प्रा सुमंत टेकाडे:- एका शिवदीपस्तंभाचे जाणे
आज सकाळी प्रा सुमंत टेकाडे निवर्तल्याची तीव्र क्लेशदायक अशी बातमी समाज माध्यमाव्दारे कळली. वर्ष 2019 मध्ये खामगांव येथील टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सवा निमित्त सुमंतजी टेकाडे हे खामगांव येथे व्याख्यान देण्यास आले होते. टेकाडे यांची दर रविवारी तरुण भारत पुरवणीत प्रकाशित होणारी शिवदीपस्तंभ ही शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दलची लेख मालिका त्यावेळी वाचत होतो. त्यामुळे सुमंतजी यांच्या व्याख्यानाला जायचेच असे ठरवले होते व गेलो होतो. काय आवेशपुर्ण व्याख्यान होते ते. त्या वक्तादशसहस्त्रेशु अशा सुमंतजीनी श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले होते. प्रत्येक व्याख्यानानंतर ते शिवाजी महाराजांचा जयघोष करीत असत, शिवाजी महाराज दरबारात येतांना त्यावेळी जी मानवंदना दिल्या जात असत ती सुद्धा जशीच्या तशी अशी ते आवेशात देत असत. आजही त्यांची अनेक व्याख्याने त्यांच्या youtube चॅनलवर आहेत. अनेक तरुणांचा त्यांच्या या चॅनलला उदंड प्रतिसाद आहे. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना मोठा आघात पोहोचला आहे. त्यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या अनेक स्मृती तरळून गेल्या. खामगांव येथील व्याख्यानानंतर मी त्यांचेशी जुजबी असे संभाषण केले होते. त्यांनी अत्यंत मधुरभाषेत व विनम्रपणे सर्वांशी संवाद साधला होता. पुढे त्यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संवाद साधला होता. त्यांच्या व्याख्यानाबद्दल “कर्णतृप्त करणारे व्याख्यान” असा लेख लिहिला होता. तो त्यांनी वाचल्यावर आनंदाने मला आभार प्रकट करणारी प्रतिक्रिया पाठवली होती. व्याख्यानातील मुद्दे लेखात वाचल्यावर त्यांना खुप चांगले वाटल्याचे त्यांनी कळवले होते. मग त्यांचेशी अनेकदा संवाद होत गेला. कवि भूषण बद्दल त्यांनी लिहिलेल्या लेखावर मी पुनश्च लिहिल्यावर ते सुद्धा त्यांना आवडल्याचे त्यांनी कळवले होते. “राष्ट्रीय विचारावर लिहित रहा” असा सल्ला त्यांनी दिला होता. गत वर्षी त्यांनी “कोरोना विरुद्ध हर हर महादेव” अशी एक चित्रफित सुद्धा प्रसारित केली होती. तरुण भारत मध्ये आलेला माझा “भ्रमरहित पार्थ” हा लेख सुमंतजी यांनी पेपर प्रकाशित झाल्यावर रात्रीच मला पाठवला होता. नुकताच प्रभू श्रीराम विशेषांक “रामार्पण” यात सुद्धा माझा लेख आल्याचे त्यांनीच अंकाच्या अनुक्रमणिकेचे पान पाठवून मला सर्वप्रथम कळवले होते. अभ्यासू , व्यासंगी , चतुरस्त्र असे ते होते. अल्प अशा परिचया नंतर पुढे सुमंतजी व माझा संपर्क दृढ झाला होता. त्यांचे येणारे व्हिडीओ , कार्यक्रम यांची माहिती ते आवर्जून कळवत असत. एकदा त्यांच्या एका ऑनलाईन कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. प्रश्नोत्तराच्या वेळी माझा व्हिडीओ बंद होता पण मी प्रश्न विचारणे सुरु करताच “विनयजी बोला” असा त्वरीत प्रतिसाद त्यांनी मला दिला होता. एवढे मोठे वक्ते , लेखक , शिवचरित्राचे गाढे अभ्यासक , मोटीव्हेशनल स्पिकर असूनही ते तितकेच विनम्र होते. आता काही दिवसांपूर्वी मला शिवाजी महाराज यांच्या मुस्लिम अधिका-यांची भली मोठी नांंवे असलेला एक संदेश आला असता मी मार्गदर्शन म्हणून सुमंतजींना विचारले होते. त्यावर शिवाजी महाराज यांच्या एकूण 95 अधिका-यांमध्ये केवळ 2 मुस्लिम असल्याचे त्यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे सांगतिले होते. शिवाजी महाराजांचे वास्तववादी चित्रण ते आपल्या व्याख्यानातून करीत असत , शिवाजीराजांच्या ज्या गोष्टींचे पुरावे उपलब्ध आहेत त्याच बाबींचा उल्लेख ते आपल्या व्याख्यानातून करीत असत. काळाने असा वक्त्तादशसहस्त्रेशु हिरावून नेल्यामुळे प्रचंड अशी सामाजिक हानी झाली आहे. त्यांची अमोघ वाणी अनुभवाला आली , त्यांनी केलेले लेखन वाचनात आले हे त्यांच्या तमाम चाहत्यांचे भाग्य आहे. हे काही जाण्याचे वय नव्हते. आज सुमंतजी जरी देह त्यागून गेले असले तरी त्यांच्या अनेक दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमाने ते आपल्यातच आहेत. तरीही त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांची व त्यांच्यावर प्रेम करणा-या अनेकांची न भरून निघणारी अशी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो. भरकटलेल्या जहाजांना जसे दीपस्तंभ किना-याची दिशा दर्शवितो तसे आपल्या लेखणी व वाणीतून तरुणांना व समाजाला शिवाजी महाराजांचे गुण व त्यांंचा प्रेरणादायी असा इतिहास सांगून दिशा दाखवणा-या प्रा सुमंत टेकाडे या शिवदीपस्तंभास ही शब्द सुमनांची श्रद्धांजली.
🙏🏼💐
उत्तर द्याहटवाया महान वक्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा