासाठी एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज आहे का ? मीरा, राधाच्या देशातील आपल्या तरुणांना प्रेम काय हे कळलेच नाही का? आज मुलांना सुद्धा धडे देण्याची, संस्कारांची गरज आहे. प्रेम यशस्वी होत नसेल तर त्या प्रेमाला
वो अफसाना जिसे अंजाम तक
लाना ना हो मुमकिन , उसे एक
खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा
या वरील ओळींसारखी उदात्त प्रेमाची भावना आता जणू लोपच पावली. अ‍ॅसिड हल्ले करणा-या या तरुणांना त्यांच्या प्रेमाला “तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी नही“ अशा शाहरुख टाईप प्रेमाला एक चांगला “खुबसुरत मोड” नाही का देता येणार का ? व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर तरुणांनी प्रेमाबाबत चिंतन करणे जरुरी आहे. प्रेम काय आहे तर “एक अहसास है ये रूह से मह्सुस करो” हे ध्यानात घ्यावे. प्रेमाच्या या जाणीवेला रूह अर्थात आत्म्यापासून जाणायला नको का ? प्रेमप्राप्ती करीता, ते ओरबाडून, हिसकावून घेण्याच्या विकृतीतून हल्ले करण्याऐवजी. प्रेमासाठी वासू-सपना सारखी परीक्षा द्यावी. जर प्रेमाला “अंजाम तक”  नेणे शक्य नसेल तर निदान त्याला “खुबसुरत मोड” तरी तरुणांनी द्यावा. हीच व्हॅलेंटाईन डे अनुषंगाने सदिच्छा.

०४/०२/२०२०

Lady Teacher Burnt Alive In Love Affair Case in Hinganghat Dist Wardha , Maharashtra

सुरांना ठेचण्याची वेळ
हिंगणघाट येथील घटनेने मन हेलावून गेले , विषण्ण झाले ,उद्विग्न झाले. एका तरुण शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यासारखे अमानवी कृत्य काल मधील हिंगणघाट मधील अलीपूर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातील एका विक्की/ लिकेश नगराळे नामक विवाहित युवकाने केले. हे असे करवले तरी कसे जाते ? एखाद्या व्यक्तीस इतक्या क्रुर पद्धतीने मारणे ते सुद्धा एका स्त्रीस. काय असते या नगराळे सारख्या, निर्भयावर अत्याचार करणा-या व  ,तेलंगणातील त्या डॉ तरुणींवर बलात्कार करणा-या सारख्या आरोपींच्या मनात ? ही असली कृत्ये करणा-यांना देहांत शिक्षाच व  ती सुद्धा त्वरीत व्हायला पाहिजे. त्यांच्या वयाचा वा इतर कोणताही मुलाहिजा वगैरे न बाळगता शिवाय या अशा आरोपींना पकडल्यावर मानसोपचार तज्ञांकडून तपासणी करून गुन्हा करतेवेळी यांच्या मनाची अवस्था, त्यांना एवढे भीषण कृत्य का करावेसे वाटते ? याचा अभ्यास करून त्या अभ्यासोत्तर इतर तरुणांचे समुपदेशन करणे आता आवश्यक झाले आहे. जेणे करून इतर तरुणांना ही असली कृत्ये करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करता येईल. हिंगणघाट घटनेचे तथ्य अद्याप समोर आले नाही तपासणी अंती ते येईलही. परंतू ज्या स्त्रीवर एखाद्या तरुणाचे प्रेम आहे व तीने त्या तरुणाचे प्रेम नाकारले तर तीचा खून करणे, तीच्या चेह-यावर अॅसिड फेकणे , पेट्रोल फेकून जाळणे हा इतका क्रोध का ? या अशा क्रोधी , निष्ठूर तरुणांची संख्या या भगतसिंग, विवेकानंदांच्या देशात का वाढते आहे? ही घटना तर महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात घडली आहे. ज्या महात्मा गांधीनी अहिंसेचे धडे भारतीयांना शिकवले. त्याच भारतातील तरुण ही असली हिंसाचाराची कृत्ये करतात ! हे कुणाचे अपयश ? सरकार , शिक्षण प्रणाली , राजकारणाचा घसरलेला स्तर , मोबाईल , इंटरनेट माध्यमाने
फोफावलेली वाढती पोर्नोग्राफी, मूल्याधारित शिक्षणाचा अभाव की पालक? काही समजण्याचा मार्ग नाही. पालक मोठ्या अभिमानाने आपल्या पाल्यांना मोबाईल देतात, तो किंवा ती त्यावर काय पहाते काय करते यावर सुद्धा लक्ष नाही. औरंगाबाद येथील एक शिक्षण संस्था विद्यार्थी 
महाविद्यालयात आले की त्यांचे मोबाईल जमा करून घेते व महाविद्यालय सुटले की परत करते या अशा उपाययोजना सर्वानी करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. हिंगणघाट मधील त्या तरुणीची भर रस्त्यात काय अवस्था झाली असेल? तीची वाचा, दृष्टि आता राहण्याची शक्यता कमी आहे. काय मिळाले आता त्या नगराळेला ? त्याला आता आपला कायदा कोणती शिक्षा करेल ? कधी करेल ? कोर्ट , त्या पुढे वरिष्ठ कोर्ट , तारखा , दयेचा अर्ज त्यावर पुन्हा विचार , आरोपी बाबत उपटसुंभ जनतेला .निर्भयाच्या वकीलासारखा आलेला प्रेमाचा उमाळा या प्रक्रियेत कितीतरी वर्षे लोटतील. निर्भयाच्या केस मधील आरोपींना अद्याप फाशी झालीच नाही. क्रूरकर्मा नगराळे बुटीबोरी येथे पकडला गेला. कायद्याच्या लांबलचक प्रक्रियेतून त्याला शिक्षा होण्यास मोठा कालावधी लागेल. पुन्हा प्रत्यक्षदर्शी पुरावा , नगराळे कोर्टात गुन्हा कबूल न करण्याची शक्यता या सर्व बाबी आहेतच. उत्तम , मध्यम आणि अधम व्यक्तींचे त्यांच्या कर्मानुसार असे तीन स्तर असतात. यातील अधम व्यक्तींचा स्तर हाच अधिक मोठ्या प्रमाणात समाजात वाढतो आहे. तसेच दैवी आणि असुरी संपदा  अशा दोन प्रकारच्या व्यक्तींपैकी असुरी संपदेचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हिंगणघाटचा हा राक्षस नगराळे , तेलंगणातील बलात्कारी, निर्भया केस मधील गुन्हेगार, अतिरेकी , नक्षलवादी , अर्बन नक्षलवादी , शिक्षण क्षेत्रातील नक्षलवादी हे सारे असुरी संपदेचेच या अशा असुरांचे निर्दालनच केले पाहिजे , त्यांना ठेचलेच पाहिजे, त्यांना ठेचण्याची वेळ आता आली आहे अन्यथा हे वाढतच राहील. यांना कठोरात कठोर शासन झाले तर असे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही.