असुरांना ठेचण्याची वेळ
हिंगणघाट येथील
घटनेने मन हेलावून गेले , विषण्ण झाले ,उद्विग्न झाले. एका तरुण शिक्षिकेला पेट्रोल
टाकून जाळण्यासारखे अमानवी कृत्य काल मधील हिंगणघाट मधील अलीपूर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातील एका विक्की/ लिकेश नगराळे नामक विवाहित युवकाने केले. हे असे करवले तरी कसे जाते ?
एखाद्या व्यक्तीस इतक्या क्रुर पद्धतीने मारणे ते सुद्धा एका स्त्रीस. काय असते या
नगराळे सारख्या, निर्भयावर अत्याचार करणा-या व ,तेलंगणातील त्या डॉ तरुणींवर बलात्कार करणा-या
सारख्या आरोपींच्या मनात ? ही असली कृत्ये करणा-यांना देहांत शिक्षाच व ती सुद्धा त्वरीत व्हायला पाहिजे. त्यांच्या
वयाचा वा इतर कोणताही मुलाहिजा वगैरे न बाळगता शिवाय या अशा आरोपींना पकडल्यावर
मानसोपचार तज्ञांकडून तपासणी करून गुन्हा करतेवेळी यांच्या मनाची अवस्था, त्यांना एवढे
भीषण कृत्य का करावेसे वाटते ? याचा अभ्यास करून त्या अभ्यासोत्तर इतर तरुणांचे
समुपदेशन करणे आता आवश्यक झाले आहे. जेणे करून इतर तरुणांना ही असली कृत्ये
करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करता येईल. हिंगणघाट घटनेचे तथ्य अद्याप
समोर आले नाही तपासणी अंती ते येईलही. परंतू ज्या स्त्रीवर एखाद्या तरुणाचे प्रेम
आहे व तीने त्या तरुणाचे प्रेम नाकारले तर तीचा खून करणे, तीच्या चेह-यावर अॅसिड
फेकणे , पेट्रोल फेकून जाळणे हा इतका क्रोध का ? या अशा क्रोधी , निष्ठूर तरुणांची
संख्या या भगतसिंग, विवेकानंदांच्या देशात का वाढते आहे? ही घटना तर महात्मा
गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात घडली आहे. ज्या महात्मा
गांधीनी अहिंसेचे धडे भारतीयांना शिकवले. त्याच भारतातील तरुण ही असली हिंसाचाराची
कृत्ये करतात ! हे कुणाचे अपयश ? सरकार , शिक्षण प्रणाली , राजकारणाचा घसरलेला
स्तर , मोबाईल , इंटरनेट माध्यमाने
फोफावलेली वाढती पोर्नोग्राफी, मूल्याधारित
शिक्षणाचा अभाव की पालक? काही समजण्याचा मार्ग नाही. पालक मोठ्या अभिमानाने आपल्या
पाल्यांना मोबाईल देतात, तो किंवा ती त्यावर काय पहाते काय करते यावर सुद्धा लक्ष
नाही. औरंगाबाद येथील एक शिक्षण संस्था विद्यार्थी
महाविद्यालयात आले की त्यांचे
मोबाईल जमा करून घेते व महाविद्यालय
सुटले की परत करते या अशा उपाययोजना सर्वानी करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. हिंगणघाट
मधील त्या तरुणीची भर रस्त्यात काय अवस्था झाली असेल? तीची वाचा, दृष्टि आता राहण्याची
शक्यता कमी आहे. काय मिळाले आता त्या नगराळेला ? त्याला आता आपला कायदा कोणती
शिक्षा करेल ? कधी करेल ? कोर्ट , त्या पुढे वरिष्ठ कोर्ट , तारखा , दयेचा अर्ज
त्यावर पुन्हा विचार , आरोपी बाबत उपटसुंभ जनतेला .निर्भयाच्या वकीलासारखा आलेला
प्रेमाचा उमाळा या प्रक्रियेत कितीतरी वर्षे लोटतील. निर्भयाच्या केस मधील आरोपींना
अद्याप फाशी झालीच नाही. क्रूरकर्मा नगराळे बुटीबोरी येथे पकडला गेला. कायद्याच्या
लांबलचक प्रक्रियेतून त्याला शिक्षा होण्यास मोठा कालावधी लागेल. पुन्हा
प्रत्यक्षदर्शी पुरावा , नगराळे कोर्टात गुन्हा कबूल न करण्याची शक्यता या सर्व
बाबी आहेतच. उत्तम , मध्यम आणि अधम व्यक्तींचे त्यांच्या कर्मानुसार असे तीन स्तर
असतात. यातील अधम व्यक्तींचा स्तर हाच अधिक मोठ्या प्रमाणात समाजात वाढतो आहे. तसेच
दैवी आणि असुरी संपदा अशा दोन प्रकारच्या
व्यक्तींपैकी असुरी संपदेचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हिंगणघाटचा
हा राक्षस नगराळे , तेलंगणातील बलात्कारी, निर्भया केस मधील गुन्हेगार, अतिरेकी ,
नक्षलवादी , अर्बन नक्षलवादी , शिक्षण क्षेत्रातील नक्षलवादी हे सारे असुरी संपदेचेच
या अशा असुरांचे निर्दालनच केले पाहिजे , त्यांना ठेचलेच पाहिजे, त्यांना
ठेचण्याची वेळ आता आली आहे अन्यथा हे वाढतच राहील. यांना कठोरात कठोर शासन झाले तर
असे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा