ये दुनिया है कालाबाजार
रेमडीसीवर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. ग्राहकांना हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून मूळ किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत आहे. या इंजेक्शनची मूळ किमंत ही 1200 रुपये असून ते 4000 पेक्षाही जास्त किमतीत विकल्या जात आहे. हेच इंजेक्शन पिंपरी येथे 11000 रुपयात विकतांना काही जण पकडल्या गेले आहेत. ठाणे येथे सुद्धा काही काळा बाजार करणा-यांना पकडले आहे. देश सध्या भीषण संकटातून जात आहे. राष्ट्रीय आपत्ती आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा हा:हाकार माजला आहे. काल अहमदनगर येथे एकाच वेळेस 42 अंतिम संस्कार करण्यात आले. लोक हवालदिल झाले आहेत. ही अशी स्थिती असूनही या लोकांना स्वत:च्या तुमड्या भरणे सुचते आहे.
आपला देश मोठा अजब देश आहे , राष्ट्रीय सणांच्या दिनी येथे राष्ट्रभक्तीच्या संदेशांची मोठ्याप्रमाणात आदान-प्रदान केली जाते , समाज माध्यमांवर स्टेट्स , स्टोरी , पोस्ट केल्या जातात , चौका-चौकात रांगोळ्या काढून देशभक्तीपर गीते लावली जातात. परंतू नंतर लगेच दुस-या दिवशी पासून हा जोम ओसरतो मग आपल्याच देशबांधवाला कसे लुबाडता येईल याचा विचार सर्वच भ्रष्ट नोकरदार, नेते, व्यवसायी करू लागतात. या भ्रष्ट आचरणाची प्रचिती सध्या देशावर आलेल्या कोरोना माहामारीच्या राष्ट्रीय आपत्तीत येत आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यावर गुणकारी अशा रेमडीसिवीर या इंजेक्शनची आवश्यकता रुग्णाला असते. परंतू या इंजेक्शनचा सध्या मोठ्याप्रमाणावर तुटवडा भासत आहे. देशावर , महाराष्ट्र राज्यावर सध्या कोरोनाचे भीषण सावट पसरले आहे. या अशा कठीण परिस्थितीत मात्र कोरोना विषाणूवर उपयुक्त असलेल्या रेमडीसीवर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. ग्राहकांना हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून मूळ किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत आहे. या इंजेक्शनची मूळ किमंत ही 1200 रुपये असून ते 4000 पेक्षाही जास्त किमतीत विकल्या जात आहे. हेच इंजेक्शन पिंपरी येथे 11000 रुपयात विकतांना काही जण पकडल्या गेले आहेत. ठाणे येथे सुद्धा काही काळा बाजार करणा-यांना पकडले आहे. महाराष्ट्रात इतरही अनेक ठिकाणी असे होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देश सध्या भीषण संकटातून जात आहे. राष्ट्रीय आपत्ती आहे. कोरोनामुळे नोक-या गेल्या आहेत, लोक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत , रोग्यांची मानसिक स्थिती सुद्धा ढासळते आहे , नातेवाईकांवर मोठे दडपण आले असते. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा हा:हाकार माजला आहे. काल अहमदनगर येथे एकाच वेळेस 42 अंतिम संस्कार करण्यात आले. लोक हवालदिल झाले आहेत. ही अशी स्थिती असूनही या लोकांना स्वत:च्या तुमड्या भरणे सुचते आहे. राज्य व देशावर ही आपत्ती ओढवली असतांनाही हा असा काळाबाजार सुरु आहे. संकटात सुद्धा या भ्रष्ट व्यवसायिकांना लुबाडणूक सुचते आहे. एखाद्याचा नातेवाईक जर दवाखान्यात भरती झाला तर सर्व कुटुंब हवालदिल होते. नातेवाईक बिचारे औषधपाणी , घरची कामे , कामाचा व्याप सांभाळून मेटाकुटीला येतात . त्यांच्यावर काय ताण-तणावा असेल , काय परिस्थिती असेल याचा विचार इतर कुणीही करू शकत नाही. कोरोना हा संसर्गातून पसरत असल्याने आता तर कुणाला मानसिक आधार देण्यास सुद्धा जाता येत नाही. या सर्व परिस्थितीचा विचार या अशा काळाबाजार करणा-यांच्या मनात येत नसावा काय ? हे असे मरणाच्या दारात असलेल्या रूग्णाकडून पैसे उकळून काय मिळवणार आहेत हे नतद्रष्ट ? असे पैसे कमावून हे काय अँटीलिया सारखी ईमारत उभी करणार आहे काय ? कुठे घेऊन जाणार आहेत हे पैसे अरे “तुम्हारे महल चौबारे , यंही रह जायेंगे सारे “ याचे तरी भान ठेवा. कुठून आपल्या तिजोरीत जास्त पैसे येतील सतत हाच विचार या अशा काळाबाजार करणा-यांच्या मनात येत असावा. मार्ग कोणता का असेना मला जास्त पैसे मिळाले पाहिजे मग “कोई जिये या मरे क्या हमको बाबू“, या ओळींप्रमाणे यांची वृत्ती होते. सरकारी धान्य असो, औषधे असो , गुटके असो , अंमली पदार्थ असो कसा काळाबाजार करता येईल व आपल्या तुमड्या कशा भरता येतील याचाच जणू यांनी ध्यास घेतला आहे. देशातील गरीब जनतेची पिळवणूक होते व हे असे काळाबाजार करणारे धनदांडगे होतात. धनाच्या जोरावर हे आणखी काळी कामे करू लागतात. यांच्या धनामुळे हे प्रसंगी सत्तेलाही झुकवू पाहतात. संपूर्ण जगातच ही अशी काळाबाजार करणारी एक मोठी जमात आहे जी गरीबांची पिळवणूक करून गबर होत चालली आहे. यांना रोखण्यासाठी कडक शासन तर हवेच शिवाय उच्च नैतिक मुल्यांची शिकवण बाल्यावस्थेपासून देणे जरुरी आहे. या जगातील उदंड होत चाललेला काळाबाजार, कोरोना महामारीतही होत असेलली लुबाडणूक हे पाहून “ये दुनिया है कालाबाजार” असे जे कुण्या कवीने म्हटले आहे ते वास्तव आहे असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा