तडफडून मरणारे जीव आणि नाकर्ते शासन
महाराष्ट्रात हे काय सुरु आहे.जगभरात कोरोना महामारी सुरु आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या दुस-या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णालये भरली आहेत , औषधांचा मोठा तुटवडा व काळाबाजार सुरु आहे. सत्ताधारी व विरोधक हमरीतुमरी वर येऊन भांडत आहेत. बोगस कोरोना रुग्णालये , बोगस डॉक्टर गल्ले भरून घेत आहेत. लॉकडाऊन , लॉकडाऊन करता करता मुख्यमंत्री लाइव्ह येण्याची हौस भागवून घेतात व लॉकडाऊन साठी दोन-दोन दिवसांची मुदत वाढवून घेतली. नेत्यांच्या घरी जाऊन लस टोचली जात आहे तर काही नेत्यांचे नातेवाईक वयाच्या मर्यादेचे बंधन तोडून लस घेत असल्याची वृत्ते येत आहे. जनता कोरोनाच्या , मृत्यूच्या सावटाखाली वावरत असतांना नेते मात्र स्वत:च्या पात्रात बरोबर तूप ओढून घेत आहे. दिशा सालीयानी , सुशांत सिंग यांची हत्या की आत्महत्या , रक्षकच भक्षक होत चालले असल्याचे शंभर कोटींची वसुलीचे प्रकरण , भंडारा अग्नितांडव , सरनाईक इडी चौकशी , संजय राऊत यांच्या पत्नीची इडी चौकशी अशा घटनांवर हळू-हळू पडदा पडत आहे किंवा योजनाबद्धरित्या पडदा टाकल्या जात आहे . या सर्व प्रकरणात मौन साधून उद्धव ठाकरे यांनी मौन साधण्यात मनमोहनसिंग यांचा विक्रम मोडला आहे. यातच काल नाशिक येथे झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू गळतीची घटना होऊन योग्य दाबाने प्राणवायू न मिळाल्याने 20 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिकची ही घटना सरकारची व सरकारी यंत्रणांची नाचक्की करणारी घटना आहे. कोरोना रुग्णांसाठी तत्परतेने सोयी उभारण्याचा प्रत्यन केला जात आहे ते योग्य सुद्धा आहे. परंतू तत्परतेने ही कामे करतांना त्या कामाची गुणवत्ता तपासली जात आहे की नाही ? त्यात कुठे पाणी मुरते आहे का ? साधनांची गुणवत्ता चांगली आहे का ? साधने पुरवणारे कंत्राटदार , जोडणी करणारा कंत्राटदार योग्य पद्धतीने कामे करीत आहेत की नाही ? की नजराणे मिळाल्यावर काहीही तपासले जात नाही व कशी तरी कामे उरकली जात आहे ? नाशिक येथील घटनेबाबत मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांनी शोक प्रकट केला आहे. परंतू आधी भंडारा , आता नाशिक आणखी असे किती घटनांवर शोक व्यक्त करणार आहे सरकार ? मुख्यमंत्री महोदय आपले सरकार केवळ शोकच व्यक्त करणार की रुग्णालयात आग , प्राणवायू गळती सारखी कालची घटना या घटनांना जबाबदार कोण आहे याची शहनिशा करून त्यांना कठोरात-कठोर शासन सुद्धा करणार ? भंडारा रुग्णालयातील अग्नि तांडवास जबाबदार कोण ? त्याची चौकशी कुठपर्यंत आली हे काहीही अद्याप पुढे आलेले नाही ? नाशिक येथील घटनेबाबत नाशिक महापालिका व सरकार अशी दोघांनीही मदत जाहीर केली आहे. ते योग्यच आहे. परंतू गेलेले जीव परत येतील का ? मृतकांच्या आप्तांची न भरून निघणारी हानी तुमच्या आर्थिक मदतीने कदापीही भरून निघणार नाही. महाराष्ट्रात योग्य उपचारा अभावी अनेक कोरोना मृत्यू झाले आहेत , भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात बालकांवर अकारण मृत्यू ओढावल्या गेला होता. काल नाशिक येथे सुद्धा प्राणवायू गळतीमुळे अनेक परीवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कित्येक कोरोना रुग्णांचा रुग्णालयात सोयी नसल्याने , प्राणवायू उपलब्ध नसल्याने , रेमडीसिवीर सारख्या इंजेक्शनचा व इतर औषधांचा काळाबाजार होत असल्याने झालेल्या अनुपलब्धत्यामुळे सुद्धा मृत्यू होत आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक आत्महत्या सुद्धा होत आहेत. या आत्महत्येची कारणे सुद्धा कोरोना मुळे रोजगार , आर्थिक चणचण , मानसिक तणाव हे असण्याची दाट शक्यता आहे. या काळात खरे तर शासन गरीब जनतेला दिलास देत आहे , धीर देत आहे, केवळ बोलघेवडेपणा न करता योग्य ते निर्णय झटपट निर्णय घेऊन कार्यक्षम असल्याचे चित्र दिसणे अपेक्षित आहे परंतू याच्या अगदी उलट चित्र आहे लोक तडफडून मरत आहेत , महामारीच्या काळातही भ्रष्टाचार व काळाबाजार अशी प्रकरणे घडत आहेत. सरकार जरी कसे-बसे टिकून असल्याचे दिसत असले तरी मंत्री सहकारी पक्षातील आमदार हे आपल्याच पक्षातील नेत्याची, मंत्र्यांची वक्त्यव्ये खोडत असतांना दिसत आहे त्यांना घरचा आहेर देतांना दिसत आहे.. वरवर जरी सरकार दिसत असले तरी भ्रष्टाचार , काळाबाजार , तडफडून मरणारे जीव जातांना पाहून हे शासन नाकर्ते असल्याचे जनतेला स्पष्ट झाले आहे.
खरोखरच जनतेच्या भावनांचा खेळ खेळल्या जात आहे.खूप छान लेख
उत्तर द्याहटवा